वैभवीने आपल्या गाण्याच्या कार्यक्रमाचं आमंत्रण आवर्जून शंतनूला दिलं. विमनस्कतेनेच शंतनूने तिच्या हाथातून पत्रिका घेतली आणी काही न बोलताच तो तिथून निघाला. आज गाडी गॅरेज मधे होती. त्यामुळे रिक्षा किंवा बसमधून घरी न जाता पाईच जाण्याचं ठरवलं त्यानीं.
घरी पोचायची घाई देखील नव्हती त्याला. कोण वाट पाहतय घरी आपली? पूजा होती तोपर्यंत. पूजाची आठवण येताच तो जागच्या जागी थांबला. मनात एक कळ उठली आणी सारं जगच स्थब्ध झाल्यासारखं वाटलं त्याला. डोळ्यातून वाहणारे अश्रू घामाच्या ओघळात मिसळून गेले असले. त्याचे हाथ आपोआप ते अश्रू पुसण्यास सरसावले. जड झालेल्या पाऊलानां निर्धाराने उचलत तो परत चालू लागला. त्याचं जग जरी काही क्षणांसाठी थांबलं असलं तरिही त्याच्या आसपासचं जग अव्याहत पणे धावत होतं. रसत्याच्या कडेला फुलं गजरे विकणार्यांची गर्दी लागली होती. मोगरा, चाफा, गुलाब, जुईच्या फुलांचा सुगंध आज तरी त्याला खिळवू शकला नाही. नेहमी पूजा साठी चाफ्याची फुलं घेणारा शंतनु आज त्या फुलांकडे दुर्लक्ष करून संपूर्ण विखुरलेल्या अवस्थेत चालत जाताना बघून पाणी मारून मारून टवटवीत झालेली फुलं देखील काही क्षण कोमेजली. घरी येताच आमंत्रण पत्रिका सोफ्यावर फेकुन शंतनू खोलीत जाऊन आडवा झाला. झोपण्याचा प्रयत्न विफल होणार आहे हे माहीत होतं त्याला. तसही हल्ली झोपूया म्हण्टलं तरी लगेच झोप तरी कुठे येत होती. पटकन कुशीत येणारी पूजा गेल्यापासून झोपेनी पाठ फिरवलीये.
सदैव आपल्या पाठीपुढे करणारी, आपल्या आवडीनिवडी जपणारी, आपल्यावर जिवापाड प्रेम करणारी पूजा. कित्ती विश्वास होता आपल्याला की आपण दोघे कधीच एकमेकांपासून दूर होणार नाही ह्याचा. दोघे एकमेकांमधे एवढे एकरूप झालो होतो की मृत्यू आपल्याला एकदुसऱ्या पासून दूर करेल हा विचारच मनाला शिवला नव्हता. कित्ती गाफील होतो आपण. पूजा हेच आपलं जग होतं. पण दैव पण विचित्रच असतं. . जिथे गाफील तिथे मार बसलाच म्हणून समजायचं. असाच मार पूजाला माझ्यापासून लांब नेत क्रूर नियतीने आपल्याला दिला. विचार करता करताच अनावर झालेल्या अश्रूनीं त्याची उशी चिंब भिजवली. काळोख्या खोलीत शंतनूचं मन पण अंधारून गेलं. वैभवीने आपल्या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू केली होती. शंतनूने ऑफीसमधे पाऊल ठेवलं आणी त्याच्या लक्षात आलं की ऑफीसचं वातावरण वैभवीमय होऊन गेलय. सकाळी घरून निघताना मुद्दामच त्यानीं सोफ्यावर ठेवलेल्या पत्रीकेकडे दुर्लक्ष केलं होतं. तो चुपचाप आपल्या केबिनमधे जाऊन बसला. कामात काही मन लागत नव्हतं. चार वर्ष झाली पूजाला जाऊन पण तिच्या आठवणीने मन आजून भिजतं. पूजा गेल्यापासून इतकी विरक्ती आलीये की कोणाशीच कसलही नातं नकोस झालय. लग्न झालेल्या वर्षातच झालेला तिच्या मृत्यूनं मन जणू मरून गेलय. निर्लिप्त झालय असं वाटलं त्याला. पूजाच्या अशा अचानक जाण्याने फक्त तोच नाही घरचे सगळेच हवालदिल झाले होते. शंतनूचं वय पाहता त्याला परत लग्न करण्याच आग्रह घरच्यांकडून होत होता. पण त्याने लग्नाचा सल्ला धुडकावून लावला. पण त्याचं विरक्त मन हल्ली वेगळ्या दुनियेत पाय ठेवायला पाहतय असं त्याला राहून राहून वाटत होतं. आपण नाकारू पाहत असलेली प्रेमभावना परत ह्याच मनात रुजू पाहतीये ही कल्पनाच त्याला कासावीस करत होती.
वैराग्य पांघरून बसलेल्या मनात परत हिरवी पालवी अंकूरित होताना जाणवत होती. हेच त्याला नकोसं वाटत होतं. वैभवीचं ऑफीसमधे येणं तिचं खळखळून हासणं. प्रत्येक गोष्टीत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जीवनाचा भरभरून आनंद घेत राहणं हे तिच्या बाबतीत सगळं कसं एकदम नैसर्गिक होतं. तिच्या वागण्यात कुठेच आव आणलेला दिसत नव्हता. जगायचं तर खुल के कुठेही हातच न राखता जगयचं ही तिची पॉलिसी. ऑफीसमधली बरीचशी मुलं तिच्या पाठी तिला इंप्रेस करण्यात दंग असतानाच ती मात्र हळूच शंतनूच्या मनात जागा शोधत होती. शंतनूसाठी वैभवी म्हणजे गरम तुपाचा घास. गिळू शकत नाही आणी थुकूपण शकत नाही. त्याला जाणवत होतं की वैभवी आपल्या जवळ येण्याचा प्रयत्न करतेय म्हणून त्याने तिला निग्रहाने लांबच ठेवलं होतं. आजही बसल्याबसल्या त्याला मागच्या वर्षीचा वॉलंटाईन डे आठवला. ऑफीस मधे डिबेट कांपिटीशन होतं. विषय होता "प्रेम मनाला उभारी देतं" ऑफीसचा सगळा स्टाफ भाग घेण्यासाठी शंतनूच्या पाठी लागला होता. पण शंतनूने सरळ नाही म्हणजे नाही सांगितलं. हे असलं डिबेट म्हणजे पोरखेळ वाटत होता त्याला. वैभवी भाग घेणार आहे, म्हणटल्यावर तिच्यावर जीव टाकणाऱ्या ऑफीसमधल्या पोरानी हिरीरीने भाग घेतला. त्यादिवशी काहीतरी कारण सांगून ऑफिसमधून लवकर निघायचं असं शंतनूनी ठरवलं. पण नेमकी काही फॉरेन डेलिगेट्स बरोबर मीटींग निघाल्याने तो अडकला. मीटींग संपवून निघणार एवड्यात त्याचे वरचे बॉस प्रधानानीं त्याला आडवलं आणि डिबेट कांपिटेशन ला घेऊन गेले. चारपाच जणांचं बोलणं ऐकल्यानंतर शंतनूची चुळबुळ सुरू झाली होती. प्रधान सर त्याच्या कानात काहीतरी सांगत होते पण त्याच्या काही डोक्यात जात नव्हतं. तेवढ्यात वैभवीचं नाव अनाऊंस झालं. तिने माईक ताब्यात घेताच त्या खोलीत एक जादूई वातावरण तयार झालं. नकळत शंतनूचं मन पण शांत झाल्यासारखं झालं. पाच मिनिटांपुर्वी तिथून उठून जायच्या मनस्थितीत असलेला शंतनू आता स्थिर झाला होता. आपल्यातला हा बदलस्वीकारताना काही क्षण त्यालाही जड गेले. पण त्यावर विचार करायला वेळ नव्हता कारण वैभवीने आपलं मत मांडायला सुरूवात केली होती.
मित्रानों, प्रेम ही प्रत्येक जिवाची सुंदर भावना आहे. भावना कधीच आपल्याला दिसत नसतात. त्याकरता व्यक्त व्हावं लागतं. जसं राग व्यक्त करतो, द्वेश व्यक्त करतो, तसं प्रेम पण व्यक्त केल्यावरच समोरच्याला ते दिसतं. प्रेम हे जगातलं एकमेव असं अस्त्र आहे, ज्याने आपण आपल्या शत्रूलाही जिंकू शकतो. प्रेम ही नैसर्गीक भावना असल्याकारणाने त्याला फक्त आपल्या मनातच लपवून ठेवण्याची गरज नाहीये. जेवढी वाटाल तेवढी ती वाढते. व्यक्त व्हाल तेवढी मनाला शांतता मिळते. जर तुम्ही प्रेम व्यक्त करू शकत नसाल, तर कोणती अडचण तुम्हाला तसं करण्यापासून रोखते आहे ह्याचा आधी विचार करा. कारण कोणाताही नार्मल माणूस आपलं प्रेम व्यक्त केल्याशिवाय शांत राहूच शकत नाही. आपण सोडवू शकत नाही अशी जगात कोणतीच अडचण नाहीये. दुखः प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. अंधार प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. पण त्या दुखाच्या पलीकडे सुख वाट पाहत असतं. त्या अंधारातून बाहेर याल, तर एक दिव्य असा उजेड तुमचं आयुष्य उजळायला वाट पाहात असतो. फक्त सकारात्मक विचाराची गरज आहे. माणसाला प्रेम एकदाच होतं असं काहीसं मी बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकते. ते ऐकून ऐकून बरेच जणं त्या वाक्याला आपलं आदर्श वाक्य मानतात आणी त्यालाच कवटाळून सगळं आयुष्य कुढत काढतात. प्रत्येक जिवाचं मन प्रेमाला आसूसलेलं असतं. जन्मभर ते खऱ्या प्रेमाचा शोध घेत फिरत असतं. त्याला खरं प्रेम मिळालं तर त्याचं आयुष्य सफल होतं. पण त्या शोधात तो असफल झाला तर त्याला वैराग्य येतं. नैराश्येचा अंधार मनात दाटून येतो. पण खरं सांगू का ते खरं वैराग्य नसतं. वैराग्य पाहीजे म्हणून मिळतं नाही. त्यासाठी प्रचंड तपस्या करावी लागते. हे आपलं फक्त तात्पुरतं वैराग्य असतं. काही वर्षानं मन परत उभारी घेतं नवीन प्रेमाच्या शोधात. आता मी जे काही बोलणार आहे ते समजण्यास तुम्ही सर्व सूज्ञ आहात. कदाचीत आपलं मन काहीकाळ वैराग्यात नैराश्येच्या खोल गर्तेत गटांगळ्या खात राहत. फक्त मानाचं जरासं ऐकलं तर प्रश्न चुटकी सरशी सोडवला जाऊ शकतो. प्रेमाची छोटिशी आशा जग जिंकायची ताकत देऊन जाते. जगायची उभारी येते. मग का नाकारायचं त्या प्रेमाला? फक्त काही कारणानीं मनावर जमलेली धूळ बाजूला सारली की लक्ख उजेडाची वाट दिसू लागते आणी एका आशेनी मन परत उभारी घेतचं. मनाचे खेळ इतके विचित्र असतात की ते कधीच प्रदीर्घ नैराश्येत राहायला बघत नाही. काही काळानी ते स्वतः दुःखातून बाहेर पडतच पडतं असा विश्वास आहे मला. शेवटी चार ओळींची कविता वाचून मी माझं बोलणं संपवते.
मन तुझे अथांग सागर
मिळतील तुला प्रेमाची
रत्ने त्यात भरपूर.
तुझाच शोध नव्याने होइल
मिळेल तुला नवी प्रीत
हीच जगाची रीत.
हीच जगाची रीत.
धन्यवाद.
टाळ्यांचा कडकडाटानीं ती खोली भरून गेली. शंतनू काही क्षण स्थब्द झाला. त्याचे विचारच खुंटले. प्रधानानीं वैभवीला विजेती घोषित केलं आणी तिला बक्षीस देण्यासाठी शंतनूला उभे केलं. वैभवी आणि तिचे विचार डोक्यात आले की मग तो बेचैन व्हायचा. तिचे विचार ठीक आहेत, पण तिला मनात थारा नाही द्यायचा तिला हे पक्क ठरवून टाकलं त्यानीं. पण काही म्हणा निसर्ग आपलं काम करतच राहतो. वैभवीने हळूहळू त्याच्या मनाचा ताबा कधी घेतला हे त्याचं त्यालाच कळलं नाही. काही महिन्यांपासून आपल्या ऑफीसच्या कॉबिन मधे नवा बदल पाहत होता तो. आफीसच्या आपल्या केबीन मधे शिरलं की पहिल्यापेक्षा प्रसन्न वाटायचं त्याला. रोज त्याच्या टेबलवरच्या फुलदाणीत सुगंधी फुलं असायची ज्याने त्याचं मन प्रसन्न होई. एयर परफ्यूमचा सुगंध हल्ली वेगळा वाटत होता पण कुणालाच त्याबद्दल त्यानी विचारलं नव्हतं. प्रधान त्यांचे नवीन बॉस होऊन आल्यापासून असे बदल झाले असतील असा कयास त्यानीं बांधला. पण काही महिन्यातच त्याला कळलं की संपूर्ण ऑफीस नाही तर फक्त त्याचीच कॉबीन सुगंधित असते आणी ते श्रेय फक्त वैभवीला जात होतं. हे ऐकून आतून कुठेतरी तो सुखावला पण नको तिथे आपणगुंततोय, ही भिती देखील त्याला वाटत होती. आज ऑफीस मधे बसून हे सगळं त्याला आठवलं. त्याने टेबलावर पाहीलं तर फुलदाणीत नवीन टवटवीत फुलं होती. हळूच त्याने त्या फुलांवरून हाथ फिरवला आणि त्याचं मन फुललं. वैभवी समोर उभी राहून हासतेय असा भास झाला त्याला. अरे मी तर विरक्तीच्या मार्गावर होतो ना? मग हे प्रेमाचे दालन कसे काय माझ्या साठी खुलं झालं? ह्याचा उलगडा त्याला होईना. कालचं त्याने ऐकलेलं संगीत मतस्यगंधा मधलं पद त्याल आठवलं आणी आपलिही आवस्था त्या राजा शंतनूसारखी झालीये का असं काहीसं वाटलं.
देवा घरचे ज्ञात कुणाला विचित्र नेमानेम
कुणी रखडति धुळीत आणिक कुणास लाभे हेम
मी निष्कांचन निर्धन साधक
वैराग्याचा एक उपासक
हिमालयाचा मी तो यात्रिक
मनात माझ्या का उपजावे संसाराचे प्रेम
तशाच बेचैन अवस्थेत त्याने काम संपवलं आणि घरी जायला निघाला. सहज त्याची नजर वैभवीच्या केबीन कडे वळली. वैभवी शेवटची आवरा आवर करताना दिसली. उद्या मी तुमच्या कार्यक्रमाला येत नाही असं तिला सांगावं असं फार वाटलं त्याला पण काहीच न बोलता तो तिथून निघाला. गाडीत बसला आणि परत मन संगीत मत्स्यगंधाचं पद घोळवत होतं. गंगा शंतनूला सोडून गेल्यानंतर शंतनूचं पण मन काही काळासाठी विरक्त झालच होतं ना? पण सत्यवतीला पाहिल्यानंतर तेच विरक्त मन परत उभारी घेतंच की. म्हणजे ही विरक्ती क्षणीक असते का? प्रेमाचा एक धागा पुरेसा असतो त्याला विरक्ती मधून बाहेर काढायला. हे सगळं थोडफार त्याला पटायला लागलं असलं तरिही पूजाच्या प्रेमाशी कुठेतरी प्रतारणा करतोय असं वाटून मन परत पाठी फिरत होतं. दुसरे दिवशी त्याने ऑफीसला सुट्टी टाकली घरीच आराम केला आणि संध्याकाळी तो सरळ वैभवीच्या कार्यक्रमाला हजर राहीला. वैभवीचं प्रत्येक गाणं त्याच्या मनाचा ठाव घेत होतं. तो फक्त डोळे मिटून गाणं आपल्या मनात उतरवून घेत होता. कार्यक्रमाच्या शेवटी सगळ्यानीं तिचं आणि श्रोत्यांचं आवडतं सरस्वती चंद्र सिनेमातलं गाणं म्हणायचा आग्रह केला. ती फार थकली होती पण श्रोत्यानां नाराज करु शकत नव्हती म्हणून त्या गाण्याचं एकच कडवं म्हणेन असं स्पष्ट्पणे सांगीतलं. शंतनूने परत डोळे मिटले. तिचा आवाज ते शब्द मनातुन पार आत शिरत होते.
कितनी हसरत से तकतीहै कलीयां तुम्हे क्यों बहारों को फिरसे बुलाते नही
एक दुनिया उजडही गई है तो क्या दूसरा तुम जहां क्यों बसाते नही.
दिल ना चाहे भी तो साथ संसार मे चलना पडता है सबकी ख़ुशी के लिये ।
टाळ्यांच्या गडगडाटात शंतनूचं मन संपूर्णपणे साफ आणि हलकं झालं. मनातला अंधार दूर झाला. आणि एक दिव्य असा प्रकाश आत येताना जाणवत होता. डोळे उघडावेसे वाटत नव्हते त्याला पण एका नाजूकशा स्पर्षाने त्याने डोळे उघडले. वैभवी त्याच्या समोर उभी होती. त्याने आपसूक पुढे केलेल्या हाथात वैभवीचा हाथ विसावला होता. त्या स्पर्षाने दोघांचे डोळे लक्ख चमकले.
@© अक्षता देशपांडे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा