सोमवार, १५ जानेवारी, २०२४

868. मी कात टाकली.

 आकांक्षा आणि आकाशचे लग्न होऊन वर्ष झालं होतं. राजा-राणी शिवाय आकाशचे आईवडील देखील त्यांच्यासोबत राहत होते. नव्याची नवलाई अर्थातच संपत आली होती. आकाशचे घराबाहेर राहणे वाढले होते. तो सुट्टीच्या दिवशी देखील घरी थांबत नव्हता. सगळे घर आकांक्षावर सोडून मित्रांमध्ये रमायला लागला होता. हल्ली तर तो मित्रांजवळ 'उगाचच लग्नाच्या फंदात पडलो' असे बरळत फिरायचा.
आकांक्षा लग्न करून घरी आल्या आल्याच सासूबाईंनी 'मी रिटायर्ड होतेय ' असे म्हणत सगळ्या घराचा ताबा सूनबाईला दिला. आकांक्षाला हे सगळे अनपेक्षित होते. एकंदरीत सगळ्यात कामाचा जेमतेम अनुभव असलेल्या आकांक्षाची नोकरी आणि घर सांभाळताना त्रेधातिरपीट उडू लागली. घरात सासू सासऱ्यांच्या सूचनांचे रूपांतर मग आज्ञेत होऊ लागले. आकांक्षा देखील सहन करणाऱ्या सूनांपैकी नव्हती. तिही प्रत्यूत्तर देऊ लागली. घरात वारंवार खटके उडू लागले. ते आकाशच्या कानावर आल्यावर तो आई बाबांचीच बाजू घेऊ लागला. आकाशला खरी बाजू ओळखता येत नव्हती.
त्या दिवशी आकाश घरी लवकर आला. त्याचा मूड खराब होता. आकांक्षाने त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला. तो काही न बोलताच मोबाईल मध्ये डोकं खूपसून बसला. आकांक्षाला वाटायचे लग्नाअगोदर आकाश किती वेगळा होता. भरभरून बोलायचा. स्वप्ने बघायचा. त्यांचा प्रेम विवाह नसला तरी एकमेकांना जाणून घ्यायला पूरेसा वेळ मिळाला होता.
आकांक्षा आता तिच्या मनातील एक महत्त्वाचा विचार सांगणार होती तर त्याचं बिनसलेलं.
शेवटी त्या रात्री तिने धीर करून विचारले.
" आकाश आपण वेगळे राहूया"
" काय ?"
" मला आता सगळं नाही सहन होत रे."
" म्हणजे नक्की काय म्हणायचेय तुला ?"
" अरे, तुला माझा त्रास दिसत कसा नाही रे?"
" मग नोकरी सोड." आकाश सहज बोलून गेला.
" मला शारीरिक त्रासाबद्दल काहीच वाटत नाही रे, मानसिक दृष्टया खचलेय मी, सासू सासऱ्यांशी आई वडीलांसारखे वागून पण ते सासू सासऱ्यांसारखेच वागत असतील आणि नवऱ्याला पण तेच बरोबर वाटत असेल तर आम्ही घरदार, आई वडील , भावंडे अगदी सगळेच सोडून परक्या घरी आलेल्या मुलींनी कोणाकडे पाहावे? आई वडील तर ' दिलीस तिकडेच मेलीस ' असं बोलतात." आकांक्षाच्या डोळ्यात पाणी आले होते. तिला वाटले आकाश ते पुसेल आणि जवळ घेईल पण तसे काही झाले नाही. तो आपली उशी घेऊन सोफ्यावर झोपायला गेला.
" हे बघ आकांक्षा , हे सर्वांनाच सोसावे लागते. तू कायम सूनच राहणार आहेस का? कधी तरी सासू होशीलच की. प्लीज मला आता झोपू दे." आकाश गेल्यावर आकांक्षाला हूंदका अनावर झाला.
आकाशचे शब्द तिच्या कानात घुमत राहिले. ती सारी रात्र तिने तळमळत काढली. पहाटे उशीरा तिचा डोळा लागला. इतक्यात सहा वाजताचा अलार्म वाजला. तिला उठावेसे वाटत नव्हते. अंगात कणकण होती. पण तिच्याकडे पर्याय नव्हता.
विनय कॉफीचे घुटके घेत गॅलरीत बसला होता. त्याच्या एका पुस्तकाचे लेखन अंतिम टप्प्यात आले होते. सकाळपासून त्याच्यावरच काम चालू होते. त्या शिवाय त्याला एक महत्त्वाचे काम हातावेगळे करायचे होते. तो मोबाईलमधील नोटस् चालू करून टाईप करू लागला.
प्रिय आकाश,
तू अजूनही माझ्यासाठी प्रिय आहेस. आपली लहानपणापासूनची मैत्री एका शुल्लक कारणामुळे तुटली याला आता वर्ष होईल. आपण दोघांनीही वर्षभरात एकमेकांशी बोलायचा प्रयत्न केला नाही. तो प्रयत्न आज मी करतोय. पण मी जे तुला सांगणार आहे ते वाचून कदाचित मला समजून घेशील अशी आशा करतो. मी हे सर्व गेल्या वर्षभराच्या अनुभवातून सांगतोय.
मी घरजावई झालो हे तुला आवडले नाही हे मला माहीत आहे. पण मी तसं का केलं हे कधी जाणून घ्यायचा प्रयत्न केलास ? नाही. माझ्या लग्नाला देखील आला नाहीत. नंतर जेव्हा आपण भेटलो तेव्हा तू मला नाही नाही ते बोललास. अगदी बायला, बायकोचा बैल, ऐतखाऊ असं बोलून मला कुठेतरी आतून दुखावलस आणि मी सर्वांदेखत तुझ्या कानाखाली मारली. तू रागाने फणफणत निघून गेलास.
आकाश, मी जेव्हा लग्न करून दिप्तीच्या घरी राहायला गेलो. तेव्हा सुरूवातीला जावई म्हणून खूप लाड झाले. पण हे कोडकौतुक तिकडच्या मंडळींना समजून घेताना कुठेतरी निसटत होतं. पण इथे दिप्तीने मला सांभाळून घेतले. तिकडच्या लोकांनी मला घरजावई म्हणून कधीच वागवले नाही. मी त्यांच्या घरात राहत होतो म्हणून घरजावई होतो. अन्यथा माझे सर्व हक्क आणि अधिकार शाबूत होते. दिप्ती खूप खूश होती. ती तिच्या आई वडीलांच्या जवळ होती आणि त्यांची ती सेवाही करायची. काही गोष्टी स्वतः करून मी केल्या असं तिच्या आईवडिलांना सांगायची. आपण नवरे असं करतो का रे? आपण लग्न झालं की आपल्या आई वडीलांची जबाबदारी आपल्या बायकोवर ढकलून मोकळे होतो. त्यांची सेवा तिने करावी , त्यांच्याशी तिने चांगले वागावे अशी अपेक्षा ठेवतो. ते पहिले आपले आई वडील असतात मग आपण का नाही घेत आई वडीलांची काळजी? तू कितीवेळा बायकोला घरकामात मदत केली आहेस? उलट आपण तिला समजून न घेता तिच्यावर अतिरिक्त जबाबदाऱ्या टाकतो. नवीन घरात नवीन लोकांशी समजून घेताना एखाद्या स्त्रीचे काय होत असेल ते मी जाणलंय वर्षभरात. मला काही काम करावे लागले नाही पण नवीन जागा, नवीन माणसे समजून घेताना माझीही कुचंबना झालीच. जसा आपल्याला स्वाभिमान असतो तसाच त्यांनाही असतोच की. मुलगा घरजावई झाला की लोकं हसतात, कमी पणाचे वाटते मग त्या आपल्या आईवडीलांचे घर सोडून येणाऱ्या मुलीला काय वाटत असेल? मला घरजावई होऊन राहताना कोणी त्रास दिला नसला तरी आत कुठतरी सूप्त सुई टोचत असतेच. आई वडील, मित्र मैत्रिणी, नातेवाईक आणि शेजारी या सर्वांपासून दूर झालेच्या त्रास असतो तो. असच काही आपल्या बायकोचे होत असेल ना? मग तिने वेगळे राहायचा विचार केला तर चुकते कुठे? तिच्या मनात असा विचार येऊच नये यासाठी काहीतरी करायचे.
आकाश, तुझ्यापासून दूर होतो रे, पण मित्रांकडून तुझी खबर घेत होतो, तुझा मार्ग चुकतोय हे दिसत होते रे मला. तू मी जे काही बोललो त्यावर विचार कर. संसार दोघांचा असतो ना रे. मग एकालाच त्रास का? एका चाकाने धड असून पण हवा गेल्यासारखे का ओढत राहायचे ? मी फक्त एक वर्षासाठी घरजावई म्हणून राहणार आहे. आम्ही लेखक मंडळी लिखाणात खरेपणा येण्यासाठी तो विषय जगायचा प्रयत्न करतो. मी ' स्त्री तुझा जन्म कसा ' या विषयावर एक पुस्तक लिहीतोय. यासाठी मला लग्न झाल्यावर घर सोडून येणाऱ्या एका मुलीची बाजू समजून घ्यायची होती म्हणून मग मीच घरजावई व्हायचे ठरवले. दिप्तीला यातले काहीच माहीत नाही आहे. किंबहुना ती कधीही आमच्या घरी राहायला यायला तयार आहे. मी जेव्हा माझा घरजावई बनण्याचा निर्णय सांगितला तेव्हा तिला ही ते पटले नाही. तिने तीव्र विरोध केला. ती केवळ माझ्या इच्छेपोटी तयार झाली. माझे हे पुस्तक प्रकाशित झाले की मी परत आमच्या घरी राहायला येणार. माझ्या या निर्णयामुळे आई वडील , मित्र मैत्रिणी, नातेवाईक सगळेच दुखावले गेलेत. त्यांची समजूत काढेनही. तूही तुझ्या बायकोला समजून घे. अगदी वेगळेच राहा सांगणार नाही पण तुझ्या बायकोचा स्वाभिमान जप. तिची बाजू ऐकून घे. तिला कामात मदत कर. तिचे दुख समजून घे. काही गोष्टी तिच्या वतीने तू कर. कधी तिचे कौतुक कर. तू तिला मान दिलास तर दुनिया तिला मान देईल.
जास्त लेक्चर देत नाही. बाकी तुझं भलं तू जाणतोस. त्या थप्पडबद्दल मला माफ कर. तिथे माझीच चूक होती. माझा घरजावई होण्याचा बेत तुला अगोदरच सांगितला असता तर तो प्रकार घडला नसता. असो. काळजी घे. लवकरच भेटू.
तुझा मित्र
विनय.
सकाळी सकाळी आलेला विनयचा मोबाईलवरील मेसेज आकाशने वाचून काढला आणि विचारात गढला. मी खरचं असं वागायला नको होते. आता आकांक्षाचे वेगळे राहण्याचे मत बदलले पाहीजे. ती ऐकेल ही माझं. पण आई बाबांचे काय ? ते नीट वागतील का तिच्याशी ? आकांक्षाला सांगू समजावून, ते काही बोलले तर उत्तर नको देऊस. विनयला सांगून आई बाबांसाठीही असंच एक पत्र लिहायला सांगू. डोळे उघडणारे पत्र. माझे नाही का उघडले डोळे? इतके दिवस आकांक्षा सांगत होती ते डोक्यात शिरत नव्हते पण विनयने लग्न झालेल्या मुलीचे मन घरजावई बनून ओळखले आणि पहिल्या थिअरीचा यशस्वी प्रयोग माझ्यावर केला.
आकांक्षा बाबांना पोहे देत होती.
" मला पोह्यात शेंगदाणे आवडत नाही हे माहित आहे ना?" सासरे आकांक्षावर ओरडत होते.
" अहो, आकाशला पोह्यात शेंगदाणे लागतात तर मी काय करू ?"
" त्याच्या पोह्यात घालत जा, माझ्या नको." सासऱ्यांचे हे वाक्य ऐकल्यावर आकांक्षा काही तरी बोलणार एवढ्यात आकाश मध्ये पडला.
" थांबा बाबा, मी निवडून देतो शेंगदाणे." असे बोलून आकाशने बाबांच्या हातातील पोह्याची प्लेट आपल्याजवळ घेतली. बाबांनी आकाशकडे पाहिले. तो पोह्यामधील शेंगदाणे निवडून तोंडात टाकत होता आणि हसत होता. बाबांच्या तोंडातील शब्दही थबकले. वाढणारा वाद संपुष्टात आला होता.
आकांक्षाला आश्चर्य वाटले. एरव्ही कितीही मोठा वाद झाला तरी ढिम्मासारखा बसून राहणारा आकाश आज मध्ये पडून समंजसपणा दाखवत होता आणि कधी नव्हे तो घरी हसताना दिसला.
आकाशचे आईबाबा देवळात गेले होते. घरात ते दोघेच होते.
" अक्षू, ऐक ना." आकाश म्हणाला.
" हं, बोला." चेहऱ्यावरील खुशीचे भाव लपवत आकांक्षा म्हणाली. आज खूप दिवसांनी त्याने तिला अक्षू नावाने हाक मारली होती.
" आपण आज एका कपात चहा पिऊया का ?" तो किचनमध्ये येऊन तिला पाठीमागून कवेत घेत म्हणाला.
" माझा चहा झालाय." दुसरा गोड धक्का लपवत तिने त्याचा विळखा सोडवला.
" अक्षू मला माहीत आहे. तू माझ्यावर रागवली आहेस ते. मला थोडा वेळ दे. मी सर्व काही ठिक करेन. तुझा त्रास मला समजतोय. आपण तो त्रास दोघे मिळून कमी करू. आई बाबांच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊस. "
असा बराच वेळ आकाश आकांक्षाला समजावत राहीला. आकांक्षाला सारं स्वप्नवत वाटत होतं. नवरा आपल्याशी प्रेमाने बोलतोय याचंच अप्रूप होतं. ती आतून खूप सुखावली होती. त्याचे आश्वासक शब्द तिला बळ देते होते. तिच्या मानसिक मरगळीने कात टाकली होती. तिने उभ्या उभ्याच आकाशच्या खांद्यावर आपले डोके ठेवले होते. एकमेकांच्या बाहूपाशात ते जणू कात टाकत होते. एक नवी सुरुवात करत होते. संसार फुलवण्याची स्वप्न बघत होते. रथाची दोन चाके आज मजबूत होत होती. तेवढ्यातच टिव्हीवर ' मी कात टाकली' हे गाणं वाजू लागले.

© नितीन दशरथ राणे
संग्रही: श्रुती मुंदडा (काबरा)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...