अहो, शौनक आलाय बहुतेक बाहेर गाडीचा आवाज ऐकला आता आणि तीच हॉर्न देण्याची पध्दत. सलग आठ वेळा वाजवतो. रागाने डोळे वटारले तर म्हणतो आजोबांना हॉर्नरूपी तोफांची सलामी असते ती. करा अजून त्याचं कौतुक. ही बागेतूनच घराच्या दिशेने मोठ्या आवाजात बोलून गेली. मी देवपूजा करण्यात गर्क होतो. तरीही मनांत विचार आला की हा पठ्ठ्या खरं म्हणजे दोन दिवसांनी येणार होता. काही गडबड तर नाही ना झाली. पूजा संपायलाच आली होती. मी निरांजन लावून देवापुढे ओवाळून नेहमीच्या जागी ठेवून खुर्चीवरून उठलो. बाहेरच्या दिवाणखान्यात येतो तो काय शौनक आणि किमया पोर्चच्या पायऱ्या चढून आतच येत होते.
"आबा असं म्हणत औनक मला येऊन बिलगला आणि हळूच कानांत बोलून गेला. त्या धबधब्याच्या पाण्यात आम्ही दोघेही चिंब भिजलो' हे ऐकून मी सुटकेचा निःवास टाकला.
बिलगलेल्या शौनकला पुढ्यात उभा करून मी विचारले, पण तू आणखी दोन दिवसांनी येणार होतास ना, मग अचानक आजच कसा काय आलास ?
शौनक ऐवजी किमयानेच माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले. ती म्हणाली, आजोबा काल रात्री सिनियर्सचा फोन आला होता की पुढच्या आठवडयात होणारी एक मिटिंग काही कारणाने उद्या ठेवली आहे. त्यामुळे आम्हाला परत यावं लागलं. शौनक थोडा हिरमुसला होता पण काय करणार? उद्याच्या मिटिंगमध्ये माझंच मुख्य प्रेझेन्टेशन आहे त्यामुळे नाईलाज होता."
दोघांनीही मला वाकून नमस्कार केला. नमस्कार करताना किमया मला म्हणाली, थॅंक्यु आजोबा', मी तिला आशिर्वाद देऊन विचारले त्याबद्दल. त्यावर ती म्हणाली ," शौनकने मला सगळं सांगितलंय. हे सांगून तीच्या सासू सोबत स्वयंपाक घरात पळून गेली. शौनकच्या चेहऱ्यावरचं समाधान मला बरंच काही सांगुन गेलं. त्याला मी म्हणालो आता हे कायमचं लक्षांत ठेव म्हणजे झालं. तु बस थोडावेळ मी आलोच पुजेचं सोवळं बदलून, असं म्हणून मी माझ्या खोलीत गेलो. कपडे बदलून मी बाहेर आलो तर शौनक बंगल्याच्या आवारात असलेल्या बागेत डोकावलेला दिसला. झोपाळ्यावर बसून मी आजचा पेपर वाचायला घेतला खरा पण डोळ्यांसमोर दोन आठवड्यांपूर्वी खिन्न मनाने भेटायला आलेला शौनक आठवला.
😔😔😔😔😔
त्या दिवशी ही मार्केटला गेली होती तेव्हा शौनक अचानक घरी आला. त्याचा चेहरा बघून मी काळजीत पडलो. त्याला पाणी प्यायला दिलं आणि नंतर जरा शांत झाल्यावर त्याने त्याचं मन मोकळं केलं. आजोबा हल्ली मला आणि किमयाला एकमेकांशी बोलायला देखील वेळ नसतो. ती ऑफिस मधून आल्यावर देखील तिथे फोन्स सुरू असतात. लॅपटॉप तिला उघडायलाच लागतो. डोळे त्यात खुपसलेले आणि कान मी बोलत आहे ते लक्ष्य देऊन ऐकत असतात. एकमेकांच्या सहवासात काही मिनिटे शांतपणे घालवता येत नाहीत. आजोबा कुठेतरी काहीतरी चुकतंय माझं. प्लीज मला ह्यातून बाहेर पडायला मदत करा तुम्ही. असं म्हणून शौनकने चक्क माझे दोन्ही हात पकडले. प्रकरण गंभीर जरूर होतं पण शांतपणे विचार केला तर त्याचं सोपं उत्तर शौनकला नक्कीच मिळालं असतं. पण आजच्या पिढीचा हा स्वभाव झाला आहे की सगळे झटपट हवं असतं आणि ते नाही मिळाले की त्याच वेगाने ते निराश देखील होतात. उत्तर त्याला मी पटेल अशा भाषेत दिलं आणि लढाई जिंकल्याचा आनंद झाल्यागत त्याचा चेहरा खुलला. मी त्याला म्हणालो," शौनक तुमचं लग्न होऊन जेमतेम वर्ष झालं आहे. आताशी कुठे तुम्ही एकमेकांना बऱ्यापैकी समजून घ्यायला लागला असाल. एकमेकांच्या आनंदाच्या आणि सुखाच्या गोष्टी काय आहेत ते मनापासून शोधत रहा. आयुष्याच्या रिसाॅर्टवर डोळ्यांतल्या आतुरतेचा, हातांच्या स्पर्शाचा, ओठांच्या हळूवारपणाचा आणि एकमेकांच्या सहवासाचा अखंड वाहणारा धबधबा असतो. त्या धबधब्याच्या पाण्यात तु जितका वेळ जास्त चिंब भिजत रहाशील तेवढी तुझ्या संसाराची गोडी अधिकाधिक वाढत जाईल. एकमेकांना भेटण्याची आणि समजून घेऊन जगण्याची आतुरता आणि उत्कटता तुला अधिक चांगल्या पद्धतीने लक्षांत येईल. परस्पर आदर प्रेम, विश्वास आणि सन्मान ह्या चार खांबांवर संसाराचं मंदिर शेवटपर्यंत ताकदीने उभं राहात. पुढच्या काही महिन्यात विकेंडला जोडून एखादी सुट्टी असेल तर अचानक गाडी काढून तिला घेऊन कुठेतरी शांत जागी घेऊन जा. तिथे तुमचे तुम्हीच असाल एकमेकांना सोबत. आणखी चांगल्या पद्धतीने एकमेकांना समजून घेता येईल तुम्हाला. तुझ्या पुर्ण वेळाच्या सहवासात वेगळीच किमया तुला बघायला मिळेल ह्याची खात्री आहे मला. दोन तीन दिवस मोबाईल आणि लॅपटॉपला सक्तीची विश्रांती द्या आणि मी सांगितलेल्या धबधब्यात चिंब भिजत रहा. तिथेच तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल जे तुला भविष्यात देखील उपयोगी पडेल. आज तुम्ही दोघंच आहात तेव्हा एकमेकांच्या सहवासात आयुष्य भरभरून जगा. आवडीचं खा प्या आणि बेधुंद होऊन जगण्याचा नवा रस्ता शोधा.
🌈🏃🌊🏖️😀❤️✅
एव्हाना शौनकच्या आवडीचा ब्रेकफास्ट तयार होण्याचा संदेश स्वयंपाकघरातून मस्त दरवळत बाहेरच्या दिवाणखान्यात यायला सुरुवात झाली. मी खिडकीतून शौनकला आत यायला सांगितले. मटार घालून केलेला गरमागरम उपमा त्यावर घातलेली बारीक शेव, डाळिंबाचे दाणे, वरून पेरलेली कोंथिबीर आणि त्यावर पिळलेली लिंबाची फोड. आत येऊन हात धुतल्यावर आजीच्या गळ्यात हात टाकून शौनक लाडात येऊन म्हणाला आजी थॅंक्यु यु सो मच. माझ्या आवडीच्या उपमा केल्याबद्दल. तितक्यात ही बोलून गेली. ओ राजे आजचा ब्रेकफास्ट मी नाही तर किमयाने केला आहे. त्यामुळे मला ज्या पद्धतीने शाबासकी आपण दिलीत त्याच पद्धतीने आमच्या समोर तिला दिलीत तर बरं होईल. ते ऐकून आम्ही सगळेच हसायला लागलो.
© सतीश बर्वे ✍️
०२.०६.२४.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा