सकाळी नेहमी प्रमाणे कॉफी घेऊन आईंच्या खोलीत गेले. खांद्यापर्यंत पांघरूण घेऊन त्या शांतपणे झोपल्या होत्या. चेहर्यावर निरागस भाव होते. कॉफीचा कप बाजूला स्टुलावर ठेवून मी त्यांना उठवायला लागले. त्यांचे अंग मला थंडगार वाटले, श्वास बंद झाला होता. मी पटकन डॉक्टरांना बोलवले. त्यांचा इथला प्रवास संपल्याचे त्यांनी मला सांगितले. त्यांचा आणि माझा गेल्या पस्तीस वर्षांचा प्रवास देखील आज संपला होता. आधीच कल्पना आली होती पण डॉक्टरांनी सांगितल्यावर डोळ्यातून टचकन पाणी आले. तसे बघितले तर मृत्यूने त्यांची सुटकाच केली होती. गेली सात वर्षे त्या आजारी होत्या. बेड रिडन नसल्यातरी औषधें आणि डॉक्टरांच्या फेऱ्यांना वैतागल्या होत्या. वयाच्या पंचाहत्तरीपर्यंत त्यांनी डॉक्टर बघितला नव्हता पण शेवटची सात वर्षे नियतीने त्याचा संपूर्ण बदला घेतला होता. आंघोळ करतांना त्या बाथरूममध्ये पडल्या आणि हिपबोन मोडले. एका आधारवडाचा बुंधा निकामी झाला होता. त्यांच्या सुदृढ प्रकृती आणि डॉक्टरांच्या कौशल्यामुळे त्या लवकरच चालायला लागल्या पण आता वोह बात नही थी. दुपारपर्यंत सगळे पोहोचले. चार वाजेपर्यंत त्यांना नेले देखील. सहापर्यंत आलेल्या सगळ्या बायका देखील गेल्या. लेक म्हणत होती, चल माझ्यासोबत म्हणून, तिला जावेच लागणार होते, पण नाही गेले मी. मला कुठेही जावेसे वाटत नव्हते. पस्तीस वर्षे आम्ही सोबत होतो. मला आज ते सगळे आठवत होते.
मेजर अनिल मोडकची बायको म्हणून मी या घरात प्रवेश केला होता. माझे सासरे देखील लष्करात होते. अनिल चार वर्षाचा असताना ते युद्धात हुतात्मा झाले होते. तरीही त्यांनी अनिलला लष्करात पाठवले होते. पंचवीस वर्षांचा अनिल आणि वीस वर्षाची मी. आमचे गुलाबी दिवस सुरू होते. पहिली तीन वर्षे मी अनिलसोबतच होती. मृण्मयीच्या आगमनाची चाहूल लागली आणि त्या मला घरी घेऊन आल्या. प्रचंड लाड केले होते. मृण्मयीच्या आगमनाने घर आनंदात नाहून निघाले. त्यांना तर जणू खेळणेच मिळाले होते. बघता बघता मृण्मयी चार वर्षांची झाली. तिला पण आता एक भावंड हवे असा हट्ट त्यांनी धरला होता. त्या काळात पाकिस्तानसोबत युद्ध झाले. त्या युद्धात कोण जिंकले, कोण हारले ते मला अजूनही माहीत नाही. पण आम्ही तिघींनी आमच्यासाठी असलेली सगळ्यात प्रेशियस व्यक्ती गमावली होती. त्यांनी नवऱ्याला अग्नी दिला होता. नियतीने आता परत तीच वेळ माझ्यावर आणली होती.
त्यांचा आणि माझा खरा प्रवास इथून पुढे सुरू झाला. मी जेमतेम पंचवीसची होते. अनिल होता तोपर्यंत त्या चाळीतल्या लोकांची हिंमत नव्हती माझ्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची. पण अनिल गेला आणि चित्र पालटले. माझ्याकडे बघण्याची नजर आता बदलू लागली होती. एक दिवस संध्याकाळी मी घरी येत होते. त्या अंधाऱ्या जिन्यात कोणीतरी मला नको तिथे हात लावला होता. मी धावतच घरी आले आणि त्यांच्या कुशीत शिरून रडायला लागले. मृण्मयीला कळत नव्हते. नेमकं काय झालं आहे. त्या मला समजावण्याचा प्रयत्न करत होत्या. रात्री कधी त्यांच्या कुशीतच झोप लागली हे मला आजही आठवत नाही. सकाळ झाली आणि त्या मला आणि मृण्मयीला घेऊन निघाल्या. त्यांनी मला आणि मृण्मयीला कराटे क्लास लावला होता. माझ्यासाठी हा सायकोलॉजिकल बुस्ट होता. दोन वर्षात आम्ही दोघीही स्वयंसिद्ध झाल्या होतो. चाळीत हे कोणालाच माहीत नव्हते. अशीच एक संध्याकाळ, अंधारलेला जिना. पण यावेळी केस वेगळी होती. माझ्या अंगाजवळ आलेला हात मी धरला आणि त्याला माझे कौशल्य दाखवायला सुरवात केली. तासाभरात त्याची सहा हाडे मोडली होती मी. गेल्या अनेक वर्षात आमच्याकडे वाकड्या नजरेनी बघण्याची हिंमत झाली नाही कोणाची. त्यांनी मला नोकरी करायला लावली. आपले काम चोख असेल तर नोकरीत मला कोणी त्रास देणार नाही हे देखील त्यांनीच मला सांगितले. मी प्रामाणिकपणे बिलमोरिया साहेबांकडे काम करत गेले. यश हळूहळू का होईना मिळत होते. बिलमोरिया साहेब मनाने मोठा माणूस. त्यांनी मला अनेक गोष्टी शिकवल्या. ते माझा परिचय करून देतांना अनिलचा उल्लेख नेहमी करत असत. आता बरेच काही रुळावर आले होते पण अनिल सोबत नव्हता.
मृण्मयीने माझे सौंदर्य आणि वडिलांचा बांधा घेतला होता. पोरगी सिव्हिल सर्व्हिसेस पास झाली. आयएएस सोडून तिने आयपीएस घेतले आणि मी घर डोक्यावर घेतले. मला आता माझ्या घरातून अजून बलिदान करायचे नव्हते. पोरगी बापावर गेलेली, अडून बसली. मी पण जिद्धीला पेटले होते. दोन दिवस उपोषण केले. शेवटी त्याच म्हणाल्या, ती ऐकणार नाही, तू कशाला तुझा जीव देते आहेस. मृण्मयीला पहिलेच पोस्टिंग आसामात मिळाले होते. ती तीनवर्षे घरातला गणराया पाण्यात होता.
असे कितीतरी प्रसंग आज मला आठवत होते. लग्न झाले तेंव्हा अनिल मला म्हणाला होता, आईशी जर तुझे जमले तर त्यासारखी धमाल नाही. किती खरे होते ते. त्यांनी मला शिकवलेले अनेक पदार्थ, रमीत मात्र त्या कधीच हारल्या नाही. मृण्मयीला त्यांनीच वाढवले. मृण्मयीच्या कुठल्याही परेन्ट्स मीटला मी गेल्याचे मला आठवत नाही. हे सगळे आठवतच मला कधी झोप लागली ते कळलेच नाही. कधीतरी छातीत बारीकशी कळ उमटल्याचे जाणवले. आत्ता जाग आली आहे. आई, अनिल बाजूलाच बसले आहेत. अनिल मला म्हणातोय
जानू, आपल्याला निवांतपणा शेवटी स्वर्गातच मिळाला तर !
©हर्षद शामकांत बर्वे, पुणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा