शुक्रवार, २१ जून, २०२४

1231. ट्रान्झिस्टर

     नचिकेत जवळजवळ सहा महिन्यांनी घरी परत आला होता. बोटीवर ऑफिसर चा जॉब म्हटल्यावर भरपूर पगार होता पण हो गैरसोय होती. सहा शहा महिने घरच्यांचं तोंड दिसत नव्हतं. आजोबा गेल्यानंतर जवळजवळ तीन महिन्यांनी तो घरी आला होता. तो आला. बॅग वगोरे ठेऊन आजीला भेटायला तिच्या खोलीत गेला। आजीने त्याला बघितलं आणि तिला  हुंदके आवरेनासे झाले. "नचिकेत, अरे पोरा चांगले ठणठणीत होते रे. असे कसे अचानक गेले ते?" आजी इतकंच बोलली आणि पुन्हा रडू लागली. त्याने तिचं कसंबसं सांत्वन केलं. दरम्यान आईने त्याला आणि आजीला पाणी आणून दिलं. "बाबा गेल्यापासून हे असं आहे रे. काय सांगायचं त्यांना आता? तूच बघ." नचिकेत ची आई, सुनीला त्याला म्हणाली. 
        नचिकेत आजीशी बोलता बोलता खोली बघत होता. आजोबा असताना खोलीला एक चैतन्य होतं. आता मात्र पार रया गेल्यासारखी झालेली खोलीची. त्याची नजर भिरभिरत एका गोष्टीवर स्थिर झाली. त्या खोलीत असणारी जवळजवळ प्रत्येक गोष्ट त्याला परिचीत होती. पण एक वस्तू सोडून. आरामखुर्ची च्या बाजूला असलेल्या खिडकीत असलेला ट्रान्झिस्टर. हे काहीतरी नवीन आहे हे त्याला दिसत होतं." ते होय, यांच्या एका मित्राने आणून दिलंय." आजी म्हणाली. तो उठला आणि ट्रान्झिस्टर हातात घेऊन जवळून त्याचं निरीक्षण करू लागला. मेड इन जपान म्हटल्यावर विषय संपत होता. त्याने तो उचलला आणि तो घेऊन  हॉल मष्ये घेऊन बसला.  इतक्यात त्याचे वडील, जे त्यांच्या मित्राकडे गेले होते, ते परत आले. त्यांना बघून त्याने ट्रान्झिस्टर बाजूला ठेवला.
    "अरे नची, कधी आलास तू?" वडिलांनी विचारपूस करायला सुरुवात केली. नचिकेतने पूर्ण सहा महिन्यांचा अनुभव थोडक्याग सांगितला. जॉईन झाल्यानंतरची ही त्याची पहिली सुट्टी. आजोबांचं दुःख होतं आणि सहा महिन्यांनी सगळ्यांची भेट होते ही जरा चांगली गोष्ट होती. थोड्या वेळाने त्याची धाकटी बहीण, समिहा घरी आली. आल्या आल्या तिने नचिकेत च्या खांद्यावर एक दणका दिला. ते त्या दोघांची आक्रमक प्रेमाची भाषा होती," काय दादा, हं? सहा महिन्यांनी होतेय भेट आपली. घरापासून जास्ती कधी लांब गेला नाहीस आणि आता इतके दिवस?" नचिकेतने तिला आपल्या जवळ बसवलं आणि बॅगेतून एक गिफ्ट बॉक्स काढून तिच्या हातात दिला." माहितीये मला. तुला दूर रहावत नाही. बडबड कोणाशी करणार आता तू इतकी? हाहाहा . व्हिडिओ कॉल वगैरे आहेत पण ते तात्पुरते." तो बोलत होता. समिहाने तो बॉक्स उघडला. आत एक छोटं गिटार सारखं वाद्य होतं." हे उकुलेले आहे. गिटार सारखं वाजतं. सुंदर वाद्य आहे." तो तिच्या विस्फारलेल्या डोळ्यांकडे बघत म्हणाला. तिने ते हातात घेतलं. गिटार वाजवता येत असल्यामुळे तिने त्याच्यावर एक धून वाजवून पाहिली. "चला रे, जेऊन घ्या सगळे. भूक लागली असेल नचि ला" आईने फर्मान काढलं आणि समिहा लगेच आईच्या मदतीला गेली. भराभर ताटं वाढली गेली आणि आई बाबा आजी समिहा आणि तो असे सगळे जेवायला बसले. 
 "वाह, सहा महिन्यांनी घरचं जेवण." पुरणपोळीचा घास खात खात नचिकेतने आईकडे बघत म्हणाला.
"होय बाळा, त्या बोटीवरच्या जेवणाला कसली आलीय मेली चव?" इति नचिकेतची आजी. 
"आजी, अगदीच असं नाहीये ग. पण जे घरचं ते घरचं." नचिकेत हसत हसत म्हणाला. 
"दादा, बोटीवरचे किस्से सांग ना काही." समिहाने आग्रह धरला.
"ए, त्याला जेवू देत जरा, मग सांगेल तो किस्से." नचिकेचच्या आईचा दम मिळाल्यावर सगळे गप्प माना खाली घालून जेवू लागले.
     आपला दादा सहा महिन्याने परत येणार आहे ही समिहासाठी खूप आनंदाची गोष्ट होती. समिहा आणि तिचा भाऊ नचिकेत यांच्यात इतकं चांगलं बॉंडिंग होतं की कोणतीही गोष्ट समिहा त्याच्याशी शेअर करू शकत होती. अगदी शाळेतला पहिला क्रश पण तिने शेअर केला होता. तसं दोघांमध्ये चार वर्षाचं अंतर पण आदर आणि मैत्री यांचं बरोबर संतुलन साधलेलं आदर्श भाऊ बहिणीचं नातं. कॉलेज आणि गिटार क्लास आटोपुन ती घरी आली तेंव्हा नचिकेत आलेला होता. तिने नेहमीप्रमाणे एक दणका पाठीवर देत त्याचं तिच्या पद्धतीने स्वागत केलं. नचिकेत ने येताना तिच्यासाठो आणलेलं गिफ्ट तिला खूप आवडलं. नंतर  नचिकेत ने सांगितलेली बोटीवरची वर्णनं, तिथले अनुभव ऐकता ऐकता बारा वाजले. "चला ,झोपा आता" अशी आईची आज्ञा आल्यावर सगळे झोपायला गेले.
     समिहाला नचिकेतशी बोलायचं होतं. पण तो नेमका  एकटा सापडत नव्हता. आजोबांच्या मृत्यू हा दिसायला वरकरणी श्वासोश्वास थांबल्यामूळे झालेला दिसत असला तरी त्यांच्या मृत्यूचं कारण वेगळं असावं असं तिला राहूंन राहून वाटत होतं. कारण आजोबा आजारी नव्हते. ते ज्या पहाटे गेले त्या रात्री ते ट्रान्झिस्टर वर काही ऐकत होते. आणि जेंव्हा सकाळो त्यांना उठवायला आजी उठली आणि तिने तिचं मशीन कानाला लावलं तेंव्हा तिला पहिला आवाज ट्रान्झिस्टरच्या खरखरीचा आला होता. हे समिहाला माहिती होतं. त्या ट्रान्झिस्टरचा आणि आजोबांच्या मृत्यूचा काही संबंध असावा असं समिहा ला वाटत होतं. तिच्या या बोलण्याबर कोण विश्वास ठेवणार नाही हे समिहाला पकक ठाऊक होतं. पण नचिकेत नक्की ऐकेल असा तिला विश्वास होता. दुपारी शेवटी तो तिला मोकळा सापडलाच. 
"दादा, एक बोलायचं होत मला." ती हळू आवाजात म्हणाली. 
"बोल ना, काय झालं? " नचिकेत हातातलं पुस्तक बाजूला ठेवत म्हणाला. 
"दादा, आजोबा गेले ते संशयास्पद आहे खूप माझ्यासाठी. त्यांचं जाण असच जाण नव्हतं. त्या रात्री ते ट्रान्झिस्टर वर गाणं ऐकत होते." समिहा ने तिला जे माहीत होतं ते सगळं सांगितलं.
"हं, हे पटायला कठिण आहे पण या जगात अनेक अविश्वसनीय गोष्टी घडू शकतात. आपण आज तो ट्रान्झिस्टर लावून बघूया. मी काल बघितला होता तो आल्या आल्या. पण नंतर चालू करायचा राहून गेला. आता बघूया." अस म्हणून तो उठला. ते दोघे बाहेर आले. समिहाला थोडं बरं वाटत होतं. तीन महिन्यानंतर ती कोणालातरी हे बोलून दाखवत होती. 
    ते दोघे हॉल मष्ये आले. नचिकेत ने ट्रान्झिस्टर हातात घेतला. जरा नीट निरीक्षण केलं आणि त्याने तो चालू केला. खरखर करत तो सुरू झाला. वेगवेगळे चॅनल्स चालू झाले. जवळजवळ तीन महिन्यानंतर कोणीतरी तो चालू केला होता. गाणी वाजत होती. आवाज ऐकून आजी आणि आई दोघी हॉलमध्ये आल्या.
"हा का काढला आता?" आईने बडबड सुरू केली. नचिकेत ने हाताने थांबवलं. समिहा पण ऐकू लागली. कसले तरी कु कु असे आवाज येत होते. हे असलं काही तिने कधीच ऐकलं नव्हतं. तिला काही अर्थ लागत नव्हते, पण मचिकेतच्या चेहऱ्यावर भावनांचे जे बदल होते त्यामुळे काहीतरी वेगळं आहे हे समिहाल कळत होतं. आपल्या बहिणीने सांगितलेल्या गोष्टीवर नचिकेत कधीही अविश्वास दाखवत नसे. तर्क वगैरे गोष्टी असतील तरी त्या थोडावेळ तो बाजूला ठेवायचा. आताही तिने सांगितलेल्या गोष्टोला त्याने उडवून लावलं नव्हतं. त्याची सत्यासत्यता पडताळायला नचिकेतने तो ट्रान्झिस्टर चालू करून ऐकायला सुरुवात केली होती. खरखर करत तो ट्रान्झिस्टर सुरू झाला. वेगवेगळे चॅनल्स नचिकेत फिरवून बघत होता. समिहा सुद्धा बाजूला बसलेली होती. तो आवाज ऐकून त्याची आई आणि आजी पण बाहेर येऊन बसली. गाणी वाजत असताना अचानक ट्रान्झिस्टर ला पुन्हा खरखर सुरू झाली. नचिकेत काही करणार इतक्यात त्यातून कु कु असे आवाज सुरू झाले. हे रेडिओ संदेश होते. नचिकेतला ती भाषा समजत असल्यामुळे तो ताठ बसला.
 "काय झालं रे?" त्याचे चिंतीत आविर्भाव पाहून नचिकेतच्या आईने त्याला  विचारलं. 
"आई, ही मदतीची हाक आहे. पाचशे लोक जहाजावर अडकलेले आहेत. जहाजाच्या इंजिनात बिघाड झालेला आहे. कधीही स्फोट होऊ शकतो अशी स्थिती आहे." तो उठून उभा राहिला. 
" काय रे? त्याच्या आजीने त्याला विचारलं.
 "मला माझ्या सिनियर्स ना कळवायला हवं हे. काही मदत पाठवता येते का पाहू. " नचिकेत ने फोन करायला फोन बाहेर काढला पण नेटवर्क पूर्ण डाउन. रेंजसाठी तो बाहेर आला. बाहेर पूर्ण रेंज होती. त्याने आपल्या सिनियर्स ना फोन केला. पलिकडे कॅप्टन महेश नाडकर्णी नावाचे अधिकार होते. नचिकेतने त्या बोटीबद्दल, तिच्या स्थानाबद्दल, अक्षांश रेखांशब्दल सगळं सांगितलं. 
"मि. नचिकेत. ताबडतोब तो ट्रान्झिस्टर डिसमेंटल करा. नष्ट करा ते यंत्र. किती वेळ झालं हे चालू आहे?" नाडकर्णींचा आवाज गंभीर होता. 
"एक सात आठ मिनिट झाली असतील." नचिकेत म्हणाला. 
"तिथे आजूबाजूला कोणी आहे का?" नाडकर्णी गंभीर पणे बोलत होते. 
"हो, आई बहीण आणि आजी आहेत." नचिकेतने सांगितलं. 
"मि. नचिकेत, ताबडतोब जा तिकडे. त्यांचे प्राण संकटात आहेत. पहिलं ते तोडून टाका आणि. जा." फोन कट झाला होता.
      नचिकेत पळत पळत आत आला. आत मध्ये मोठा स्फोट झाल्यासारखं दृश्य होतं. त्याची आई, आजी, बहीण तिघीही खाली जमिनीवर पडल्या होत्या. ट्रान्झिस्टर आजूनहो वाजत होता. नचिकेतने पुढे जाऊन तो बंद केला. तरीही तो बंद न होता वाजत होता. नचिकेतला अचानक अंगाचा दाह जाणवू लागला. त्याला श्वास घेणं कठीण वाहायला लागलं. कशीबशी तिथे पडलेली एक पक्कड घेऊन त्याने ट्रान्झिस्टरवर वार केला. ट्रान्झिस्टर थांबायला तयार नाही. शेवटी नचिकेत ने ट्रान्झिस्टर उचलला आणि जोरात जमिनीवर आपटला.  त्याचे तुकडे झाले. तो आवाज थांबला. आता कुठे त्याला शांत वाटलं जरा. त्याने त्या दोघींची नाडी गती बघितली. नाडी बंद होती. श्वासही बंद झालेला होता. नचिकेतच्या पायाखालची जमीन सरकायची बाकी होतो. इतक्यात त्याचा फोन वाजला. तेच मघाचं कॅप्टन नाडकर्णी होते. 
"तिथले अपडेट्स?" त्यांनी विचारलं. 
" सर, आई आजी, आणि बहीण बेशुद्ध आहेत श्वास बंद नाडी बंद" कसं बस नचिकेत म्हणाला.
"शेवटी तेच झालं जे व्हायला नको होतं. मि नचिकेत, हा ट्रॅप आहे. हा कोणी कसा चालू केला माहीत नाही. पण ज्या घटनेचा उल्लेख तुम्ही करता किंवा ज्या जहाजाचे अक्षांश रेखांश सांगता, ते सत्तर वर्षांपूर्वी तिथे बुडालेलं आहे. त्या जहाजाचा अत्यंत करुण अंत झालाय. पाचशे साडेपाचशे लोक त्यात मारले गेले. त्यानंतत दोन तीन वर्षापासून या घटना सुरू झाल्या. जबाबदार लोक मेसेज देऊ लागले. पण नंतर आम्हला कळत गेलं की जे हे जहाजकडून आलेले संदेश ऐकत आलेत त्यापैको कोणीही वाचलं माही. अगदी विरळ केसेस. सो मि. नचिकेत. सावरा स्वतःला. पुढचं सगळं आता तुम्हाला बघायचंय. काही लागलं तर नक्की सांगा." एवढं बोलून नाडकर्णीनी फोन ठेऊन दिला. नचिकेत मटकन खाली बसला. काही मिनिटात होत्याच नव्हतं झालं होत. नचिकेत रडत होता आणि बाजूला तो ट्रान्झिस्टर पडला होता. बऱ्याच वेळाने नचिकेत सावरला आणि त्याने लोकांना फोन करायला सुरुवात केली. शेवटी आता सगळं त्यालाच निभावाचं होतं. तो तयारीला लागला.
     नचिकेत बाबत जे झालं त्याला काय स्पष्टीकरण देता येईल हा एक मोठा प्रश्न आहे पण एक सांगता येईल. त्या जहाजाच्या बाबतीत जे काही झालं ती फार करुण घटना होती. अनेक लोकांच्या इच्छा आकांक्षा त्या दाहक अग्नी मध्ये भाजून निघाल्या. तयातून एक तीव्र नकारात्मकता निर्माण झाली. परिणामी विश्व अशांत करू पहाणाऱ्या शक्तींना एक खेळणं मिळालं. ज्याचा उवयोग ते स्वतःची ऊर्जा वाढवण्यासाठी करत आलेले आहेत. नचिकेत बाबत हेच झालं.
      ट्रान्झिस्टर हे फक्त निमित्त झालं. एक द्वार ज्यांतून प्रवेश केला आणि हवी असलेली गोष्ट मिळवली. हा ट्रॅप किंवा सापळा काही विशिष्ट वेळी उघडत असतो. उद्या वेळ काहीही असू शकेल. उद्या निमित्त काहीही असू शकेल. आपण सगळे सध्या घरो आहोत. आपण करमणूक मोबाईल मधून एफ एम लागू शकतो. चुकूनही असं काही ऐकू आलं तर मोबाईल पासून लांब दूर जा. कारण जीव महत्वाचा. कोणी सांगावं तो ट्रॅप उघडला असेल तर.
 
अभिषेक अरविंद दळवी 
 (धारप पंथी)  ✍️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...