"प्रियकराशी भांडण झालं म्हणून सख्ख्या आईने दोन वर्षाच्या मुलाला ट्रकखाली फेकून दिले" वर्तमानपत्रामध्ये
ही बातमी वाचली आणि बातमीतला प्रसंग डोळ्यासमोर उभा राहून तन्वीचा थरकाप झाला. परवाच तिने अशीच एक बातमी वाचली होती.
" चाकूचे सपासप वार करुन सख्ख्या आईने चिमुरडीचा जीव घेतला."
तेव्हाही तिचा असाच थरकाप झाला होता. आज ही बातमी.तिचे हातपाय लटपटू लागले. डोळ्यात आसवं जमा होऊ लागली. भरलेल्या डोळ्यांनी तिने कोपऱ्यात खेळत असलेल्या आपल्या चिमुरड्या भावाकडे, मयुरकडे पाहिलं. तो आपल्याच तंद्रीत कसलंतरी गाणं गुणगुणत खेळत होता. आपली आई आपल्या भावाला ट्रकखाली फेकत असल्याचं चित्र तिच्या मनाने डोळ्यासमोर उभं केलं तशी ती जोरात किंचाळली. तिच्या किंचाळण्याने मयूर दचकला. तिच्याकडे पाहून त्याने विचारलं
" काय झालं ताई?"
त्याच्या त्या निरागस प्रश्नाने तिला भडभडून आलं आणि ती धावत त्याच्याकडे गेली. आणि त्याला घट्ट मिठी मारुन रडू लागली. मयूरला कळेना की ती का रडतेय? पण ती रडतेय म्हणजे नक्कीच काहीतरी वाईट घडलंय या अंदाजाने तोही रडू लागला. थोड्या वेळाने तन्वी शांत झाली तसा तोही शांत झाला.
" त्या पेपरमध्ये ना, बातमी आहे की एका आईने आपल्या छोट्या मुलाला ट्रकखाली फेकून मारुन टाकलं. म्हणून मला रडू आलं."
ती त्याला सांगू लागली. सांगतांना तिला परत गहिवरुन आलं.
"का बरं मारलं तिने बाळाला? त्याने काही खोडी काढली होती का?"त्याने निरागसपणे विचारलं
" प्रियकराशी भांडण झाल्यामुळे तिने आपल्या बाळाला मारुन टाकलं म्हणे."
" ताई प्रियकर म्हणजे कोण गं"?
" मला नाही माहीत."
" ताई आपली आई पण आपल्याला मारुन टाकेल का गं?" त्याने मुळमुळू रडत विचारलं.
तन्वी विचारात पडली. तिला नक्की सांगता येत नव्हतं पण गेल्या पाचसहा महिन्यातली तिच्या आईची वागणूक पाहून ती असं करु शकते असं तिला वाटत होतं. छोट्या छोट्या कारणांवरुन ती त्या दोघांवर संतापायची. त्यांना मारायची. एकदा ती संतापून म्हंटलीही होती की "तुम्ही दोघं चांगले वागले नाही ना तर मी तुम्हांला गच्चीवर घेऊन जाईन आणि तिथून खाली फेकून देईन " हो.ती नक्कीच असं करु शकते. पण हे त्या चिमुकल्या जीवाला सांगणं तिला बरं वाटेना. तो जास्तच घाबरुन गेला असता.
"सांग ना ताई.ती आपल्याला पण मारेल?"त्याचं रडणं सुरुच होतं.
तिने त्याला जवळ घेतलं .त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली.
" असं कसं मारेल? मी आहे ना ! आणि आपण बाबांना सांगू. ते आईला तसं करु देणार नाही"
" पण बाबा तर उशीरा घरी येतात. ते येण्याअगोदर तिने काही केलं तर?" तो परत मुळमुळू रडू लागला.
" मग आपण समोरच्या आजोबांना बोलवू.त्यांच्याजवळ नेहमी काठी असते. तिने ते आईला मारतील "
त्याचं समाधान झालं नाही पण तो चुप बसला. तिच्यापासून दुर होत तो परत चेंडूशी खेळू लागला. तन्वीने घड्याळात पाहिलं. अजून आईला यायला दोन तास होते. ती येण्याच्या आत घराची आवराआवर झाली पाहीजे नाहीतर ती खवळाखवळ करेल. कदाचित पट्टी घेऊन तिला मारेलही. ती उठून कामाला लागली.
तन्वीचे बाबा शैलेश साँफ्टवेअर इंजीनियर. एका चांगल्या कंपनीत चांगल्या पगारावर होते. पण मंदी आली. त्यात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. शैलेशलाही घरी बसावं लागलं. त्याने एका फुड सप्लिमेंट बनवणाऱ्या मल्टिनँशनल कंपनीची एजन्सी घेतली. पण त्यातही त्याचं जबरदस्त नुकसान झालं. नाईलाजास्तव त्याने एका छोट्या फर्ममध्ये कमी पगाराची नोकरी पत्करली. त्यासाठी त्याला कल्याणहून अंधेरीला जावं लागायचं. नवीन फ्लँटच्या कर्जाचे हफ्ते,मुलांचं चांगल्या शाळेतलं महागडं शिक्षण,वाढती महागाई यात त्याचा पगार पुरणार नव्हताच.ओढाताण व्हायला लागली तेव्हा तन्वीची आई-तेजल,दादरच्या एका मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करायला लागली. पण त्यासाठी तेजलला रोज पहाटे उठून तिचा, नवऱ्याचा आणि मुलांचा डबा तयार करुन धावपळ करत साडेसातची लोकल पकडावी लागायची. परतायला तिला रात्रीचे आठ वाजायचे. शैलेश तिला जमेल तशी मदत करायचा पण आईच्या कडक शिस्तीत वाढलेल्या तेजलला थोडंही कमीजास्त चालायचं नाही. ती शैलेशवर डाफरायची. त्याच्या कामात चुका काढायची. त्यामुळे शैलेशही तिला घाबरुनच कामं करायचा.आधीपासूनच सणकी असलेल्या आणि ऐशाआरामात आयुष्य काढलेल्या तेजलच्या शरीराला आणि मनालाही हा बदल, ही धावपळ मानवत नव्हती. नव्हे ती सहनच होत नव्हती. परीस्थितीचा राग कधी ती नवऱ्यावर तर कधी मुलांवर काढायची. दहा वर्षाची तन्वी मोठी म्हणून तिला आईच्या रागाचे चटके जास्त सहन करावे लागत. सहा वर्षांचा छोटा मयूर आई चिडली की बेडरुममध्ये जाऊन लपून रहायचा. मग तेजल हातात येईल त्या वस्तूने तन्वीला मारायची. आईवडील गेले की तन्वी आपल्या छोट्या भावाची शाळेत जायची तयारी करुन द्यायची. तिची शाळा दुपारची. ती शाळेत गेली की मयूर एक वाजता घरी यायचा. दुपारी पाचपर्यंत तो बिचारा एकटाच घरात बसलेला असायचा. सोसायटीतल्या त्या फ्लँट संस्कृतीत कुणी कुणाच्या घरी जायचं नाही. त्यातून तेजलचा रागीट स्वभाव शेजाऱ्यांना माहित असल्यामुळे त्यांच्या मुलांनाही ते मयूरशी खेळण्यासाठी पाठवत नसत. पाच वाजता तन्वी घरी आली की त्याची कळी खुलायची. दोघां भावाबहिणींचं एकमेकांवर खुप प्रेम होतं. ते कधीही भांडत नसत. किंबहूना परीस्थितीनेच त्यांना खुप जवळ आणलं होतं. दोघांना एकमेकांचा आधार वाटायचा. त्यामुळे अशा बातम्या वाचल्या की तन्वी अस्वस्थ व्हायची. तिला आईची भिती वाटू लागायची. आई घरी यायच्या आत बाबांनी घरी यावं असं तिला प्रकर्षाने वाटायचं पण ते कधीच शक्य व्हायचं नाही. शैलेशला यायला कधी नऊ तर कधी दहा वाजायचे.छोटा मयूर तर तो येण्याच्या आतच झोपून जायचा. तेजलने तशा काही चांगल्या सवयी मुलांना लावल्या होत्या. वाचन ही त्यातलीच एक. तन्वी रोज शाळेतून आली की वर्तमानपत्र वाचायची. पण त्या वर्तमानपत्रात वाईटही बातम्या असतात. अशाच एका त्या वाईट बातमीने आज तन्वी घाबरुन गेली होती.
सात वाजता तेजलचा फोन आला
" तनू दोन कांदे आणि पाच बटाटे चिरुन ठेव. मी आले की भाजी करेन. मयूरकडून घरचा अभ्यास करुन घे. पसारा आवर. मी आल्यावर पसारा दिसला तर बघच. तुम्हांला दोघांना मी चांगलं बदडून काढेन"
" हो आई"
आईच्या शेवटच्या वाक्याने तन्वी अधिकच घाबरली. आई म्हणते तसं खरंच करुन दाखवते हे तिने अनेकदा बघितलं होतं. ती बाहेरच्या हाँलमध्ये आली.जिथेजिथे पसारा पडला होता तो तिने आवरला.आता मयूरच्या अभ्यासाची पाळी होती. तिने त्याच्या स्कुलबँगमधून नोटबुक्स काढून तपासल्या.१ ते २० आकडे लिहायचा ग्रुहपाठ होता.मयूरकडून तो करुन घेतला. बरं तरी त्याने त्रास दिला नाही. ग्रुहपाठ झाल्यावर वह्यापुस्तकांनी जड झालेली बँग कपाटात ठेवून दिली. तिने घड्याळाकडे पाहिलं. पावणेआठ झाले होते."बापरे! पंधरा मिनिटात आई येईल" स्वतःशी पुटपुटत ती पटकन किचनकडे पळाली. घाईघाईने ती कांदा चिरु लागली. एका बेसावध क्षणी तिच्या बोटात चाकू शिरला आणि रक्ताची धार लागली.ती किंचाळली. वेदनेने तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मयूर धावत आला.तन्वी बोटाला धरुन रडत होती. खाली फरशीवर रक्ताचे थेंब पडत होते. त्या छोट्या जीवाला काय करावं ते समजेना. तो धावत बेडरुममध्ये गेला आणि तिथून एक रुमाल घेऊन आला. त्याने तो रुमाल तन्वीच्या बोटावर दाबून धरला. थोड्या वेळाने रक्त थांबलं. वेदना कमी झाल्या. तिने रुमाल काढून बोट बेसीनच्या नळाखाली धरलं. जखमेत शिरणाऱ्या पाण्याने परत तिच्या डोळ्यात पाणी आणलं. त्या दुखऱ्या बोटाने आता कांदे कसे चिरावे ते तिला कळेना पण आईच्या भितीने ती परत कांदे चिरु लागली. तिखट कांद्याचा रस जखमेला झोंबत होता .तिने रडतरडतच चिरण्याचं काम पुर्ण केलं.
"तनूताई खुप दुखतंय का?"
तिच्या रडण्याने बैचेन झालेल्या मयूरने विचारलं.
तिने भरलेल्या डोळ्यांनी मान हलवली. त्याला अचानक काहीतरी आठवलं तो पळतपळत बाथरुममध्ये गेला. तिथून अँटिसेप्टिक क्रिम घेऊन आला.
"आता तुला बरं वाटेल" तिच्या बोटावर ते क्रिम लावत म्हणाला. तो क्रिम लावत असतांना त्याच्या चेहऱ्यावरचे निरागस, गोड भाव पाहून तिला त्याही परीस्थितीत हसू आलं. तो क्रिम ठेवायला गेला आणि दारावरची बेल वाजली. तन्वीने घाबरुन जाऊन दरवाजा उघडला. तेजलने आत येऊन पर्स टीपाँयवर ठेवली. हाँलमध्ये सगळीकडे नजर फिरवली .सगळं व्यवस्थित आहे असं पाहून ती आत शिरली. तसा मयूर तिला सांगू लागला
" आई तनूताईला ना....."तेवढ्यात तन्वीने त्याला चुप रहायचा इशारा केला.
" काय झालं तनूताईला?"तेजलने रागात विचारलं.
"काही नाही तू कपडे बदलून ये"
तो घाबरत म्हणाला.ती बेडरुमकडे जायला वळली आणि किचनमध्ये तिला रक्ताने भरलेला रुमाल दिसला.
" तनू हे काय आहे?"ती ओरडली. तन्वी घाबरुन आत पळत आली.
आईच्या हातातला रुमाल पाहून ती चाचरत म्हणाली
" कांदा चिरतांना मला चाकू लागला. मयूरने रुमालाने रक्त पुसलं "
"एक नंबरची वेंधळी पोरगी आहेस तू.लक्ष कुठे असतं गं तुझं? नीट लक्ष देऊन करता येत नाही कामं?आणि ए कार्ट्या रक्त पुसायला तुला माझाच रुमाल मिळाला वाटतं? दुसरे खराब कपडे दिसले नाहीत? नव्या कोऱ्या रुमालाला रक्त पुसतात? तरी मला शंका आलीच की आज सगळं व्यवस्थित कसं काय? काहीतरी गोंधळ घातल्याशिवाय तुम्हांला कसं बरं वाटेल? जा आता चुपचाप हाँलमध्ये जाऊन बसा"
दोघं भाऊबहिण मुकाट्याने बाहेर सोफ्यावर जाऊन बसले. आईच्या रागावण्याने मयूरच्या डोळ्यात पाणी आलं. तो आता रडला तर आई अजूनच चिडेल या भितीने तन्वीने त्याला जवळ घेतलं.
" नको रडू बाळा"
त्याच्या अंगावरुन हात फिरवताफिरवता ती म्हणाली तसा तो तिला बिलगून बसला. तन्वीने ठरवलं आज कोणत्याही परीस्थितीत वर्तमानपत्रातल्या बातम्या बाबांना दाखवायच्या. जमलं तर आई असं तर करणार नाही अशी शंका बोलून दाखवायची. बाबा नक्कीच आईला रागावतील. या वाक्यावर मात्र तिला थोडी निराशा वाटली.आई चिडली की बाबांचंही ऐकत नाही. अशीही ती त्यांच्या नोकरीवरुन नेहमी टोमणे मारत असते. चिडली की सासरच्या माणसांचा उध्दार ठरलेला. बरं तरी बाबा शांत आहेत. ते तसे नसते तर घरात काय रणकंदन माजलं असतं देव जाणे? या विचाराने ती शहारली.
नऊ वाजता तेजलने ओरडूनच तन्वीला जेवायची तयारी घ्यायला बोलावलं. तन्वीने पटकन जाऊन टेबलवर ताटं घेतली. पाण्याचा तांब्या,ग्लास घेतले. मयुरला बोलावलं. खरं तर दोन्ही पोरं भुकेने कासावीस झालेली. पण भुक लागली असं आईला सांगितलं तर ती चिडते हे बऱ्याच महिन्यांपासून ती बघत आली होती त्यामुळे भुक लागूनही ती एक शब्द तोंडातून काढत नसत.
तन्वीने तिला आणि भावाला वाढून घेतलं. मयूरने जेवायला सुरुवात केली.तन्वी पहिला घास घेणार तेवढ्यात तेजलने विचारलं
" तन्वी ताटं पुसली होती?"
तन्वीच्या हातातला घास हातातच राहिला.
" नाही"
तेजलचा पारा एकदम चढला.ती जोरात ओरडली.
