त्यादिवशी अक्षरश: साडेअकरा होत आले तरी एकेक माणूस येतच होता. कुणाला पीएम किसानचे खाते काढायचे होते तर कुणाला मातृवंदनाचे. कुणाला पोस्टात न येता घरबसल्या आँनलाईन पैसे भरण्यासाठी Ippb चे खाते काढायचे होते. कुणी पैसे काढण्यासाठी आले होते, तर कुणाचे खाते सुरळीत चालू व्हावे यासाठी आले होते. या कामाची वेळ सकाळी ९ ते ११ असते. परंतु आमच्या ऑफिसला दिवसभर लोक येतच राहतात. ज्याला जशी सवड मिळेल तसे ते येत असतात. एकदा तर मी आणि जमीरभाई अकाउंट ओपनिंग करत बसलो होतो. रात्रीचे दहा वाजले होते. तुम्हाला खरं नाही वाटणार पण एक व्यक्ती चक्क स्पीड पोस्ट करण्यासाठी एवढ्या रात्री आला होता. आला तर आला आणि म्हणतो कसा, "रात्री दहा वाजले तरी पोस्ट ऑफिस उघडे दिसतेय. बरं झालं..चला..उद्याचे काम आजच करुन टाकू. म्हणून आलो हो बुकिंगसाठी."
तर त्यादिवशी माणूसच संपेना. थेंबाथेंबाने जसे तळे साचते तसेच एकेक करुन अकरा-बारा लोकांचे काम झाले.
"देवा..बसं कर आता..बारा वाजले..टपाल वाटून ये आता.." मागून जमीरभाईंचा आवाज आला. हातातले शेवटचे काम संपवतानाच एक कॉलेजची विद्यार्थीनी ऐन मोक्यावर येऊन उभी राहिली. मला वाटले आज देव नक्की आपली परिक्षा पाहतोय. म्हणून हातातले काम आटोपून चट्कन तिच्याकडे वळलो. " बाळा..काय काम आहे तुझे..? लवकर सांग..आधीच वेळ संपून तास झालाय.."
मी काहीसा गडबडीच्या स्वरातच म्हणालो.
ती आधीच चिंतातूर वाटत होती. बहुतेक बराच वेळ चालत आल्याने ती घामेजली होती. धापही लागलेली होती. तिची ती अवस्था पाहताच मी नरमलो.
"सर..आज स्कॉलरशिपसाठी फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे. मला दोनशे रुपये काढायचे आहेत. अकाउंटला आहेत माझ्या..मी बाहेर खूप प्रयत्न केला पण दुसरीकडून काहीच काम होईना..प्लीज द्याना काढून.." तिचा रडवेला स्वर आणि डोळ्यांच्या काठांवर आलेले थेंब मला स्पष्टपणे जाणवले.
" अच्छा, तुझा आधार नंबर सांग बघू.."
मी तिच्याकडून आधार नंबर घेतला आणि तिच्या खात्यावरुन पैसे काढू लागलो. आधार नंबर टाकला..cash withdrawal साठी गेलो..ओटीपी सेंड केला..तिच्याकडून घेऊन टाकलादेखील..! आणि पाहतो तर काय...तिच्या खात्यात पैसेच नव्हते. मी पुन्हा चेक केले. परत तेच..!
त्या मुलीला अत्यंत महत्वाच्या अशा शिष्यवृत्तीसाठी फॉर्म भरायचा होता. कारण कॉलेजची फी भरण्याइतपत तिची परिस्थिती भक्कम नव्हती. निदान शिष्यवृत्तीमुळे फी भरण्यासाठी खूप मोठा हातभार लागेल या विचाराने ती वणवण भटकत आशेने इथपर्यंत आली होती. आता तिला तिच्या खात्यावर पैसेच नाहीत हे सांगायचे असुरी धाडस माझ्यात नव्हते. मी तात्काळ माझे खिसे तपासले. अवघे पाचपन्नास रुपये शिल्लक होते. माझी चुळबुळ पाहून तिने विचारले. " सर..काय झाले..? बघा ना प्लीज..होतय का ? "
मी तिला खोटेच सांगितले.." बाळा..सर्व्हर प्रॉब्लेम आहे बहुतेक..आता काही पैसे काढता येणार नाहीत." हे ऐकल्याबरोबर तिचा चेहरा खाड्कन उतरला. पण पुढच्याच क्षणी मी तिला धीर देत म्हणालो.." एक काम कर..आत्ता माझ्याकडचे देतो..तुझे फॉर्म भरणे महत्वाचे आहे. ते काम झाले की जेव्हा तुला वाटेल तेव्हा दे.." तिला सध्याची वेळ भागविणे गरजेचे होते. त्यामुळे ती बिनशर्त तयार झाली.
मी झट्दिशी आत गेलो. आत बाकीचे पोस्टमन कुणीच नव्हते. फक्त अजय होता. मी अजयकडून दोनशे रुपये उसने घेतले आणि बाहेर येऊन त्या मुलीला देऊ केले. ती हरखून गेली. आनंदाने आभार मानत दिसेनाशी झाली.
दिवसामागून दिवस गेले. मी ती गोष्ट त्याच दिवशी विसरुन गेलो. अजयही मला त्या दोनशे रुपयाबद्दल आजतागायत चकार शब्द बोलला नाही. कारण त्याला ठाऊक होतं की आपला मित्र शेवटचा रुपया संपेपर्यंत समाजासाठी खर्च होत राहतो. म्हणून तो अधूनमधून अशी बेहिशोबी मदत कसलीही नोंद न ठेवता मला अदा करत असतो. या गोष्टीला मागच्या बुधवारी सहा महिने झाले. नेहमीप्रमाणे मी अकाउंट ओपनिंगचे काम करत होतो. तोच ती मुलगी मला दरवाज्यात उभी दिसली. मी किंचित चमकलो.
मी तिला ओळख देणार तोच तिने हातात दोनशे रुपये घेऊन माझ्या पुढ्यात हात धरला. " सर..हे तुमचे दोनशे रुपये..तुम्हाला आठवतं..? एकदा मी पैसे काढायला आले होते. पण माझ्या खात्यावर पैसे नसतानाही तुम्ही तुमच्याकडचे पैसे देत माझी वेळ
भागवली. मला नंतर समजले की माझ्या खात्यावर पैसेच नव्हते. सर...मला तुमच्या पाया पडू द्या...कारण तुमच्या त्या उदारपणामुळे माझ्या खात्यावर 70,625 रुपये शिष्यवृत्ती जमा झाली. माझी खूप मोठी हेल्प केलीत.."
असे म्हणत ती मुलगी पायांना स्पर्श करु लागली. मी मागे झालो.
" बाळा..पाया पडायच्याच असतील तर तुझ्या आईवडिलांच्या पड..ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांच्या पड..मी तुझा भाऊ आहे. आणि तुझा भाऊ इतका मोठा नाही की तु त्याच्या पाया पडावसं..खूप मोठी हो..खूप अभ्यास कर..."
माझ्या शालेय जीवनात मला किती खस्ता खाव्या लागल्या मलाच ठाऊक..माझी आई रानात खूरपण-टुरपण करुन मला फी साठी पैसे द्यायची. पदराच्या गाठीला पैसे बांधून ठेवायची. ते दिवस आठवले की ढसाढसा रडू येतं. म्हणून आता वाटतं की प्रसंगी आपण गहाण राहू..पण शे-दोनशे आणि काही हजारांसाठी कुणाचे शिक्षण थांबू द्यायचं नाही.
मी बराच वेळ तिच्या पाठमोऱ्या आकृतीला न्याहाळत होतो. ती मुलगी त्यादिवशी आली म्हणून मला काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळाली. अशाच लोकांसाठी तर मी सबंध आयुष्य खर्ची घालू शकतो. मला पैशांच्या लाख अडचणी येतील..पण जेव्हा मला कुणाला मनापासून मदत करायची असेल तेव्हा देव माझा खिसा कधीच रिता ठेवत नाही. बस्स..जगातल्या सर्व दुःखाचे निराकरण करण्याची कुवत आणि ऐपत देवाने द्यावी. बाकी काही नको.
त्या मुलीची 70,625 रुपये शिष्यवृत्ती जमा झाली. पण मला लाखमोलाचे समाधान लाभले आणि बात होती फक्त दोनशे रुपयांची
©️®️ लेखक
नामदेव सुखदेव गवळी
9767041875
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा