आजची सकाळ एकदम शांत होती. नेहमीप्रमाणे आवरणे, कामे करणे चालू असले तरी एक अजबसी गहन गंभीर शांतता पसरलेली होती. काहीतरी निमित्य करून सासूबाई गिरीशला पुन्हा पुन्हा खोलीत बोलावीत होत्या. मग त्याचे काहीतरी हळूहळू आवाजात बोलणे चालत होते. सासरे ते पाहूनही न पाहिल्यासारखे करत होते, वर्तमानपत्राच्या आडून ते देखील हे दृश्य पहात होते... पण बोलत काहीच नव्हते.
सई मनातल्या मनात हसली आणि चहा गाळला. नास्ता आधीच झाला होता.
"चहा..." असे म्हणाली आणि टेबलवर सगळ्यांसाठी चहा ठेवला.
मग निवांत खुर्चीत बसून स्वतःच्या चहाचा आनंद घेऊ लागली.
सासूबाई आणि गिरीश खोलीमधून बाहेर आले. सासऱ्यांनी वर्तमानपत्र घडी घालून ठेवले आणि उठले. येता येता त्यांची सासूबाईंशी झालेली नेत्रपल्लवी सईने पाहिलीच.
"सई, कधी निघताय तुम्ही?" खुर्चीत बसता बसता अगदी साधारण प्रश्न विचारावा, असे सासूबाईंनी विचारले.
"चहा झाला कि निघूच..काय रे गिरीश?" तिने गिरीशलाच प्रतिप्रश्न विचारला.
"हो...हो...निघुयात! "
"मुले दोघेही संध्याकाळपर्यंत घरी येतील त्यांचा कॅम्प झाला कि! तोवर आम्हीही येऊच." सई म्हणाली.
"मग काय ठरवले आहेस सई तू? काय बोलणार, मागणार आहेस?" सासूबाई म्हणाल्या.
सई सावकाश हसली. तिने सासूबाई, गिरीश आणि सासऱ्यांकडे सावकाश पाहिले आणि म्हणाली, "हो ठरवले आहे पण वेळ आली कि बोलेन."
"अगं पण काय ठरवले आहेस? म्हणजे हे बघ घर मोठे, मोक्याच्या जागी आहे तुमचे. तुझ्या वडिलांनी तसे काही लिहून ठेवले नाही तर मुलीचा काही हक्क आहेच कि त्यावर." सासूबाई ठामपणे म्हणाल्या गिरीशकडे पाहून.
"हम्म..कायदा मलाही कळतो. चल गिरीश...मी आलेच पर्स घेऊन! " सई उठली आणि कप सिंकमध्ये ठेवत म्हणाली.
:
वाटेमध्ये गिरीश शांतच होता.
सईदेखील काहीच बोलली नाही.
महिन्यापूर्वीच सईच्या वडिलांचे निधन झाले होते. आई तर त्याआधीच गेली होती. तिच्या वडिलांचे दोन मजली मोठे घर आहे. मोठा भाऊ खालच्या मजल्यावर राहतो. वरचा मजला भाड्याने दिला होता. वडिलांचे बरेचसे खर्च ह्या भाड्यावरच निभावत होते. अगदी तस्सेच नियोजन करून त्यांनी वरचा मजला बांधला होता. तसा सुहास, सईचा मोठा भाऊ, वडिलांचे सगळे खर्च करतच होता पण त्यांच्या मनाचे समाधान.
सुहासने सांगितले, "बाबांनी मृत्यूपत्र केलेले नाही. तेव्हा एकदा सविस्तर बोलायला ये. येताना गिरीशलाही घेऊन ये."
म्हणूनच सई आणि गिरीश निघाले होते.
:
सई पोहोचली तेव्हा घरातील वातावरण शांत होते... जणू वादळापूर्वीची शांतता!
"वहिनी, रिद्धी राहुल कुठे आहेत गं?"
"आलीस का सई, गिरीश. या या..." असे म्हणत वहिनी पुढे आली. "अहो, सई गिरीश आलेत.." असे म्हणत ती आतमध्ये पाणी आणण्याकरिता गेली.
आपल्याच घरात एक अजब असे दडपण घेऊन सई सोफ्यात बसून राहिली. नेहमीप्रमाणे पटकन आतही जावेसे तिला वाटेना. भिंतीवर आई-बाबांचा फोटो होता, त्याला ताज्या फुलांचा हार घातला होता. सई तो फोटो पहात होती. तेव्हाच, सुहास सावकाश बाहेर आला. पांढराशुभ्र सलवार आणि झब्बा घातलेला सुहास, त्याला पाहून सईला बाबांची आठवण झाली.
"दादा..."
"दोघेही आलात ते बरं झालं. शांतपणे बोलता येईल..." सईच्या हाकेला उत्तर देण्याचे त्याने टाळले, हे सईला जाणवले. ती अजूनच शांत झाली.
"आधी जेवणे करायची का आधी..." वहिनी विचारतच बाहेर आली.
"आधी बोलूनच घेऊयात." सुहास पटकन म्हणाला.
"हो हो चालेल, आधी बोलूनच घेऊयात! " गिरीशही म्हणाला.
सुहास आत जाऊन एक फाईल घेऊन बाहेर आला. गिरीश सरसावून बसला. सईदेखील आश्चर्याने पाहू लागली. वहिनी सुहासच्या शेजारी बसली.
"सई, मी काय सांगतो ते सगळे शांतपणे ऐक. भराभर निर्णय घेऊ नकोस. गरज पडल्यास, नीट ऐक, गरज पडल्यास गिरीशशी बोल. पण तू कायद्याने सज्ञान आहेस. तुझे निर्णय तू घेऊ शकतेस, तूच घ्यावेस." सुहास म्हणाला.
सई अजूनच गंभीर झाली.
गिरीशने फक्त तिच्याकडे पाहिले.
"हम्म.." सईने मान हलविली.
सुहासने फाईल उघडली.
"बाबांनी त्यांच्या नावाने ह्या तीन FD ठेवल्या होत्या. गरज पडल्यास उपयोगी पडतील म्हणून. त्याचा नॉमिनी म्हणून माझे नाव आहे." सुहासने तीन पेपर हातात धरत सांगितले.
"पण दादा, हे तू मला का सांगतोस? बाबांनी येणारे भाड्याचे पैसे कसे गुंतवले हा त्यांचा निर्णय होता." सई म्हणाली.
"हे बघ, आपण काही श्रीमंत नाही. आपल्याकडे नोकरी करून जे पैसे आले तेवढेच पैसे. निवृत्तीनंतर बाबांना पेन्शन मिळणार नाही, हे माहिती असल्यामुळे त्यांनी आणि मी मिळून हा वरचा मजला बांधला. त्याचे भाडे मी बाबांनाच घ्यायला आणि त्यांच्याकडे ठेवायला सांगत होतो. त्यांनी आयुष्यभर कोणाकडे हात पसरलेले नव्हते. निवृत्तीनंतर त्यांच्याजवळ पैसे असावेत, म्हणून आम्ही मिळून हा निर्णय घेतला होता." सुहासने वहिनीकडे पाहून सांगितले.
"बरं! " सई म्हणाली.
"हि एक FD बाबांनी तुझ्यासाठी केली होती, ५०००० रुपयांची." सुहासने सांगितले आणि पेपर दाखविला. त्यावर नॉमिनी म्हणून 'सई गिरीश xxx' असे नाव होते. खाली सईची सहीदेखील होती.
गिरीशने डोळे चमकले आणि त्याने पेपर हातात घेतला आणि वाचू लागला.
"हो, मला माहितीये. बाबांनी हि FD का केली ह्याचे कारणही मला माहिती आहे."
"मला त्याबद्दल माहिती नाही. तुला सांगायचे असेल तर सांग. हा पेपर आजपासून तुझ्याकडे ठेव. तुझे नाव नॉमिनी म्हणून असल्यामुळे हे पैसे तुला सहज मिळतील." सुहास म्हणाला.
सईने गिरीशच्या हातामधून पेपर घेतला आणि आपल्या बाजूला ठेवला.
"पुढे...?" सईने विचारले.
"आईचे दागिने. इथे काही दागिने आहेत." त्याने वहिनीने दिलेला एक डबा हातात घेतला आणि टीपॉयवर ठेवला. "तुला जे हवे, जितके हवे तितके घे. एकूण किती दागिने वगैरे मला माहिती नाही. हा डबा बाबांकडे होता, तो त्यांनी हिच्याकडे दिला. आम्ही उघडूनही पाहिलेला नाही. तू काय किती घेतले हे मी पाहणार नाही, एक प्रश्नही विचारणार नाही."
"बरं..." सईने डबा हातात घेतला. डबा उघडला. त्यात हिरव्यागार रेशमी ब्लाऊजपीसमध्ये सोन्याचे दागिने ठेवलेले होते. सगळे दागिने सई ओळखत होती. आईने घातलेल्या पाटल्या-बांगड्याशी तर ती लहान असल्यापासून खेळत होती. आईचा कंठहार, दोन पदरी बोरमाळ, कर्णफुले, मोत्याची नथ, अखंड सौभाग्यवतीचे मंगळसूत्र.... तिने त्यावरून अलवार हात फिरवला. घशात आलेला आवंढा गिळत तिने वाहिनीकडे पहिले.
तिच्या नजरेत ना असूया होती...ना लालसा...
सईने डबा सावकाश बाजूला ठेवला. म्हणाली "सांगते नंतर...पुढे बोल तू"
"हे घर! बाबांनी आपल्या कष्टाने हि जमीन घेतली. इथे घर बांधले. एक एक सुखसोयी केल्या. आजूबाजूला बाग फुलविली. मग उतारवयाचा विचार करून वरचा मजला बांधला. तो संपूर्ण मजला तेव्हापासून भाड्यानेच दिलेला आहे. दोन बिऱ्हाडे राहतात. त्याचे भाडे नियमितपणे येते." सुहास क्षणभर थांबला.
सई एकटक सुहासकडे पहात होती.
"बाबांनी तसे काही ठरवलेले नव्हते, नाही. तेव्हा तुझा काय विचार आहे. तुला ह्यात कसा वाटा हवाय?" सुहासने विचारले.
सई काहीच बोलली नाही.
तिची शांतता पाहून गिरीश म्हणाला "मी सुचवू का?"
"हो, अवश्य! " सुहास म्हणाला.
"हे बघ, दागिने किंवा बाकी कशात काय घ्यायचे ते सई पाहिलं पण मी काय सुचवतो म्हणजे म्हणतो कि एक भाडे आम्ही घेऊ एक तुम्ही घ्या, म्हणजे काय, काही हिस्सा तिलाही मिळाल्यासारखे होईल कायमस्वरूपी! " गिरीशने सावकाश एक एक शब्द शांतपणे उच्चारत सांगितले.
"सई, तुझे काय म्हणणे आहे?" सुहासने सईला विचारले.
"तू काय म्हणशील तसे करू दादा..." सई म्हणाली. तिने गिरीशकडे दुर्लक्ष केले हे सुहासलाही समजले आणि गिरीशलाही.
"मी काहीच सांगणार नाही किंवा सुचवणारही नाही, तू उत्तर दे आणि काय हवे ते घे." सुहास ठामपणे म्हणाला. त्याचा आवाज करारी झाला तसा वहिनीने त्याच्या हातावर आपला हात ठेवला.
:
काही वेळ शांततेत गेला.
गिरीशने एक-दोनदा 'आपण बाहेर जाऊन बोलूयात का' असे सईला सुचविले पण सईने नकार दिला.
सगळेच बसून राहिले होते.
मनातला कढ थांबवत सई म्हणाली, "दादा, बरे झाले आज तू आम्हाला असे बोलायला बोलावलेस ते, म्हणजे मलाच माझ्याकडे एका वेगळ्या चष्म्यातून पाहता आले. माझे निर्णय झालेत. ऐक...
बाबांनी माझ्या नावाने ती ५०००० ची FD का ठेवली, ते मी तुला आणि गिरीशला आज सांगते. आमच्या लग्नानंतर घरात लगेचच धुसपूसी सुरु झाल्या. संसार टिकतो का मोडतो, हे समजत नव्हते. तुला आठवत असेल तर दोन-चार वेळा मी घरी म्हणजे माहेरी आले होते, पुन्हा कधी जाणार नाही असे ठरवूनच! आई-बाबांना माझी खूप काळजी असायची. त्यानंतर दोन मुले झाली, संसार टिकला....डगमगत पुढे सरकला. आता स्थिरसावर झालाय संसार. आता हा मोडणारही नाही आणि डगमगणारही नाही.
पण पुन्हा कधी आयुष्यात परत यायची वेळ आलीच तर... म्हणून बाबांनी हे ५०००० माझ्या नावावर ठेवले होते. हे मला माहिती होते कारण मी ह्या पेपरवर सही केली होती. बाबांनी हे मला स्पष्टपणे सांगितले होते कि तेव्हा मी असेल नसेल, पण अशी वेळ आली तर सुहासवर एकदम दडपण येईल. तुझ्यासाठी तो वाट्टेल ते करेलच पण तरीही..त्याची परिस्थिती कशी असेल, त्याला त्याच्या जबाबदाऱ्या आहेत, त्याला एकदम पैसे उभे करता येतील न येतील... म्हणून हे तुझ्या नावावर! तशीच गरज असेल तरच हे पैसे मोड किंवा सुहास, गिरीशलाही सांग. तोवर कोणालाही काही सांगू नकोस.
तर, आता हे पैसे, ह्या FD ची गरज संपलीय. मी आता ठाम उभी आहे, माझ्या पायावर! कारण ह्यासाठी मला जे शिक्षण हवे होते ते बाबांनी दिलंय. मला जे पाठबळ हवे होते ते बाबांनी दिलंय... आणि पुन्हा तशी वेळ आली, तर तू माझ्यामागे ठामपणे उभा असणार आहेस, हे मला माहिती आहे.
तेव्हा, हि FD मी मोडून तुझी लेक रिद्धी आणि आमची लेक वैदही ह्याच्या नावावर हे पैसे करणार आहे.
"अगं पण सई, ते तुझे पैसे आहेत.आपण वापरू कशाला तरी किंवा तसेच FD म्हणून ठेवुयात." गिरीश म्हणाला
"गिरीश, ते पैसे माझे असले तरी अशी FD करण्याचे कारण तितके सुखावह नाहीये ना? म्हणूनच नकोय ते पैसे मला. ह्या दोघी उद्या सासरी जातील, तेव्हा त्यांना हे पाठबळ असू देत त्यांच्याजवळ."
"बरं, ठीक आहे..." सुहास म्हणाला.
"आता तो दागिन्यांचा डबा...." सईने डबा हातात घेतला. त्या दागिन्यांवरून हात फिरवत म्हणाली "हे सगळे दागिने मला माहिती आहेत. वेळोवेळी आईने घातलेले, वाहिनीने ल्यायलेले आहेत. मी देखील उत्साहाने घालून मिरवायची हे दागिने माझ्या लग्नाच्या आधी.
मग माझे लग्न झाले. मला माझे स्वतःचे असे दागिने मिळाले, अगदी लग्नात मागून २० तोळे घेतले, त्याचे दागिने...! मला हा अजिबात निर्णय आवडला नव्हता. २० तोळे मागितले माझ्या सासरच्यांनी! सगळी शिकलेली माणसे पण २५ वरून २० तोळ्यावर आली म्हणून भांडणे, कुरबुरी सोसल्या आहेत मी. म्हणजे बाबांनी तेव्हाही २० काय अगदी २५, ३० तोळे सोने दिलेही असते आणि दिलेच २० तोळे सोने तेव्हा... पण ते ज्या भावनेने, ज्या जबरदस्तीने दिले... ते मला आवडलेले नाही.
लग्नानंतर लगेच हा विषय जोर धरू लागला आणि मग...त्यातूनच मी घरी परत आले होते. पुन्हा सासरी जाणार नाही...असे सांगून! बाबा पण खूप चिडले होते, आई तर सतत रडायची. तेव्हा आई म्हणाली होती 'हवे तर माझे सगळे दागिने घेऊन जा...पण सुखाने नांद बाई तिथे'
माझ्या हातात होते का असे एक एक तोळ्यासाठी भांडणाऱ्या माणसासोबत संसार करणे! पण केला संसार... तरले! कशी ते एक मला माहिती नाहीतर दुसरे त्या देवाला आणि आई-बाबांना.
तर ऐक माझा निर्णय, आज माझ्या नवऱ्याची इतकी ऐपत आहे, त्याला इतका पगार आहे कि तो मला हवे तसे हव्या तितक्या तोळ्याचे दागिने कधीही करू शकेल. पण हे माझ्या माहेरचे दागिने माझ्या वहिनीवरच जास्त खुलून दिसतील. ज्या दागिन्यांमध्ये मी आईला पाहिले त्याच दागिन्यांमध्ये मला वहिनीला पहायला आवडेल. आणि दागिने वहिनीकडे राहिले म्हणून माझा हक्क का कमी होणार आहे? त्याच हक्काने मागून घेईन वहिनीकडून एखाद्या दिवशी घालायला."
सईने डोळ्यातले पाणी पुसले तसे वाहिनीने तिचे भरून आलेले डोळे पुसले.
"सई, अगं तुझ्या आईची आठवण म्हणून एखादा तरी दागिना घे." गिरीश धुसपूसत म्हणाला.
"तुझ्या आईची आठवण... माझ्या आईची आठवण ना, आहे माझ्याकडे! आणि या पुढे मी वहिनीला तिच्या रूपात पाहीन. मला त्यासाठी दागिना नकोय." सई शांतपणे म्हणाली.
सईने तो दागिन्यांचा डबा बंद करून सुहासकडे परत दिला.
"आता मी म्हणतोय तसे एक भाडे तरी घेऊयात. आपल्यालाही उपयोगी पडेल. पुढेमागे वेदांतला ऑफिस किंवा रहायला उपयोगी पडेल." गिरीश म्हणाला.
"हो, मी घेणार आहे ना निर्णय.. मग मला सांगु देत..." सई गिरीशला थांबवत म्हणाली.
एकदम सुहासकडे पहात म्हणाली "किती भाडे येते रे दादा?"
"एका बिऱ्हाडाचे २००० रुपये महिना. वीज आणि पाणी बिल तेच भरतात." सुहासने सांगितले.
"ह्म्म्म...म्हणजे २४००० रुपये वर्षाला. पण फार कमी आहेत रे...."सई म्हणाली.
"तुला हवे असेल, कमी वाटत असतील तर दुसऱ्या बिऱ्हाडाचे पैसेही तूच घे. तुला जे योग्य ते कर, माझी काहीच हरकत नाही. आणि हे मी अगदी सहज सांगत आहे, रागाने सुचवत नाहीये." सुहास लगेच म्हणाला.
"मला माहितीये रे...पण तरीही पारडे जडंच होत नाहीये! " असे म्हणत सई हसायला लागली. तिचे बोलणे न समजल्याने सगळेच तिच्याकडे पहायला लागले.
"काय बोलतीयेस, सई?" वहिनी म्हणाली.
"मला हे घर 'माझे माहेर' म्हणून आंदण हवे आहे. ह्यावर माझा कुठलाही हक्क नाही आणि म्हणले तर माझा संपूर्ण हक्क असेल." सई म्हणाली.
"सई, काय म्हणालीस काहीच समजले नाही." गिरीश चिडत म्हणाला.
"सांगते, अगदी समजावून सांगते तुम्हाला... हे घर मला माझे माहेर म्हणूनच हवे आहे. ह्यावर कायद्याने मला कोणताही हक्क नको.
माहेर म्हणले मी इथे कधीही केव्हाही येणार, वहिनीला ऑर्डर देणार, खायला करायला सांगणार, हक्काने तिच्या नवीन साड्या नेसणार, दादाला हुकूम सोडणार, रात्री-अपरात्रीपर्यंत भाच्चाशी गप्पा मारणार, गौरी-गणपती, दिवाळी.. माझी हक्काची भाऊबीज सगळे मी आनंदाने उपभोगणार. हक्क मागितला तर ह्यावर पाणी सोडावे लागेल आणि मग ते पारडे जड होणार नाही रे त्या २४००० रुपयांच्या भाड्यापुढे!
आज कायद्याने हक्क मागितला तर प्रेमाचा हक्क कमी होईल. मान ताठ करून घरात येते तो ताठा कमी होईल. आनंदाच्या प्रसंगी येते तसेच दुःख वाटून घ्यायलापण येते, ते येणं होणार नाही. त्यापेक्षा नकोच हे काही...
(गिरीशकडे पहात सई पुढे म्हणाली) आमचा एक फ्लॅट आहे, सध्या भाड्याने दिलेला. वेदांत अजून शिकतोय. त्याला हवा असेल तर तो वापरू शकेल किंवा तोवर अजून एखादा फ्लॅटसुद्धा घेऊ आम्ही.
तेव्हा, मला हे घर माझे माहेर म्हणून आंदण हवे आहे. ह्यावर माझा कायद्याने कुठलाही हक्क नाही पण प्रेमाचा हक्क मात्र असेल."
"अगं पण सई..." गिरीशला पुढे काही बोलायला सुचलेच नाही.
सुहासने फाईल मिटली. डोळ्यांमधून येणारे पाणी टिपले.
"मी निर्णय घ्यायचा होता ना, घेतला. संपलं बोलून.....आता जेवणे." वहिनीच्या गळ्यात पडत सई म्हणाली, "मला माहितीये वाहिनीने नक्की मसालेभात आणि श्रीखंड केले असणार, मला आवडते म्हणून! मी काहीही मागितले असते तरी आणि नसते तरी... मला गोडधोड खायला घालूनच माझी पाठवणी केली असती...."
"हे बाकी खरंय हा नणंदबाई ! मसालेभात आणि श्रीखंडच आहे जेवायला...! "
:
आंदण - अर्थ - मुलीच्या वडिलांनी मुलीला वा जावयाला लग्नात हुंड्याव्यतिरिक्त द्यायची गोष्ट.
© सौ आरती अत्रे-कुलकर्णी
संग्रही: श्रुती मुंदडा (काबरा)