लेकीच्या लग्नात पेशवाई पद्धतीचा तन्मणी घालायचं अरूणाचं स्वप्न होतं. दोन्ही बाजूला मोत्यांच्या चार माळा व जुन्या पध्दतीचं तन्मणीचं खोड असलेला सुंदर तन्मणी घालून कन्यादान करायचं मनात होतं पण प्रपंचातील मागण्या पूर्ण करताना जीव मेटाकुटीला आला होता. मात्र मोठ्या लेकीचं, साक्षीचं, लग्न ठरलं होतं त्यामुळे अरूणाच्या मनातील तन्मणीने परत मान वर केली होती. विवेक व अरूणा यांना तीन मुले होती. सासूबाई सासरे घरात होते. सासऱ्यांची तब्येत बरी नसे. त्यांच्या आजारात खर्च खूप वाढले होते. घराच्या खालीच अरुणाचे किराणा मालाचे छोटेसे दुकान होते. विवेक शाळेत शिक्षक होता. साक्षीचे लग्न ठरले म्हणून घरात आनंदी आनंद होता. मुलाला उत्तम नोकरी होती. स्वतःचे घर होते. विवेक-अरुणाला मात्र लग्नाचे खर्च भागवताना नाकी नऊ येत होते. साक्षीच्या साड्या, दागिने, देणे घेणे, मुलाचे कपडे करून झाले होते. सासूबाई त्यांची मोहनमाळ साक्षीला देणार असे काहीतरी अरुणाच्या कानावर आले होते पण सासूबाईंनी स्पष्ट काही सांगितले नव्हते. त्या मोकळेपणाने तिला कधीच काहीच सांगत नसत. लग्न जवळ आले म्हणून अरुणा काम संपून चंदू सराफाच्या दुकानात गेली. पर्स मधे तन्मणी साठी कष्टाने जमवलेले पैसे होते. तन्मणीच्या खोडाचे जे डिझाईन आवडले ते बजेटमध्ये बसत नव्हतं आणि जे बजेट मधे बसत होते ते आवडत नव्हते. जाऊदे आत्ता वेळ नाहीये तन्मणी साठी म्हणत ती हताश होऊन घरी परतली. घरी येताच बाहेर ॲम्ब्युलन्स बघून ती चरकली. सासऱ्यांच्या छातीत दुखत होते म्हणून विवेक घाईने त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेला होता. सासूबाई रडत बसल्या होत्या.
ती म्हणाली,"आई, नका रडू. आपण बाबांना उत्तम हॉस्पिटल मध्ये दाखल केले आहे. ते बरे होतील."
"लग्न अगदी महिन्यावर आलंय ग. यांना काही झाले तर लग्नात विघ्न नको.” सासूबाई डोळे पुसत म्हणाल्या.
"नाही येणार विघ्न, आई ! बाबा बरे होतील. परमेश्वर आपल्या पाठीशी आहे." ती त्यांचा हात धरून म्हणाली.
सासुबाई तिच्याशी फार बोलत नसतं. त्या अत्यंत व्यवस्थित होत्या आणि त्यांच्या मानाने अरुणा गबाळी व अव्यवस्थित होती. नीटनेटकेपणावरून त्यांच्यात अनेक मतभेद होते पण त्या पलिकडे जाऊन अरूणा मनानं चांगली मुलगी आहे हे आपण आजवर बघितलंच नाही असे त्यांना वाटून गेलं. दोन व्यक्ती एकत्र आल्या की मतभेद होणारच पण हे नातंच गुंतागुंतीचे आहे याची अरुणाला जाणीव होती. तेवढ्यात अरुणाला विवेकचा फोन आला, "तातडीने बायपास करायची जरूर आहे. जेवढे पैसे असतील घरात तेवढे घेऊन ये."
सासूबाई आशेने तिच्याकडे बघत होत्या. "काय झालं ग?"
"सगळे ठीक आहे आई. मी काही गोष्टी हॉस्पिटल मध्ये देऊन येते. तुम्ही पण चला हव तर. घरी चैन पडणार नाही तुम्हाला!” अरुणा म्हणाली.
सोन्याच्या तन्मणी साठी जमवलेले सगळे पैसे तिच्या पर्स मधे होतेच. घरात असलेले सर्व पैसे घेऊन त्या हॉस्पिटलच्या वेटींग रूम मधे पोचल्या. अरूणानं घरून काही पदार्थ एका पिशवीत घालून आणले होते. विवेक दिसताच तिने त्याला पैसे दिले. विवेक काळजीत म्हणाला, “दोन लाखापर्यंत पैसे लगेचच लागणार आहेत.”
तिने त्याला बाजूला ओढले. “हळू बोला. आईंना ऐकू नको जायला. टेन्शन येते त्यांना." अरुणा म्हणाली.
तिचा फोन सासुबाई जवळ असलेल्या पिशवीत सारखा वाजत होता. सासुबाई तिला त्यांच्या खुर्चीवरून तुला फोन येतो आहे असे दाखवत होत्या पण ती दोन लाख कसे उभे करायचे हे नवऱ्याशी बोलण्यात गर्क होती. पाच मिनिटात ती वेटींग रूम मधे आली व सासुबाईंना म्हणाली, “ मी बॅंकेत जाऊन येते पटकन्. तुम्ही बसा इथे. विवेक व तुम्ही या पिशवीतले काहीतरी खाऊन घ्या." तासाभरात ती परतली. विवेकला तिने एक पुडके दिले. ती सासुबाई जवळ येऊन बसली. त्या तिची धावपळ बघत होत्या. गबाळी, अव्यवस्थित वाटणारी अरुणा बाबांसाठी किती धावपळ करत होती! त्यांनी कृतज्ञतेने तिच्याकडे बघितलं. त्यांची नजर तिच्या गळ्याबरोबर घातलेल्या छोट्या मंगळसूत्राकडे गेली. हे काय - ही हल्ली असली खोटी मंगळसूत्र घालायची फॅशन आलेली दिसते असे वाटलं पण त्या नेहमीप्रमाणे काही बोलल्या नाहीत. बाबांची बायपास उत्तम पार पडली सांगत डॅाक्टर बाहेर आले. सासूबाईंनी मनातच गजानना समोर हात जोडले. अरुणाचा चेहरा पण आनंदाने फुलला होता. बाबांची तब्येत सुधारत होती. लग्न अगदी आठवड्यावर आले होते. त्या दिवशी अरुणा दुकानातून घरी आल्यावर सासूबाईंनी तिला हाक मारली. अरुणा दमलेल्या चेहऱ्याने आली. सासुबाईंनी जवळच्या पिशवीतून एक लाल पेटी बाहेर काढली. ती अरूणाला देत गहिवरल्या स्वरात त्या म्हणाल्या,
“अरुणा, हे सोन्याचं लांब मंगळसूत्र केलय तुला ! आवडते का बघ.”
“अहो आई, कशाला हे? आहे की माझं.अरुणा त्यांच्या नजरेला नजर न देता म्हणाली.
"अग, ह्यांच्या बायपास साठी तीन लाख जमवण्यासाठी तू तुझं सोन्याचे मंगळसूत्र विकलस म्हणून हे खोटे घालतेस हे मला माहित आहे. माझं मंगळसूत्र वाचवण्यासाठी स्वतःचे मंगळसूत्र विकलस तू सूनबाई !” त्यांनी डोळे पुसले व हात जोडले. अरूणा शरमली.
“अहो आई...असं काहीतरी म्हणाली. चंदू काकांनी ह्यांना सगळं कशाला सांगितल असं तिला वाटलं. सासूबाईंनी पिशवीतून आणि एक लाल रंगाची पेटी काढली. ती अरुणाला देत त्या म्हणाल्या,
"हा पेशवाई पद्धतीचा तन्मणी आवडतो का बघ." अरुणा निशब्द होऊन त्या सुंदर तन्मणी कडे बघत राहिली. मोत्याचे चार पदर आणि तिला अत्यंत आवडलेले सुंदर खोड! लाला वेलवेटच्या पेटीत तो तन्मणी चमकत होता. चंदूकाकांनी आईना हे पण सांगितलं?"
सासूबाई म्हणाल्या, "ह्यांच्या ऑपरेशन दिवशी सारखा तुझा फोन वाजत होता म्हणून शेवटी मी घेतला तेव्हा चंदूकाका मला म्हणाले की अरूणा हा सोन्याचा तुकडा आहे बघा. मी रत्नपारखी आहे. माझं चुकणार नाही.आजवर मी तू गबाळी व अव्यवस्थित आहेस म्हणून तुझ्यावर टीका केली. मला माफ कर अरुणा. कुठला व्यवस्थितपणा घेऊन बसलेय मी? चार गोष्टी नीट ठेवणे याला व्यवस्थित म्हणायचे का आमची जीव तोडून काळजी घेणाऱ्या व्यक्तीला व्यवस्थित म्हणायचे हे मलाच कळले नव्हते. तुझं मन मोठे आहे अरुणा ! खरंच मला माफ कर."
अरुणा लटक्या रागाने म्हणाली, "काय हो आई. कुठे आहे मी गबाळी आणि अव्यवस्थित?" आणि दोघी जोरात हसल्या.
चंदूकाका काठी टेकत लग्नाला आले होते. सासूबाईंची पाच पदरी मोहनमाळ मोडून त्यातून बनवलेला तन्मणी, मंगळसूत्र आणि साक्षीसाठी बनवलेला नेकलेस बघत ते स्वत:वरच खूष झाले होते. चिंचपेटी खाली घातलेला नवा तन्मणी घालून अरुणा कन्यादान करत होती. परमेश्वराच्या मनात असले की तो सगळे विनासायास घडवून आणतो. आपण फक्त आपले कर्म मनापासून करायचे या भावनेने जगणाऱ्या गबाळ्या आणि अव्यवस्थित अरुणाचे आयुष्य अतिशय व्यवस्थित चालले होते. सासरे नातीला आशीर्वाद देताना म्हणाले, "अगदी तुझ्या आई सारखा सुरेख संसार कर ग पोरी !" आणि अरुणा मनापासून हसली.
©® ज्योती रानडे ✍️
2024 JyotiRanade. All rights reserved.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा