शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०२२

45. ते माझे घर...! (शेवटचे स्टेशन )

        मी धावतपळत येऊन बसमध्ये  चढले आणि कंडक्टरने दोन घंटा मारल्याच.दुपारी 11.30 चा सुमार असल्याने बसमध्ये फारशी गर्दी नव्हती.मी तेवढ्यातल्या तेवढ्यात,कोणत्या बाजूला ऊन येणार नाही याचा हिशोब करून एका सीटवर धपकन बैठक मारली.तेवढ्यात कंडक्टर माझ्या पर्यंत येऊन पोहोचला.वाशी डेपोचं तिकीट घेऊन मी ते नीट पर्समधे ठेवलं आणि खिडकीपाशी सरकले.खिडकीची जागा.. रिकामी सीट..खिडकीतून येणारी मोकळी हवा; या सगळ्यामुळे  सुखावून मी जरा रेलूनच बसले.
       इतक्यात माझ्या पुढच्याच सीटवर बसलेल्या दोघींच्या बोलण्यातले काही शब्द माझ्या कानांवर आले नि त्यांच्या संभाषणाकडे नकळत माझं लक्ष वेधलं गेलं.त्या दोघी साधारण साठपासष्ट वर्षांच्या असतील.  त्यांच्या गप्पा अगदी रंगात आल्या होत्या .त्यातली एक जण दुसरीला म्हणत होती,' तुला खरं सांगते अनघा, देवाने मला आयुष्यात सर्व  काही दिलं.चांगला नवरा..गुणी मुलं..घरदार ..पैसाअडका..स्थैर्य.. सगळं मिळालं.मुलं चांगली शिकली. लग्न होऊन वेगळी  राहात असली तरी आमचं येणंजाणं असतंच.खरंच मी अगदी तृप्त आहे.आता मी देवाला नेहमी म्हणते की' देवा..मला आता आणखी काही सुद्धा नको.  फक्त   एकच गोष्ट दे,ती म्हणजे मला जेव्हा मरण येईल ते अगदी पटकन येऊ दे. कोणाला माझं काही करावं लागू नये.'
   त्यावर दुसरी उत्तरली, 'हो ग , आता आपल्याला देवाकडे आणखी काही मागावंसं वाटतच नाही ना..? त्याने एवढंच द्यावं की हाती पायी धड असतानाच मृत्यू यावा.अंथरुणात लोळत पडायची वेळ नको ग बाई यायला... !
   त्यांचं संभाषण ऐकताना मला थोडंसं हसूच आलं.या दोघी देवाकडे ,' आता काहीच नको' म्हणता म्हणता,सगळ्यात मोठी  आणि महत्वाची गोष्टच मागत होत्या की.तरुण वयात माणूस  देवाकडे पैसा मागतो,मुलाबाळांचं सौख्य मागतो, ऐहिक आणि भौतिक सुखांची याचना करतो. पण एकदा का आयुष्याची मध्यान्ह उलटली..संध्याछाया  भेडसावू लागल्या की मग माणसाला आणखी काहीच नको  वाटतं.सगळी सुखं भोगून झालेली असतात,त्यातली गोडी आटलेली असते..आणि आता दिसू लागलेलं असतं पैलतीर.... !
         साधारणपणे प्रत्येक व्यक्तीला मृत्यू या कल्पनेची खूप भीती वाटते.मृत्यू म्हणजे सगळ्याचा शेवट..मृत्यू म्हणजे या आयुष्याचा कायमचा निरोप घेणं..आपलं घरदार,मुलंबाळं आप्त स्वकीय परिचित परिसर.. सगळ्यापासून दूर एकट्यानेच निघून जाणं.अशा ठिकाणी, की जिथून परतीचा मार्ग नाही.जिथे नक्की काय आहे हे कोणालाही ठाऊक नाही. माणूस हा समाजप्रिय प्राणी असल्यामुळे त्याला नेहमीच कोणाची तरी संगत सोबत आवडते.पण हा शेवटचा प्रवास एकट्याने करायचा आहे..तिथे दिव्य प्रकाश आहे की काळा मिट्ट अंधार आहे,ते कोणालाच माहीत नाही...तिथे सुंदर सुमधुर संगीत आहे की भयाण निःशब्द शांतता आहे याची कोणालाही कल्पना नाही!  मी जसजसा 'मृत्यू'चा विचार करायला लागले तसतसं वाटू लागलं की आपल्याला नक्की भीती कशाची वाटते..? मरणाची तर वाटतेच वाटते.जी गोष्ट आपल्या आकलना पलीकडची आहे ,ज्याच्या भोवती एक गूढतेचं वलय आहे,ज्याची काळवेळ निश्चित ठरलेली असूनही आपल्याला त्याबद्दल यत्किंचितही कल्पना नाही,अशा मरणाची भीती तर वाटणारच ना ? पण  त्याचवेळी आपल्याला मृत्यू या कल्पनेइतकीच भीती वाटते, " तो येईल कसा... ?" या विचाराची.
    ठराविक वयानंतर आपण प्रत्येकजण मृत्यूचा थोडातरी विचार करतोच.एक ना एक दिवस आपल्याला हे जग सोडून जायचे आहे,यासाठी आपण मनाची तयारीही करत असतो.आपण कधी ऐकतो ,की एखाद्या व्यक्तीला कुठलासा असाध्य आजार झाला..मृत्यूपूर्वी खूप वेदना सहन कराव्या लागल्या...किंवा एखाद्या व्यक्तीला अर्धांग वायूचा झटका आला आणि महिनोन् महिने ती व्यक्ती अंथरुणाला खिळून राहिली..किंवा एखादी व्यक्ती अपघात होऊन कोमामध्ये गेली.....असलं काहीही ऐकलं की आपलं मन नकळत धास्तावतं... आपण कुठेतरी, स्वतःला त्या व्यक्तीच्या जागी ठेवून बघतो आणि  मग आपल्या मनात येतं....' आपल्याला पैलतीरावर घेऊन जाणारा मार्ग कसा बरं असेल... ? तो प्रवास खाचखळगेवाला असेल  की सुखकर असेल.. ?आपण जर अंथरुणावर लोळागोळा होऊन पडलो तर कोण पाहील आपल्याला... ?कोण करेल आपलं सगळं.... ?     म्हणजे आपल्या पिढीच्या मनात ही जी असुरक्षिततेची भावना आहे तिच्यामुळे आपल्याला  भीती वाटते.आपण जर दोन पिढ्या मागे गेलो,तर  त्यावेळेस एकत्र कुटुंब पद्धती होती.घरात म्हातारी माणसं असायची आणि त्यांची काळजी घ्यायला तरुण पिढीही असायची. दहा जणांच्या घरात ,एखाद्या व्यक्तीची शुश्रूषा करणं काही फारसं जड जायचं नाही आणि त्यामुळे म्हातारपण हा शापही वाटायचा नाही..! त्यानंतर आमच्या मागच्या पिढीपर्यंत, एकत्र कुटुंब पद्धती जवळजवळ नष्ट झाली असली तरी घरात , नवरा बायको ,मुलं आणि आजी आजोबा असायचे.आईवडील आजारी पडले तर त्यांची काळजी घेणं ही प्रत्येकाला आपली नैतिक जबाबदारी वाटायची.नोक-या सांभाळून, त्रास सहन करूनही आपण आपल्या आईवडिलांची जशी जमेल तशी  सेवाशुश्रुषा केली.हॉस्पिटलमधली धावपळ, रात्रीची जागरणं सारं सारं एका कर्तव्यभावनेतून केलं.  पण आता नंबर आहे आपल्या पिढीचा.ज्यातले बहुसंख्य जण एकेकटे राहातायत. मुलंबाळं स्वतःच्या संसारात गुंतलेली आहेत. कित्येकांची मुलं तर दूर परदेशात आहेत...पण इथे असलेली मुलं देखील वेगळे ब्लाॅक घेऊन स्वतंत्र राहातायत. कारणं काहीही असतील..जागेची अडचण म्हणून...नोकरीची सोय म्हणून किंवा स्वतंत्र संसाराची हौस म्हणून..! त्यांना त्यांच्या  आई वडिलांचं प्रेम नाही असं मी म्हणत नाही.पण ही एक तडजोड आहे.त्यांनी कामाशी आणि प्राप्त परिस्थितीशी केलेली.त्यांच्या वेगवान आयुष्यात आईवडिलांना द्यायला त्यांच्याकडे वेळच नाहीये. आणि हे आपल्यालाही पूर्णपणे ठाऊक आहे.      आपण आजारी पडलो आणि जर मुलं जवळपास असतील तर  काळजीपोटी लगेच येतील,  आपली हाॅस्पिटलात सोय  करतील. पैसे खर्च करून एखादी  नर्स,वॉर्डबॉय ठेवतील अन् पुन्हा आपल्या व्यापात बुडून जातील.परदेशात असलेली मुलंही धावून येतील.. थोडे दिवस राहातील..भक्कम आर्थिक मदत देतील...रोज फोन करून चौकशी करतील.पण  आजारी माणसाला जी प्रेमाची..  मायेच्या स्पर्शाची ,आधाराची गरज असते ती थोडीच पैसे टाकून पूर्ण होणार  आहे... ? एकट्यानेच   "मग काय असंच हाॅस्पिटलात पडून  राहायचं... ? मृत्यूची प्रतीक्षा करत... ?आणि पटकन  एकदिवस एकट्यानेच निघून जायचं दुस-या अनोळखी जगात?" अगदी साध्या प्रवासाला जाताना सुद्धा आपल्याला, स्टेशनवर.. airport वर सोडायला आलेल्या व्यक्तींची सोबत ,हवीहवीशी वाटते.मग एवढ्या मोठ्या प्रवासाला निघताना,निरोप  द्यायला..धीर  द्यायला कोणी  नको... ?"  एका अनामिक भीतीने माझ्या मनाला ग्रासून टाकलं.  त्याचवेळी कुठल्यातरी सिग्नलला बसड्रायव्हरने जोरात ब्रेक दाबला नि माझी विचारांची साखळी एकदम तुटली.समोरच्या दोघींच्या बोलण्याची गाडीही आता दुस-याच कोणत्यातरी विषयाकडे वळली होती आणि मी मात्र उगीचच नको त्या विषयात गुरफटले होते. मनातल्या विचारांपासून दूर जाण्यासाठी मी पर्स उघडली अन् तिच्यातून नुकतंच विकत घेतलेलं  सुनील चिंचोलकरांचं ' 'दासबोधातील भक्तियोग ' हे पुस्तक  बाहेर काढून वाचायला सुरुवात केली. 
           पहिल्याच प्रकरणात ' विवेक आणि वैराग्य ' याची मीमांसा करताना लेखकाने रवींद्रनाथ टागोरांच्या एका सुंदर कवितेविषयी लिहिलं होतं .'काही मुलं समुद्रकिनाऱ्यावरच्या वाळूत खेळत असतात.दिवसभर त्यांचा खेळ रंगात आलेला असतो.ती वाळूची घरं बांधत असतात ,किल्ले बांधत असतात.  प्रत्येकजण ' हे माझं घर...हा माझा किल्ला' असं म्हणून स्वतःचं  एक स्वतंत्र विश्व निर्माण करत असतो.त्यातच रमलेला असतो. हळूहळू संध्याकाळ होते आणि त्या मुलांचं खेळण्यातलं लक्ष उडतं.आता त्यांना आठवण येते त्यांच्या ख-या घराची आणि मग सकाळपासून खपून बांधलेले किल्ले, घरं पायाखाली तुडवून ती मुलं आपल्या घराकडे धाव घेतात. आता त्यांचं लक्ष या खेळातनं उडालेलं असतं.आता त्यांना ओढ लागलेली असते आपल्या घराची आणि तिथे त्यांची वाट बघत असलेल्या आईची.....! 
    त्या कवितेचा भावार्थ वाचता वाचता माझ्या मनात आलं, 'खरंच, किती सुरेख कल्पना आहे ही.मृत्यू म्हणजे तरी दुसरं काय..? आपण आयुष्यभर संसाराचा खेळ मांडतो,त्यात रमतो आणि एक दिवस हे सारं सोडून आपल्या ख-या घराकडे निघून जातो..मग त्यात भीती कसली आणि दुःख तरी कसलं... ?   आणि खेळायला गेलेली बाळंवेळेवर घरी आली नाहीत,तर आई त्यांची वाट बघते.तिला आपल्या बाळांची काळजी वाटते.ही आईची मायाच त्या मुलांना ओढ लावत असते.तसाच आपलीही काळजी करणारा..आपली वाट  बघणारा कोणीतरी,कुठेतरी आहेच की.एकदा त्याच्यावर पूर्ण  श्रद्धा ठेवली की मग कसली आली आहे चिंता.. ? लहान मूल ज्या विश्वासाने, निश्चिंतपणे आईच्या खांद्यावर मान टाकून गाढ झोपते तोच विश्वास आपण "त्याच्या" बद्दल बाळगला तर मग कसली आलीये भीती... ?   हातातलं पुस्तक बंद करून मी शांतपणे डोळे मिटून घेतले. बस आता वाशीच्या खाडी पुलावरून चालली होती.खिडकीतून फणफण वारा येत होता आणि  माझ्या मनात कायम ठाण मांडून बसलेली "मृत्यूची" भीती त्या वा-याबरोबर दूर दूर निघून जात होती...... !!!

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...