मंगळवार, ९ जानेवारी, २०२४

847. द ८. ०० PM कॉल ...

 माधवी आणि त्याच्यात शेवटचा वाद झाला  तेव्हा मिली अवघी सात वर्षाची होती. त्याचं त्यांच्यावर प्रेम नव्हतं असं नाही पण माधवी आणि त्याच्यात सतत खटके उडत होते आणि त्याच्या काही चुकीच्या आर्थिक निर्णयामुळे सगळ्यांच्याच नजरेतून तो उतरला होता. त्याच्या घरच्यांनीही माधवीचीच बाजू घेतली आणि शेवटी त्याचंच घर त्याला सोडायला सांगण्यात आलं. तो गेला ते पुन्हा कधीही परतून न येण्यासाठी. 
त्यातल्यात्यात समाधानाची बाब एवढीच होती की त्याला मिली सोबत फोन वर बोलण्याची परवानगी मिळालेली होती. मिलीवर त्याचं असलेलं प्रेम माधवीला पण माहिती होतं आणि तेही त्याच्यापासून त्याला दूर ठेवण्याइतकी उलट्या काळजाची तीही नव्हती. रोज रात्री ८ वाजता तो मिली ला फोन करत असे . त्यात कधीही खंड पडला नव्हता.  
काही महिन्यांनी तो गल्फ मधल्या कुठल्यातरी देशात कामानिमित्त गेल्याचं तिच्या कानावर आलं होतं. दरमहिन्याला काही रक्कम तिच्या बँकेत त्याच्याकडून येऊ लागली. माधवीला पगार बऱ्यापैकी होता त्यामुळे तिला त्याच्या पैशाची गरज नव्हती म्हणून ती रक्कम ती जशीच्या तशी मिलीच्या नावे जमा करू लागली होती. 
काळ पुढे चालला होता  दिवसांचे, महिने झाले महिन्यांचे वर्ष. मिली मोठी होत होती. तिच्या प्राधान्यक्रम बदलत होता. ती तिच्या अभ्यासात व्यस्त होत होती. पण याचे फोन सुरु होते. आधी लँडलाईन वर नंतर मग जसा मोबाईल आले तसा माधवीच्या मोबाईलवर. नंतर मग मिली चा स्वतःचा नुंबर मिळाल्यावर तिच्या फोनवर. या दरम्यान माधवी चुकूनही त्याच्याशी एक शब्द ही बोलली नव्हती. 
पूर्वी अर्धा अर्धा तास चालणाऱ्या बापलेकीच्या गप्पा पोएम्स, गाणी, शाळेतल्या गमतीजमती यावरून आता हळू हळू कमी होत  काही काळाने फक्त 
कशी आहेस बेटा ?
चांगली आहे पप्पा
काय करते आहेस ? काही हवे आहे का ?
पप्पा मला अभ्यास करायचाय. मी नंतर बोलेन ठेवते आता
ओके बाळा 
याच्यावर येऊन ठेपल्या होत्या. 
काही वर्षांनी मिली ही कधी कधी त्याचे फोन घ्यायला कंटाळा करायची. तसं ही तिला समजायला लागल्यापासून तिने त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह असं कमीच ऐकलं होतं. क्वचित कधीतरी माधवी फार इमोशनल झाली की कबूल करायची की तो सगळे म्हणतात तेवढा काही वाईट नव्हता पण त्याच्या हट्टापायी घेतलेल्या काही निर्णयांनी त्यांच्या आयुष्याची घडी पुरती विस्कटून टाकली होती. पण लगेच ती तो विषय बदलून टाकायची.
एखाद दोन वेळा त्याने त्यांना सुटटीत त्याच्याकडे बोलवायचा प्रयत्न केला. माधवीचा तर प्रश्नच नव्हता पण मिलीलाही काही उत्सुकता नव्हती. 
मिलीच्या प्रत्येक वाढदिवसाला गिफ्ट मात्र तिला वेळेवर मिळत असे. कधी तिने मागितलेली एखादी वस्तू तर कधी एखादं मोठा सरप्राईस. 
असे सतरा वर्ष उलटले.  
मध्यंतरी त्याने मिली ला त्याने नोकरी बदलल्याचं सांगितलं पण तिला त्यात काही इंटरेस्ट नव्हता. तिचं शाळा संपली, तीने पुढे सॉफ्टवेअर इंजिनियरिंग केलं. तिथेच तिला अमिश भेटला. तिला दोन वर्ष सिनियर होता. शांत पण खंबीर. त्याने इंजिनियरिंग संपल्यावर त्याच्या वडिलांच्या कन्सल्टन्सी चे काम बघायला सुरुवात केली होती. एकुलता एक होता. त्याची आई केंद्र सरकारच्या कुठल्यातरी विभागात वरिष्ठ अधिकारी होती. अमिश च्या पालकांनाही मिली आवडत होती.
एक दिवस अचानक रात्री आठ वाजता फोन वाजला नाही. त्यानंतर २-३ दिवस त्याचा फोन आलाच नाही. असं आजवर कधीच झालं नव्हतं, काहीवेळेस त्याने ८ ला फोन केला नव्हता पण नंतर उशिरा का होईना पण नक्की केला होता. त्यावेळेस मिली च्या लक्षात आलं की तिने तिच्या पप्पाला किती गृहीत धरलं होतं. इतकं की आजवर तिने त्याचा फोन नंबर ही विचारला नव्हता. त्याचे फोन बहुतांशी व्हॉइप वरून असायचे त्यामुळे दरवेळेस काही वेगळाच फोन नंबर असायचा किंवा मग प्रायव्हेट नंबर असं लिहून यायचं.  त्याची सध्याची कंपनी पण तिला माहिती नव्हती. 
मिलीला काळजी वाटते तोच  पुन्हा चवथ्या  दिवशी त्याचा फोन नेहमीच्या वेळेस आला आणि पुन्हा नियमित सुरु झाले. त्याचा आवाज मात्र सध्या खूप खोल गेलेला, थकलेला आणि खूप लांबून बोलत असावा तसा येत होता. मिलीने त्याला एक दोन वेळेस विचारले देखील. त्याने तो ठीक असल्याचे सांगितले. पण त्यांचं संभाषण मात्र त्या नेहमीच्या २ -३ वाक्यांच्या पुढे कधी गेले नाही. 
मिलीचा २४ वा वाढदिवस आणि अमिश बरोबर तिचा साखरपुडा एकत्रच साजरा झाला. हे सगळ्यांनी मिळून तिला दिलेलं एक सरप्राईस होतं. झाडून सगळे हजर होते फक्त तिचा पप्पा सोडून. त्यादिवशी तिला त्याचा फोन नाही घेता आला. दुसऱ्या दिवशी त्याचा फोन आल्यावर तिने त्याला सगळं सांगितलं. 
माझी परीताई आता खूप मोठी झाली. तो म्हणाला. त्याचा आवाज अशक्त वाटत असला तरी त्यात आनंद होता. 
मिली आजकाल तिच्या पप्पाला खूप मिस करू लागली होती.  अमिश आणि तिच्या लग्नाची तारीख डिसेंबर ची ठरली.  तिच्या लग्नाला पप्पाने यावं असं तिला वाटू लागलं. त्यादिवशी रात्री त्याचा फोन आल्यावर तिने त्याला सांगायचा प्रयत्न केला पण आवाज नीट येत नव्हता आणि फोन डिस्कनेक्ट झाला. मिलीच्या  मनात वेगळाच विचार आला. आपण अचानक पप्पाकडे जाऊन त्याला आश्चर्यचकित करायचं आणि आपल्यासोबत घेऊनच यायचं असं तिने ठरवल.
तिने अमिशला या बाबतीत सांगितलं तसं तो ही तयार झाला. आपण आपल्या पप्पापासून किती दुरावलो आहोत याची तिला जाणीव होत होती. 
तिने त्या रात्री तिच्या पप्पाचा फोन आला तेव्हा सहज त्याचा फोन नंबर आणि कंपनी विचारली पण तेवढ्यात पुन्हा लाईन डिस्कनेक्ट झाली. तिने पुन्हा त्याला १-२ वेळा विचारायचा प्रयत्न केला पण अपेक्षित  उत्तर काही मिळालं नाही. 
शेवटी आईकडून तो सतरा वर्षांपूर्वी जॉईन झाला त्या  पहिल्या कंपनीचं नाव आणि इंटरनेट वर मिळालेला पत्ता एवढं घेऊन ती कतारमध्ये सकाळी सहा वाजता दाखल झाली. गल्फ सूट्स नावाच्या हॉटेल मध्ये रूम बुक केलेली होती. तिथे सामान ठेऊन आणि थोडा आराम केल्यावर, रिसेप्शनच्या मदतीने टॅक्सी घेऊन ती बी रिंगरोड येथील अल - वाहिद डेव्हलपमेंट च्या ऑफिस मध्ये पोहोचली. तिथे चौकशी केल्यावर त्यांच्या तिथे तिच्या पप्पाच्या नावाचा कोणीही कर्मचारी नाही असं तिला कळलं. मग तिने एच आर मॅनेजर ला भेटण्याची विनंती केली. तिथला बहुतेक कर्मचारीवर्ग भारतीय दिसत होता. अब्दुल नासर यांना जेव्हा ती भेटली तेव्हा तिला कळलं की ६-७ वर्षांपूर्वी ही कंपनी दुसरा ग्रुप ने विकत घेतली तेव्हा त्यांनी  तिथल्या सर्व जुन्या कर्मचाऱ्यांना बदली केलं होतं. एन.ओ.सी. देऊन दुसरीकडे नोकरी शोधण्याची मुभा त्यांना दिलेली होती. त्यामुळे त्याला त्याच्याबद्दल काहीही माहिती नव्हती. तीच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने तिला भारतीय वकिलातीत जाऊन तपास करण्याचा सल्ला दिला आणि तिथल्या एका कर्मचाऱ्याचा फोन नंबर ही दिला. 
त्यांची चर्चा सुरु होती तितक्यात एक वयस्कर असा एक कर्मचारी त्यांना पाणी आणि चहा घेऊन आला. तो ते टेबलावर ठेऊन निघणार तितक्यात नासर ने त्याला आवाज दिला 
साईदू जी आप तो पहले से इसी कंपनी मे है. क्या आप मोहन नाईक जी को पहचानते है जो मुंबई से थे ?
अब्दूल नासर ने तिला सांगितले की त्यांनी जे काही एक दोन कर्मचारी जुन्या कंपनीचे ठेवले होते त्यापैकी साईदू ऑफिस बॉय एक होता. 
साईदू ला तो ब-यापैकी आठवत होता. त्यावेळेस तो एकटाच मराठी माणूस त्यांच्या कंपनीत होता. अधून मधून काहीतरी गमतीशीर मराठीत बोलायचा.   खुशमिजाज व्यक्ती होता तो. पण कंपनी सोडल्यावर तो कुठे गेला ते त्याला काही माहिती नव्हतं. 
मिलीचे पुढचे मार्गच खुंटले. निराश स्वरात ती हात जोडून साईदू ला म्हणाली अंकल प्लिज सोचो ना कुछ और याद है तो.
त्याने नकारात्मक मान हलवली आणि खाली मान घालून निघाला. तेवढ्यात पुन्हा वळून म्हणाला. एक बात याद आया, उसका सबसे अच्छा दोस्त एक रेजी कुमार करके है. वो स्टार ट्रेडिंग मे काम करता है करके सुना था. उधर देखो उससे कुछ जानकारी मिला तो.
अब्दुल नासरच्या मदतीने स्टार ट्रेडिंग एल एल सी चा पत्ता घेऊन ती तासाभरात अल रयान रोड  वरील त्या ऑफिसात पोहचली. रिसेप्शन वरच तिला कळले कि रेजी कुमार काही महिन्यापूर्वी रिटायर होऊन भारतात परत गेलाय. आता तिची आशा हळू हळू मावळायला लागली होती. तरी धीर करत तिने त्यांच्या एच आर  मॅनेजर ला भेटायची विनंती केली. त्याने सुरवातीला नकार दिला पण तिने बरीच विनंती केल्यावर तो भेटायला तयार झाला तेव्हा ऑफिस बंद होण्याची वेळ होत आली होती. मिली ची कहाणी ऐकल्यावर त्याने शेवटी तिला रेजी कुमारचा भारतातील पत्ता दिला. पण हेही सांगितलं की रेजी कुमार जरी रिटायर होऊन भारतात गेला  असला तरी त्याचा मुलगा दोहा लाच नोकरीला आहे. आणि काही दिवसापूर्वी त्याच्या कानावर आलेलं होतं की तो सध्या त्याच्या मुलाकडे आलेला आहे.
त्याने तिला रेजी कुमारचा मुलगा रॉबी जिथे काम करायचा त्या ऑफिस चा पत्ता आणि फोन नंबर देऊन त्याच्याशी बोलून बघायला सांगितलं. 
मिली खूपच नर्व्हस होती. तिच्या भावना दाटून आलेल्या होत्या. आपल्या पप्पा ला भेटायला आपण खूप उशीर केला याचं दुःख तिला कासावीस करत होतं. उद्या रॉबी कडून तिला माहिती मिळाल्यावर ती तिच्या पप्पाच्या खांदयावर डोकं ठेऊन मनसोक्त रडणार होती. कितीतरी वेळ ती कॉर्निशच्या समुद्र किनार्याच्या  कट्ट्यावर बसून होती तिचं तिलाच कळलं नाही. भानावर आली तेव्हा बराच वेळ झाला होता. तिचा मोबाईल केव्हा डिस्चार्ज झाला ते ही तिला समजलं नव्हतं. 
घाई घाईत हॉटेल ला पोहचली आणि फोन चार्जिंग ला लावला तोवर सव्वा आठ वाजून गेले होते. फोन सुरु झाल्यावर आठ वाजता प्रायव्हेट नंबरवरून मिस्ड कॉल चा मेसेज तिच्या फोनवर आला. आज पुन्हा तिने तिच्या पप्पाचा फोन कॉल मिस केला होता. तिला स्वतःवर चीड आली. तिला त्याला सांगायचं होतं की ती त्याला घ्यायला आली आहे. तिला आता त्याची कमतरता नकोय. तिला तिचा पप्पा हवाय.  रात्री बराच वेळ तिला झोप लागली नाही शेवटी तिने स्वतःलाच धीर दिला की उद्या तीला त्याची माहिती मिळेल आणि ती अचानक जाऊन त्याला आश्चर्यचकित करून टाकेल. 
दुसऱ्या दिवशी तिने रॉबीच्या ऑफिस ला फोन केला तेव्हा तिला कळले की तो घरून डायरेक्ट कुठल्यातरी मिटिंग ला गेलाय आणि उशिरा ऑफिसला येणार होता. शेवटी तिने त्याच्या ऑफिसला जायचे ठरवले. तयारी करून ती रॉबी च्या ऑफिसला पोहचली तेव्हा रॉबी पण नुकताच आलेला होता. तिने रिसेप्शनवर त्याला भेटायचं म्हणून सांगितलं. तो समोरं आल्यावर तिने त्याला स्वतःची ओळख सांगितली आणि तिथे येण्याचं कारण सांगितलं.  ते ऐकल्यावर रॉबीच्या चेहऱ्यावर हळूच वेदनेचा भाव झळकला. आवंढा गिळून तो म्हणाला-
मला वाटतं माझे वडीलच तुला सांगू शकतील. तू ऐकलं ते खरं आहे ते सध्या माझ्याकडे आले आहेत. माझा ड्राइवर तुला माझ्या घरी सोडून देईल. असं म्हणूनत्याने ड्राइव्हर ला बोलावून काही सूचना दिल्या आणि मिली ला त्याच्याबरोबर जायला सांगितले.
ती उत्सुकतेने रेजीकुमार ला भेटायला गेली. रेजी शरीराने नाजूक  दिसत असला तरी प्रकृतीने ठणठणीत होता. रॉबीने बहुतेक त्याला आधीच फोन करून तिच्याबद्दल सांगितले होते. त्याची हिंदी मल्याळी लहजाची होती. त्याने तिला बसवले आणि पाणी चहा वगैरे दिला पण तिला तर तिच्या पप्पा बद्दल ऐकायची घाई होती. 
अंकल, मेरे पप्पा किधर राहते है ?
रेजी समोरच्या खुर्चीत बसला. तो त्याच्या भावना आवरायच्या खूप प्रयत्न करीत असलेला दिसत होता. 
अंकल, प्लिज बताओ ना मेरे पप्पा किधर राहते है ?
रेजीने काही बोलायचा प्रयत्न केला पण तोंडातून शब्दांच्या ऐवजी त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायला लागले आणि त्यानेही ते थांबवायचा जराही प्रयत्न केला नाही. शेवटी तो कसाबसा म्हणाला. तेरा पपा पिछला साल उपर चला गया.
क्या ? मिली किंचाळली  
हां बेटा. उसका ऍक्सीडेन्ट हुआ. उसका कार को ट्रेलर ने उडाया. तीन दिन तक कोमा मे था बाद मे हम सबको छोड के चला गया. ऍक्सिडेंटका एक दिन पेहले हमारा बात हुआ था. तुम्हारा जन्मदिन के लिये मोबाईल लेके कुरियर करके आया हूँ करके बोल रहा था. दुसरा दिन सुबह उसका ऍक्सीडेन्ट का खबर आया  
मिली तिथेच खाली कोसळली आणि हमसून हमसून रडायला लागली. तिचे अश्रू थांबता थांबत नव्हते.बराच वेळाने थोडी शांत झाल्यावर तिने विचारलं  
आपने हमको बताया क्यू नाही अंकल ? 
कैसे बतायेगा बेटा. हमने बहोत कोशिश किया. उसका कंपनी मे और एम्बॅसी मे भी उसका पुराना  ही पता था. लेकिन वहांसे तो  तुमलोग चला गया था. वो भी इतना साल मी कभी मुंबई नाही गया था. ऍक्सिडेंटमे उसका फोन का टुकडा हो गया इसलिये तुम्हारा किसीका नंबर भी नही था हमारे पास. आखिरमे एम्बॅसी ने ही उसका क्रियाकरम किया. मुझे माफ कर दो  बेटी - असं म्हणून तो हात जोडून रडू लागला.
वो तुमको बहोत प्यार करता था बेटी. मार्केटमे कुछ भी नया आयेगा तो वो लेके तुमको भेजता था. तुम्हारा बर्थ डे, तुम्हारा दसवी, बारवी, इंजिनियरिंग सबका ख़ुशी वो इधर मनाता था. तुमको देखनेका बहोत तमन्ना था उसको. स्काईप सॉफ्टवेयर आया तो उसको तुम्हारा आय डी चाहिये था व्हिडीओ कॉल करने  के लिये पर लगता है तुम नही था, तुम्हारा माँ ने फोन उठाया और उसका आवाज सूनके फोन काट  दिया. उसका फिरसे मांगने का हिम्मत नही हुआ. शायद तुम्हारे रिश्तेदार भी उसको भूल गये थे. वो खाली तुम्हारी बात करता था. कभी कभी बहोत इमोशनल हो गया तो तुम्हारा माँ के बारे बोलता था. बोलता था की मैने कोई गलती  नही किया फिर भी उससे माफी मांग लुंगा. उसको सेकंड चान्स चाहिये था बेटा सबका जिंदगी सुधारने के लिये पर तुमलोग ने उसको कभी सुना ही नही. वो तुमसे मिलने का राह देखते देखते ही चला गया.  
तिला तिच्या पप्पाच्या कॉल्स  कडे दुर्लक्ष केल्याचा खूप पश्चाताप होत होता. पण ती तरी काय करणार होती, तो गेला तेव्हा ती खूपच लहान होती. तिला ते सगळं अंधुकसं आठवत होतं
अचानक तिला काहीतरी आठवलं आणि ती एकदम स्तब्ध झाली. हे कसं शक्य होतं ? जर तिचा पप्पा एक वर्षांपूर्वीच गेला होता तर तिला रोज रात्री फोन कॉल्स येत होते. दर महिन्याला तिच्या बँकेत पैसे जमा होत होते. ते काय होतं ? खरं काय होतं ?
तिने रेजीला हे सांगितलं. ऐकून त्याला धक्का बसलेला दिसला. तो विचारात पडला, 
वो काई साल से यहां है उसका बँक मे  सेविंग्स था और उसने बँक को हर महिने तुम्हारे अकाउंट को ट्रान्सफर का स्टँडिंग इंस्ट्रक्शन दिया होगा लेकिन फोन कॉल के बारे मे पता नही. ऍक्सीडेन्ट मे उसका फोन पुरा टुकडा हो गया था तो किसीको तुम्हारा नंबर मिल्ने का चान्स नही है. कोई और उसके नामसे करता होगा.
नही अंकल मैं उनके आवाज को पिछले कई साल से सून रही हूँ
तासाभराने मिली थोडी सावरली. तिला समजलं की तिच्या प्रश्नांची उत्तरं आता रेजीकडे मिळणार नाहीत. रॉबीच्या बायकोने तिला चहा दिला. त्याने तिला जरा तरतरी आली. 
रेजीने तिला परती बद्दल विचारले. 
आज रात को ही चली जाऊंगी अंकल.
त्याने तिला एक दिवस थांबायला सांगितले जेणेकरून त्याची कागदपत्रे आणि तिथले बँक चे व्यवहार पूर्ण करून जाता येईल. तिने होकार दिला 
रेजीने तिला मग त्यांच्या एका खोलीत नेले आणि २-३ बॅग्स कडे बोट दाखवून त्या तिच्या पप्पाच्या असल्याचे सांगितले. 
तिने त्या उघडून बघितल्या काही डायरीज, नोटबुक्स आणि काही इलेक्ट्रॉनिक सामान होतं. १ -२ बुटांचे जोड होते. एका बॅगमध्ये तिला एक पाऊच मिळाले. तिने ते उघडून पहिले. आत तिच्या लहानपणीचे काही फोटो होते आणि एक फोटो तो, तिची आई आणि मिली असा तिघांचा होता. मिली त्याच्या मांडीवर बसलेली होती आणि त्यांची आई हसऱ्या चेहऱ्याने त्यांच्याकडे पहात होती. किती छान दिवस होते ते. किती स्वप्न त्यांनी पहिली असतील ? आता सगळं संपलं होतं. तिला एकदम दाटून आलं.
रेजी ने मग एक पाकीट तिच्या हातात दिले.त्यात एक आय.डी. कार्ड होते. एक दीड वर्षांपूर्वीच ते रिन्यू केलेले दिसत होते. तिने तो फोटो न्याहाळून पहिला. त्यांच्या जुन्या फोटोशी तुलना करून पहिली. त्याच्यात जास्त काही बदल झालेला नव्हता फक्त डोक्यावरचे केस जरा विरळ दिसत होते बाकी डोळे तेच तसेच स्वप्नाळू दिसत होते. बराच वेळ ती तो फोटो पहात बसली. ती काय गमावून बसली त्याची जाणीव तिला आज होत होती. 
इतर काही बँकेची कागदपत्र होती. रेजीने ते पहिली आणि तिला म्हणाला की तसंही तिला आजची फ्लाईटची तिकिटं मिळाली नसती त्यापेक्षा जर ती एक दिवस थांबली तर दुसऱ्या दिवशी ती बँकेची कामं संपवून मग रात्रीची फ्लाईट घेऊन मुंबईला परत जाऊ शकत होती. त्याचं बाकीचं सामान तो रॉबी कडून कार्गोने मुंबईला पाठवून देईल. 
ती हॉटेलवर परत आली तेव्हा ७.५० झाले होते. तिला कधी एकदा रूमवर पोहचते असं झालं होतं. आठ वाजताचा कॉल तिला घ्यायचा होता. ती लिफ्ट मध्ये शिरली आणि २ मजले जात नाही तोच लिफ्ट अडकली. न वर न खाली. तिने अलार्म दाबला आणि रेस्क्यूची वाट पाहायला लागली.  तिने मोबाईल पहिला. रेंज नव्हती. आज तिला कसही करून फोन घ्यायचा होता. ती व्यक्ती तिचा पप्पा होता की जो कोणी होता त्याच्याशी बोलायचं होतं. त्याला तो कोण हे स्पष्ट विचारायचं होतं. मनातलं सांगायचं होतं. लिफ्ट मधला एक एक मिनिट युग सारखा वाटत होता. 
तिला तिच्या सुटकेसाठी बाहेर चालली धडपड ऐकू येत होती. ती आठ वाजेच्या आत बाहेर पडत यावं म्हणून प्रार्थना करत होती. पण .... ती लिफ्टच्या बाहेर येऊ शकली तेव्हा ८.१० झाले होते.
मोबाईलची रेंज आली तेव्हा प्रायव्हेट नंबर वरून मिस कॉल येऊन गेल्याचा मेसेज तिला आला. रूम मध्ये आल्यावर ती धाडकन बेडवर कोसळली आणि हमसून हमसून रडायला लागली. मी इतकी वर्ष इथे का आली नाही ? का मी पप्पाच्या फोनला कधी महत्व दिलं नाही ? आईला इतक्यात फोन करण्यात काहीच अर्थ नव्हता. तिने रिसेप्शनला कॉल करून दुसऱ्या दिवशीची फ्लाईट बुक करायला सांगितलं. थोड्या वेळाने तिला कॉल आला की तिची फ्लाईट संध्यकाळी ७ . ५५ ची होती. 
तिला कळलं की उद्या पुन्हा तिला ८.००  वाजताचा  फोन घेता येणार नव्हता. ती प्रार्थना करत होती की तिला एकदा तो कॉल घेता यावा.
ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी रेजी आणि रॉबी तिच्याबरोबर मोहनचे डेथ सर्टिफिकेट आणि इतर कागदपत्र घेऊन मिली बरोबर एम्बॅसी आणि बँकेत गेले.  अपेक्षेप्रमाणे त्याने खरंच बँकेला मिलीच्या अकाउंट ला दर महिन्याला १०,०००/- रियाल जमा करायचे स्टँडिंग इंस्ट्रक्शन्स दिलेले होते. 
संध्याकाळी रेजीकुमार, रॉबी आणि त्याची बायको तिघं मिली ला सोडायला एयरपोर्ट वर आले होते. तिने त्यांचे खूप आभार मानले आणि भारतात आल्यावर तिच्या घरी यायचं आमंत्रण देऊन ती जड अंतःकरणाने  ती विमानात जाऊन बसली. शेवटी फोन बंद करण्याची वेळ आली. 
घरी पोचल्यावर दुसरा दिवस गोंधळाचा होता. मिली रडून रडून हैराण होती. तिची आई तशी स्तब्धच होती पण मिली ने त्यांचा तिघांचा फोटोसमोर ठेवल्यावर मात्र तिचा बांध फुटला. मग मात्र अश्रू थांबता थांबत नव्हते. एवढ्या वर्षांचा ताठपणा अभिमान सगळा गळून पडला  होता. एवढं कठोर वागल्याबद्दल ती स्वतःला दोष देत होती. पण आता त्याचा काही उपयोग नव्हता. अमिश आणि त्याच्या पालकांना त्यांना सावरताना खूप कष्ट पडले.  
८.०० वाजले आणि मिलीचा फोन वाजला. तिने एका झटक्यात तो उचलला आणि स्पीकर वर टाकला
हॅलो 
कशी आहेस बेटा ? - तोच नेहमीचा आवाज आला. 
हे बघ मला सगळं समजलंय. तू कोण आहेस ? आणि का माझ्या पप्पा असल्याचं भासावुन माझ्याशी खेळतोय ? खरं सांग ?
आता तो आवाज खूप दूरवरून आल्यासारखा वाटत होता. 
मी तुझा पप्पाच आहे बेटा. तू माझीच लाडकी परी आहेस. मला समजलंय की मी आता नाहीये हे तुला कळालंय. मला तुला काही सांगायचा वेळच मिळाला नाही. आता इतक्या वर्षांनंतर माझे फोन अचानक थांबले असते तर तुला देखील हेच वाटलं असतं की मी खरंच तुम्हाला विसरून गेलो. मला तसं होऊ द्यायचं नव्हतं. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुझ्याशी बोलण्यासाठी मला काय दिव्यातून जावं लागतंय ते तुला कळणार नाही. मी तुझ्याशी तोपर्यंत असाच बोलत राहिलो असतो जोवर तुला माझ्याबद्दल कळालं नसतं. पण आता तुला सगळं समजलंय त्यामुळे देवाला मी दिलेल्या वाचनाला जागून मला आता कायमचं जावं  लागणार आहे. या गोष्टीचा आनंद आहे की तुला फार चांगला साथीदार मिळालाय. मला माफ कर मला तुझ्या लग्नाला येत येणार नाही पण तुम्हाला सगळं सुख आणि आनंद मिळो हाच माझा आशीर्वाद आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की मिळालेलं आयुष्य सुंदर कसं बनवायचं हे तुमच्या हातात असतं. पण  ते खूप नाजूक ही असतं. गैरसमज एका क्षणात. तुम्हाला उध्वस्त करू शकतो. 
मला माहितीये की तुला आणि तुझ्या आईला माझ्यामुळे खूप त्रास सहन करावा लागला. त्यासाठी मला माफ कर आणि आईला सांग की पप्पा तिच्यावर प्रेम करत आलाय आणि  अजूनही प्रेम करतो शक्य झालं तर मला माफ कर. तुला एवढं व्यवस्थित सांभाळल्याबद्दल तिचे माझे धन्यवाद पण दे. आज तू जे काही आहेस ते तीच मुळेच आहेस. 
बेटा हा माझा तुला शेवटचा कॉल आहे. आता यापुढे मला तुझ्याशी पुन्हा कधीच नाही बोलता येणार पण मी तुझ्याबद्दल मी खूप समाधानी आहे. मी आनंदाने जातो आहे. गुड बाय. आय लव्ह यु ऑल.
नाही पप्पा मला तुमचा फोन हवाय. अगदी रोज हवाय. पप्पा प्लिज तुम्हीही जाऊ नका ना ... 
माधवीही काही बोलणार होती पण फोन डिस्कनेक्ट झालेला होता.  
त्यानंतर पुन्हा कधीही मिलीच्या  फोनवर रात्री ८.०० वाजताचा तो प्रायव्हेट नंबरचा कॉल आला नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...