अरे आज परत तु दादर ब्रीजवर कसा? मी घाईघाईत असताना मागून ओळखीचा आवाज आला. मी वळून बघितले तर प्रकाश माझा ऑफिस कलिग होता.
"अरे काल इथे एका आजोबांकडून लहान मुलांच्या अभ्यासाचे तक्ते घेतले होते. बरीच गिऱ्हाईकं आजूबाजूला होती. जो तो वस्तू घेऊन गाडी पकडायच्या घाईत होता. त्या गडबडीत आजोबांनी मला शंभर रुपये जास्त दिले परत. आज शनिवार आहे. ऑफिस दोन तास लौकर सुटलंय म्हणून त्यांना ते पैसे देण्यासाठी मी परत दादरला गाडीतून उतरून इथे आलोय. पण आजोबा दिसत नाहीयेत कुठे "
" चल कुठे येवढा हिशोब करत बसला आहेस. त्यांच्या कदाचित लक्षांत देखील नसेल ते. मी निघतो. माझी विरार लोकल यायची वेळ झाली आहे." असं म्हणून प्रकाश गेला. मी दादरच्या मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणाऱ्या ब्रीज वर आजोबांना शोधू लागलो. अखेर थोडी शोधाशोध केल्यावर ते सापडले मला. काल बसले होते त्या जागेपासून थोडेसे लांब बसले होते ते. सुदैवाने आज कोणी गिऱ्हाईक नव्हती त्यांच्या जवळ.
मी पुढे जाताच ते नेहमीच्या सवयीप्रमाणे म्हणाले काय देऊ साहेब, तक्ते, पुस्तकं, रंगपेटी, चित्रकलेची वही, प्लास्टिक कव्हर,कंपासपेटी. पुष्कळ वस्तू आहेत.तुम्ही बघा आणि सांगा.
इतकं सांगून आजोबा बोलायचे थांबले आणि मी कालचा प्रकार त्यांच्या कानावर घालून शंभर रुपयांची नोट त्यांच्या हातावर ठेवली.
आजोबांच्या डोळ्यांत चटकन् पाणी आले." तुम्हाला गेले होते वाटतं हे जास्तीचे पैसे. एकदम पुष्कळ गिऱ्हाईक आली की हिशोबात गोंधळ होतो माझा. तुम्ही प्रामाणिकपणे आणून दिली ह्यासाठी तुमचे आभार. पण आता आलाच आहात तर माझं एक छोटं काम कराल का?
आजोबांच्या प्रश्नाने मी जरा अस्वस्थ झालो आणि ते आजोबांनी अचूक ओळखले.
"साहेब घाबरू नका. मी तुम्हाला काही वस्तू नव्याने घ्यायला सांगत नाहीये. ह्या पुलाच्या शेवटी पायरीवर उसळपाव वाला आहे त्याच्याकडून ह्या पैशात एक प्लेट उसळ आणि येतील तितके पाव आणा. मी आणि ही बाजूला पिशव्या विकणारी दोन मुलं आमच्यासाठी मागवतोय मी उसळपाव. आम्ही तिघेही उपाशीच आहोत सकाळी धंदा लागल्यापासून.
आजोबांच्या बोलण्याने मला माझीच लाज वाटली. त्यांनी दिलेल्या शंभर रुपयांत आवश्यक तेवढी भर टाकून मी तीन प्लेट ऊसळ आणि प्रत्येकी ५-५ पाव आणून दिले आजोबांना.
आजोबा भारावून गेले. त्या दोन मुलांना जवळ बोलावून ते तिघेही उसळपाव खायला बसले.
आजोबा एक विचारू का?
विचारा की साहेब
काल हिशोबात शंभर रुपये कमी आल्याचं कळलं नाही तुम्हाला?
माझ्या मोठ्या मुलाला कळलं ते आणि मी त्याची शिक्षा देखील भोगली.
आजोबांच्या बोलण्याने मी दचकून त्यांना विचारले," कसली शिक्षा?"
काय सांगू पोरा तुला मी. हिशोबात चूक म्हणून सुनबाईने काल रात्री उपाशी ठेवलं मला. सकाळी नाक्यावर चायबिस्कुट खाऊन इथे आलो धंदा लावायला.
मी जे ऐकलं ते भयंकरच होते. ह्या वयात वडिलांना कष्ट करायला लावणाऱ्या त्यांच्या मुलाची चीड आली मला. मी तसं बोलूनही दाखवलं त्यांना. त्यावर ते खिन्न होऊन हसले आणि म्हणाले दोन पोरं आहेत मला. चांगली तरणीताठी. पण शिक्षण नाही घेतलं. भाईगिरी सुरू असते दिवसभर. इथल्या नगरसेवकांच्या हाताखाली काम करतात. चार पैसे कमावून घरासाठी देतात बाकी सगळं मौजमजा करण्यासाठी घालवतात. मोठ्याचे लग्न लावून दिलं तो सुधारले म्हणून. पण यश नाही आलं. नाही म्हणायला नगरसेवकाच्या ओळखीने सुनबाईला वस्तीवर चालणाऱ्या अंगणवाडीमध्ये सेविका म्हणून मोठ्याने चिटकवून दिले. पण तिच्या मिळकतीच्या जोरावर दोघा नवरा बायकोची घरात दादागिरी सुरू असते. मिल बंद पडल्यावर मी असंच छोटं मोठं साहित्य विकतो इथे पुलावर आणि पुलाच्या त्या दुसऱ्या टोकाला माझी बायको शा़ंता फुले आणि गजरे विकते. पण रोजची कमाई मात्र आम्हाला मोठ्या मुलाच्या हातात द्यावी लागते. आला दिवस ढकलतोय आम्ही इतकंच.
मला शंभर रूपये जास्त देऊन रात्री उपाशी रहाणाऱ्या आजोबांच्या मनाची श्रीमंती मला महिन्याला मिळणाऱ्या पगारापेक्षा कैक पटीने अधिक होती.
सगळं ऐकून मला गहिवरून आले. हात चटकन पाकिटाकडे गेला. जास्तीचे असावेत म्हणून कप्प्यात ठेवलेली पाचशे रूपयांची नोट मी छोटीशी मदत म्हणून आजोबांच्या पुढ्यात धरली.
माझी मदत आजोबांनी विनम्रपणे नाकारली आणि ते म्हणाले पोरा ," मी नाही घेऊ शकत हे पैसे. माझ्या स्वाभिमानाला धक्का लागेल अशाने. पैसा काय आज नसेल तर उद्या मिळेल देखील. पण समाजातून हरवत चाललेल्या माणूसकीचं काय करायचं? ती कुठे सापडली तर मात्र मुबलक प्रमाणात मला आणून दे. थोडी माझ्या मुलांना देईन मी आणि बाकी वस्तीतील बिनकामाच्या बसलेल्या तरण्याताठ्या मुलांमध्ये वाटून टाकीन. आयुष्य चांगल्या प्रकारे जगण्याऐवजी वाईट कामं आणि नशाबाजी करून ही पिढी स्वतःची आणि सोबत कुटुंबाची देखील फरफट करत आहेत.
आजोबांच्या बोलण्याने मी निरूत्तर झालो. त्यांच्या समोर हात जोडले आणि शांता आजींकडून बायकोसाठी गजरा विकत घेण्यासाठी मी पुलाच्या दुसऱ्या टोकाला चालायला सुरुवात केली.
©️ सतीश बर्वे
०४.०८.२३.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा