"माई मी निघते. पोळी भाजी करून ठेवली आहे. दुपारी मावशी येतील. त्यांना वरण भाताचा कुकर लावायला सांगा. रात्रीचं मी बघेन आल्यावर."
माई मख्ख चेहेऱ्याने अनुजा च्या सुचना ऐकत होत्या. त्यांच्या चेहेऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. म्हणजे आजपण दिवसभर त्या एकट्याच असणार. नात काय शाळेतून आली की जेवेल आणि क्लासला जाईल. तिथून आली की खेळायला मैत्रिणी कडे पळेल. अनुजाचं त्यांच्या कडे लक्ष गेलं
"काय झालं माई? नाराज आहात का? कसला राग आलाय का? माझं काही चुकलंय का?"
"तुझं काही चुकलं नाहीये ग बाई. माझंच चुकलंय, मीच एक अडगळ होऊन राहिले आहे तुमच्या घरात."बोलता बोलता त्यांचा कंठ दाटून आला. आज काहीतरी वेगळाच नूर दिसतोय माईंचा. त्या सहसा असा त्रागा करत नाहीत. अनुजा ने पर्स खाली ठेवली त्यांच्या जवळ बसत तिने विचारलं
" काय झालं माई? मनात काय असेल ते बोलून मोकळ्या व्हा म्हणजे तुम्हाला हलकं वाटेल."
माईंनी एकदा अनुजा कडे बघितले. तिच्या आवाजात, नजरेत आर्जव होतं. त्यांना एकदम अपराधी वाटलं. खरं तर त्यांना तक्रार करायला काही जागा नव्हती. घरात सगळ्या सोयी होत्या. मुलगा, सून, नात सगळी त्यांच्याशी नीट वागत होती. त्यांचं औषधपाणी ,व्यवस्थित होत होतं. फक्त प्रश्न होता तो त्यांच्या समोर अजगरा सारख्या पसरलेल्या वेळेचा.
"कंटाळा येतो ग दिवसभर, काही काम न धाम. टीव्ही बघितला की डोकं दुखतं. तुम्ही सगळी आपापल्या व्यापात. दिवस खायला उठतो बघ. पण हे बघ तुम्हा कोणाची काही चूक नाहीये. तुम्ही माझं सगळं व्यवस्थित करता. 'सुख दुखतं' म्हणतात ना तसं झालय माझं"
अनुजा जरा विचारात पडली ,मग म्हणाली" तुम्हाला वाती करायला जमतील का?
"हो. बोटं दुखतात त्याने सुद्धा. पण थांबून थांबून करीन"
"ठीक आहे. मी कापूस आणून ठेवीन तुम्हाला कंटाळा आला की तुम्ही वाती करत जा."
अनुजा लहान मुलीची समजूत काढावी तशी बोलत होती माईंनी मान डोलावली तशी अनुजा म्हणाली
"निघू मग मी आता?रात्री लवकर येते.
अनुजा गेली आणि त्या घरात एकट्याच उरल्या. इतक्यात बेल वाजली. त्यांनी दार उघडलं. खालच्या वाण्याच्या दुकानातला मुलगा कापूस घेऊन आला होता. अनुजाच्या तत्परतेच त्यांना कौतुक वाटलं. त्यांनी पिशवी टेबलावर ठेवली. जेवण झाल्यावर त्यांनी पिशवीतून कापूस पुढे काढला. तो फुटबॉल एवढा गोळा बघून माईंना हसूच फुटलं. एवढ्या कापसाच्या हजार- दीड हजार वाती होतील आणि घरात वर्षात एखादं दुसऱ्या वेळी निरांजन लावलं जातं. काय उपयोग इतक्या वाती करून? विचार मागे सारत त्यांनी वाती वळायला सुरवात केली. इतक्यात ऋत्विका तिथे आली
"आजी मी पण करू?"
"नको तुला नाही जमणार."
"तू शिकवं ना मला."
त्या दाखवतील त्या प्रमाणे ऋत्विका पण प्रयत्न करू लागली आणि विशेष म्हणजे तिला जमायलाही लागल्या. तिने केलेल्या वाती माई थोड्या सुधारून घेत होत्या. पुढचे दहा बारा दिवस माईंना एक उद्योगच झाला. वाती वळण्याचा पण वेळही चांगला जात होता. वैषम्य एवढंच होतं की, एवढ्या वातींपैकी चार वाती सुद्धा घरात वापरल्या जाणार नव्हत्या. एवढी कशी अश्रद्ध माणस? एकही परंपरा पाळावी असे वाटू नये यांना? अनुजा रोज सकाळी बाहेर पडत असे ती संध्याकाळीच परते. आज तर सात वाजून गेले तरी अनुजा चा पत्ता नव्हता. शेवटी ७.३० ला आली. खूप थकलेली वाटत होती, हातात कसली तरी गुंडाळी होती. आल्या आल्या तिने माईंना हाक मारली. माई आल्या. अनुजाने गुंडाळी उलगडली आणि माईंच्या अंगावर काटा उभा राहिला. ते विठ्ठलाचे चित्र होते. मूर्तिमंत पांडुरंग. त्यांच्या कडे फ्रेम होती. अगदी तसाच विठोबा रेखाटला होता. वत्सल,आश्वासक माईंचे हात जोडले गेले. स्वतःच्याही नकळत.
"कोणी काढलं हे चित्र?" भानावर येत माईंनी विचारलं.
"माई तुम्ही ऐकून थक्क व्हाल, हे चित्र करुणा नावाच्या एका अनाथ, दिव्यांग मुलीने काढलंय."
तिला दोन्ही हात नाहीयेत. पायाने काढलंय तिने हे चित्रं. तिलाच चित्र काढायला शिकवायला जात होते पंधरा दिवस."
"अगं किती सुरेख चित्र काढलंयन. आपल्याकडे एक तसबीर होती पांडुरंगाची. अगदी हुबेहूब तसंच चित्र आहे."
"अगदी बरोबर, कारण त्या फ्रेम वरूनच तिने हे चित्र काढलय. मीच नेली होती तिला दाखवायला. तिने काढलेल्या ह्या चित्राला स्पर्धेत पाहिलं बक्षीस मिळालं. "
"आता ह्या चित्राचं काय करणार?"
"काही नाही. खास तुम्हाला दाखवायला आणलंय."
"मी काय म्हणते हे चित्र आपण सोसायटी च्या लॉबी मध्ये लावूया. बाजूला चित्र कोणी काढलं त्याचीही माहिती लिहू. नाहीतरी उद्या एकादशी आहे..."
"अरे वा ही आयडिया माझ्या डोक्यातच नाही आली. फक्त सेक्रेटरिंची परवानगी घेऊ म्हणजे झालं."
झालं. सगळे कामाला लागले आणि चित्र खाली लागलं. बाजूला करुणाची माहिती आणि बाजूला एक वही ठेवली. त्यात अभिप्राय लिहायचे होते.
माई तुम्ही नेहमी म्हणत असता ना की आम्ही अश्रद्ध आहोत. तसं नाहीये माई. आमची श्रद्धा आहे. पण देवावर. देवाच्या मूर्तीवर नाही. माई तुम्ही आणि ऋत्विकाने वाती केल्या होत्यात ना त्या मी देवळा जवळच्या दुकानात विकायला दिल्या त्याचे पैसे मिळाले त्यात थोडी भर घालून, देवळा जवळच एक मुलगी रस्त्यावर फडकं टाकून हार, फुलं विकायला बसायची, तिला एक स्टूल, टोपली, हार अडकवायला स्टँड असं समान घेऊन दिलं. इतकी खुश झाली. पुन्हा पुन्हा आभार मानत होती. आज तुमच्या रुपात तिला पांडुरंग भेटला. त्या मुलीसाठी तुम्ही, ऋत्विका, करुणासाठी मी आणि माझ्या साठी माझे बाबा 'पांडुरंग' होते. ज्यांनी मला माणसा मधला पांडुरंग ओळखण्याची 'नजर' दिली. माई हसल्या.
"अगं भल्या माणसाची ओळख आम्हाला पण पटते. देवमाणसा पुढे आम्ही कायमच लीन असायचो आणि गरजू माणसाला मदत करायची बुद्धी देवाने आम्हाला ही दिली. पदराला खार लावून सुध्दा मदत केली आहे आम्ही. पण तरीही मला परंपराही पाळावीशी वाटते गं."
परंपरा देवासाठी नाही तर स्वतः साठी, कुटुंबासाठी, समाजासाठी पाळायची. आता इथे शहरात सगळी कडे उजेडच उजेड असतो, पण खेडेगावात संध्याकाळ झाली की, धड अंधार नाही. धड उजेड नाही अशा वेळी खूप उदास वाटत,मन कातर होतं. अशा वेळीच देवाशी निरांजन लावायची पद्धत होती,तुळशी जवळ दिवा लावून शुभंकरोती म्हणायला लागलं की मन शांत,आश्वस्त होतं. अशा परंपरांमुळे आपलं मानसिक स्वास्थ्य टिकतं. सणा उत्सवाच्या निमित्ताने कुटुंबातली माणसं एकत्र येतात, नाती टिकतात, किरकोळ रुसवेफुगवे विसरले जातात. अनुजा श्रद्धा ही बावनकशी सोन्यासारखी असते. पण सोन्याची लगड दोऱ्याला बांधून गळ्यात घातली तर कशी दिसेल? परंपरा त्या लगडीचा सुंदर हार करते. विस्तारते. सर्वांना सामावून घेते. श्रद्धेला एक लोभस रूप देते."अनुजा चकित होऊन ऐकतच राहिली.
आपण माईंना देवभोळ्या फारसा विचार न करता प्रथा पाळणाऱ्या समजत होतो. जरा विचार करून अनुजा म्हणाली,
"माई तुम्ही दमला असाल ,जरा आराम करा ,जेवायच्या वेळी हाक मारते तुम्हाला."
माई त्यांच्या खोलीत जाऊन आडव्या झाल्या , त्यांचा डोळा लागला.
त्यांना जाग आली ती अनुजा त्यांना उठवायला आली तेव्हा. त्या उठल्या. त्यांनी ठरवलं आपल्या उपासाचे काही बोलायचे नाही. नाही केला उपास तर काय बिघडतं? नाहीतरी ह्या प्रथा स्वतः साठीच असतात, असं आपणच नाही का सांगितलं अनुजाला. घरात निरांजन लागत नाही म्हणून आपण नाराज होतो. पण आज एका मुलीच्या आयुष्यात एक दिवा लागला. मग नाराजी कशाची? त्या बाहेर आल्या. ऋत्विकाने त्यांना हात धरून किचन मध्ये देव्हाऱ्याजवळ नेलं. माई बघतच राहिल्या. विठोबाची तसबीर ठेवली होती. हार घातला होता आणि निरांजन लावलं होतं. माईंनी हात जोडले नि त्या डायनिंग टेबल जवळ आल्या. ताटात वरी तांदूळ, दाण्याची आमटी,बटाट्याची भाजी. सगळा उपासा चा मेनू. आज धक्क्यावर धक्के बसायचा दिवस होता. त्यांनी अनुजा कडे पाहिलं.
"माई ,तुमचं पटलं मला, प्रथा आपल्या साठी पाळायची. खरं सांगू मला पण बरं वाटलं हे सगळं करून. कारण
जे काही मी केलं त्या मागचा हेतू मला आज कळला."
माई हसून म्हणाल्या "आणि आज मी परंपरा सोडायचं ठरवलं होतं. तुझ्या सारखा माणसातला पांडुरंग शोधायचा ,असं ठरवलं होतं."
"चला. म्हणजे आज आपल्या श्रद्धेचे वेगवेगळे रंग एकत्र आले आणि
'अवघा रंग एक झाला'
दोघी एकदम म्हणाल्या.
मेधा दीक्षित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा