आमच्या शोरूम मध्ये नेहेमी सारखीच गर्दी होती. सणासुदीनिमित्ताने टीव्ही फ्रीझ,एसी, वॉशिंग मशीन घेण्यासाठी सर्वजण आले होते. नुकतंच एक लाखाचे बिल मी तयार केले आणि वस्तू कुठे पोहोचवायच्या ह्या साठी गिऱ्हाइकाला पत्ता विचारला. त्याने सांगितलेला पत्ता ऐकून मला क्षणभर धक्काच बसला. हा तर सावंत काकांचा पत्ता होता. माझ्या चेहेऱ्यावरचे बदललेले भाव बघून त्या तरुणाने मला विचारले. "पत्ता ओळखीचा आहे का? मी त्याला म्हणालो हो. हा सावंत काकांचा पत्ता आहे. पण हल्ली बऱ्याच महिन्यांत भेट नाही आमची म्हणून मी थोडा काळजीत आहे. त्यावर तो तरुण मला म्हणाला ज्यांचा तुम्ही उल्लेख केलात त्यांचा मी मुलगा आहे . बाबा आता निवृत्त झाले. त्यांच्याच वाढदिवसानिमित्त मी ही खरेदी केली आहे. खूप मेहेनत घेऊन त्यांनी मला मोठे केले आहे. माझ्या सहकाऱ्याला माझे काम करण्यास सांगून मी त्या तरुणाकडे थोडा वेळ मागून घेतला. त्याला आणि त्याच्या बरोबर आलेल्या दोन बायकांना (बहुतेक एक त्याची बायको आणि एक आई असणार) शोरूमच्या आतल्या बाजूला घेऊन गेलो आणि बसण्यास सांगितले. आता मी काय सांगतो ते नीट ऐक असं म्हणून मी बोलायला सुरवात केली. सावंत काकांची आणि माझी जुनी ओळख आहे. आमच्या शोरूमच्या बाहेर रस्त्यावर असलेल्या बस स्टॉपवर ते नेहेमी उतरायचे. मला मध्ये अडवून तो तरुण म्हणाला पण का ? कारण आमचे घर अजून तीन स्टॉप पुढे आहे. "त्याचेच कारण आणि तुझ्या बाबांची तळमळ मला आज तुला सांगायची आहे"
मी त्यांना ठराविक वेळेला रोज बघायचो . एक दिवस माझा सहकारी मला म्हणाला की हे गृहस्थ ह्याच रस्त्याने सरळ पुढे बरेच चालत जातात. मला ती गोष्ट जरा चमत्कारिक वाटली. कुतूहलापोटी मी एक दिवस त्यांना शोरूम मध्ये बोलावून ह्या मागचे कारण विचारले आणि त्यांचे उत्तर ऐकून थक्क झालो. ते म्हणाले ह्या स्टॉपचे भाडे आणि माझ्या घराजवळच्या स्टॉपचे भाडे ह्यात ८ रुपयांचा फरक आहे. म्हणून मी ह्या स्टॉप वर उतरून घरी चालत जातो. सकाळी देखील मी ३ स्टॉप अलीकडे उतरून स्टेशनवर जातो. चर्चगेट स्टेशन वरून देखील मी ऑफिसला जाताना आणि परत येताना चालत जातो येतो आणि २० रुपये वाचवतो. अश्या रीतीने रोजचे ३६ रुपये आणि महिन्याचे ९००-९२५ रुपये मी वाचवतो. शिवाय ऑफिस सुटल्यावर एके ठिकाणी २ तास नोकरी करून मग घरी जातो रोज. माझ्या घरच्यांना ह्याची काहीही कल्पना नाही. ह्या पैशातून मुलांसाठी गरजेच्या वस्तू घेतो . मुलं हुशार आहेत माझी. पण माझ्या मर्यादित उत्पन्नाची झळ माझ्या मुलांना बसू नये ह्यासाठी हे अधिकचे कष्ट मी घेतो. एखादी आवश्यक गोष्ट आपल्याकडे नाही ज्यामुळे आपल्याला शिकायला त्रास होईल असं क्षणभर सुद्धा माझ्या मुलांच्या मनांत येऊ नये ह्याची मी कायम काळजी घेतो. माझ्या मुलांना कष्टाच्या आणि गरिबीच्या क्षितीजाच्या पलीकडे ठेवण्यासाठी मी रोज ३ स्टॉप अलीकडे उतरतो आणि चर्चगेट वरून दोन्ही वेळेला चालत जातो येतो .
तुझ्या बाबांचे बोलणे ऐकून मी थक्क झालो. सुरवातीला त्यांनी नकार दिला पण काही वर्षांनी मात्र माझी विनंती त्यांनी मान्य केली. माझ्या शोरूमपासून तुमच्या घरापर्यंत आणि इथूनच स्टेशन पर्यंत माझा माणूस त्यांना स्कुटरवरून सोडायला लागला. तुझ्या वडिलांचे कष्ट थोडेसे का होईना पण कमी करण्यासाठी माझा हातभार लागला ह्याचा मला अभिमान आहे. तुमच्या घरासाठी त्यांनी केलेल्या त्यागाची जाणीव ठेव तू शेवटपर्यंत. माझे बोलणे झाले आणि त्या तरुणाने मला गच्च मिठी मारली आणि त्याच्या गळ्यातून हुंदका बाहेर आला. त्याच्या बायकोची आणि आईची देखील तशीच काहीशी अवस्था होती हे त्यांचे डोळे सांगत होते. भानावर आल्यावर तो मला म्हणाला पुढच्या आठवड्यात बाबांचा वाढदिवस आहे आणि त्यासाठीच तर मी आज तुमच्या शोरूम मधून ह्या वस्तू खरेदी केल्या आहेत. तुम्ही नक्की या आमच्या घरी बाबांच्या वाढदिवसाला. त्यांच्यापोटी जन्माला येणे किती भाग्याचे होते हे मला आज जाणवले. त्यांनी आमच्या नकळत केलेल्या कष्टांची पुरेपूर भरपाई मी नक्की करीन हे मी तुम्हाला आज वचन देतो. माझ्या मनांत त्यांच्या विषयी तुम्ही देवत्व जागवलेत ह्यासाठी तुमचे खुप खुप धन्यवाद. ते तिघे माझे आभार मानून आमच्या शोरूममधून निघाले आणि माझ्या सहकाऱ्याला उठायला सांगून मी परत माझ्या जागी काम करू लागलो.
© सतीश बर्वे.
०९.०६.२०२४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा