मंगळवार, २५ जून, २०२४

1239. शिक्का

      रविवार सकाळ उजाडली. पावसाचा रंग गडद झाला होता. सिंथिया आणि व्हिन्सेंट डी'मेलो मात्र उठले होते. त्यांची रविवार सकाळ चर्चमध्ये जायची. तिथल्या प्रेअर्स , सर्व्हिसेस दोघांना मनापासून आवडायचे.  फादर काय बोलले? त्यांनी आज काय सांगितले याचा विचार करत ते घरी परतायचे. दर रविवारी कोणीना कोणी भेटते, खुशाली कळते हा सिंथियाच्या आवडीचा भाग होता. आठच महिन्यांपूर्वी व्हिन्सेंटने नोकरी बदलली होती. नविन कंपनीने त्याला आलिशान गाडी दिली होती. नवऱ्याबरोबर या गाडीतून जाताना तिला वेगळाच आनंद व्हायचा. तिच्या या वागण्याला ' सिली गर्ल' असे म्हणत मान डोलवून हसायचा. रविवारी दुपारी त्यांना त्यांच्या मोठ्या मुलीच्या एडिथच्या मैत्रिणीकडे जायचे होते. येतायेता बांद्र्याहूनच तिला द्यायला गिफ्टस् घ्यावीत असे दोघांनी ठरवले. त्याप्रमाणे दोघे गिफ्ट घ्यायला एका चांगल्या दुकानात शिरले.  खरेदी चालू असतानाच व्हिन्सेंटला ऑफिसमधून दोन फोन आले. सिंथियाला आश्चर्य वाटले. रविवारी का फोन आले असतील? दुसऱ्या फोनच्या वेळी व्हिन्सेंट दुकानाबाहेर जाऊन पाचेक मिनीटे बोलत होता. तो आत आला तेव्हा त्याचा चेहरा थोडा तणावात वाटला. सिंथियाने हळू आवाजात विचारले ," एनी प्राॅब्लेम इन ऑफीस? यु लुक वरीड्.." व्हिन्सेंटला विषय वाढवायचा नव्हता. ऑफिसमध्ये ऑडीट चालू आहे आणि त्यासंदर्भात त्याला फोन आला होता असे त्याने सांगितले. नंतर दिवसभर व्हिन्सेंट विचारातच होता. दुपारी बराच वेळ लॅपटॉप घेऊन काम करत बसलेला सिंथियाने पाहिले. तिने परत काही प्रश्न न विचारायचे ठरवले होते. संध्याकाळी एडीथ आणि केविनला जाणवले डॅडीला टेन्शन आले आहे. लिझाच्या घरी त्या चौघांनी मजेत वेळ घालवला. दोन्ही मैत्रिणी एकदम खुश होत्या. घरी परत येताना डॅडीचे वागणे नेहमीसारखं नाही हे दोन्ही मुलांना परत एकदा जाणवले. घरी यायला उशिरच झाला होता. चौघे भरभर आटपून झोपी गेले आणि नव्या आठवड्यासाठी सज्ज झाले. सोमवारी सकाळी नवा आठवडा सुरू झाला. एडिथ आणि केविन शाळेत गेले. आपापल्या वेळी व्हिन्सेंट ऑफिस आणि सिंथिया बँकेत गेले. लंचच्या आधी व्हिन्सेंटचा फोन आलेला बघून सिंथियाला वाटले व्हिन्सेंटच्या पप्पांची तब्येत वगैरे बिघडली असेल चेकअपला न्यायचे असेल..पण तिचा नवरा अगदी रडवेला झाला होता.
       थोडसं अस्पष्ट काहीतरी बोलला तिला काय प्रकार झाला असेल ते समजेना. " They have trapped me. I'm innocent. " हेच तो परत परत बोलत होता. नीटसा उलगडा झाला नाही पण त्याचा तो घाबरलेलाआवाज ऐकून सिंथिया चिंतेत पडली. तिने तिच्या मैत्रिणीला झाला प्रकार सांगितला. व्हिन्सेंटच्या ऑफिसमध्ये फोन केला तेव्हा समजले की पोलिस त्याला चौकशी करता पोलिस स्टेशनवर घेऊन गेले आहेत. सिंथियाच्या पायाखालची जमिनच सरकली. तिने धावतच पोलिस स्टेशन गाठले. तिथले एकूण वातावरण बघून तिच्यातले होते नव्हते ते त्राणच गळून पडले. तिच्या घशाला कोरड पडली. तिचे ते घाबरणे वागणे बघून भोवतीच्या नजरांनी ' ही नविनच दिसते इकडे ' चा कयास बांधला. तिथल्या एका लेडी काँन्स्टेंबलचे तिच्याकडे लक्ष गेले. तिने सिंथियाची विचारपूस केली. एकूण मामला लक्षात आल्यावर तिने सिंथियाला घरी जायला सांगितले. " रूटिन चौकशी करता बोलावलंय. डिपार्टमेंटच्या प्रोसिजर असतात मॅडम. तुमच्या हजबंडने काही केले नसेल तर सुटतील की ते. इथे काय पार्टी आहे का सर्वांना बोलावून घ्यायला?" अगदी बेफिकीरीने काँन्स्टेंबल बोलत होती. पर्समधल्या रूमालाने डोळे पुसत सिंथीया पोलिस चौकीबाहेर आली. तिच्याकडे बघून सहज अंदाज येत होता काहीतरी विचित्र घडलय. बस करता थांबण्यापेक्षा तिने सरळ टॅक्सीला हात केला. ती टॅक्सीत बसली. घरी येता येता तिने तिच्या मम्मीला डॅडीबरोबर घरी यायला सांगितले. ती घरी पोचली तेव्हा ते दोघे आधीच आले होते. व्हिन्सेंटचे पप्पा आजारी असतात उगाच मम्मीच्या डोक्याला नवा ताण नको म्हणून तिने नंबर डायल न करताच फोन पर्समध्ये ठेवून दिला. सिंथियाने रडतरडत झालेला सगळा प्रकार तिच्या मम्मी डॅडींच्या कानावर घातला. सिथिंयाचे मम्मीडॅडी- जेनिफर आणि विल्सन सरकारी नोकरीतून निवृत्त झालेले दांपत्य होते. त्यांनी दुनिया पाहिली होती. सिंथियाला वाटले त्यापेक्षा ते दोघे अगदी शांत स्थिर वाटले. व्हिन्सेंटचे कालपासून बदलले वागणे लक्षात आल्याचे एडिथ आणि केविनने पण सांगितले. व्हिन्सेंट लालची नाही हे सर्वांना माहिती होते पण तेच आता पटवून द्यावे लागणार होते. सिंथियाचा मोठा भाऊ डेव्हीड पण तिकडेच आला. डॅडीना त्यांच्या एका मित्राकडून ॲडव्होकेट ताहिल्यानीचा नंबर मिळाला. डॅडींनी ताहिल्यानीला फोन केला. काप-या आवाजात आणि नेमक्या शब्दात त्यांनी घडलेला सर्व प्रसंग त्यांच्या कानावर घातला. ताहिल्यानीने दिलेला सल्ला ऐकून सिंथिया आणि डॅडींना हायसे वाटले. तरी आज काही करता येणारच नव्हते. उद्या सकाळची वाट पहावी लागणार होती. 
     मम्मीने डिनरची तयारी केली.  एडिथ होतीच तिच्या ग्रॅनीच्या मदतीला. केविन मात्र खूप घाबरून गेला होता. तिने मुलांना खायला लावले. होमवर्क करायला पाठवले. कोणाचेच मन लागत नव्हते. डेव्हिड पण आजचा दिवस तिकडेच रहातोय हे समजल्यावर सर्वांना बरे वाटले. सिंथिया आणि जेनीने प्रेअर म्हटली. व्हिन्सेंट परत येऊ दे त्याला त्रास नको असे हात जोडून विनवताना सिंथिया सतत रडत होती. सन्मार्गाने चालणाऱ्याला हा असा ठपका देखील खूप मोठा बट्टा वाटतो. मुले पण खूप केविलवाणी झाली होती. " Edie, you  know something? The police are very cruel they beat innocent and make them accept the charges and then put them behind bars ." केविन असे म्हणाल्यावर एडिथ खूप घाबरली. तिने मूव्हीज् मध्ये हे पाहिले होते. तिला खूप रडू येऊ लागले. तिने डोक्यावरून पांघरूण घेतले आणि आपले अश्रू लपवायचा प्रयत्न केला. रात्री खूप उशिरा दोनच्या सुमारास बेल वाजली. सगळे जागेच होते. डेव्हिडने दार उघडले समोर व्हिन्सेंट होता. विस्कटलेले केस, शर्टची बिघडलेली इस्त्री बरच काही सांगून गेली. घरी आल्यावर त्याला फार बरे वाटले. बायको, मुलांचे चेहरे बघून तो पण हळवा झाला. मम्मीने थोडं पाणी प्यायला लावले. तो मान खाली घालून सोफ्यावर शांत बसून होता. अचानक उठला आणि सरळ आंघोळ करायला बाथरूममध्ये घुसला. त्याने शाॅवर सुरू केला अंगावर गरम पाणी पडताच झालेल्या सगळ्या गोष्टी एकानंतर एक आठवत गेल्या. नविन नोकरी , नविन जग आठेक महिन्यापूर्वी तो ज्या आनंदात होता त्याच्या अगदी विरुद्ध आज घडले होते. 
     ऑफिसमध्ये बराच मोठा आर्थिक घोटाळा झाला होता. बरीच मोठी रक्कम हळूहळू करत ऑफिसबाहेर नेली होती. खोटी चलान्स, खोटी बिले, चुकीच्या खात्यात रक्कम भरली जात होती. अगदी दिवसा ढवळ्या फसवणूक झाली होती. अगदी सुरुवातीला एकाने लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला होता पण त्याकडे म्हणावे तसे लक्ष दिले गेले नव्हते. हे सर्व व्हिन्सेंट या कंपनीत कामाला लागण्या आधीपासून घडत होते पण तरीही व्हिन्सेंटचे नाव मुद्दाम यात गोवले गेले. अधिका-यांना आधीच थोडी कुणकुण लागली होती. शनिवार रविवारी ऑफिसमधल्या काही सिनीयर लोकांनी या प्रकाराचा छडा लावायचा ठरवले होते. म्हणून शनिवारी मेलवर आणि रविवारी फोनवर व्हिन्सेंटला प्रश्न विचारले गेले. त्यावेळी त्याला कल्पना दिली नव्हती. त्याच डिपार्टमेंटला असल्याने व्हिन्सेंटला चौकशीकरता पोलिस स्टेशनवर जावे लागले. पण तिकडे, चौकशी करताना एका काँन्स्टेंबलने त्याची काॅलर धरली तेव्हा त्याला खूप राग आला, खूप अपमान वाटला. अब्रूदार माणूस नेहमीच बेइज्जतीला घाबरतो. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे नुसतेच बसून होते. डेव्हिड घरी गेला. मम्मी डॅडी मात्र तिथेच राहिले होते. व्हिन्सेंट निर्दोष होता याची त्याला खात्री होती पण कालपासून त्याला असे जाणवले की नुसते आपल्याला माहिती असून चालणार नाही. हे कागदावर लिहून आले पाहिजे , सिद्ध झाले पाहिजे. त्याने समोरच्या येशूच्या फोटो फ्रेमकडे पाहिले. येशूच्या डोळ्यातली करूणा त्याला आधार देऊन गेली त्याने समोर उभे राहून प्रार्थना केली. मागे उभ्या असलेल्या  सिंथियाने " आमेन!" म्हणताच त्याने मागे वळून तिच्याकडे पाहिले. 
" Don't worry, Vinn ! God is Great, He will take us out of this difficult time." तिने नवऱ्याला आश्वास्त केले. तिने आपले डोके त्याच्या खांद्यावर ठेवले. त्याने तितक्याच स्नेहभराने तिला पाठीवर थोपटले. या दोन क्षणांमुळे व्हिंसेंटला आपले सर्व कुटंब आपल्या बरोबर आहे याची खात्री पटली. व्हिंसेंटला पोलिस स्टेशनवर जावे लागले ही बातमी पसरायला फारसा वेळ लागला नाही. आपले वाटणारे किती परके किंवा अलिप्त होते हे चौघांना समजू लागले होते. 
"कुछ तो किया रहेंगा, इसके वास्तेच पुलिस ले गयी होगी.." 
" इतना बडा गफला किया तो दे दिया होगा पोलिस को २% और आया निकल के बाहर.." 
"कितना शरीफ लगता था.." 
अशी वाक्य ऐकू येतील अशा बेताने मोठ्याने बोलली जात होती. एडिथ आणि केविनने बाहेर जायचेच बंद केले होते. त्यांच्याकरता ही परिस्थिती अक्षरशः परिक्षा बघणारी होती. घरात ताण , ताणातून आलेली शांतता होती. एडिथचे ना कुठे जायचे प्लॅन होते ना केविन मोठमोठ्या आवाजात गाणी म्हणत होता. ना हट्ट होते ना भांडणे..घरातले वातावरण पार बिघडून गेले होते. सिंथियाचे मम्मी डॅडी घरी परत गेले होते.  सिंथिया घर, नवरा, मुले, तिची बँक अशा सगळ्या आघाड्यांवर लढत होती. पहिले काही दिवस व्हिन्सेंट ऑफिसला गेला नव्हता. त्याला सारखे वाटत होते राजीनामा पाठवून द्यावा परस्पर. सिंथियाने त्याला बजावले होते, " नोकरी सोड पण तू निर्दोष आहेस हे सिद्ध झाल्यावरच. एकदम उजळ माथ्याने. हा माझा माझ्या नवऱ्यावरच्या विश्वासाचा प्रश्न आहे." आपली बायको इतके बळ कुठून आणते असा प्रश्न त्याला सतत पडत होता..आठवडाभराने त्याला ऑफिसला परत पुन्हा यायची मेल आली. घरातले वातावरण जरा निवळले. हे तीन आठवडे डी'मेलो कुटूंबाकरता खूप अवघड होते. नंतर हळूहळू परिस्थिती बदलत गेली. आर्थिक घोटाळ्यामागचे सर्व लोक पकडले गेले. त्यांनी व्हिन्सेंटचे नाव मुद्दाम गोवल्याची कबूली दिली. सिंथीयाच्या डोक्यावरचे मणामणाचे ओझे उतरले. त्यादिवशी चर्चमध्ये जाऊन डोकं टेकवत भरपूर रडून घेतले. एडिथ आणि केविन पण खूप खूश झाले. त्यांना देखील खूप ताण आले होते.  " पोलिस डॅडीला घेऊन जाणार.. त्रास देणार.." असा भयगंड त्याला त्रास देत होता. व्हिन्सेंटने आता कुटूंबाची विस्कळीत झालेली घडी परत बसवायचे ठरवले. संध्याकाळी ते त्यांच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये गेले. चौघांकरता अतिशय गरजेचा बदल होता.  ते घरी आले तेव्हा परेरा कुटूंब खाली पार्किंगमध्ये भेटले नंतर लिफ्टमध्ये आदिल भेटला. दोन्ही वेळा सिंथियाला जाणवले की लोकांना खूप कुतूहल आहे नक्की काय घडले हे जाणून घ्यायचे किंवा थोडा संशयही ! नेहमी आपल्याभोवती रहाणारी लोकं आपल्याला ओळखू शकली नाही याचे तिला खूप वाईट वाटले. मुलांना देखील असाच अनुभव येत होता. 
"डॅडी, आपण इथून निघून जाऊ..दुसरीकडे अजून मोठ्या घरात."  केविन उसळून म्हणाला. 
व्हिन्सेंट शांत राहिला. शनिवारी रात्री त्याने एडिथ, केविन आणि सिंथियाला एकत्र असताना विषय काढला. तिघं तो काय सांगतोय ते ऐकत होती. 
"एडि, केविन आपण इथून जाऊ शकतो. नविन घर घेऊ शकतो पण असे करणे म्हणजे पळून जाणे होईल. परत कधी ना कधी कोणाला तरी समजले की काय परत तिथून जाणार का आपण? आणि जर माझी चूक नव्हती तरी आपण इथून गेलो तर उलट लोकांना अधिक संशय येईल. खरंतर आपण कोणाला उत्तर द्यायची गरजच नाही. कोणी विचारले तर माझ्याशी बोलायला सांगा. मी बोलीन. तुम्ही जितके लवकर नेहमीसारखं वागायला लागाल तितके लवकर लोकं विसरतील." 
" No Daddy, they won't let us forget.." एडिथ म्हणाली. 
" Eddie, Let them remember their part and better you conquer this guilt." 
मुले आणि सिंथिया ऐकत होती त्यांना व्हिन्सेंट जे सांगतोय ते पटले होते. एक मोठा धडा त्यांना मिळाला होता. रविवारच्या मास प्रेअर करता दोघांनी आपणहून मम्मी डॅडी बरोबर जायचे ठरवले होते. सगळे शिक्के पुसून टाकणे गरजेचं होते.  आपल्या आजूबाजूच्या लोकांनी आपल्यावर लादलेल्या शिक्क्यांचे ओझे घ्यायचे नसते. ते त्यांच्या सोयीने मत बनवतात, मते पसरवतात ती त्यांची ' नियत ' असते. काहींना सूक्ष्म असूया, द्वेष असतो. आपण त्याला फशी पडलो तर त्यांचे फावते. त्यामुळे असे शिक्के हसत पुसून टाकत पुढे जाणे हेच योग्य असते. आयुष्यातला सर्वात अवघड धडा मुले शिकली होती..


 #अनघा_किल्लेदार  ✍️
 पुणे.  २२/०६/२०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...