ती होती तशी साधीच, काळी सावळी थोडी कृश, एका पायाने थोडी लंगडी पण देहाने काटक. कोणतंही काम हातात घेतले की न थांबता पूर्ण करूनच थांबणारी, एक आंबाडा, कपाळावर एक मोठ कुंकू, साधीशीच साडी आणि चेहऱ्यावर न उमगणारे एक हसू. मला वाटते त्या वेळेसच्या सर्व कष्टकरी बायकांचे ते एक प्रातिनिधिक असे एक ठळक रूप तिच्यात सामावलेले होते. शाळेत जायच्या वयापासून मी तिला पाहत आले होते. तशी तिची आणि माझी भेट अगदी अचानक पणे झालेली. मी नेहमीसारखीच शाळेत निघाले होते आपल्याच नादात इकडेतिकडे पाहत, रमतगमत. आता त्या वेळेसचा काळ म्हणजे तीस पस्तीस वर्षांपूर्वीचा त्यामुळे मुलांना स्कुलबस, स्वतः नेवून शाळेत सोडणे वैगरे असले लाड गावात तर अजिबातच नव्हते त्यामुळे फक्त मुलांना झोपेतून उठवून दूध किंवा चहा जे असेल ते पाजवून शाळेत जायला दोन थपडा मारून तयार करणे हे आद्यकर्तव्य केले की पालकवर्गाची इतिकर्तव्यता होत असे. असो.
त्या दिवशी मी पण अशीच रमतगमत रिबिनीचे एक टोक तोंडात चघळत गोडचिमणीच्या झाडाकडे आशाळभूत नजरेने पाहत, खाली पडलेली गोडचिमणी व पुंगीचे फुल ओच्यात भरत शाळेत माझी वरात निघाली होती आणि तेवढ्यात भोsss भोssss असा आवाज करत एक जीप कुठनशी आली त्या आवाजाने मी एकदम गोंधळले आणि घाबरून मोठयाने ओरडले. त्या ओरडण्याने का अजून कशाने माहिती नाही ती जीप करकचून ब्रेक दाबून थांबली आणि आतापर्यंत रस्त्यावरची कोठे कोठे लपून बसलेली माणस एकदम धावत आली, त्या माणसामध्येच ती पण होती. आता एवढ्या सगळ्या माणसाची गर्दी व तो जीपवाला जाडजूड मिशिवाला माणूस बघून मी मोठयाने भोकाड पसरले, कालच तर आईने त्या पोर पळवून नेणाऱ्या माणसाची गोष्ट सांगितली होती तीच आठवली मला, तोच पोर पळवून नेणारा माणूस रूप बदलून जीप घेऊन मला पळवून नेण्यासाठी आला अस वाटून मी जमिनीवर फतकल मारून भोकाड पसरले व तिथे एकच गलका सुरू झाला, आता छोटस गाव आमचं तिथे सगळेच एकमेकांना ओळखत होती त्यात मी तिथल्या प्रतिष्ठित घराण्यातील त्यामुळे आम्ही गावात फेमस का काय म्हणतात तसे. मी भोकाड पसरून रडतेय व ती गर्दी नुसतीच बडबड करत होती व त्या जीपवाल्याला काही तरी बोलत होती तो जाडजूड माणूस एवढासा चेहरा करुन ऐकून घेत होता, तेवढ्यात ती सरसावली मला जवळ घेत म्हणाली
"अय्यो पाप ! लेकरू पडलं की भाड्या, कूट बघून मोटार चालवत होतास र..!?
आणि माझ्या चेहऱ्यावर हात फिरवत, बोट मोडून म्हणाली,
"चला अम्मा, तुम्हाला घरी नेवून घालते, लागलं नवं तुमाला"
आमच्या गावाकडे तेलगु बोलणारी माणस खूप. काही तरी एनडु गुंडू बोलत असायची काही कळायचं नाही ती पण त्या गाडीवाल्याला तेलगुतून बोलत मला उठवून हात पकडून माझा अनमोल ऐवज स्वतःच्या ओच्यात गोळा करून मला घेऊन घरी निघाली. मला तर ती एका देवदूतासारखीच वाटली एक तर शाळा बुडाली व माझा ऐवज सहीसलामत मला वापस मिळाला होता. अशी आमची वरात तिच्या हातात हात घालून घराकडे निघाली. ती रस्ताभर काही तरी बोलत होती. मधेच एखादा तेलगू शब्द तो मला कळत नव्हता पण तिच्या थोड्या जाड्या भरड्या आवाजात माया मात्र ओतप्रोत होती आमचं वेंधळे ध्यान तिच्या अंगावरील मोठ्या मोठ्या लाल फुलांच्या साडीकडे मोठ्या कुतूहलाने पाहत निघाले होते. हीच माझी व तिची पहिली भेट. घरी गेल्याबरोबर तिने दरवाजातूनच माझ्या आईला हाक मारली व ती दरवाज्यातच थांबली,
तिची हाक ऐकून आई बाहेर आली..
"काय ग पीरा? एवढ्या मोठयाने कशाला हाक मारत आहेस?"
मला प्रथमच तिचे नाव कळले, तिचे नाव ऐकूनच मला फसकन हसू आले. पीरा...
"बघा ना अम्मा. आज टून्नू बाय गाडीखाली येत व्हत्या ना. म्या तिथूनच चालले व्हते म्हणूनशान बगीतल व लागोलाग घराला घेवून आले."
मला आता तिचा खूप राग आला एवढं छान 'माधवी' नाव असताना तिने मला 'टून्नू' म्हणण्याचा. मी आईला पण खूप वेळा सांगितले होते मला 'माधवी' म्हणत जा म्हणून पण हे मोठे लोक लहान मुलांचे अजिबात ऐकत नाहीत. आता आईचे लक्ष माझ्याकडे गेले. तिने माझ्याकडे निरखून पाहिले व सिटी स्कॅन केल्यासारखे मला जवळ घेवून म्हणाली.
"लागलं नाही ना कुठे?"
मी इकडून तिकडे म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे अशी मान हलवून नाही असं सांगितले,
"मग काय मातीत लोळून आलीस का? जा कपडे बदल"
इति आई.
मी पीराच्या ओच्यातील माझा ऐवज ताब्यात घेतला व घरात पळत पळत शिरले. अशा रीतीने पीराची एन्ट्री आमच्या घरात कायमचीच झाली म्हणजे आईने तिला घरकामासाठी ठेवून घेतले ती आमच्या घरात आली व कुटुंबातील एक सदस्यच झाली. दररोज सकाळी ती यायची, भांडे घासणे, वरची काम, झाडझुड इत्यादी इत्यादी. तिची एक सवय होती मूडमध्ये असेल तर आपल्या जाड्या आवाजात नाकातून छान छान तेलगुतून गाणं म्हणायची तिचे ते बोल कळायचे नाहीत पण ते गाणं ऐकावे असे वाटायचे, आम्ही बहिणी कितीदा तरी तिला गाणं म्हणायला लावायचो. दर रविवारी ती मोठं घमेलभर पाणी तापवायची व आम्हाला कढत कढत पाण्याने शिकेकाई चोळून चोळून त्या निबर झालेल्या पण मायेचा ओलावा असलेल्या हाताने डोक्यावरून नाहू घालायची अगदी नाकातोंडात शिकेकाई जाईपर्यंत. ही प्रथा अगदी आम्ही मोठं होईपर्यंत कायम होती अगदी मोठं झाल्यावर पण कधी कधी ती नाहू घालायची. जशी जशी मोठी होत गेले तशी तिच्याबद्दल बरच काही कळत जात होते. पीरा लहान असतानाच तिला पोलियो झाला व तिचा एक पाय अधू झाला होता त्यामुळे तिच्या वडिलांनी तिच्यासारख्या अधू मुलाशी तिच्यापेक्षा वयाने पंधरा वर्षे मोठया जो मासे पकडत होता त्याच्याशी लावून दिले होते. तिची मुलं लहान असतानाच देवाघरी गेली व पस्तिशी नंतर एकच मूल नवसाने वाचले म्हणून अत्यंत लाडात त्याला तिने वाढवले. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. वाईट संगतीने व लाडाने त्याला पण लहान वयातच नको नको ते व्यसन लागले. नवरा दारुडा मनात आले तर घरी पैसे द्यायचा नाही तर हिलाच मारून हिच्याकडून पैसे घेवून दारू प्यायचा. दर दोन तीन दिवसांआड तो तिला मारायचा. एकदा मी तिला बोलले ,
"एवढा मार का खातेस तू त्याचा, सोडून दे त्याला, नाही तरी तुझ्याच पैशांवर तर तो मजा मारत आहे"
तर ती हसून बोलली.
"कूट जाणार मी? बाप व भाऊ पण दारुडा, माज्या जाण्यामुळे माज्या आईला मातर तरास व्हईल. तीच बिचारी कसतरी देवा देवा मनुन दिवस ढकलती आणि तुमाला सांगते बाई, हे कुकु हाय म्हणून कपाळाला सोभा हाय बगा, एकदा का नवऱ्याचा हात सुटला की रस्त्यावरच कुत्र पण आपल्याकडे बगून तंगडी वर करतय. लय वंगाळ जीन बाई बाईमाणसाचं." बोलता बोलता तिने नेमके समाजातील बाईच्या स्थानाचे कटू सत्य सांगितले.ती शिकलेली नव्हती पण पोथ्या पुराणाचे तिला ऐकून ऐकून ज्ञान होते. तिच्या गाण्यातून स्त्रियांवरील अन्यायाचे बोल काळजात झिरपत जात. एकदा रात्रीचे दहा वाजले असतील, एकदम कडी वाजण्याच्या आवाजाने मी बाहेर गेले तेंव्हा काही तरी मी बारावीत असेन, अभ्यास करत होते आणि ते लहान गाव रात्री आठलाच जिकडे तिकडे सामसूम होत असे आणि दहाला दरवाजा वाजला की छातीत धस्स झाले.
"कोण आहे."
"टून्नू बाय मी पीरा...दरवाजा उगडा"
"तू एवढया रात्री, काय झाले?"
असे म्हणतच मी दरवाजा काढला तर पीरा अंगावरची साडी अर्धवट फाटलेली, कुंकू ओघळलेले, चेहऱ्यावर अंगावर माराचे वळ. केस अस्ताव्यस्त व सोबत तिचा लहान मुलगा अस तीच रूप पाहूनच मी हादरले. तेवढ्यात आई आली, आईला बघताच ती आईच्या गळ्यात पडून रडू लागली. आईने तिला शांत केले. प्यायला पाणी दिले तिच्या मुलाला व तिला पहिले जेवायला घातले नंतर विचारले,
"काय सांगू बाई, भाड्या दारू पीत व्हता. मारत व्हता ते सहीन करीत होते पण आज एका बाईला घरी घेऊन आला. आणि मला मारूनशान घराबाहीर काडल. लय मारलं बगा, म्या नाई मनलो तर. आता ऐवड्या रातीच कूट जाऊ मनुन तुमच्याकडे आलो."
आईने तिला हळद आणि तेल लावले आणि ओसरीवर झोपायला दिले. नंतर आई व ती बराच वेळ बोलत बसल्या होत्या. त्यांचं नात आता फक्त एक मोलकरीण व मालकिणीचे न राहता एका स्त्रीचे दुसऱ्या स्त्रीशी असणारे एकाच जातकुळीतील त्या पोरक्या भावनेशी साधर्म्य साधणारे झाले होते. दुसऱ्या दिवशी मी उठले त्याच्या आधी ती उठून बाहेर सडा टाकत काही तरी गुणगुणत होती, मला आश्चर्य वाटले. आदल्या दिवशी एवढे रामायण घडूनही ती आता ताजीतवानी होती. मी तिला विचारले,
"कशी आहेस पीरा.."?
"छान हाय बाय..."
"अग ! कशाला काम करतेस? राहु दे आजच्या दिवस."
"ते तर बगा रोजचंच झालय मला. आता मार नाही खाल्ला तर झोप येत नाई बगा आता."
ती हसत हसत म्हणाली. ती हे म्हणाली खर पण त्या आवाजातील वेदना शब्दातीत होती आणि ती पुन्हा कामाला लागली. मी पण सर्व आवरून कॉलेजमधे गेले. संध्याकाळी घरी आले तर पीरा गेली होती, मी आईला विचारले,
"आई ! पीरा कुठे आहे?"
"अग ती घरी गेली आपल्या."
"अग ! अस अचानक, आणि ती दुसरी बाई."
"तिला त्या शिवाय गत्यंतर नाही ग..! कुठे जाईल लहान पोराला घेवून. माहेरी थारा नाही. रस्त्यावर राहू शकत नाही. आता राहते म्हणाली पोराला घेवून त्याच घरात एका कोपऱ्यात."
मी अतिशय सुन्न झाले आणि कुठूनतरी माझ्या कानावर सूर येऊन आदळले.
"सर्वस्व तुजला वाहूनी, माझ्या घरी मी पाहुणी."
असच तर तिच्या बाबतीत घडलं होत. जे घर तीन स्वतःच्या कष्टावर उभं केले होते. त्या घरात तिची जागा फक्त एका दयेच्या कोपऱ्यात होती.स्वतःचे होते नव्हते ते किडुकमिडुक विकून तिने दोन खोपटाच घर बांधले होते. आईकडून काही रक्कम घेतली होती त्यासाठी. ते पैसे ती अजून फेडतच होती. घर बांधून झाले तेंव्हा मोठी पूजा केली होती आम्हाला पण जेवायला बोलवले. मी व मधली बहीण गेलो होतो. तेव्हा खूप आनंद झाला होता तिला. दोनच खोपटाच घर पण महाल असल्यासारखा तिच्या तोंडावरून आनंद पसरला होता. आम्हाला दोन्ही खोल्या दाखवल्या व आम्हाला घोंगडीवर बसवून घरातील अन्न शिजवून घातले होते. तिचा तो फुललेला चेहरा मनात घट्ट घर करून अजून बसला होता आणि आज त्याच घरातून तिला बाहेर काढले होते. मलाच खूप राग आला, कशाचा माहीत नाही पण मी खूप चडफड व चिडचिड केली आईवर. तिलाच बोलले,
"तू तरी कशाला जाऊ दिलेस तिला? आता कशी राहील तिथे ती. मुळात तिला जावंच कस वाटलं? काय गरज होती तिची, काम करून पोट भरत होती ना स्वतःची? मग? राहिली असती ना अशीच तर निदान रोजचा मार तरी वाचला असता तिचा."
आई माझ्याकडे बघून हसली, व मला जवळ बोलवत हात धरून स्वतःच्या जवळ बसवत म्हणाली,
"हे बघ उगाच चिडचिड करू नकोस. ती इथे जरी राहिली असती तरी तिची ओढ कायम घराकडे राहिली असती. तिचा नवरा दर दोन दिवसाने येवून हक्काने पैसे घेवून गेला असता आणि अग आपण बायका ग !, अशाच तर असतो. थोडे ही आपल्या मायेच्या माणसाने गोड बोललं की पघळणाऱ्या. सर्वस्व वाहून देणाऱ्या, अगदी आपल्या पदरात काहीही शिल्लक न ठेवता सर्व काही उधळून देणाऱ्या. आपलं घर, नवरा ह्यातच रमणाऱ्या. भले मग तिथे आपली काहीही जागा नसली तरी तिथेच लुडबुड करत आपला हक्काचा एक कोपरा तयार करण्यासाठी अख्खे आयुष्य पणाला लावतात. ही सर्वच सर्वसामान्य स्त्रीची कथा आहे. मग पीरा कशी वेगळी असणार? हं आता काही काही जणी धाडस करून उंबरठ्या बाहेर पाय टाकतातही पण काही जणी यशस्वी होतात आणि काही एकाकीपणे आयुष्याशी लढा देत आपलं जीवन नातेवाईक किंवा स्वतःच्या अस्तित्वाशी तडजोड करत घालवतात."
मला आईचे म्हणणे पुष्कळ पटले व बरेचसे पटले नाही पण मी शांत मात्र झाले.
आता पीराच्या आयुष्यातील दुसरा टप्पा तिच्या वयाच्या चाळीशी नंतर सुरू झाला होता. तरुणपणी साधारण जरी असली तरी ती उत्साही, बडबडी होती. आता मात्र ती बरीचशी मिटून गेली होती. जास्त बडबड नाही, गप्पा नाही. कामास काम करायची व शांत बसून राहायची. आजकाल ती आईकडून भाकरी वैगरे जास्तीच्या घेवून जायची का तर तिच्या सवतीला दिवस गेले होते आणि घरात कमवणारी ही एकटीच. नवरा पहिल्यासारखाच खविस बरा अस म्हणायची वेळ आणणारा. त्या दिवस गेलेल्या बाईला पण तो मारहाण करायचा. ती पण कधी कधी आमच्याकडे हळूहळू कामाला येऊ लागली होती. आता दोघी मिळून घराचा गाडा ओढत होत्या. तिचे नाव लक्ष्मी होते. नाव जरी लक्ष्मी पण हाती कथिलाचा वाळा अशी गत होती तिची. तिच्यापण घरी आठराविश्व दारिद्र्य. ही दिसायला बरी, एका मुसलमान मुलाच्या नादी लागली. त्याने वापर करून फेकून दिले आणि पीराचा नवरा देवदूत म्हणून गेला व फक्त अंगावरील साडीनिशी त्याने हिला लग्न करून घरी आणले. तिच्या माहेरी आनंदच झाला. मग कसलीही चौकशी न करता वीस वर्ष मोठया असलेल्या पीराच्या नवऱ्याशी लग्न करून देऊन त्यांनी आपले कर्तव्य संपवले. अशी ही पीराची व लक्ष्मीची जोडी आता घरात रुळत होती आणि लक्ष्मीला मुलगी झाली तेंव्हा पण पीराने उसनपासण करून लक्ष्मीचे बाळंतपण पार पाडले, बारसं केले. असे दोन चार महिने निघून गेले व एक दिवस बातमी कळली लक्ष्मी कुणाचा तरी हात धरून मुलीला पीराच्या पदरात देवून पळून गेली. ती पळून गेली तर पीराच्या नवऱ्याने पीरालाच बदड बदड बदडली, हिच्यामुळेच लक्ष्मी बघर सोडून निघून गेली म्हणून. आता पीरा त्या छोट्या पोरीला घेवून आमच्याकडे कामाला येऊ लागली. मध्यंतरी तिच्या नवऱ्याचे लिव्हर खराब झाले त्यामुळे आता तो बराच वेळ घरीच बसून असायचा पण पीराला मारण बरचस कमी झाले होते. तिचा पोरगा ही थोडे फार पैसे हिच्या हातात ठेवायचा. हिने कधी चौकशी नाही केली तो पैसा कुठून आणतोय म्हणून. ती आता त्या छोट्या सावित्रीच्या बाळलीलात रंगून गेली होती.
असेच दिवस जात होते आता सावित्री मोठी होत होती. आईचंच रूप घेवून आली होती. आम्ही आमचे कपडे तिला वापरायला द्यायचो. दिवाळीत, सणाला आई तिला नवीन कपडे करायची. एक दिवस पीरा जात्यावर काही तरी दळत तेलगुतून गाणं म्हणत होती व सावित्री तिला साथ देत होती, मी पीराला त्या गाण्याचा अर्थ विचारला तेंव्हा तिने जे सांगितले ते ऐकून अंगावर काटा आला. गाण्याचा मतितार्थ असा होता...
"ह्या कपाळावर जो लालबुंद सूर्य प्रत्येक बाईच्या भाळावर उगवला आहे तो स्त्रीची अस्मिता, तिची वेदना, शोक
ह्यांचे जळजळीत प्रतीक आहे. ही रक्तरंजित खूण म्हणजे तिने दिलेला स्वतःच्या मनाचा शरीराचा बळी आहे. ती स्वतःच ह्या सुर्यरूपात अडकत जाते, मोहते आणि शेवटी एक अग्नीचा तप्त गोळा माथ्यावर वागवत धर्माचे पालन करत स्वतः स्वतःचे अग्नीला तर्पण देत नाही तोवर तिची ह्यातून सुटका नाही."
माझ्या लग्नात तिने व सावित्रीने खूप काम केले. मला पोटाशी धरून खूप रडली. तेंव्हा मला तिने जेव्हा मी मातीत फतकल मारून रडत बसले होते तेंव्हाही तिने असेच पोटाशी बिलगून घेतले होते त्याची आठवण झाली. नव्या नवलाईच्या माझ्या दिवसात वर्ष दोन वर्षे सरून गेली आणि मी एकदा माहेरी आले. असेच आईकडून लाड करून घेऊन मी लोळत होते तेंव्हा सावित्री कामाला आली. हातात चुडा, गळ्यात नवीन मंगळसूत्र. मला आश्चर्यच वाटले, सावित्री फक्त सोळा का सतरा वर्षाची होती.
"हे काय ग सावित्री? कधी लग्न झाले तुझे?" तर ती लाजत लाजत म्हणाली,
"ताई, महिना दीड महिना झाला असेल."
"अग पण तू शिकत होतीस ना? आणि पीरा कुठे आहे"
"त्या जेलमध्ये"
"काय..!?"
मी जवळ जवळ किंचाळलेच. मग आईने मला सांगितले, एक दिवस तिचा मुलगा काही माणसांना घरी घेवून आला व सावित्रीला विकण्याचा प्रयत्न केला तेंव्हा पीराने कोयता घेवून त्यांना प्रतिकार केला. त्या झटापटीत पीराने स्वतःच्या मुलाच्या मानेवर कोयता चालवला व सावित्रीला वाचवले. मग पीराच्या नवऱ्याने सावित्रीचे लग्न स्वतःच्या बहिणीच्या मुलासोबत लावून दिले. हे सर्व ऐकून मी शॉक झाले. आता पीरा गावच्याच तुरुंगात होती. मी व सावित्री तिला भेटायला गेलो, मला बघून ती हरखून गेली. आपले खरबरीत हात माझ्या गालावरून फिरवत होती, माझे मात्र डोळे गच्च भरले होते,
"रडू नका टून्नू बाय. मी येईन बाहीर. तस ही आता माज काय उरलंय? हीच लगीन झालं. पोरग गेलं त्याच्या गुणाने. नवरा पण सुकात हाय हिच्याकडे. मग माझी हाड इथं पडली काय, बाहेर पडली काय...सार सारकच."
मला बोलायलाच येईना,
"अग पण.."
"जे झालं ते बेस झालं. नाई तरी मरणारच होता त्यो, अफू खाऊन खाऊन माझा जीव घ्यायचा दररोज. पहिले नवरा मारायचा. आता पोरग मारायचं, कटाळून गेला होता जीव माझा."
"आणि बघा बाय. बाई जनमभर आपल्या इज्जतीला जपती आणि तो भाड्या स्वतःच्या बहिणीच्या अब्रूवर पैसे कमवायच बगत होता. मला सहन नाही झाले ते. घेतला कोयता व कापली मान. जनम दिला मीच व मीच जीव बी घेतला."
तिचा निरोप घेवून निघालो तेंव्हा सूर्य मावळतीला जात होता. आपल्या रंगबिरंगी छटानी आकाश भरले होते तो लालभडक गोळा क्षितीजाच्या पल्याड जात होता व मला डोळ्यासमोर कोयता घेवून स्वरक्षणासाठी व मुलींसाठी उभी टाकलेली पीरा दिसत होती.
©®माधवी देवळाणकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा