त्या दोघांचा फार सुखाचा आणि गोड संसार सुरू होता. दोघांचेही एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. दोघेही एकमेकांना काय हवे नको ते प्रेमाने पाहत, एकमेकांची काळजी घेत. एकमेकांच्या मनाला देखील फार जपत. एके दिवशी तिने आलू पराठा बनवला. तिच्या सासूबाईंनी आजपर्यंत पराठा कधी बनवला नव्हता आणि बाहेर देखील हे दोघे गेले तर त्याने कधी मागवला नव्हता तर त्याला पराठा आवडेल की नाही अशी शंका तिला होती. पण त्याला आलू पराठा खूप आवडला. तो म्हणाला अप्रतिम अशी चव आहे तुझ्या हाताला. खरे तर मला पराठा आवडतो पण आईला बनवता येत नाही म्हणून मी कधी आग्रह केला नाही. पण आज मी तृप्त झालो. किती छान चव आहे तुझ्या हाताला. मी खरेच भाग्यवान आहे तुझ्यासारखी बायको मला मिळाली. ती फार खुश होऊन गेली. आपल्या नवऱ्याची आवड आता तिला समजली होती. दुसऱ्या दिवशी तिने कोबीचे पराठे बनवले. ते देखील त्याने आवडीने खाल्ले. तिसऱ्या दिवशी तिने मुळ्याचे पराठे बनवले. आता ती रोज वेगवेगळ्या भाज्या आणून वेगवेगळ्या प्रकारे त्याला पराठे बनवून खाऊ घालू लागली. तो जेवायला बसला की ती त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राही. त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यात ती धन्यता मानत असे. ती पराठा बनवताना घेत असलेली मेहनत समजून घेऊन त्याला तिचे कौतुक वाटायचे पण हल्ली त्याला पराठा नाव काढले तरी मळमळ होत असे. पण तो तिच्या मनाला वेदना होतील म्हणून काहीही बोलत नसे. तिला न दुखवता त्याला तिला हे सांगायचे होते की ती जितक्या प्रेमाने आणि मेहनतीने त्याच्यासाठी जो पराठा बनवते त्याचे कौतुक आहे पण आता त्याला पराठा नाव सुध्धा ऐकण्यास नको वाटू लागले आहे पण हे तिला सांगायचे कसे हे त्याला समजत नव्हते.
त्याला एक कल्पना सुचली तो पूर्वी ऑफिस मधून येताना तिला आवडतो म्हणून कधी कधी मोगऱ्याच्या फुलांचा गजरा आणत असे. आता तो रोजच तो घरी गजरा घेऊन येऊ लागला. त्याने स्वतः वापरत असणारा परफ्यूम मोगरा वास असलेला आणला. बेडरूम मधील रूम फ्रेशनर पण मोगरा सुगंध असेल असा आणला इतकेच काय घरात अगरबत्ती देखील मोगरा सुगंध असलेली आणली. आता तिला त्रास होऊ लागला सतत तिला सगळीकडे मोगरा मोगरा दिसू लागला. आता तिला प्रिय असणारा सुगंध आता नकोसा आणि जीवघेणा वाटू लागला. आज रात्री जेव्हा तो पुन्हा गजरा घेऊन आला तेव्हा ती म्हणाली ,ऐका ना मला मोगरा आवडतो पण इतकाही नाही की सदैव त्यासोबत मी राहू शकेन. एका ठराविक मर्यादपर्यंत आवडती गोष्ट आनंद देते पण त्यापलीकडे. ती पुढे काही बोलणार इतक्यात तिचे बोलणे मध्येच तोडत तो म्हणाला ,आज कोणता पराठा बनवला आहेस? मी फ्रेश होऊन येतो तोवर ताट घे वाढायला. तो आत निघून गेला ही इकडे किचन मध्ये आली आणि विचारात पडली. थोड्या वेळाने तो बाहेर आला आणि जेवायला बसला तेव्हा आज त्याच्या ताटात पराठा नव्हता. त्याने हळूच वर तिच्या चेहऱ्याकडे पाहिले तर तिने लहान मुलासारखे आपले दोन्ही कान आपल्या नाजूक बोटांच्या चिमटीत पकडले होते आणि जणू त्याला सॉरी म्हणत होती. तिला तसे पाहून ह्याने देखील स्वतः चे कान पकडले आणि दोघेही खळखळून हसू लागले.✍️
गिरीश मिठारी 9561404599
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा