शनिवार, २० जानेवारी, २०२४

874. फसवणूक

       विपुलच्या अचानक जाण्याने तृप्ती चे भावविश्व पार उन्मळून पडले. आता तर  चालू झाली जीवनाची खरी लढाई. कसे सामोरे जाणार होती ती समाजाला, नातलगांना? जिवाभावाची सखी ही तिची सवत आहे कळल्यावर, त्यातून तृप्तीला सावरायला जवळपास दोन वर्षे लागली. पण आपल्या  मुलीसाठी गाथा साठी तरी सावरणं भाग होतं. तिचे दोनाचे चार हात करायची  वेळ लवकरच येऊन ठेपेल तेंव्हा काय उत्तर देणार होती तृप्ती तिची आई या नात्याने मुलांकडील लोकांना? विचार करून करून तिचं डोकं भणभणायला लागलं होतं. चहाची तल्लफ आल्याने उठून ती किचनमध्ये निघाली , इतक्यात विशाखा तिची जीवलग मैत्रीण. तिची सवत हीचा कॉल आला. खरेतर तृप्तीने तिचा नंबर ही डिलीट केलेला पण विपुल च्या दिवसपाणी कार्यात ती सहभागी झाली व झालं गेलं विसरून तृप्ती तिच्याशी मोजकेचं बोलली. त्यावेळी दोघीही आपल्या आयुष्यात कुठलं वादळ उदभवलेचं नाही या आवेशात वावरत होत्या पण जमलेल्या नातेवाईकांच्या नजरेत सारे भाव स्पष्ट दिसत होते. अस्फुटशी कुजबूज केलेली जाणवत होती. विपुलच्या आईला जेंव्हा या सगळ्या गोष्टी कळल्या तेंव्हा त्या माऊली ने त्याची बरीच कानउघाडणी केली होती. त्यानंतर काही काळ विशाखा व विपुल दूर होते. परंतु एकमेकांपासून आपण फार काळ दूर राहू शकत नसल्याने विपुल ने कंपनी टूर च्या नावाखाली पुन्हा बेंगलोर ला व्हिजिट दिली. या सगळ्या प्रकारात मात्र तृप्ती हताश झालेली. सासूबाईंच्या इच्छेला मान देऊन विपुलमध्ये परिवर्तन होण्याची  वाट पहात राहिली. 
     आयुष्याच्या एका टप्प्यावर मात्र आपण फसवले जात असून विपुलच्या मार्गातून , स्वतःहून दूर होण्याचा पर्याय तिने निवडला. त्यावर घरात बराच गदारोळ माजला होता. प्रत्येक वेळी स्त्री ने एक पाऊल माघार का घ्यावी , तिची काहीही चुकी नसताना ? ठरल्याप्रमाणे तिने आपल्या वकील मैत्रिणीशी बोलून फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. नात्यातील सहवास कमी झाला की दुरावा जाणवतो. वारंवार पडत असलेले अंतर..त्याचा तरुण वयातील गाथा वर  होणारा परिणाम. या साऱ्या गोष्टींवर पडदा टाकून तृप्तीला आता अलिप्त  व्हायचं होतं.
      तृप्ती एका कॉलेजमध्ये लेक्चरर होती. स्वतःच्या पायावर ठाम उभी होती. लवकरच तिच्या PHD च्या प्रबंध वर शिक्कामोर्तब होणार होते.  अतिशय शांतपणे तिने विपुलशी बोलून जेंव्हा डिव्होर्स चा निर्णय घेतला , तेंव्हा तिच्या या अनपेक्षित निर्णयामुळे मात्र विपुल हादरला होता.या साऱ्या ताणतणावामुळे त्याला हार्ट अटॅक ला सामोरे जावे लागले. अँजिओग्राफी झाल्यानंतर तृप्तीने पत्नीच्या नात्याने तिची सगळी कर्तव्ये पार पाडली होती , अगदी मनाचा कोंडमारा होत असतानाही. खरंतर आता त्या दोघांना एका छताखाली राहणं ही अवघड झालं होतं.
      काही कालावधी नंतर विपुल आजारपणातून सावरला व त्याचे ऑफिस रुटीन चालू झाले मग मात्र तृप्ती. मुलगी गाथासह माहेरी परतली. नातेवाईक चौकशी करत होते पण काळजातलं दुःख लपवत तृप्ती साऱ्याला सामोरे जात होती. वयस्कर आई - वडिलांना जपत होती. या वयात त्यांना हा धक्का पचविणे अवघड जात होते पण तृप्ती व नात गाथा ला आधार देण्याचं  आपलं कर्तव्य ते करत होते. लवकरच तो दिवस येऊन ठेपला. आज विपुल व तृप्तीची लग्नाची अँनव्हर्सरी होती. तृप्ती आज मुद्दाम सुट्टी घेऊन घरी राहिली. दुपारची जेवणं झाल्यावर बेडरूममध्ये आईच्या मांडीवर डोकं ठेवून विसावली होती. डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंना थोपवणं अवघड जात होतं. बिचारी आई मात्र तिच्या डोक्यावरून आपला मऊशार हात फिरवत तिला शांत करत होती. कसं आणि काय घडलं या विचारात गढून गेली , खरेतर अतिविचार करणे हे तब्येतीच्या दृष्टीने स्ट्रॉंग पॉयझन असते. कोणाला काय वाटेल हा विचार करत बसलो तर. हे आयुष्य संपून जाईल पण Let It Go....! म्हणून झालेली घटना ही विसरता येण्यासारखी नव्हती.
    गतकाळातील घडामोडींचा चित्रपट तृप्तीच्या डोळ्यासमोर तरळला. विपुल एक आयटी इंजिनिअर झालेला हुशार मुलगा. मध्यमवर्गीय कुटुंबातील तृप्तीच्या बघताक्षणी प्रेमात पडला. कुठल्याश्या एका कार्यक्रमात विपुलच्या फॅमिलीने तृप्तीला पाहिलं व मागणी घातली. अगदी रीतसर दाखविण्याचा कांदा पोहे प्रोग्रॅम पार पडला. मेड फॉर इच अदर अशीच त्यांची जोडी दिसत असल्याने , दोघेही यथावकाश बोहल्यावर चढले. सासरी तृप्ती सगळ्यांशी लाडकी झाली. कॉलेजमध्ये जॉब करत सारी कर्तव्ये हसतखेळत पार पाडत होती. पण त्याचवेळी विपुल मात्र कंपनीत यशाच्या पायऱ्या चढत असतानाही भरकटत चालला होता. लग्नप्रसंगी विशाखा चा तृप्तीच्या घरी मुक्काम होता. सगळ्या नातेवाईकांनी , मित्रमंडळींनी लग्न छान एन्जॉय केलेलं. तृप्तीला व तिच्या आईबाबांना तर स्वर्ग दोन बोटे उरलेली. नशीब काढलं होतं पोरीने म्हणून सगळेच खुश होते. पण काही वर्षांनंतर जेंव्हा सत्य कळलं तेंव्हा मात्र विशाखा त्यांच्या नजरेतून पार उतरली. लहानपणी आईचं छत्र हरपल्याने तृप्तीच्या घरच्यांनी   विशाखावर पोटच्या पोरीप्रमाणे प्रेम केलं. पण त्यांना काय माहीत हेच प्रेम पुढं आपल्या तृप्तीचा संसार मोडणारं ठरेल. असो , पण यात विशाखा ला पूर्ण जबाबदार धरणं ही चुकीचे होतं. कारण दोषी तर विपुल ही होता. तरुण वयात स्वतःचा संसार छान फुललेला असतानाही त्याने विशाखा वर आपली मोहिनी घातली. 
      बेंगलोर ला जॉब निमित्त एकटी राहात असलेली विशाखा हळुहळू विपुलच्या प्रेमात गुरफटून गेली. काळवेळेचं बंधन न पाहता आकंठ दोघेही प्रेमात बुडाले. समाज , कायदा हे लग्न मान्य करणार नाही हे माहीत असूनही गुपचूप देवळात देवाला साक्ष ठरवत, त्यांनी एकमेकांना आणाभाका दिल्या.
     तृप्तीला तो दिवस आठवला. लग्नानंतर सात ते आठ वर्षानंतर कॉलेजच्या काही कामानिमित्त तिचा बेंगलोर ला चार ते पाच दिवस अभ्यास दौरा ठरला. त्यावेळी वेळात वेळ काढून ती आवर्जून विशाखाला भेटायला गेली. मध्यंतरीच्या काळात एखादी दुसरी पुण्यात विशाखा ची धावती भेट झाली होती. विशाखा ने कोर्ट मॅरेज केलं सांगून सध्या तिचे मिस्टर यूएस ला असतात असा बनाव रचला. प्रेमाचे अनेक किस्से पेरून तृप्तीला भुरळ घातली. सालस स्वभावाच्या तृप्तीला कसलीही शंका आली नाही. या सगळ्या खटाटोपमध्ये विशाखाने आपलं बिंग फुटू नये म्हणून खूप काळजी घेतली. पण तिचा सात वर्षाचा मुलगा संकेतला जेंव्हा तृप्तीने पाहिलं त्यावेळी ती बुचकळ्यात पडली. का तर? हुबेहूब. तो विपुल सारखा दिसत होता. मनात अनेक कुशंका चे वादळ घेऊन ती घरी परतली. तिने विपुलचे लहानपणीचे फोटो असलेला अल्बम उघडला. तिचं मन हे मान्य करायला तयार नव्हते. तिला बेंगलोरला गेल्यावर विशाखाच्या वागण्यातील अनेक गोष्टी खटकल्या होत्या. पण सोबत कॉलेज मधील मैत्रीण असल्याने तिने फार लक्ष दिलं नाही. आपली अगदी जवळची मैत्रीण विशाखा आपल्याशी अशी का वागत होती? अगदी अंतर राखून.
     तृप्तीने संकेत शी बोलताना त्याच्या पप्पाबद्दल विचारले असता विशाखा ने आपल्या मेड ला खूण करून त्याला आत रूममध्ये न्यायला सांगितलं व तृप्तीजवळ सध्या आमचं नातं अवघड वळणावर असल्याचं सांगितलं. मला इंडिया सोडून तिकडं स्थायिक व्हायचं नाही आणि आता माझे पप्पा ही थकलेत, त्यांना इकडे बेंगलोर ला घेऊन येतेय असे सांगितले. मिस्टर तर तिकडेच राहायचं आहे म्हणतात.
    नात्याची गुंतागुंत उकलण्यात काहीच अर्थ नव्हता पण आता तृप्तीने विपुल वर लक्ष ठेवायला सुरुवात केली. शब्दाने वाद वाढविण्यात अर्थ नव्हता. आपली शंका जर खोटी ठरली तर मुखातून गेलेला एखादा अप्रिय शब्द एखाद्याला अपमानीत करून जातो. विश्वास हा नेहमी माणसाच्या वृत्तीवर ठेवावा.  तात्कालिक शब्दांवर नाही हे तृप्ती जाणून होती. म्हणूनच तिने सावधगिरी बाळगली होती. आपल्या बेंगलोरस्थित मावसभावाला हाताशी धरून तिने या गोष्टीचा छडा लावायचा निर्णय घेतला. सततच्या विपुलच्या बेंगलोर वाऱ्या या नक्की ऑफिस कामानिमित्त होत्या का?  याची शहानिशा तिने त्याच्या बॉस शी बोलून केली. त्यातूनचं जे बेगडी सत्य उलगडत गेलं. तेंव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. संसाराचा सारीपाट उधळला गेला. एखाद्या पत्त्याच्या बंगला कोसळावा त्याप्रमाणे.  इकडे तृप्तीच्या मावसभावाने विशाखाची माहिती काढायला सुरुवात केली. जेंव्हा विपुलचा फोटो शेजाऱ्यांना विश्वासात घेऊन दाखवला तेंव्हा तो पार हबकला. तृप्तीला आता काय सांगायचं. कसं सामोरे जायचं या घटनेला. म्हणून त्याने तिला काही टिप्स दिल्या. जानेवारी चा तो महिना. विपुल पुन्हा प्रोजेक्ट कामानिमित्त बेंगलोर मेन ऑफिसला जाणार असे कळल्यावर तृप्तीने त्याची प्रवासाची हसतखेळत तयारी केली व त्याच्या पाठोपाठ ती  आपल्या मावसभावाकडे बेंगलोरला आली. आपली मुलगी गाथा ला माहेरी सोडून. सासरी घरी अनेक कारणे देताना तिला नाकी नऊ आलेलं. पण सासूबाईंना तिने PHD प्रबंधाची माहिती व व्हिजिट देण्यासाठी मला मुंबईला चार दिवस तरी  राहावं लागेल असे सांगितले.
     बेंगलोरला गेल्यावर डिनर ला हॉटेलमध्ये विशाखा मुलगा संकेत सोबत विपुल ही  बसला असता अचानक तृप्ती समोर आल्याने त्या दोघांची पाचावर धारण बसली. तृप्ती व तिच्या भावाने कोणत्याही प्रकारे वाद न घालता सत्य जाणून घेतले. सुरुवातीला आरडाओरडा करणाऱ्या विपुलला अनेक पुरावे दाखविल्यावर त्याला आपलं हे अफेअर मान्य करण्यावाचून पर्याय राहिला नाही. विशाखा तर फक्त खाली मान घालून उभी होती. तृप्तीच्या नजरेला नजर देण्याची तिची हिम्मत ही झाली नाही. चूक कबूल न करता फक्त हात जोडणं हा तिचा एक प्रकारचा बहाणा होता. रिअलायझेशन केवळ माफी मागून, पाय पकडून होत नसते. तृप्तीने बेंगलोरहून परतताना नात्यांच्या या विळख्यातून स्वतःलाचं मुक्त करायचं ठरवलं. आता वेदना हीच तिची जिवाभावाची सखी ठरणार होती. तृप्तीच्या आक्रोशाला शब्दांचं बंधन नव्हतं पण मूकपणानं गिळणं ह्यातच शहाणपण होतं आणि हाच मार्ग तिने स्वीकारला होता. 
     पण आता विपुलच्या जाण्याने सगळेच प्रॉब्लेम नकळत सुटले होते का?  का गुंतागुंत वाढली होती. हे येणारा काळ ठरवणार. काळानं आपलं म्हणवणाऱ्या व्यक्तीला हिरावून नेलं पण त्यांनी केलेली फसवणूक याचं काय? नात्याला गेलेला तडा जोडता येणं , पुन्हा शक्य होईल का? तुटलेल्या गोष्टी गोळा करताना जखमा होतातचं तसंच नात्यातील फसवणूक कदापि विसरता येणं शक्य नाही. घोंघावत कोसळणाऱ्या  प्रपातासारखं  नियती खदखदत होती. तृप्तीच्या आयुष्यात झंझावती वळणं आली होती , त्यातही ती ठामपणे उभी राहायला सज्ज झाली. आपल्या लाडक्या लेकीच्या गाथा च्या भल्यासाठी.
     शेवटी काय माणसाचं मन  ही एक अजब सर्कस आहे. मनाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे ही शोधण्याचा प्रयत्न करू नये कारण मौनातचं त्याचं उत्तर दडलेलं असतं.

©️®️सौ राजश्री कुलकर्णी / भावार्थी
          पुणे
    १९ / ०१ / २०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...