त्या चौघांचं फिरायला जायचं ठरलं होतं बाहेर, अगदी दोनेक दिवसांकरताच. ते दोघे नी त्यांची दोन मुलं. निमित्त होतं त्या दोघांच्या लग्नाला, पंधरा वर्ष पुर्ण झाल्याचं. त्याला गड - किल्ले फिरायला आवडायचे, तर तिला आवडायचा समुद्र. फक्त किनार्यावर बसून न्याहाळायला. म्हणून दोघांच्याही आवडीचा सुवर्णमध्य साधत, त्यांनी 'मुरुड - जंजिरा' चा प्लॅन केला होता. खरंतर बर्याच वर्षांनी त्या दोघांनी मिळून, असं एकत्रितपणे काहीतरी ठरवलेलं. कारण असं संगनमताने काही ठरवण्यासाठी एकत्र असणं महत्वाचं असतं, आणि गेली कित्येक वर्ष ते एकत्र होते कुठे? अर्थातच मनाने... शरिराने होतेच, जशा घरच्या समोरासमोरील भिंती असतात एकत्र. दोघांतील विसंवाद... लग्नाच्या सहाव्या - सातव्या वर्षापासूनच सुरु होऊन, आताशा विकोपाला पोहोचलेला. त्यामागे कारणंही बरीच होती, काही किरकोळ तर काही अगदीच तुच्छ. पण आपापल्या अहंकाराच्या मुलाम्याखाली सजवलेली. म्हणूनच सध्या फक्त नी फक्त आपल्या दोन मुलांच्या भविष्याचा विचार करुन, त्या दोघांचं स्वतःचा वर्तमान ढकलणं चालू होतं. त्यामुळे ह्या मुरुड - जंजिरावर आपलं एकमत कसं झालं, या गोष्टीचं दोघांनाही आश्चर्यच वाटत होतं.
तर... ठरल्याप्रमाणे ते गेले होते फिरायला. संध्याकाळी पाचच्या सुमारास, एका छोट्या बोटीतून ते जंजिरा फोर्टवर उतरले. सुरुवातीला चार पावलं देखल्या देवा एकत्र फिरणारे ते चौघे, लगेचच पांगले. तो आश्चर्याने इथून तिथून फिरत, किल्ल्याचं बांधकाम पाहू लागला. ती एका मोक्याच्या अशा जागी बसून, आजूबाजूनी पसरलेल्या समुद्राकडे अनिमिषतेने बघू लागली. त्यांची दोन मुलं चोहीकडे हुंदडत खेळत होती, त्या दोघांना अजिबात डिस्टर्ब न करता. आणि त्या दोघांनी तर एकमेकांना डिस्टर्ब करणं, तसंही केव्हाचच सोडलेलं. दोन्ही मुलं आपापसात रममाण होती, नी ते दोघेही आपापल्या आवडीच्या विषयात गुंग. आणि त्यामुळेच चौघांनाही... किल्ल्यातून बाहेर निघायची वेळोवेळी केली गेलेली सुचना, ऐकूच नाही आली.
सगळा किल्ला रिकामा झाला. शेवटची परतीची बोटही निघून गेली. सर्वत्र अंधारुन यायला सुरुवात झाली. आणि चौघेही एका मागोमाग एक असे, भानावर आले. एकत्र जमले ते, एकमेकांसोबत आले... आणि इथे तिथे जोरजोराने हाका मारु लागले. पण आता त्यांच्या हाकांना 'ओ' द्यायला कोणीही नव्हतं... आसमंतात हळूहळू विस्तारत, भरुन येणार्या अंधाराशिवाय. दोन्ही मुलं घाबरुन आईला बिलगली... आणि ती... ती घाबरुन त्याला. त्याला धक्काच बसला... किल्ल्यात आपण एकटेच मागे राहिल्याचा नाही, तर ती आपणहून पुढे होत त्याला बिलगली होती त्याचा. त्यानेही मग एका हाताने तिला, नी दुसर्या हाताने मुलांना कवटाळून घेतलं. आता अगदी पुर्णतः अंधार दाटून आला होता आसमंतात. एकमेकांचा फक्त स्पर्श जाणवावा, इतका काळाकुट्ट अंंधार. आणि न दिसताही जाणवत होता फक्त... पायाखालच्या किल्ल्याचा तो अवाढव्यपणा, आणि डोळ्यांसमोरच्या समुद्राचा अथांगपणा. त्या मोकळ्या किल्ल्यावर घोंघावणारा वारा, नी समुद्राच्या पाण्याची कमी - जास्तीची गाज... एकमेकांशी गप्पा मारत होते जणूकाही. एवढ्यात ती त्याला म्हणाली...
"तू असाच भासतोस मला हल्ली... ह्या किल्ल्यासारखा. विशाल पण तरीही रिकामा. आत हृदयच नसलेला. एकेकाळी तुझ्या छातीवर कान लाऊन झोपायचे मी, तुझ्या हृदयाची धडधड ऐकत. मग अगदी एखाद् ठोका, एखाद् बीटनेही मागे - पुढे झालेला कळायचा मला. इतकं तोंडपाठ होतं मला ते तुझ्या हृदयाचं गणित, स्टेप बाय स्टेप. पण हळूहळू का कोणजाणे, सगळंच समिकरण चुकत गेलं खरं".
तिचं हे ऐकून... त्याने तिच्या भोवतीचा आपला हात अजून घट्ट करत, तिला आणिक आपल्या छातीशी कवटाळलं. आंणि बोलला तो...
"मलाही सध्या तू, आत्ताच्या ह्या समोर पसरलेल्या समुद्रासारखीच जाणवतेस... अथांग. प्रत्यक्ष नजरेला न दिसूनही, अंदाजानेच स्वतःच्या अंतरातील खोलीची जाणिव करुन देणारी. आपल्या गूढ गाजेने मला काही सांगू पाहणारी, पण प्रत्यक्ष माझ्यापर्यंत पोहचू न शकणारी. कधीकाळी डोळे क्षणभर मिटून घेतल्यावरही तुच दिसायचीस, आणि आता दिवसांवर दिवस सरतात उघड्या डोळ्यांनी... पण तू कुठेच दिसत नाहीस".
हे ऐकून ती आणिक घट्ट बिलगली त्याला. तिच्या डोळ्यांतून काही थेंब बाहेर सांडले, जे शर्टखालची त्याची छाती किंचितशी कोमट करुन गेले. ह्या दोघांचं मघापासूनचं हे सारं बोलणं ऐकून, त्यांचा मोठा मुलगा म्हणाला...
"तुम्ही एकमेकांशी काय बोलताय, ते कळत नाहीये. पण तुमच्या एकमेकांशी बोलण्याने आणि एकत्र असण्याने, आम्हाला दोघांना खरंच खूप सेफ वाटतंय".
पुढे लगेच धाकटा लेकही बोलला...
"बरोबर बोलतोय दादा. बाहेरच्यांची भिती वाटत असते आम्हाला नेहमी, आणि हे सांगायला तुम्ही कधीच एकत्र नसता. पण आता तुम्हाला एकत्र बघून, कोणाचीही भिती वाटत नाहीये... ह्या डार्कनेसचीही".
मुलांचं ऐकून, त्या दोघांचेही डोळे टच्चकन भरुन आले. आणि त्या थेंब थेंब खारट अश्रुंची किंमत, समोर पसरलेल्या महाकाय समुद्राच्या खारट पाण्याहूनही अधिक होती त्या क्षणी. तेवढ्यात तो थरथरला, आणि त्याने चमकूनच आजूबाजूला पाहिलं. खूप दुरुन कुठूनतरी आवाज येत होता, आणि तो हळूहळू जवळ येत चाल्लायसं भासत होतं त्याला. अचानक तो आवाज आणिकच जवळ आला, अगदी कानाशेजारीच. आणि तो खडबडून जागा झाला. त्याच्या मोबाईलचा अलार्म वाजत होता. त्याने तो आॅफ केला. आपल्या बाजूला पाहिलं, तर मोठा मुलगा शांतपणे झोपलेला. खाली पाहिलं तर, धाकटाही झोपला होता एका गादीवर. दुसरी गादी मात्र रिकामी होती... कारण ती उठली होती, नी तिच्या आवराआवरीची लगबगही जाणवत होती त्याला. सव्वा सहा वाजलेले घड्याळात... आणि आठपर्यंत ते निघणार होते, स्वतःच्या कारने मुरुड - जंजिर्यासाठी.
तो मान हलवत फक्त हसला, त्याने पाहिलेल्या स्वप्नावर. मग अलगद दोन हातांतून उचलत, त्याने धाकट्या लेकाला वर पलंगावर ठेवलं. दोन्ही लेकांच्या डोक्यावरुन, आळीपाळीने हात फिरवत बोलला तो...
"यापुढे नाही वाटणार भिती तुम्हाला कोणाचीही. आणि अगदी वाटलीच, तर नाही पडणार प्रश्न तुम्हाला की कोणाकडे जावं. कारण यापुढे तुमचे आई - बाबा, तुम्हाला कायम एकत्रच दिसतील. मी आपणहून करेन तसा प्रयत्न. I promise u both".
इतकं बोलून तो पलंगावरुन उठणार तोच, त्याला मंदसा बांगड्याचा किणकीणाट ऐकू आला... जवळून लांब जाणारा. तो पुन्हा हसला स्वतःशीच... आणि नवी 'उमेद' डोळ्यांत घेऊनच, जागचा उठला तो.
-सचिन श. देशपांडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा