गुरुवार, १३ जून, २०२४

1216. पाझर

 "किती उशीर केला काका ! लवकर यायचं ना...." म्हणत शर्वरी ने आपली नाराजी दाखवली.
तिच्या लाघवी बोलण्याकडे दुर्लक्ष करत रघू काका हसत म्हणाले, "आजोळी जायची इतकी घाई झाली आमच्या लाडुबाईंना. आता आलोय ना. फास्ट गाडी पळवतो आणि झपाट्यानं जामनेरला पोहचवितो बघा."
शर्वरीचे आई बाबा गाडीत बसता बसता म्हणालेच," हीचं काही ऐकायचं नाही बरं रघू आणि गाडी आरामाने घे. एक तास मागे पुढे." शर्वरीने काकांकडे तिरप्या नजरेने पाहिले आणि गालातच हसली. 
     प्रसन्न पहाट. सहा वाजले होते. गुलाबी थंडीचे दिवस असल्याने भास्कर अजून आला नव्हता. पक्ष्यांची किलबिल मात्र तो लवकरच येणार ह्याची साक्ष देत होती. जालन्याची वेश ओलांडताच दोन्ही बाजूंच्या झाडांची सळसळ दिसू लागली. हलक्या केशरी किरणांनी हळुवारपणे एक एक पाऊल टाकत पूर्वेला आपलं साम्राज्य पसरवायला सुरुवात केली. शर्वरी ची आई रमाताई दत्त उपासक असल्याने मनात श्लोक पठण सुरू केले आणि बाबांनी लवकर उठून झोपमोड झालेल्या झोपेला कवटाळून धरलं. शर्वरी मात्र आपल्याच धुंदीत केशरी रंगात रंगून गेली. सूर्य वर येतो कसा? हे तिला बघायचं होतं. गाडी सुसाट धावत होती. महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे हे ते सुधारलेले पथ सांगत होते. कुठेच खाच खळगे नाही की स्पीड ब्रेकर नाही. लोण्यासारखे मऊ रस्ते रघूकाकांना स्वप्नवत वाटले. आज तीन वर्षांनंतर ते जालन्याहून जामनेरला चालले होते. अतिशय उत्साहात गाडी चालवताना स्पीड बरीच वाढली आणि रमाताईंनी श्लोक म्हणत म्हणत गाडीच्या समोरच्या आरश्यातून बघणा-या रघूकाकांना इशारा केला की गाडीची स्पीड खूप वाढली आहे. जीभ दाताखाली चावत काकांनी चूक मनोमन कबुल करत गाडी स्लो केली. सगळे आपापल्या धुंदीत असताना काळाने आपले काम चोखपणे बजावले. समोरहून येणाऱ्या इनोव्हाने जोरदार धडक दिली. रस्ते नुसते गुळगुळीत होऊन चालत नसतं शेवटी नशीब बलवत्तर असावं लागतं. रघूकाका खरंच गाडी व्यवस्थित चालवत होते पण वेळ आल्यावर हुशारी, बुध्दी काहीच कामाला येत नसतं. एक जोरदार धमाका झाला. नेमकं काय, कसं झालं?  हे कुणालाच कळलं नाही आणि क्षणात जीवनपट बदलला.
     रमा ताई आणि शर्वरीच्या बाबांचा कोणता श्वास शेवटचा ठरला हे कळलेच नाही. सहा वाजता गाडीत बसलेले सात वाजता शेवटच्या स्टेशनावर होते. केशरी रंग क्षितीजाचे न्याहाळणारी शर्वरी लाल रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. रंगाचे बेरंग झाले होते. गाडीचा चक्काचूर झाला. आई बाबा गेले आणि रघूकाका तर कुठे फेकले गेले हेही कळले नाही. शर्वरीने डोळे उघडले तेव्हा ती  सिल्लोडच्या मल्टिस्पेशल हॉस्पिटलमध्ये होती. डोक्यात जोरदार कळ निघाली आणि शर्वरी दोघी हातांनी कपाळाला आवळत वेदनेत विव्हळू लागली. दारातून येणाऱ्या त्या नर्सने येऊन तिला धीर दिला.  त्या भीषण अपघातात तिचे आई बाबा जग सोडून गेले असं डॉक्टर तिला सांगत होते. भर दुपारी अंधार पसरला होता. अठराव्या वर्षात नुकताच पदार्पण केलेल्या शर्वरीचे बालपण संपताच तिने सरळ प्रौढत्व गाठले. तरुणपणा हा काळाने हिरावून घेतला. स्वतःची जबाबदारी स्वतःवर येऊन पडली आणि ती प्रौढ झाली.  तिच्या बाबांच्या मित्राने तिला समोरच्या पार्टीवर म्हणजे ज्या गाडीने येऊन धडक दिली त्या गाडीच्या मालकावर केस करायला सांगितली.  रितसर केस दाखल झाली आणि आज ती आपल्या वकिलासोबत कोर्टात आली होती. आजपर्यंत कोर्ट फक्त टीव्ही वर पाहिलेल्या शर्वरीला आज कोर्टाच्या प्रांगणात पाय ठेवताच घाम सुटला. तिला तीव्रतेने आई-बाबा आठवले आणि पापणकाठ पाणावले. वकिलांनी आपल्या परिने धीर देत तिला आश्वस्त केले की निकाल आपल्याच  बाजूने लागेल. शर्वरी मात्र वेगळ्याच विचारात होती. आई बाबा तर गेले आणि आता त्यांच्याच नावावर केस जिंकून आपण पैसे घेतले तर ते योग्य ठरेल?  डोळे फक्त वाहण्याचे काम करत होते. डोकं सुन्न झाले होते. ती खुर्चीचा आधार घेत बसली. मान खाली घालून अश्रू लपवायचा प्रयत्न होता कारण सार्वजनिक जागेत तिला असं दुःख उजागर करायचं नव्हतं. काठी टेकत टेकत एक वृध्द गृहस्थ मि. शहा तिच्या अगदी जवळ येऊन उभे राहिले आणि तिची विचार श्रृंखला भंग पावली.
"मी धर्मेश शहा" म्हणत थरथरत हात जोडत त्यांनी परिचय दिला. सत्तरीच्या आसपास असलेले मि. शहा वयापेक्षा जास्त वयस्कर वाटत होते. दुःखाच्या छटांनी चेह-यावर सुरकुत्यांच्या रूपात आपलं अस्तित्व निर्माण केलेलं दिसत होतं.
 ते म्हणाले," बेटा ! तुम्हे  जे काही भरपाई चाहिए वो मैं दुंगा". नीट मराठी अवगत नसताना त्यांनी शर्वरीशी मोडक्या मराठीत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. शर्वरीला ऐकून माहीत होतं की शहाच्या गाडीने धडक दिली होती. पण आज प्रथमच ती त्यांना बघत होती. वकिल आजूबाजूला नाही ह्याचा मि. शहा वेध घेऊन बोलत होते. आपल्या सोबत असलेल्या सात आठ वर्षांच्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, "यह मेरा पोता है. नातू...नातू है. वो अॅक्सिडेंटमध्ये ह्याचे मम्मी पप्पा पण स्वर्गवासी झाले. हा एकच मुलगा आणि मी..बस्स!" म्हणत त्यांना हुंदका अनावर झाला.
"तुम्हारे वकिलाला वाटलं की आम्ही हमारा दुःख समोर करत तुम्हारा हक्क देणार नाही." 
'वो केस मत करो बोला था' असं ते शर्वरीला सांगू लागले. शर्वरी मात्र त्यांचं दुःख बघून स्तब्ध झाली. त्यांच्या गाडीखाली आपले आई-बाबा गेले हे काही वेळेसाठी विसरली. तिला त्यांच्याशी बोलताना कळलं की गाडीचे ब्रेक फेल झाले होते आणि चूक त्यांच्या ड्रायव्हर ची पण नव्हती. आता शर्वरीला कळालं होतं की तिचे आई बाबा गेले पण हा छोटू तर खूप छोटा आणि म्हातारपणात हे आजोबा असहाय्य असे. तिच्या कोमल स्त्री मनाला पाझर फुटला. ती विचार करत असताना मि. शहा म्हणाले," कोर्टाच्या चकरा मारणं मेरे उम्रला मानवणार नाही. आणि हमेशा ह्या  परागला येथे आणून ह्याचं शिक्षण आणि बचपन वाया घालवायचं नाही." 
"तुम्हाला पाहिजे ती अमाऊंट मी देतो पर ये कोर्ट कचेरी नही होना."
शर्वरी ने ते काही ऐकलंच नाही. तिला काय करायचं हे उमगलं होतं. जे घडलं ते फक्त नियतीच्या मनातलं घडलं होतं. त्याला दुसरं कोणीच जबाबदार नव्हतं. परागचा हात हातात घेऊन ती म्हणाली," घाबरू नकोस. तुला कोर्टात यावं लागणार नाही. मी आत्ताच केस मागे घेते."
मि.शहांकडे बघत तिने आपला निर्णय सुनावला,"काका माफ करा. मला हे काहीच माहीत नव्हतं. मी माझ्याच दुःखात होते. पण आता तुम्ही मला बाबांच्या जागी आणि हा छोटा भाऊ."
बोलता बोलता कोलमडली. बांध फुटला आणि ओक्साबोक्शी रडू लागली. परागचं पुढं काय?  हा प्रश्न असलेल्या शहांना वार्धक्यात जगण्याचे पंख मिळाले होते. माणुसकीचे पंख शर्वरीने बहाल करत त्यांचं वार्धक्य सुलभ केलं होतं.
 
दीपा बंग
परळी वैद्यनाथ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...