गुरुवार, ११ जानेवारी, २०२४

864. रसद

" अरे पैसे आहेत कारे खिशात " घाईने कॉलेजला जाण्याऱ्या गौरवला धावत रुमाल देत अंजली ओरडली 
" आहेत गं " गौरव 
"किती बघू … १०० रुपये " अंजली
" दे त्याला आणखी पन्नास, उगीच कमी पडायला नको " माय लेकांचा रोजच्या संवादात प्रभाकर हि सामील झाला. 
गौरव पन्नासची वाट बघत उभा. मम्मीने पप्पाच्या खिशात हात घालत पन्नास ऐवजी शंभर काढले नी कोंबले गौरवच्या खिशात. 
गौरव सुटला बाईक घेऊन.
सातपुते साहेब केविलवाणे हसले.
सुगीच्या नाजूक स्पर्शाने ते फ्ल्याश बॅक मधून जागे झाले, डोळ्यातनं टपकणारे अश्रू लपवीत त्यांनी नातीला जवळ घेतलं.
प्रभाकर सातपुते… सॉरी सातपुते साहेब, रिटायर्ड -विदाऊट पेन्शनर, गौरवच्या बायकोचा सासरा आणि सुगी नावाच्या बाहुली सारख्या नातीचा आवडता आज्जा … 
" ये चल न अज्जोबा खाली जाऊ " सुगी.
 " नको बाबा अजिबात खाली नका नेऊ , कालच तापातनं उठलीय आणि मग त्यातनं तुम्ही तिला चॉकलेट आणी आईस्क्रीम सारखं काही वेड वाकडं खायला देणार. अजिबात घेऊन नका जाऊ " किचन मधून सुनबाईचा आवाज .
 " सुगी आगं नको बेटा. बरी हो मग जाऊ कि खाली मस्त हुंदडायला. चॉकलेट आईस्क्रीम सारं देईन हा बाळा " सातपुतेनी सुगीला समजवायचा प्रयत्न केला. सुगी हिरमुसली, रडायला लागली, नुकतीच तापतनं उठलेली पोर तिला मोकळ्या हवेत नेलं तर बरं वाटेल म्हणून घेतलं त्यांनी नातीला कडेवर आणी निघाले खाली घेऊन, सुनेला न जुमानता.सुगी बहरली. तिला चॉकी अन आईस्क्रीम पेक्षा आज्जाची ग्यांग खूप आवडायची. सगळे म्हातारे लाड करायचे तिचे, पम्या आजोबाची पामेरिअन तर तिचा जीव कि प्राण. सुगी खुलली . खाली मस्त माहोल. सांजचा गार वारा अंगावर घ्यायला माणसं उतावीळ.  कॉम्प्लेक्स हळू हळू दिव्यांच्या प्रकाशात जणू नव्या वस्त्रात नटून एन्ट्री घेतोय. तेव्हढ्यात रमोला आली अप्पांची नात , हातात चॉकलेटचं मोठ्ठ पुडकं घेऊन. एकटीच खात हातातलं चॉकलेट सुगीपूढे नाचवत. आणि सुगी बिघडली "आज्जोबा  मला पाह्यजे चॉकलेट" सातपुते साहेब हादरले त्यांनी सदरा चपापला, चल म्हणाले आपण चॉकलेट घेऊ. दुकानात गेले, सुगीला एक नको, चॉकलेट चा अक्खा बॉक्स हवा होता, हट्टाला पेटली सुगी, भोकांड पसरलं , सातपुते साहेब घामाघूम झाले.
खिशात फक्त दोन रुपये , दुकानदार हसतोय " ले जाव सर बादमे पैसा देदो.
"आरे नय अभी अभी बुखार से अच्छी हुई है वो " सातपुते साहेब सारवासारवी करीत उद्गारले .
उचललं सुगीला, रडणारी हात पाय झाडणारी सुगी त्यांना आवरता आवरत नव्हती , धापा सहन होत नव्हत्या, सुगीचं आक्रंदन बघवत नव्हतं. फाटक्या खिश्याला दोष देत ते स्वतःच्या म्हणजे मुलाच्या घरी आले. सुगीला तिच्या मम्मीच्या हातात देत. डोळ्यात कसू गेल्याची अक्टिंग करीत बाथरुम मध्ये शिरले नि आवाज न करता रडू लागले हमसून हमसून. आपलं रडणं बाहेर ऐकू न जाण्याच्या अटोकाट प्रयत्न करत पुन्हा फ्ल्याश ब्याक मध्ये जाताना सावरलं त्यांनी स्वतःला .
     टु बेड किचनच्या हॉल मध्ये झोपताना त्यांना भांडायचं होतं अंजलीशी, अंजली गेल्या पासून त्यांनी बेड मध्ये झोपणं सोडून दिलेलं, हॉल मध्ये अटलीस्ट पहाटे ४ वाजता का होईना झोप तरी यायची. पण इथेही सुगी यायची सकाळी बरोबर सहाच्या ठोक्याला, आज्जाच्या बाजूला झोपायला. मग तिला गुल बकावलीचा पुढचा प्रवेश पण सांगावा लागायचा. आज  रात्री दहाच्या सुमारास झोपलेल्या सुगीला तिच्या वडिलांच्या हवाली केल्यानंतर सतरंजीवर पडल्या पडल्या ते नेहमी प्रमाणे फ्ल्याश ब्याक मध्ये गेले.  एकुलत्या एक मुलाला शिकवलं, लग्न करून दिलं घर कमी पडतं म्हणू स्वतच्या नावावर असलेला वन बीएचके फ्ल्याट विकून गौरवने काढलेल्या लोन वर टु बीएचके फ्ल्याट घेतला अर्थात तोही गौरवच्या नावावर झाला म्हणा.  सर्विस करत असताना कुटुंबाला खूप मजेत ठेवलं होतं त्यांनी , काहीच कमी होवू दिलं नव्हतं. त्यातनं पण वाचवलेला पै पैसा घराचं लोन, गाडीचं लोन फेडून लेकाच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी खर्च झाला. अंजलीला भारत फिरवायचा होता, दागिने घ्यायचे होते, राहून गेलं सारं. इनफ्याक्ट असलेले दागिने मोडावे लागले सुनेच्या दागिन्यासाठी. इंजिनियर मुलगा कमवून पोसेल आपल्याला,  छान छौकीत राहू. हे सगळं आहे ते त्याचच ना आपल्याला कुठे काय घेवून जायचंय वगैरे वगैरे स्वप्न पाहात अंजली पण गाढ झोपेत झोपली ती कायमचीच. थोडे फार हाताशी असलेले पैसे वापरायचे खर्चाला पण तळंच ते कधी न कधी आटणार, संपले सारे , रिकामी झाली बँक. 
     नाही म्हणायला गौरव महिन्यातनं द्यायचा शंभरभर रुपये पण ते हि आता मिळेनासे झाले.  सहा महिने झाले असतील गौरवने हातावर काही टेकवायला. आणि मी मागू पण कशाला, अरे उभ्या हयातीत कुणाकडे हात नाही पसरला आणि आता पसरीन होय. दोन वेळेचे जेवण देताहेत ना आणि काय करायचेत रे पैसे तुला, काय पैश्याहून अडतंय तुझं. सिगरेट तर तू सोडून दिलयंस प्रकृती अभावी म्हण कि पैश्या अभावी आणि दारू तर तू कधी प्यायचास नाही आणि कसले आता नाटक सिनेमा बघायचे आणि कुणा बरोबर… ऑ.
 सदरा लेंगा मिळतो न दिवाळीला काय करायचेत कपडे, अरे कित्ती कपडे आहेत तुझ्याकडे. सातपुते साहेबांच्या अंगाची लाही लाही सुरु झाली. डोकं गच्च झालं, डोळ्यात अंगार साचला.  कळत होतं त्यांना कि आपलं ब्लड प्रेशर वाढतंय. डोळ्यातनं गरम आसवांच्या पावसाला सुरुवात झालेली. अरे कुणाला सांगू. कोण ऐकेल माझी व्यथा.  अंजली का मला एकट्याला सोडून गेलीस , का नाही गेलो तुझ्या आधी मी.कोणच नाही गं माझं इथं. का नाही ऐकलं मी तुझं , तू म्हणत होतीस अजून एक चान्स घेवूया आपण. का नाही घेतला. असता अजून एखादा मुलगा किंवा मुलगी तर निदान दुखं तरी शेअर करता आलं असतं , मदत नको मला पण माझं ऐकणारं कुणी तरी हवंय … मिंधा झालोय मी मिंधा… प्रभाकर सातापुत्या तुझी रसद तुटलीय … तुला आता किल्ला लढवणं शक्य नाहीय … जा शरण जा शत्रूला … फडकाव पांढरं निशाण … 
गरम अग्नीच्या लोळात सातपुते साहेब धुसर होत चाललेले पांढरं निशाण फडकावीत शत्रूच्या दिशेने

सुधीर जाधव १४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...