माझा आवडता लेखक ऑस्कर वाइल्ड एकदा लिहून गेला (आम्ही थोर लेखक नुसते लिहीत नाहीत तर लिहून जातो. कुठे जातो कुणास ठाऊक ! )-
‘गॉड गिव्हज् अस रिलेटिव्हज, थँक गॉड, वी कॅन चूज अवर फ्रेंड्स’ (देव आपल्याला नातेवाईक देतो. देवाचे आभार मानूया की त्यानं आपल्याला मित्र निवडण्याची मुभा दिल्येय.) वाइल्डचं ‘वाईल्ड’ विधान वाचून त्याच्या सख्ख्या भावानं त्याच्याशी आयुष्यभरासाठी बोलणं सोडलं. ‘नातेवाईकांना कसं जगावं व केव्हा मरावं ते कळत नाही’ या त्याच्या वाक्यात भावाशी असलेल्या संबंधांना कायमची मूठमाती दिली. (इच्छा असूनही मी आजवर असं काही लिहू शकलेलो नाही व यश (?) संपादन करू शकलेलो नाही.) वाइल्ड मित्र निवडण्याची गोष्ट करतो, पण मला वाटतं की मित्र आपण निवडत नाहीत तर ते होतात. नकळत सर्दी होते, तसे. चला, अमक्या तमक्याला आपण मित्र करूया, त्या दृष्टीनं पावलं उचलूया असं आपण कधी म्हणतो? भेटी होतात, भेटी वाढतात, सूर जुळतात व कोणाला काही कळायच्या आत दोन मनं एका सुरात गाऊ लागतील – ‘मिले सूर मेरा तुम्हारा !’
मित्र होण्यासाठी मतं मिळण्याची गरज नसते. माझा एक जानी दोस्त – आता नावच सांगतो चला, दीपक मडकीकर – दिलीपकुमारचा द्वेष्टा होता. तो जवळ राहायचा. रात्री जेवून पानबिन खाऊन शतपावल्या करीत माझ्या घरी यायचा व उत्साहानं दिलीपकुमारला काय अघोरी शिक्षा व्हायला हवी ते रंगवून रंगवून सांगायचा. कधी कोचावर मांडी घालून बसायचा व तिथूनच तोंडातील पानाची पिचकारी बाल्कनीच्या दिशेने मारत तो देवदुर्लभ आनंदानं म्हणायचा – ‘ऐक, ही नवीन शिक्षा ऐक.’ पण आमच्या मैत्रीत यामुळे तसूभरही अंतर आलं नाही. कुठेतरी आमचे सूर जुळले होते व तेवढं आम्हा दोघांना पुरेसे होतं. काही दिवस भेट झाली नाही तर अस्वस्थ वाटायचं. कागद-पेन घेऊन एकमेकांच्या आवडीनिवडी, मतं यांचा पडताळा पाहून मैत्री केली जात नसते. किंबहुना तशी मैत्री होतच नसते. म्हणतात ना, की प्यार किया नही जाता, हो जाता है. त्याचप्रमाणे मैत्री कि नही जाती, हो जाती है. काही दिवस भेट झाली नाही की मी त्याला फोन करून म्हणायचो, ‘मडक्या, दिलीपकुमारसाठी नवीन शिक्षा सुचली नाही म्हणून तू येतच नाहीस की काय?’ तो खळखळून हसायचा व धावत यायचा.
दीपक मडकीकर अकाली गेला. आणखी एक जखम उरी घेऊन जगत राहणं आलं. रवि वाघ, चंदू बापट, नंदू जुकर, चंदू म्हात्रे, अभिजीत देसाई, अजित लोणकर, सुनील, मोये, अरविंद गोगटे यांना अर्ध्या वाटेत माझी साथ सोडून निघून जायचं होतं तर ते माझ्या आयुष्यात आलेच कशाला? पण असं तरी कसं म्हणू? ते माझं खुजं आयुष्य समृद्ध करून गेले. अजूनही वाटतं की, कट्ट्यावर गेलं तर कडक इस्त्रीच्या कपड्यातला नंदू जुकर हातात कोकाकोलाची बाटली घेऊन उभा असेल. रवि वाघ आता नवीन काय फेकायचं या विचारात मग्न असेल. चंदू बापट जिना लोलोब्रिगिडाला पडद्यावर पाहून ‘अगं, बया बया बया’ म्हणेल. अभिजीत देसाई त्याच्या मुलीचे फोटो हातहातभर मोठे डेव्हलप करून आणेल. अजित लोणकर त्याची जगावेगळी मते शांत निग्रहानं मांडतील. अरविंद गोगटे आपण एका मोठ्या कंपनीचे डायरेक्टर आहोत हे विसरून शिव्यांची भेंडोळी सोडतील. आज हे सगळं माझ्या आयुष्यातून वजा झालंय. बेरजेचं गणित संपलंय. आता फक्त वजाबाकीचं गणित उरलंय. ते आणखी किती दिवस कळत नाही. एकेका जवळच्या मित्राच्या जाण्याबरोबर आपणही थोडे थोडे मरत असू तर आता माझ्यात न मेलेला मी किती शिल्लक राहिलोय कोण जाणे. परवा कोणीतरी म्हणालं, मधू भागवत गेला. मधुसूदन वासुदेव भागवत. त्याचं असं संपूर्ण नाव उच्चारण्यात काय गंमत किंवा चिडवणं होतं ते त्या वयाला माहीत. पाचवीपासून आठवीपर्यंत आम्ही एका वर्गात होतो. एका बाकावर बसायचो. अकस्मात तो आज बाक व जग सोडून गेला. शेवटी त्याला ‘अलझायमर’ झाला होता म्हणे. मी शहारलो. त्याचा मुलगा मोठा डॉक्टर होता. पण डॉक्टर कितीही मोठा असला तरी तो मृत्यूशी लढू शकत नाही. माझा मुलगाही मोठा डॉक्टर आहे. परवा तो हसत हसत मला म्हणाला, ‘पपा, पंचाहत्तर झालात, आता वाटेल ते खा-प्या, वाटेल ते करा. काय फरक पडतो?’ त्याच्या बोलण्यातला गर्भित अर्थ कळून मी शहारायचंही विसरलो. माझ्या एका मित्रानं मला शेर पाठवलाय-
‘दोस्तही है जो जबान रखते है साहब
वर्ना बच्चे वसीहत पूछते है,
और रिश्ते हैसियत पूछते है’
July 8, 2018
शिरीष कणेकर shireesh.kanekar@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा