मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०२२

55. एक खरा प्रेमवेडा

         तो अजूनही झोपला होता. वर टांगलेलं सलाईन वाऱ्यानिशी हालत होतं. त्यातून टपकणारे थेंब त्याच्या रक्तात भिनत होते. झोप कसली येत होती त्याला??? उघड्या डोळ्यांनी तो एकाच ठिकाणी बघत होता. त्याची आई औषधे आणि गोळ्या घेऊन आली. त्याला थोडेफार खाण्याची विनंती करु लागली. पण त्याने गप्प राहून नकार दिला. आई गेल्यानंतर त्याने एका हाताने औषधे गोळ्या घेतल्या. घड्याळाच्या टोलांनी त्याचे लक्ष वेधले होते. सहा वाजले होते. त्याने चटकन चादर बाजूला केली. अरे  बाप रे ! क्लास तर संपून गेला असेल. अंगात एवढही बळ नसताना त्याने आपल्या हातातली सुई खेचून बाहेर काढली. भळभळणाऱ्या रक्तावर कापासाचा बोळा धरुन तो सायकलजवळ गेला. त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नव्हंत. भर पावसात तो सायकल घेऊन क्लासकडे गेला. क्लास तर केंव्हाच संपून गेला होता. बहुतेक सर्वजण घरी निघून गेले होते. थोडी पावसाची भूर-भूर चालूच होती. ती अजूनही क्लासच्या बाहेर त्याची वाट पाहत उभीच होती.
     त्याला बघितल्यावर तिचे डोळे चमकले होते. तिला त्याचा राग आला होता. झपझप चालत त्याच्याजवळ पोहोचली. त्याच्या डोक्यावर छत्री पकडून त्याचा कान धरला, तू आजारी असताना इथं का आलास? आणि पुन्हा छत्री विसरलास. बाप रे ! किती पाणी…. त्याच्या डोक्यावरुन पाणी झटकत ती म्हणाली. पूर्ण ओला झालाय आणि सर्दी झाली म्हणजे मलाच म्हणशीलअरे किती बडबड करते मी. जाऊ दे, डॉक्टर काय म्हणाले? तब्येत कशी आहे? दोघेही क्लासच्या बाहेर पायरीवर जाऊन बसले. तो अजूनही काकडत होता. तिच्या डोळ्यांमध्ये त्याचे बावरलेलं मन स्वत:ची खोलवर रुजलेली प्रतिमा शोधत होतं. तिचे निरागस डोळे मात्र सदैव त्याच्यात चिंतेत बुडालेले दिसत होते. त्याच्या अतिभोळेपणाची तिला काळजी वाटायची. त्याच्या प्रेमाच्या वेडेपणाची सिमा अजून तिलाही ठरवता आली नव्हती. त्याच्या कपाळावर तिनं हात ठेवला आणि ती दचकलीच, बाप रे ! किती भयंकर ताप आलाय तूला ! आणि तरी तू एवढ्या पावसात मला भेटायला आलास. तुला काही झालं म्हणजे? नाहीमीच वेडी आहे. मीच थांबते ना. आता मी थांबणारच नाही, तू बघच. मी थांबतच नाही ! असं दृष्ट लागण्याजोगे प्रेम बघून त्याच्या डोळ्यामध्ये पाणी जमा झालं. बोलायचा प्रयत्न करताच त्याला खोकला आला. तिनं त्याला बोलण्याची विनंती केली. त्याचा हात आपल्या हातात घेताच तिने हातावरुन ओघळणारं लाल रक्त बघितलं. ती यावेळी मात्र चिडलीच, तू हे काय केलंस? तू सलाईन काढलेस ना? का स्वत:ला त्रास करुन घेतोस? तुला होणाऱ्या वेदना काळजात सुईप्रमाणे घुसतात. जामी बोलणारच नाही. अरे तुला काही झालं म्हणजे आणि माझे जीवन त्याने तिच्या ओठावर हात ठेवला. पुढचे शब्द काळजाला चिरणारे होते. त्याच्या डोळ्यांतून थेंब ओघळला तिच्या निस्सिम प्रेमासाठी आणि तिच्यासाठीही. तरीही त्याच्या डोळ्यांतल्या अश्रूंनी तिला अस्वस्थ करुन टाकले. तिच्याही डोळ्यातून पाणी टपकत होते. खरच, इतकं प्रेम करतोस का रे माझ्यावर. मग का असा त्रास देतोस? तुझ्या या वेडेपणानं मला वेड लावल तुझं. तुझ्या प्रेमाची मी सुध्दा इतकी वेडी आहे नामी थांबते म्हणून तर तू येतोस. दोघेपण वेडे आहोत. तिनं त्याच्या खांद्यावर मान टेकवली. तिचे डोके थापटत तो मात्र कुठल्यातरी वेगळ्याच विश्वात हरवून गेला होता. तिथ फक्त तिच्या बांगड्यांची किणकिण आणि तिचा आवाज कानी येत होता.
     तेवढ्यात त्याच्या सरांची थाप त्याच्या पाठीवर पडली. काय रे ! केंव्हाचा आवाज देतोय. काय करतोस इथं एकटा? एवढ्या पावसात का बसला आहेस? घरचे म्हणत होते तू आजारी आहेस म्हणून. सरांच्या आवाजाने तो भानावर आला. त्याने मान डोलविली. सर आत निघून गेले. भरलेल्या डोळ्यांनी किंचित मागे पाहिलं. क्लासमध्ये टांगलेली तिच्या फोटोची माळ वाऱ्यानिशी किंचीत हालत होती. ती क्लासमधील सर्वात हुशार विद्यार्थीनी होती. सर्व काही दृष्ट लागल्याप्रमाणे घडून गेलं होतं. स्वप्नाहूनही सुंदर अशा त्याच्या दुनयेवर काळाने अशी झडप घेतली की, त्या दुनियेतील सर्व सुख काळ घेऊन गेला होता. फुलांआडून डोकावणाऱ्या तिच्या डोळ्यांमध्ये घोर चिंता दिसून येत होती. कोण समजून घेणार या माझ्या वेड्याला? कोण शिकविणार याला माझ्याशिवाय जगणं? कोण जपेल का याला माझ्याप्रमाणे? असे अनेक प्रश्न तिला पडले असावे. त्याचे मन मात्र एखाद्या वेड्या हरणाप्रमाणे तिच्या सावलीमागे पळत होतं. ते हे मानायला तयार नव्हतं की तिचं अस्तित्व आता संपलय म्हणून. असे सावल्यांचे खेळ-आभास त्याच्या जीवनाचा एक भागच बनून गेले होते. हृदयात जपून ठेवलेल्या तिच्या या आठवणी अश्रू बनून क्षणाक्षणाला बाहेर पडत होत्या. तिची प्रतिमा डोळ्यामध्ये भरुन जड अंतकरणाने तो सायकलजवळ गेला. काकडत काकडत त्याने सायकल घेतली घराकडे चालू लागला आणि चालता चालता बेशुध्द पडला. हे सर्व प्रेम होते की वेड? मी त्यावेळी हे सारे फार जवळून बघितले होते. का कुणीतरी इतकही प्रेम करु शकतं? हे असं कसं प्रेम होतं जे मृत्यूनंतरसुध्दा जीवंत होतं? खरचं, त्याच्या वेडेपणाला मृत्यूच्याही मर्यादा कमी पडल्या होत्या. या अगोदर तू खूप चांगला असायचा. क्षणोक्षणी त्याच्या चेहऱ्यावर आनंद असायचा. पण त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर मी हास्यच पाहिलं नाही. आता त्यानं आपल्या मनावर ताबा मिळविलाय. सर्वांशी तो चांगला वागतोय अगदी पूर्वीप्रमाणे. पण फरक एवढाच आहे की तो पूर्वी सर्वांशी बोलू शकत होता. त्यावेळी आजारात त्याने आपली वाचा गमवली होती. त्या दोघांच्या सुखासमोर स्वर्गसुध्दा फिका पडत असावा म्हणून देवालाही हेवा वाटला आणि……… जे खरोखरचं चांगल घडत असतं तेथेच नशिब तोकडे पाहते. हा प्रश्न फार पूर्वीपासून अनुत्तरीच आहे

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...