मंगळवार, ९ जानेवारी, २०२४

855. दोन्ही हाताने झाकला ...

 पेपर टाकायला एक मुलगा 
रोज यायचा घरी 
थांबायचा नाही अजिबात 
हाक मारली जरी

बघावं तेव्हा त्याला घाई असायची 
गठ्ठा घेऊन पळताना ती बालमुर्ती दिसायची 
शाळेचा गणवेष त्याच्या वर
अगदी खुलून दिसायचा 
कधी नजरा नजर झाली तर
तो दिलखुलास हसायचा 

संवाद सुरू व्हायला 
वेळ लागला जरा 
शेवटी प्रत्येक गोष्टीला 
योग यावा लागतो खरा 

एकदा असं झालं 
पेपर यायला झाला उशीर 
अन त्या पोराच्या काळजी ने 
मी झाले अधीर 
खूप वाट पाहून शेवटी 

फोन लावला मालकाला 
तो म्हणाला काळजी करू नका
मी पाठवतो दुस-या  बालकाला
त्याला वाटलं मला 
रोजचं वर्तमान पत्र हवंय 

खरं तर आवर्जून वाचत बसण्याची मला नाही सवय 
शेवटी मी त्याना विचारलं 
तो रोजचा मुलगा नाही आला?
मालक म्हणाला काय सांगू 
त्याचा अपघात झाला 
बातमी देऊन मालकाने 
फोन ठेवून दिला 

आणि अस्वस्थ होऊन  मी
त्यांना परत फोन केला 
म्हंटलं त्याचं नाव काय
अन तो कुठे राहतो 
मालक म्हणाला थांबा 
कुणाला विचारून पाहतो

त्याचा पत्ता मिळे पर्यंत 
माझा निघत नव्हता धीर 
त्याला डोळ्या समोर पहायला 
मी झाले होते अधीर 
एक दोन फोन केल्यावर 
त्याचा पत्ता मिळवला.

आणि मी निघायच्या तयारीत आणि कोणी हाॅस्पिटल चा पत्ता कळवला 
तशीच धावले कोण जाणे 
कुठून आलं पायात इतकं बळ
रणरणतं ऊन असून 
लागली नाही झळ

रूंग्णालयात पोहचले तेव्हा 
तो पडला होता एकटा 
अंगात तसाच होता 
त्याचा टी शर्ट फाटका 

त्याला शुद्ध नव्हती 
पण जाणीव होती थोडी 
मी हात धरल्यावर त्याला 
थर थर सुटली थोडी 

 त्याच्या कानाशी जाऊन म्हंटलं 
काळजी करू नकोस 
मी आहे तुझ्या जवळ 
एवढे शब्द त्याच्या
 कानी पडले केवळ

अन जादू व्हावी तशी 
त्याने उघडले डोळे 
उघडायच्या आधीच ते
भरून वाहीले खुळे 

तसं माझ्या ही डोळ्यात तेव्हा 
जमा झालं पाणी 
आपण याच्या आई का?
विचारत होतं कोणी 

कोण विचारतय न बघता 
मी होकार देऊन टाकला 
अन त्याने आपला चेहरा 
दोन्ही हाताने झाकला 

तो पूर्ण बरा झाल्यावर 
माझ्या पाया पडायला वाकला 
आणि भाकर तुकडा त्याच्या वरून 
मी ओवाळून टाकला 

असेच गेले दिवस
आणि अशीच गेली वर्ष 
आमच्यातला संवाद म्हणजे 
ममतेचा स्पर्श

तो बोलत नाही फार 
पण त्याला न सांगता कळत 
कोण म्हणतं वळणाचं पाणी 
शेवटी वळणाला वळतं?

आता त्याच्या शिवाय माझं 
हलत नाही पान 
आणि त्याचा पायावर तो
अगदी उभा आहे छान 

आता खरा मला 
त्याचा आधार लागतो 
तो मला आई म्हणत नाही 
पण पोटच्या मुला सारखं वागतो 

परवा डाॅक्टर म्हणाले थांबा 
तुमचा मुलगा येतोय न्यायला 
मला भरूनच आलं 
डाॅक्टरानी पाणी दिलं प्यायला 

पेला ओठाशी लावला 
पण पाणी पिता येईना 
अन भरल्या डोळ्यातलं पाणी 
माघारी जाईना 

इतक्यात तो आला म्हणाला 
काय झालं बाई?
बुचकळ्यात पडत डाॅक्टर म्हणाले 
बाई काय म्हणतोस?ही आहे ना तुझी आई? 

क्षणाचाही विचार न करता 
त्याने होकार देऊन टाकला 
अन तेव्हा मी माझा चेहरा 
दोन्ही हाताने झाकला.

चंद्रशेखर गोखले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...