पूर्व जन्मी केलेली कर्मे, जी ह्या जन्मी फळ रूपाने प्राप्त होतात त्यालाच "प्रारब्ध" असे म्हणतात. बरे वाईट दोन्ही प्रकारची कर्माचे फळ या जन्मात मिळत असते त्यामुळे जीव सुख दुःख भोगत असतो. सगळ व्यवस्थित चाललेले असतानाच अचानक काहीतरी वाईट घडणे यालाच प्रारब्ध म्हणतात. अचानक धनलाभ होऊन श्रीमंत होणे हे सुद्धा प्रारब्धाचे लक्षण आहे. पूर्व जन्मी उत्तम काम करणारास उत्तम फळ प्राप्ती होते. अधम कर्मे करणाऱ्यास वाईट फळ प्राप्ती होते. प्रारब्धा शिवाय फळ प्राप्ती होत नाही. धावपळ, मेहेनत करून जर फळ प्राप्ती होत असती तर रस्त्याच्या कडेला दगड फोडणारे सगळ्यात जास्त मेहनत करतात. पुरुषार्थ सुध्दा प्रारब्धाला मदत करत असतो. योग वसिष्ठा प्रमाणे, श्रीरामाने सर्वात सोप्या शब्दात सांगीतले आहे: जे काही न करता मिळत, आणि कितीही प्रयत्नाने मिळु शकत नाही याला प्रारब्ध म्हणतात. मनुष्य त्याच्या आयुष्यात असंख्य कर्मे करतो. त्या सर्व कर्मांचे परिणाम हळूहळू साठत जातात. ज्याप्रमाणे दरमहा ठराविक रक्कम बँकेत भरल्यास ती आपल्या खात्यात जमा होत राहते व खात्याचा बॅलेंस वाढत जातो अगदी तसेच, मनुष्याने केलेली कर्मे हळूहळू साठत जातात. कर्मफलाच्या खात्यातील या बॅलेंसला ‘संचित’ असे म्हणतात. मनुष्य जसे जसे कर्म करत जातो, तसतसे त्या कर्मफलांचे रुपांतर संचितात होत जाते व त्याचा बॅलेंस वाढत जातो. भारतीय तत्त्वविचारानुसार, या संचितात मनुष्याची जन्मोजन्मीची कर्मे साठवलेली असतात. संचिताचे भोग एकदम भोगणे शक्य नसते. यातील काही भोग आनंददायी तर काही दुःखद असतात. त्यामुळे कर्मफलांचे हे भोग मनुष्यास क्रमाक्रमाने भोगावे लागतात. संचितापैकी ज्या कर्मांचे भोग भोगण्यास प्रारंभ होतो त्यास ‘प्रारब्ध’ असे म्हणतात.
"संचित" म्हणजे कर्मफलांचा महासागर आहे, तर प्रारब्ध म्हणजे किनाऱ्यावर येणाऱ्या लाटा. अथांग सागरातील जे पाणी प्रवाही होऊन किनाऱ्यावर प्रकट होतं, त्याला आपण लाटा म्हणतो. त्याप्रमाणे, संचितातील असंख्य कर्मफलांपैकी जी फले भोगण्यासाठी प्रकट होतात, त्यांस प्रारब्ध म्हणतात. कर्माचे काही परिणाम असे असतात कि ते तत्क्षणीच भोगावे लागतात. त्यास ‘क्रियमाण’ असे म्हणतात. उदाहरणार्थ, तापलेल्या तव्याला हात लावल्यास हात भाजतो. केलेल्या कर्माचे फल तिथल्या तिथे भोगावे लागते. हे झाले क्रियमाण. यासोबतच, संचिताच्या पेढीतील ज्या कर्मफलांचे भोग प्रारब्ध होऊन मनुष्य वर्तमानकाळी भोगत असतो, त्याचाही समावेश क्रियमाणात होतो. संचित म्हणजे महासागर, प्रारब्ध म्हणजे लाटा व क्रियमाण म्हणजे किनाऱ्यावर उभ्या असणाऱ्या मनुष्याच्या पायाला त्या क्षणी स्पर्श करणारे लाटांचे पाणी. थोडक्यात, संचित म्हणजे कर्मांचा भूतकाळ, प्रारब्ध म्हणजे वर्तमानकाळ, तर क्रियमाण म्हणजे चालू वर्तमानकाळ.
वाचा एका वृध्द गृहस्थाचा प्रश्न.
प्रारब्ध म्हणजे काय ? कर्तव्यकर्माचे फळ विपरीत कां मिळते ?
अति वृध्द गृहस्थ डोळ्यात पाणी आणून आपली दुर्दैवी हकीकत महाराजांना सांगू लागले. ते म्हणाले , "महाराज, माझी पत्नी माझ्या तरुणपणीच निवर्तली. माझे तीन मुलगे त्यावेळी लहान होते. लोक लग्नाचा आग्रह करु लागले. पण मुलाना सावत्रपणाचा धोका नको म्हणून मी पुनः लग्न केले नाही. मुलांच्या खाण्यापिण्याकडे, कपड्यालत्याकडे व शिक्षणाकडे मी स्वतः लक्ष देऊन त्यांना वाढविले. आता मुलांचे उत्तम चालले आहे .पण आता सुना आणि मुले मला म्हणतात, तुम्ही निघून जा. घराबाहेर चालते व्हा. हुंदका देत ते पुढे म्हणाले "महाराज, स्वतःच्या सुखाचा पूर्ण त्याग करुन मुलांच्या बाबतीतले आपले कर्तव्य मी इतके मनापासून केले त्याचे असे विपरित फळ का मिळावे?" म्हाताऱ्याची व्यथा ऐकून आजूबाजूच्या मंडळीना ही वाईट वाटले. प्रेमाने जवळ घेवून महाराज त्यांना म्हणाले, "अरेरे, मुलांनी असे करणे अगदी गैर आहे. खरेच, ते त्यांच्या हिताचे पण नाही. तुम्हाला म्हातारपणी असे वागवण्यात ते फार चुक करीत आहेत. त्यांचे असू द्या.पण तूम्ही शेवटी जो प्रश्न विचारला. तो मात्र सयुक्तिक नाही, असा विचार करा की, 'कर्तव्य म्हणजे काय? मी जे करायला पाहीजे, त्याचे नाव कर्तव्य. आता मी जर ते कर्तव्य करायलाच हवे, तर तो म्हणजे दुसरा कसा वागतो, याचा संबंध येतोच कुठे? म्हणजेच फळाचा संबंध येत नाही. कोणत्याही कर्माचे फळ प्रारब्धाप्रमाणेच मिळते. म्हणून तुम्ही आपले कर्तव्य चोखपणे केले याचे समाधान वाटू द्या आणि आजची स्थिति आपल्या प्रारब्धानुसार आलेली आहे. हे ओळखून त्या बद्दल खंत बाळगू नका.
सारांश - मनाला नामांत गुंतवा आणि आपले कल्याण करुन घ्या. प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचे फळ. हे चांगले वा वाईट असू शकते. सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही, पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो, "मी देवाचे एवढे केले, मी अमक्या अमक्या सत्पुरुषाचा आहे, मग मला असे दुःख का भोगावे लागते?" पण त्याला हे समजत नाही की हा सर्व आपल्याच कर्माचा परिणाम आहे. त्याला देव किंवा संत काय करील? समजा, आपल्याला काही पैशाची जरूरी आहे आणि आपल्या अगदी जवळचा नातेवाईक एखाद्या मोठ्या बँकेचा मॅनेजर आहे; पण आपल्या स्वतःच्या नावावर बँकेत जर काहीच पैसे जमा नसतील तर तो काहीही करू शकत नाही. फारच झाले तर तो आपल्या स्वतःच्या खिशातून काही पैसे देईल. त्याचप्रमाणे, आपल्या प्रारब्धात जर सुख किंवा दुःख नसेलच तर ते कुठून मिळणार? संत फार तर जरूरीप्रमाणे आपले सुख किंवा दुःख स्वतः सोसून आपला दुखाःचा भार हलका करील इतकेच. म्हणून आपल्या प्रारब्धाने आलेल्या बऱ्या वाईट गोष्टी देहाने भोगाव्यात आणि मनाने भगवंताचे स्मरण ठेवावे. कर्माचे भोग परमेश्वरालासुद्धा चुकलेले नाहीत. आपण तर फक्त साधी माणसे आहोत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा