बुधवार, ३० नोव्हेंबर, २०२२

66. आपला आनंद आपणच शोधायचा

 तिने मोठ्या मुलाला फोन लावला..
"हॅलो "
"बोल आई"
"अरे, दिवाळी जवळ आली ,केव्हा येतोय?"
"अगं,दिवाळीची बहुतेक लोकांनी सुट्टी घेतली आहे अगोदरच आणि वर्कलोड फार आहे. त्यामुळे कठीण वाटते आहे."
"अरे...पण दिवाळीचे चार दिवस तरी"
" नुकतेच प्रमोशन झाले आहे आई.सध्या तरी नाही जमणार"
"ऑफिसला तर सुट्टीच असणार ना? मग राहून काय करतो?"
"इथले बाकीचे काम उरकून टाकतो.फ्लॅट बघायचा आहे. काही कागदपत्रे अपडेट करायची आहेत."
" म्हणजे दिवाळीलाही नाही येणार?" तिचा स्वर हळवा झाला.
"आई, उगाच इमोशनल नको होऊ.दिवाळीनंतर मला चांगली आठवडाभराची रजा मिळणार आहे.बॉसनेच सांगितले.मग येऊन राहिल निवांत गावी."
***
       तिने लेकीला फोन लावला. 
  "हॅलो"
" आई  आता तुलाच फोन लावणार होते"
"का गं?"
"ह्यावेळी दिवाळीला येणे कठीण आहे ग."
"का?"
"प्रोजेक्ट सबमीट करायचा आहे गं."
"तो तर पुढच्या महिन्यात करायचाय ना?"
"हो .पण आता शेवटचा हात फिरवायचा आहे. सर म्हणाले आता सगळे होत आले आहे तर लिंक तोडू नको. "
"अग पण चार दिवसांनी असा कोणता मोठा फरक पडणार आहे?"
"प्लीज आई,आग्रह करू नको. प्रोजेक्ट झाला की मी महिनाभर येऊन राहिल हवी तर."
****
        मुले येणार नसल्याने निराश मनस्थितीत तिला नीट  झोप लागलीच नाही. पण नेहमीच्या सवयीने पहाटे जाग आली. बाहेर आली तर देवघरातला लाईट चालू होता. काल रात्री तर आठवणीने बंद केला होता.ती घराबाहेर आली. अजून अंधारलेलंच होते. बघते तर घराचे अंगण स्वच्छ झाडून सडा घालून ठेवलेले होते. घराबाहेरच्या कुंपणाच्या कोपऱ्यावर एक पणतीही लावलेली. तेवढ्यात धूमधडाम आवाज आला. तिने घाबरून कान बंद केले तसा रस्त्यावरून हसत हसत तिचा नवरा आला.
" तुला उठवण्यासाठीच एटमबाँब लावला तर तू आधीच उठलेली. "
"काय हे? ह्या वयात शोभत का फटाके उडवणे? शेजारीपाजारी काय म्हणतील?"
"काय म्हणतील? म्हणतील की म्हाताऱ्याचे डोके फिरले" तिचा नवरा पुन्हा  हसत म्हणाला.
" आणि एवढ्या थंडीचे बनीयन बर्म्युडावर काय फिरताय? थंडी बाधेल. चला आत मी चहा ठेवते."
"चहा झाला आहे माझा. तुझाही ठेवला आहे.चहा पी आणि लवकर आटप .आपण गणपतीच्या दर्शनाला जाऊन येऊ."
     ती दोघे निघाली तेव्हा मस्त गुलाबी थंडी पडली होती.सकाळची वेळ असूनही बाजार भरत चालला होता. इतक्या सकाळीही काही खरेदीदार लगबगीने  जात होते. दुकाने सजवली जात होती. गणपतीचे दर्शन घेऊन येतांना तिच्या नव-याने गजरा घेतला. एरवी तिने "कशाला या वयात गजराबिजरा" म्हणून विरोध केला असता. पण आज तिने आवडीने तो अर्ध्या पांढऱ्या झालेल्या केसात माळला. तिला अगदी प्रसन्न वाटत होते. ती मनाशीच म्हणाली.....
आपला आनंद आपणच शोधायचा.
          खरे तर हे एक साधे उदाहरण , पण ज्या वेळेस आयुष्याची पाने पिवळी होऊ लागतात  व  एक पोकळी निर्माण होते त्यावेळेस मुलांचा सहवास हवाहवासा वाटतो नेमके त्याच वेळेस मुले अनेक सबबी सांगून गोष्टी टाळतात may be  त्यांच्या बाबतीत ते योग्य असेलही , पण आपले मन ते  ACCEPT करत नाही , कारण मन हळवे झालेले असते , आयुष्यात बऱ्याच खस्ता खाऊन झाल्यावर मुलांच्या प्रेमासाठी आई-वडील आसुसलेले असतात, पण मुले मोकळी नसतात. व्यवहार ज्ञान बऱ्या पैकी पक्के झालेले असते. त्यामुळे ते आपल्या भावनांना बाधत नाहीत, केवळ प्रॅक्टिकल गोष्टींवर ते जास्त concentrate होतात..
        जसजसे वय वाढत जाते तसतसे एकेक गोष्ट सोडण्याचा प्रयत्न जरूर करावा, मुले मोठी झाल्यावर स्वतंत्र असतात, त्यामुळे त्यांच्या बाबतीत अपेक्षा करणे सोडणे हे केव्हाही चांगलेच. आपणच आपला आनंद शोधणे व वाढत्या वयाबरोबर हळूहळू बऱ्याच गोष्टींना फाटा देणे हे केव्हाही चांगलेच ,त्यामुळे अपेक्षांचे ओझे तर राहणार नाही व त्यामुळे येणारे दुःख पण आपोआप संपेल. मान्य आहे या गोष्टी अवघड आहेत पण तशी मानसिक तयारी जर लवकर ठरवली तर पुढील येणारा काळ हा सुसह्य होईल. बाकी काही नाही, कारण काही असल तरी दोन पिढ्यांतील अंतर , काळ, परिस्थिती, जाणीव, व्यवहाराच्या भाषा , विचार हे बदललेले असतात. ते कायम लक्षात ठेवले तर भावनिक कोंडमारा व त्यातून येणारे नैराश्य हे बऱ्याच अंशीं कमी होते..
संपादक   : गटपाडे एन आर

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

65. बदलते जग

 बदलत्या जगातही व्यक्तीला सुखाने व समाधानाने जगता येईल. 🌷
            *जगातील सर्व वस्तू गतीशील आहेत, अनित्य आहेत, सर्व अनित्य जात म्हणजे निर्माण होय. विकास पावणे, क्षय होणे, हा त्याचा स्वभाव सिद्ध गुण आहे. आपण आपली चेतना स्थिर आहे व ती जन्म जन्मांतरी स्थिर असते असे समजतो.  चेतना बदलणारी असते असे म्हणतो. जगातील सर्व वस्तू बदलणार्या असल्यामुळे वस्तूचे गुणधर्म स्थिर असू शकत नाही. सर्व धर्म अनित्य आहेत. 
         जगात स्थिर असे काहीच नाही. जे स्थिर दिसते ते तुलनेत स्थिर आहे. सर्व जीवन सतत परिवर्तनशील आहे. आपणास वस्तू स्थिर दिसतात, त्या स्थिर आहेत असे आपण म्हणतो.
          जीवन समाधानाने जगण्यासाठी जगात काही स्थैर्याची गरज आहे हे मान्य, पण सृष्टीतील बदलाकडे दुर्लक्ष करून आपण आपले जग स्थिर आहे असे कल्पून काही स्थिर नियमांच्या चौकटीत जीवन बांधून घेतल्याने स्थैर्य निर्माण होऊ शकत नाही. मन शांत करण्याचा हा मार्ग योग्य नव्हे त्याच्या उलट जग असे आहे तसे समजून घेतले तर मनातील भ्रम दूर होऊ शकतील, बदलत्या वस्तूकडे किंवा मुल्याकडे मन आसक्तीने धाव घेणार नाही व त्यामुळे मनशांत होऊ शकेल.
         माणसाने जीवनात स्थैर्य निर्माण करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी असे स्थैर्य फार काळ टिकून राहत नाही. जगात स्थैर्य व निश्चितता आहे असा जो आजपर्यंत समज होता तो हळूहळू नष्ट होत चालला आहे व जगात अनिश्चितता व लवचिकता आहे हा विचार सध्या समोर येत आहे.
            जीवन अनिश्चित आहे त्यात सतत प्रश्न निर्माण होत आहेत, हे लक्षात घेऊन जीवनाचे प्रश्न सोडविण्यात सहाय्यक होईल असे जीवनाचे तत्त्वज्ञान भगवंताने निर्माण केले. जीवनातील प्रश्न नष्ट करण्याचा मार्ग सुचविला आहे.  केवळ जगात प्रश्नच प्रश्न आहेत असे सांगत नाही, तर तेथे दुःख नष्ट होते तेथे सर्व प्रश्नांचा नाश होतो. या सत्याकडे निर्देश करतो. जगात अनिश्चितता आहे व ती आपणासाठी दुःख निर्माण करते. आपण निश्चिततेची अभिलाषा बाळगतो म्हणून हे दुःख निर्माण होते. परिवर्तन हा जीवनाचा गाभा आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेत नाहीत व प्रत्येक भावना स्थिरच असावी असे समजून जगात स्थिरता आणण्यासाठी प्रयत्न करीत असतो आणि त्यामुळेच स्वतःसाठी दुःख निर्माण करित असतो. अशा रितीने आपण आपल्या दुःखाचे निर्माते बनतो, असे  सांगणे आहे. ह्या तृष्णेची प्रक्रिया समजून घेऊन तिच्यापासून मुक्त होता आले तर ह्या बदलत्या जगातही व्यक्तीला सुखाने व समाधानाने जगता येईल.
🌞 प्रकाशाने अंधार भेदला जातो. 🌞
संपादक : गटपाडे एन आर

64. ब्रेकअपचा परिणाम

      एक मुलगा आणि एक मुलगी एकमेकांवर खूप प्रेम करत होते. ते नेहमी एकमेकांसोबत जगण्यामरण्याची शपथ घेत होते. पण ती मुलगी हिंदू होती आणि मुलगा मुस्लीम होता. मुलगीला माहित होते की तिचे वडील कधीच त्यांच्या प्रेमाचा स्वीकार करणार नाहीत. म्हणून तिनं त्या मुलाशी बोलून त्याला तिला विसरायला सांगितले. मुलग्याने तिला खूप समजवून सांगण्याचा प्रयत्न केला पण मुलगीने ते मान्य केले नाही. तो आपल्या हृदयावर दगड ठेवून त्या मुलगीपासून वेगळे झाला. पण त्याला  विसरणे त्या मुलगीच्या आवाक्यात नव्हते. कारण ती त्याला आपल्या जीवापेक्षा जास्त प्रेम करत होती. पण तीला असं करणे गरजेचे होते. कारण ती हिंदू होती तो मुस्लीम. असेच काही महिने होऊन गेले.
      एके दिवशी अचानक तो मुलगा त्या मुलगीच्या घरी आला आणि तिला म्हणाला की, तू मला विसरुन गेलीस पण माझ्या प्रिये मी तुला विसरु शकलो नाही. कृपया हे पत्र वाच. मुलगीने ते पत्र हाती घेताच ती त्याला म्हणाली की माझ्या जीवा  मी तुला एक वेळ मिठी मारु शकते का? कृपयाआणि त्या मुलग्याच्या डोळ्यात अश्रू आले.  मुलगा स्मित हास्य करत म्हणाला की, का नाही? मुलगीने त्याला रडत मिठी मारली आणि म्हणाली कृपया, माझ्या जीवा मला माफ कर. मी तुझ्यावर प्रेम करते. मुलगा हसत म्हणाला, माझेसुध्दा तुझ्यावर प्रेम आहे. ठीक आहे. आता मला वेळ होत आहे. काळजी घे असे म्हणून तो तिथून निघून गेला. त्या मुलगीने ते पत्र उघडले आणि ती वाचायला लागली. त्यात असे लिहले होते, प्रिये मी तुझी वेड्यासारखी आठवण काढतो.काल मला मरुन एक वर्ष पूर्ण झाले. कृपया माझ्या कबरीवर फूल टाकायला नक्कीच ये. तेवढ्यात ती अचानक भानावर आली. तिला झालेला तो भास होता. पण मुलग्याचा खरोखरचं मृत्यू झालेला होता. कारण तो तिच्याशिवाय दुसऱ्या कोणत्याच मुलगीचा विचार मनात आणू शकत नव्हता. ती त्याच्यापासून वेगळी झाली आहे हे त्याला पटत नव्हते. पण कधीतरी त्याला ह्या सत्याची जाणीव व्हायची. तिच्याशिवाय राहून तो एकटेपणाचे दु: जास्त वेळ सहन करु शकला नव्हता. म्हणून त्याने आत्महत्या केली होती. तिलाही त्या घटनेची माहिती नंतर समजली. आणि ह्या घटनेला काल एक वर्षे पूर्ण झाले होते.  तिला त्या रात्री संपूर्ण रात्र झोप लागली नव्हती.
     दुसऱ्या दिवशी ती त्याच्या कबरेवर फूल ठेवून तेथून रडत-रडत बाहेर आली. तिला तिच्यावर खूप पश्चाताप होत होता. तिला वाटत होते की तिच्यामुळेच त्याला आपला जीव गमवावा लागला. खरचं तिनं त्यावेळी ब्रेकअप केला नसता ( म्हणजे भांडण किंचस गैरसमज होऊन बोलणे बंद करणे, स्वत:चे नाते तोडणे की जे प्रेमाचे किंवा मैत्रीचे असते.)  तर आज तिचे प्रेम जिवंत असते. हा विचार करत-करत ती मुलगी नदीजवळ जात होती तेंव्हाच तिला तो मुलगा पुन्हा हसत असल्याचा दिसला.  ती मुलगी वेड्यासारखे त्याच्याजवळ रडत-रडत पळत होती आणि त्याच्याजवळ जाऊन त्याचा  हात पकडते. जवळपासचे लोक त्या मुलगीला पाहून किंचाळत होते कारण ती नदीच्या मध्यभागी जाऊन पोहचली होती. पण त्या मुलगीने पाठीमागे वळून पाहिलेच नाही. ती तर त्या मुलाच्या डोळ्यांमध्ये गुंग झाली होती. आणि लोक किंचाळून किंचाळून म्हणत होते, कुणीतरी थांबवा या मुलीला. पाण्याला खूप वेग आहे. पाण्यात बुडून मरेल.
     कदाचित काहींचे प्रेम असेच असते !

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...