"कारटे तुला किती वेळा सांगितलं,वाढून घ्यायच्या आधी ताटं पुसत जा म्हणून. कधी वळण लागणार आहे तुला?एवढी दहा वर्षांची झाली तरी अक्कल नाही आली तुला. इथे मी मरमर करते आणि तुला एवढंही काम जमत नाही?आता रडतेस काय? जेव मुकाट्यानं"
तन्वीच्या डोळ्यातून अश्रूंची धार वहात होती. बहिणीला रागावलं म्हणून मयूरही मुसमुसत होता. भुक लागलेली असुनही परत काही न मागता दोघं ताटात वाढलेलं संपवून उठले. टेबल आवरुन तन्वी मयूरला घेऊन बेडरुममध्ये गेली.
"ताई गोष्ट सांग ना!मला आज झोप येत नाहिये"
"आज नको बाळा. उद्या नक्की सांगेन हं.बाबा आले ना की मी त्यांना आईबद्दल सांगणार आहे"
" नक्की सांग बरं का. आई खुप त्रास देते असं सांग. आम्हांला व्यवस्थित जेऊ पण देत नाही. थोड्या थोड्या कारणांनी आमच्यावर चिडचिड करते "
" बरं बरं .सांगते.तू झोप आता" त्याला थोपटत ती म्हणाली. तो झोपला तशी ती बाहेर हाँलमध्ये बसून बाबांची वाट बघत बसली.
शैलेश साडेनऊला आला. पण आल्याआल्या तेजलला म्हणाला
" तेजू मी फ्रेश होतो तोपर्यंत जेवणाची तयारी कर. मला खुप भुक लागलीये आणि झोपही येतेय. खुप थकलोय आज.आज नेहमीची लोकल चुकली. दुसऱ्या लोकलला जागाच नव्हती. कल्याणपर्यंत उभा राहून येतोय बघ"
मग एक थकलेली नजर तन्वीकडे टाकून तो म्हणाला
" बेटा मयूर झोपला?आणि तू अशी रडवेली का दिसतेय?"
तन्वी काही बोलणार तेवढ्यात तेजल मध्येच म्हणाली
" काही झालं नाही. मी तिला जरा ताटं पुसण्यावरुन रागावले म्हणून ती रडली"
शैलेशने तन्वीला जवळ घेतलं.
" बेटा असं थोड्या थोड्या गोष्टींनी रडायचं नसतं. अगं आमचे वडील तर आम्हांला इतकं मारायचे की दोनतीन दिवस सगळं शरीर दुखायचं.पण आम्ही इतके बेरड की परतपरत त्याच खोड्या करायचो "
"बघा ना. माझी आई तर हेडमास्तरीणच होती.आम्हांला ती विद्यार्थीच समजायची.उठसुठ मारायची. चिमटे काय घ्यायची. तुम्हांला तर एवढंसं रागावलं तर तोंड फुगवून बसता"
आई समोर असतांना बाबांना तिच्याबद्दल काही सांगणं शक्य नाही हे तन्वीच्या लक्षात आलं. तिनं बोलण्यासाठी उघडलेलं तोंड बंद केलं. तन्वीला काहीतरी बोलायचं होतं पण ती बोलू शकली नाही हे शैलेशच्या ध्यानात आलं.तो तिला म्हणाला
" बरं बेटा मी उद्या बोलेन हं तुझ्याशी.आज खुप थकलोय मी"
बापापुढे तन्वी काय बोलणार होती? ती बिचारी उठली आणि बेडवर जाऊन झोपली. एक मात्र खरं की बापाच्या शब्दांनी आणि त्याने जवळ घेतल्यामुळे तिच्या दुखऱ्या मनावर फुंकर घातली होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी शैलेश कामावर जायला निघत असतांनाच तन्वी बाहेर आली आणि शैलेशला म्हणाली
"बाबा संध्याकाळी लवकर याल ना?"
"का गं बेटा?"
"तुम्ही काल म्हणत होता ना की मी तुमच्याशी उद्या बोलेन"
शैलेशला ते आठवलं आणि त्याला हसू आलं
"अगं बेटा मी ते सहज बोललो होतो"
तेवढ्यात छोटा मयूर डोळे चोळत बाहेर आला
"बाबा लवकर या ना घरी.आम्हांला खुप भीती वाटते....."
तन्वीने डोळे वटारले तसा मयूर चुप झाला. शैलेश खाली वाकून बुटाची लेस बांधत असल्यामुळे त्याचं तन्वीच्या वटारलेल्या डोळ्यांकडे लक्ष गेलं नाही.
" बरं बेटा प्रयत्न करतो. बाय. हँव अ नाईस डे"
तो निघाला तसा दोन्ही मुलांनी निरोपाचा हात हलवला.
शैलेश बोलला खरा पण लवकर काही येऊ शकला नाही. तो रात्री दहाला आला तेव्हा दोन्ही मुलं झोपून गेली होती. जेवता जेवता तो तेजलला म्हणाला
" तेजू मुलं काही तरी दडपणाखाली आहेत असं वाटतं. मयूर म्हणत होता की त्यांना भीती वाटते म्हणून. कसली भीती वाटत असेल त्यांना?"
"काय माहित!" तेजू फणकाऱ्याने म्हणाली " इथे मीच नेहमी भीतीखाली वावरत असते. त्यांची भीती जाणून घेऊन काय करु?"
अजून काही बोललं तर ही जेवतांना भांडत तर बसेलच शिवाय दुसऱ्या दिवशीही तोंड फुगवून बसेल या भीतीने शैलेश चुप बसला.
दुसऱ्या दिवशी सकाळी शैलेश जायला निघाला तेव्हा मुलं उठली होती पण तेजल समोर असल्यामुळे काही बोलली नाहीत. पण त्यांच्या चेहऱ्यावर कसलातरी ताण आहे हे शैलेशच्या लक्षात आलं.
संध्याकाळी नेहमीप्रमाणे आवराआवर करुन तन्वी आणि मयूर तेजलची वाट बघत बसले होते.अचानक मयूर तन्वीला म्हणाला
" ताई खुप गरम होतंय मला सरबत करुन दे ना!"
"आता थोड्या वेळाने जेवायचंच आहे ना बाळा. आता कशाला सरबत पितोस?"
"दे ना ताई प्लीज.मला भुकही लागलीये"
"ठिक आहे आणते"
ती आत गेली आणि स्वतःसाठी आणि मयूरसाठी सरबताचे ग्लास घेऊन आली. मयूरने टिव्हीवर कार्टून सिरीयल लावली होती.ती बघता बघता तो उभं राहून सरबत पित होता. टिपाँयला धक्का लागून त्याच्या हातातलं सरबत टाईल्सवर पडलं. तन्वीच्या ते लक्षात आलं पण कार्टून बघण्याच्या नादात ते पुसायचं तिच्या लक्षात आलं नाही.
दारावरची बेल वाजली. तसं तन्वीने घाईघाईने टिव्ही बंद केला. दार उघडलं.तेजल उभी होती. नेहमीप्रमाणेच तिच्या चेहऱ्यावर चिडके भाव होते. तन्वी घाबरून तिच्या वाटेतून दुर झाली. तेजलने पर्स टिपाँयवर ठेवली आणि जशी ती आत जाऊ लागली मयूरने गुळगुळीत टाईल्सवर सांडलेल्या सरबतावरुन तीचा पाय सरकला आणि ती जोरात कमरेवर आपटली.
"आई गंsssss" ती किंचाळली तशी तन्वी धावत आईजवळ गेली. टिपाँयजवळ सांडलेलं सरबत तिला दिसलं तशी मयूरची आता काही खैर नाही हे तिच्या लक्षात आलं आणि ती थरथर कापू लागली. तेजलच्या हाताला ते चिकट सरबत लागलं. त्याचवेळी मयूरच्या हातातल्या सरबताच्या ग्लासकडे तिचं लक्ष गेलं आणि आपण कशावरुन सटकलो हे तिच्या लक्षात आलं.संतापाने तिचा चेहरा वाकडा झाला.
"कार्ट्या तू सांडलं ना हे सरबत?"ती जोरात किंचाळली. मयूर घाबरुन थरथर कापू लागला. तेजल उठली मयूरच्या हातातला ग्लास हिसकावून तिने जोरात जमीनीवर आपटला. सगळीकडे काचांचे तुकडे पसरले. मयूरला मारण्यासाठी ती काहीतरी शोधू लागली.समोरच स्टिलची पट्टी होती ती तिने उचलली आणि मयूरला डाव्या हाताने धरुन उजव्या हातातल्या पट्टीने ती त्याच्या पाठीवर सपासप मारु लागली. तोंडाने बडबड सुरुच होती. त्या माराने मयूर जोरजोरात रडत होता. तन्वीने ते पाहिलं आणि तिच्या हातापायातलं जणू त्राणच नाहिसं झालं. वर्तमानपत्रातल्या बातम्या तिच्या डोळ्यासमोर आल्या आणि आई आज आपल्या लाडक्या भावाला मारुन टाकणार तर नाही याची तिला भीती वाटू लागली. त्या कल्पनेने तिचे हातपाय लटपटू लागले. घशाला कोरड पडली. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. अचानक कसल्याशा उर्मीने तिने रडणं थांबवलं.आईला कसंही करुन थांबवायला पाहिजे हे तिच्या लक्षात आलं.काय सांगता येतं संतापात ती मयूरला गच्चीवर घेऊन जाईल आणि खाली फेकून देईल. या विचारासरशी ती आईजवळ धावत गेली. तिचा पट्टी हातात घेतलेला हात धरुन ती रडतरडत म्हणाली
"आई नको मारु ना.आई लहान आहे ग तो. प्लीज आई नको मारु ना त्याला"
तेजलने तिच्या हाताला हिसका दिला.आणि ती परत मयूरला मारणार तशी तन्वी त्याला पाठिशी घेऊन तिच्या समोर उभी राहिली आणि त्वेषाने म्हणाली
"तुला मारायचंच आहे ना तर मला मार. मारुन टाक मला. पण त्याला मारु नको. किती छोटा आहे गं तो"
तिच्या "मारुन टाक " शब्दावर तेजल चमकली.पट्टी घेतलेला तिचा हात हवेतच राहिला
" काय म्हंटलीस तू?मारुन टाक म्हंटलीस ना?"
" हो.तेच म्हंटले मी.घेऊन जा मला गच्चीवर आणि फेकून दे मला खाली.पण त्याला नको मारु ना" तन्वी तिच्यावर किंचाळतच बोलली.
"कारटे..."असं म्हणून तेजल तिला मारणार तेवढ्यात दारावरची बेल वाजली.त्या आवाजाने तन्वी आणि मयूर दोघंही क्षणभर रडायचे थांबले
तेजलने पट्टी कपाटाच्या ड्राँवरमध्ये टाकली आणि तन्वीकडे पाहून ओरडली
"जा.बघ कोण आलंय ते"
तन्वी मयूरकडे वळली.त्याला तिने उचलून घेतलं आणि खाली पडलेल्या काचा चुकवत दरवाजाकडे निघाली.दरवाजा उघडून पहाते तो शैलेश उभा होता.त्याला पहाताच दोन्ही मुलं "बाबाssss" असं जोरात ओरडून त्याला बिलगली आणि ढसाढसा रडू लागली. शैलेशने मयूरला उचलून घेतलं तसा तो त्याच्या गळ्याला मिठी मारुन जोरजोरात रडायला लागला. शैलेशने तन्वीला जवळ घेऊन आत आणलं. सोफ्यावर बसवलं. घरभर पसरलेल्या काचा पाहून त्याने तेजलला विचारलं
"काय झालं तेजू?मुलं रडताहेत. सगळीकडे काचा पडल्याहेत. काय आहे हे?"
" त्यांनाच विचार. नालायक कुठले. फार शेफारुन ठेवलंय तू शैलेश त्यांना " तेजल संतापून म्हणाली.
तिच्याकडे दुर्लक्ष करुन त्याने तन्वीला विचारलं
"काय झालं तन्वी बेटा?"
तन्वीला भडभडून आलं. रडतरडतच ती म्हणाली
" मयूरच्या हातून टिपाँयजवळ सरबत सांडलं. आई आली आणि तिचा पाय त्यावरुन घसरुन ती पडली. तर ती ना मयूरला पट्टीने जोरजोरात मारायला लागली. मी तिला मारु नकोस म्हणत होते पण ती ऐकतच नव्हती.ती मयूरला मारुन टाकणार होती"
ते ऐकून शैलेशला धक्काच बसला.त्याने चमकून तेजलकडे पाहिलं. त्याच्या नजरेतले भाव ओळखून तेजल म्हणाली.
"काही काय बोलतेस गं? मारुन टाकण्यासाठी तुम्हांला जन्म दिला का मी?"
" हो.तू आम्हांला नेहमी म्हणतेस की तुम्हांला गच्चीवर नेऊन खाली फेकून देईन"
" बेटा ती असं बोलली म्हणून तसं करणार थोडीच आहे?अशी कोणती आई आपल्या मुलांना मारुन टाकते?"
"हो मारते.मी वाचलंय पेपरमध्ये"
असं म्हणून तन्वी कपाटाजवळ गेली.एक ड्राँवर उघडून तिने ते त्या बातम्यांचे पेपर्स शैलेशच्या हातात दिले.
" हे पहा.वाचा" तन्वीने बातमी उघडून दाखवली.
" चाकूचे सपासप वार करुन सख्ख्या आईने सहा वर्षाच्या चिमुरडीचा जीव घेतला " शिर्षक वाचूनच
शैलेशच्या अंगावर काटा आला.ती पुर्ण बातमी वाचून तर त्याला कसंतरीच झालं.त्याने दुसरी बातमी वाचली " प्रियकराशी भांडण झाल्यामुळे महिलेने दोन वर्षाच्या सख्ख्या मुलाला ट्रकखाली फेकले "
" बापरे !" घाबरुन शैलेशच्या तोंडातून शब्द निघाला.या बातम्या आपण वाचायला विसरलो किंवा आपण त्याकडे दुर्लक्ष केलं हे त्याच्या लक्षात आलं.पुर्ण बातमी वाचल्यावर शैलेशने पेपर्स तेजलकडे सरकावले.अस्वस्थ होऊन तो म्हणाला
" ह्याला क्रुरता नाही तर काय म्हणायचं? सख्ख्या मुलांना मारुन टाकण्याइतका संताप आणि धैर्य या मातांमध्ये येतं तरी कसं? पुर्वी बाप अमानुष होऊन लेकरांना मारुन टाकायचा आजकाल आईसुद्धा तेच करतेय. याच नाही अशा अनेक बातम्या आजकाल वाचायला मिळताहेत."दोन लहानग्या मुलांना विहिरीत फेकून आईने आत्महत्या केली",तीन मुलांना विष पाजून नवरा बायकोने आत्महत्या केली,अनैतिक संबंधात अडसर म्हणून आईनेच मुलाचा खुन केला" अशा बातम्या आजकाल पेपर्समध्ये सर्रास वाचण्यात येताहेत.काय चाललंय काय हे आजकाल? नऊ महिने पोटात वाढवलेल्या या निष्पाप बालकांना मारण्याचं पाप या आयांकडून होतंच कसं? समाज अनैतिकतेकडे वेगाने धावतोय तेजू. वर्तमानपत्रं,टिव्ही,वेबसिरीज पहा.सगळीकडे अनैतिकतेचं भरभरुन प्रदर्शन केल्या जातंय. अशा बातम्यांचं शिर्षक वाचून त्याकडे आपण दुर्लक्ष करतो.पण या छोट्या मुलांच्या मनात त्यामुळे आईवडिलांबद्दल भीतीच निर्माण होणार आहे.ज्यांच्या आड लपल्याने सुरक्षित वाटतं.जे आहेत म्हणून जगातल्या संकंटांचा सामना करण्याचं धैर्य येतं त्यांनीच जीव घ्यावा यासारखं दुर्देव जगाच्या पाठीवर दुसरं कुठे नसेल.का नाही भिणार ही मुलं तेजू? त्यातून तू अशी त्यांना मारणार असशील आणि गच्चीवरुन फेकून देईन असं वारंवार म्हणत असशील तर त्यांना तुझी भीती वाटणारच "
तेजलही त्या बातम्या वाचून एकदम सुन्न झाली. त्या वाचून तिला गहिवरुन आलं.
"तुझं म्हणणं खरंय शैलेश. पण मी काय करु? मी स्वतः रोज भीतीखाली मरत असते. सकाळी थोडा उशीर झाला की नेहमीची लोकल निघून जाईल याची भीती,उशीरा पोहचलं तर बाँस रागवेल का याची भीती, हाँस्पिटलमध्ये कँशचं काम माझ्याचकडे आहे. ती कँश मोजतांना चुक तर नाही होणार याची भीती,पेशंट मेला तर पेशंटचे नातेवाईक आपल्याला मारणार नाही ना याची भीती.मयुर दुपारी घरी एकटाच असतो.त्याला कुणी पळवून तर नेणार नाही याची भीती.लिफ्टमधून ये जा करतांना किंवा घरातही त्याला काही झालं, लागलं तर आपल्या अपार्टमेंटमधलं कुत्रंसुध्दा त्याला पहायला येणार नाही ही भीती. परततांना बऱ्याचदा लोकलने लोंबकळून यावं लागतं. हात सटकून मी मरणार तर नाही याची भिती. मला या गोष्टींची सवय नाही रे शैलेश.सहा महिन्या अगोदर माझं आयुष्य खुप छान होतं. आज मात्र मी नेहमी भितीखाली,दडपणाखाली वावरत असते "
बोलताबोलता ती एकदम हमसून हमसून रडू लागली.
" तेजू एक काम कर.सोडून दे ती नोकरी"
त्याने तसं म्हणताच ती रडणं थांबवून त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागली.
"खरंच म्हणतोय मी.त्या दहा हजाराकरता इतकं मनस्वास्थ्य बिघडवून घ्यायची खरंच गरज नाही "
" पण मग आपले खर्च भागणार कसे?"
" तुला सांगू माझ्या सोबत काम करणाऱ्या बिहारच्या जयकुमारलाही माझ्याइतकाच पंचवीस हजार पगार मिळतो.घरात आठजण आहेत.म्हणजे आपल्यापेक्षा दुप्पट. कमावणारा हा एकटा पण सगळं व्यवस्थित चालतं.कशाला पाहिजे या महागड्या इंग्लिश शाळा जिथे लाखो रुपये फी घेऊन पालकांना लुबाडल्या जातं.तुला माहितेय मी जिल्हा परीषदेच्या शाळेत शिकलो.मीच नाही जगातले अनेक नामवंत शास्त्रज्ञ खेड्यातल्या पत्री शाळेत शिकलेत.मग आपणच का एवढा मुलांना काँन्व्हेंट स्कुलमध्ये शिकवायचा अट्टाहास करतो.उलट मी पाहिलंय की नगरपालिकेच्या शाळेत शिकणारी गरीबांची मुलं आय.ए.एस.,आय.पी.एस.होतात आणि इंग्लिश शाळातली मुलं कुठेतरी सामान्य दर्जाची नोकरी करत असतात.प्रश्न जिद्दीचा आणि दुर्दम्य महत्वाकांक्षेचा असतो.ती असली की कोणत्याही क्षेत्रात तुम्ही पुढे जाऊ शकता.त्यासाठी महागड्या शाळांमध्येच शिकायला पाहिजे असं नाही.तुला माहित नसेल पण जितके पैसे मला साँफ्टवेअर इंजीनियर व्हायला लागले तेवढे पैसे आपण या मुलांच्या वार्षिक शिक्षणासाठी खर्च करतोय.याची काहीच गरज नाही. आपण त्यांना एखाद्या साध्या शाळेत टाकू.कशाला हवेत हे महागडे मोबाईल?कोणता फायदा घेतो आपण त्या स्मार्ट फोनचा चँटींग करण्याव्यतिरिक्त?दर आठवड्याला आपण हाँटेलमध्ये जेवायला जातो. बंद करुया तेही.आपल्या लहानपणी आपण कधी गेलो होतो हाँटेलमध्ये?माझ्या वडिलांना फक्त दोन हजार पगार होता.आईवडील आणि आम्ही पाच भावंडं.कधी गरीबी आहे असं वाटलं नाही. कारण गरजा कमी होत्या.कसले शौक नव्हते"
" पण आता गरजा वाढल्या आहेत शैलेश"
" नाही तेजू.आपण त्या वाढवल्या आहेत.ज्यांच्यावाचून आपलं काही बिघडत नाही त्यांना आपण जीवनावश्यक बनवून टाकलंय"
तेजल चुप बसली पण तीचं मन शैलेश म्हंटला त्या गोष्टीवर गांभिर्याने विचार करु लागलं.तो म्हणतोय ते खरंच आहे हे तिला थोडं का होईना पटत होतं
" ठिक आहे शैलेश.सोडते मी नोकरी.पाचसहा महिने करुन बघू तू म्हणतोय तसं.नाहीच जमलं तर मात्र मला नोकरी करावीच लागेल "
"माझ्या मनात एक विचार आहे तेजू.आपल्या सोसायटीतली १०-१२ मुलं त्यांच्या आयांच्या नोकऱ्यांमुळे पाळणाघरात किंवा चाईल्ड केअर सेंटरमध्ये जातात.असं चाईल्ड केअर सेंटर आपण आपल्या घरातच सुरु केलं तर महिन्याला वीस पंचवीस हजार तुला घरबसल्या मिळतील.हे जे आपण आपल्या लहान मुलांच्या जबाबदारीवर घर सोडून जातो ते बंद होईल.आपल्या मुलांनाही खेळायला मुलं मिळतील.
नोकरीसाठी तुला लोकलचा जीवघेणा प्रवास करायची गरज भासणार नाही"
तेजलचा चेहरा उजळला.ती आनंदाने म्हणाली
"हो चालेल.छान आयडिया आहे"
" पण त्यासाठी तुला हा तुझा चिडका,सतत हुकूम देणारा स्वभाव बदलावा लागेल " शैलेश चाचरत म्हणाला.तेजलने त्याच्याकडे रागाने बघितलं
" शैलेश मी अगोदर तशी नव्हते.गेल्या सहा महिन्यात मी जास्त चिडकी झालेय ते ह्या नोकरीपायी" ती रागावून म्हणाली
" बघ लगेच तुला राग आला.चाईल्ड केअर सेंटर चालवायचं असेल तर तुला खुप पेशन्स ठेवावे लागणार आहेत.मुलांवर चिडत राहिलीस तर एकही पालक तुझ्याकडे मुलांना पाठवणार नाही"
"ओके बाबा.मी प्रयत्न करेन"
तेजलचं लक्ष मयूरकडे गेलं.तो अजून वडिलांच्या मांडीवर त्यांच्या गळ्यात हात टाकून बसला होता.त्याला तसं भेदरलेल्या अवस्थेत पाहून तिला गहिवरुन आलं.
" ये रे बेटा माझ्याकडे" तिने त्याच्याकडे हात केले
" मी नाही येणार. तू मला किती मारलं पट्टीपट्टीने"
"आता नाही मारणार. ये रे माझ्या राजा"
" नाही. तू मला मारुन टाकशील"
त्याच्या बोलण्याने तिला भडभडून आलं
" तुझी शपथ. मी आता कधीच तुला नाही मारणार. ये. हे बघ मी तुमच्यासाठी कँडबरी आणलंय" तिने पर्समधून कँडबरी काढून त्याला दाखवली. त्याने प्रश्नार्थक नजरेने बापाकडे पाहिलं.
" जा बेटा.आता आई शहाणी झालीये." त्याने त्याला खाली उतरवलं. तो दबकत ,घाबरत तिच्याकडे गेला. तिने त्याला लगेच उचलून छातीशी कवटाळलं. त्याच्यावर मुक्यांचा वर्षाव केला. मग तिचं लक्ष तन्वीकडे गेलं.
"ये बेटा तनू. तुही ये"
तन्वी जवळ गेल्यावर तिने तिलाही जवळ घेतलं.
"मोठी आहेस म्हणून तुला खुप त्रास देते ना बेटा मी "तिने रडत रडत विचारलं. तन्वीने मान डोलावली
" साँरी बेटा. खुप करते गं तू.मयूरला सांभाळतेस, त्याची तयारी करुन देतेस. माझी चिमुरडी पोर. साँरी बेटा साँरी. यानंतर तुलाही मी कधीच रागावणार नाही. मारणार नाही" तेजल रडत होती .दोघा मुलांच्या अंगावरुन प्रेमाने हात फिरवत होती.
शैलेश ते प्रेमळ द्रुश्य बघत होता.खऱ्या आईचं प्रेमळ रुप त्याला समोर दिसत होतं.असतीलही काही क्रुर आया या जगात. पण आपल्या मुलांच्या सुखासाठी,त्यांच्या कल्याणासाठी जीवाचं रान करणाऱ्या,स्वतः उपाशी राहून लेकरांना मायेचे दोन घास खाऊ घालणाऱ्या आयांची संख्या अजुनही कमी नाही याचं त्याला समाधान वाटलं. टिपाँयवरच्या वर्तमानपत्रांकडे त्याची नजर गेली. आईचं विक्रुत,हिडिस रुप तेवढ्याच विक्रुतपणे जाहिर करणाऱ्या त्या प्रसिध्दी माध्यमांचा त्याला संताप आला. त्याने ते उचलून त्यांचे तुकडे केले आणि डस्टबिनमध्ये टाकुन दिले.
© दीपक तांबोळी
9503011250
(ही कथा माझ्या "अशी माणसं अशा गोष्टी "या पुस्तकातील आहे.कोणताही बदल न करता शेअर करण्यास हरकत नाही. माझ्या पुस्तकांच्या अधिक माहितीसाठी क्रुपया वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा