शुभमचा आज दहावीचा निकाल लागला. खूप आनंदात होता तो. आईशी बोलावे म्हणून तो अंगणात गेला. आकाशातल्या तारका पाहत होता. अचानक आज त्याला तो लहान असतांना घडलेली घटना जशीच्या तशी त्याच्या डोळ्यासमोर तरळून गेली. खरंतर ती घटना त्याच्या डोळ्यात कायमच जिवंत होती. म्हणूनच आज त्याला आईची खूप आठवण येत होती. तू शिकून मोठा साहेब हो. त्या दिवशी आईने बोललेले हे वाक्य. त्याच्या कानात सारखे गुंजत होतो.आणि म्हणूनच तो खूप अभ्यास करत होता आणि आज तो दहावीत मेरिट मध्ये आला होता.
त्या दिवशी तो खूप बैचेन होता. खूप रडत होता. कारण आजी आणि बाबा दोघे मिळून त्याच्या आईला खूप मारत होते. तसे ते दोघे मिळून नेहमीच आईला मारायचे. पण आज भाजीत मीठ जास्त पडल्याचं निमित्त. अन त्यांनी मारायचा कहरच केला. बाबा काठीने आणि आजी बेल्ट ने मारत होती.. सीमा, शुभमची आई. वाचवा..! वाचवा..! म्हणून ओरडत होती. तो बिच्चारा एकदा आजीला पकडून. एकदा बाबांना पकडून सोडा माझ्या आईला..! सोडा माझ्या आईला..! माझ्या आईला मारू नका..! सोडा तिला .. माझ्या आईला वाचवा.. ओ... काका..! ओ... मावशी..! कुणीतरी माझ्या आईला वाचवा..! प्लीज ..! असे म्हणून आक्रोश करत होता.
आईला आजी आणि बाबा मारणे काही थांबवत नाही... आणि मदतीला कोणीच येत नाही, हे पाहून... शेवटी त्याने आजीला जोरात दाताने चावा घेतला... लहान मुलांचे अनुकुचीदार दात ते... चांगलेच रुतले...
आजीने देवा ... देवा...! मेली रे बाबा..! गणेश वाचव रे या म्हातारीला..! आता तुझी आई काही वाचत नाही..! गणेश..!देवा ..! मेली रे बाप्पा..! असे म्हणून ओरडायला लागली ... आणि सीमाला सोडले... शारदाबाई जोरात ओरडल्या ... आणि गणेशने सुद्धा मारणे थांबवून... शारदाबाईकडे धाव घेतली...
काय झाले आई..? का ओरडते..? काय केले या रांडीने तुला..? थांब तुझा आता जीवच घेतो...? रांडीचे..! माझ्या आईला त्रास देते का...?
शारदाबाई पुन्हा ओरडल्या ... अरे गणेश..! तुझ्या बायकोन नाही रे बाबा.. तिच्या ह्या कार्ट्यांनं..! मांडीचा लचकाच तोडला रे बाबा..! देवा मेली रे..! वाचवं या कारट्या पासून..! आणि शारदाबाईने तिची साडी वर करून... आपला पाय गणेशाला दाखवला... शुभम चे दात जबरदस्त रुतले होते... पोटरीतून रक्त येत होत... नरेश लेकाकडे पाहून म्हणाला...
हरामखोर.! आजीला चावतो..! माझ्या आईला चावतो..! थांब तुझ्या आई बरोबर तुलाही जिवंत नाही ठेवत.. कोणाचं पाप माझ्या घरी घेऊन आली कोणास ठाऊक हि रांड..! असं गणेश नेहमी म्हणायचा... कारण सीमा लग्न होऊन आली... तेव्हा तिचा सहावा, दिवस होता... त्या नंतर पाळी आलीच नाही... नशीब पण इतके खोटे... आठवा संपला आणि दुसऱ्याच दिवशी पोटात दुखायला लागले... अगदी म्हणतात तसे नवव्या ची फक्त सावली पडली... पण अनपढ शारदाबाई आणि गणेश त्यावरून तिला खूप त्रास देत होते.. हे पाप कुणाचं तरी तू माझ्या गळ्यात मारलं..! सांग रांडे..! हे कोणाचे पाप ते..!
हे आपलंच बाळ आहे.. आपल्या दोघांचं बाळ आहे.. सासूबाई हा तुमचाच नातू आहे..! या घराण्याचा वारस..! हे सांगून सांगून सीमा थकली... पण या दोघा माय लेकात काडीचा फरक पडला नाही... शेवटी बिचारीने पटवून सांगणे सोडून दिले.. तुम्हाला जे समजायचे ते समजा..! असंच ठाम सांगितलं.. आणि म्हणूनच गणेश शुभम चा दुस्वास करायचा... जवळ गेला की त्याला ढकलून द्यायचा... पण त्याने शुभंमला मारायला कधीच हात वर केला नव्हता... आज पहिल्यांदा त्याने शुभम वर हात उचलला...
सीमाने तो हात वरच्यावर धरला... इतक्या वेळची गुपचूप मार खाणारी सीमा... पण जेव्हा तिच्या लेकराच्या अंगावर हात उगारला... तेव्हा मात्र तिच्या अंगात इतकं बळ कुठून आल कोणास ठाऊक.. म्हणाली माझं काय करायचं ते करा..! पण माझ्या लेकराला बोट जरी लावलं तरी एकेकाचा हात तोडून ठेवीन..! अंगणात रचून ठेवलेल्या सरपणा वरची कुऱ्हाड हातात घेतली तिनं. आणि शुभमला पाठीमागे लपवून रागाने पाहू लागली.. तिचे ते लालभडक डोळे आणि हा असा अवतार शुभंमने पहिल्यांदा पहिला... आपल्या आईचा असा रुद्रावतार बघून तोच घाबरला...
गणेश सुद्धा तिचे हे चंडिकेचे रूप प्रथमच पाहत होता. शुभमला मारले, तर ही चंडिका नक्कीच आपल्या नरडीचा घोट घेईन इतकी भनायक आणि अक्राळविक्राळ रूप दिसत होते तिचे.. तिचे ते रूप पाहून गणेशने शुभमला मारायला उगारलेला हात खाली घेतला...
शारदाबाई शुभम ला कायम एका डोळ्याने बघायची... त्यामुळे सीमा डोळ्यात तेल घालून शुभंम कडे लक्ष ठेऊन असायची... लपून छपुन पैसे ठेवायची... आणि शुभम ला गुपचूप आवडते ते घेऊन द्यायची.. आता शारदाबाईने तर कहरच केला होता... सीमाला जेवण बनवायला लावायची आणि सगळं संपवून टाकायची... रोज असंच करायची... शुभम ला थोडंफार खायला द्यायची... त्यातलं थोडं गपचूप तो सीमाला द्यायचा... म्हणायचा आई थोडंसं घे खाऊन..! दोन घास खाऊन तिचे पोट मात्र भरत नव्हते.. घासातला घास तो..! कसं पोट भरणार..? किती दिवस उपाशी राहणार..? सीमाने आता ठरवले घराच्या बाहेर पडायचे... लोकांची धुनी भांडी करायची... आणि आपले व आपल्या बाळाच्या पोटापाण्याची सोय करायची... निदान कोणी शिळंपाकं तरी खायला देईल... तितकाच पोटाला आधार.. आणि हातात चार पैसे आले, तर शुभंम च्या शिक्षणाची सोय..!
पण शारदाबाई आणि गणेश महा धूर्त... म्हणाले आमची बदनामी करायला... आणि तुला गुलछर्रे उडवायला बाहेर पडायचे आहे... होय ग.. खबरदार घराच्या बाहेर पाऊल टाकलं तर.. पुन्हा या घराचे दरवाजे कायमचे बंद.. बिचारी सीमा गपचूप यांचा अन्याय सहन करत घरात बसली... आता वरून लात आणि खालून बुक्की असे लाजिरवाणे जिणे जगत होती... शारदाबाई सीमा कडून काम मात्र सर्व करून घ्यायची... सर्व करून... जेवण नाही... बिचारी खूप अशक्त झाली होती... तिला ताप भरला... पण डॉक्टरकडे सुद्धा नेत नव्हते... शेवटी शुभमने... रात्री गणेश झोपल्यावर एक दहा ची नोट गुपचूप खिशातून काढली... सकाळी शाळेत गेला... येतांना मेडिकल वाल्याला बोलला
काका माझ्या आईला खूप ताप आहे हो..! माझ्याकडे दहा रुपये आहेत.. यात तापाची गोळी येणार काहो..! मेडिकल वाला जरा दयाळूच होता.. तो म्हणाला नक्की येईल बेटा..! पण आधी तुझ्या आईचा ताप नेमका कशाने येतो.. हे डॉक्टर ला दाखवावे लागेल... शुभम म्हणाला... काका..! डॉक्टरला देण्याइतपत पैसे माझ्याकडे नाही... आणि माझे बाबा आणि आजी ... तिला काहीं झाल तरी डॉक्टर कडे नेणार नाही... जणू ते माझ्या आईच्या मरणाची वाट पाहत आहेत.. काका प्लीज माझ्या आईसाठी काहीतरी करा .. प्लीज..!
ठीक आहे, असे म्हणून मेडिकल वाल्याने क्रोसिनच्या चार गोळ्या शुभंमच्या हातावर ठेवल्या... शुभंमने पैसे देण्यासाठी हात पुढे केला... पण पैसे घेण्याचे धाडस त्या मेडिकल वाल्यात नव्हते... म्हणाले बेटा पैसे नकोत... काहीतरी खायला देऊन मगच तुझ्या आईला गोळी दे... मग त्याने एक बिस्कीटचा पुडा घेतला... पाच रुपये अजून उरले... गपचूप घरात गेला... सीमा तापाने फनफनत होती... गणेश, शारदाबाई कोणीच घरी नव्हते... त्याने आईला बिस्कीट खायला दिले... मग गोळी दिली... आणि पुन्हा तिला आराम करायला लावून बाहेर पडला.... जायच्या आधी त्याने डायरीतून एक नंबर हातावर लिहून घेतला... त्याच्या मामाचा नंबर होता तो... जवळपास गेलो तर आजी किंवा बाबांना खबर लागेल म्हणून... सायकल घेऊन लांब गेला... तिथून मामला फोन केला... मामा घरी नव्हता... फोन मामीने उचलला. आई खूप आजारी आहे... पण आजी आणि बाबा तिच्याकडे दुर्लक्ष करतात... तिला उपाशी ठेवतात... काम मात्र सगळे करून घेतात... मामी मामाला आल्यावर सांग... आणि लवकर पाठव... मामी नाहीतर माझी आई मरून जाईल ग..! मामी प्लीज मामाला लवकर पाठव..
हो नक्की पाठवते...! शुभम तू अजिबात काळजी करू नको... म्हणून मामीने फोन ठेवला... तसाच सायकल जोरात पिटाळून घरी आला... घरात कोणीच नव्हते... आई अंथरुणावर पडली होती... हळूच आईजवळ गेला... म्हणाला आई मी मामाला फोन केला... मामीने उचलला होता... तिला सगळं सांगितलं मी... मामी मामाला उद्याच पाठवते म्हणाली... पण सीमाला माहित होते... आपली वहिनी काही दादाला सांगणार नाही... कारण आई बाबा दोघेही वारले...तेव्हा वहिनीने किती त्रास दिला हे तिला माहित होते... आणि दादा आल्यावर कशी गोडगोड बोलायची, हे तिने अनुभवले होते...
लग्न झालं, तेव्हाच सांगितले होते तिने... सीमा आता तुझा आमचा सबंध संपला... आता तू या घरात पाऊल टाकशील तेव्हा... कोणतंच रडगाणं घेऊन यायचं नाही... खूप चांगलं स्थळ शोधून दिलं आम्ही... आता तेच तुझं घर... सीमा दोनतीन वेळच माहेरी गेली... दादाने विचारले सुद्धा... सीमा खूप अशक्त दिसते ग..! सुखी आहेस न ग..! सीमाला पक्के ठाऊक होते... इथे येऊन पण आपला निभाव लागणार नाही... आणि पदरात एखादं पोर असेल, तर सारंच कठीण..
ती म्हणायची, हो दादा खूप सुखी आहे मी... अरे मागच्या आठवड्यात तब्बेत बरी नव्हती ... म्हणून सुकलेली दिसते तुला..! तू आल्यावर पाहतोच न .... माझी सासू आणि नवरा माझी किती काळजी घेतात ते... कारण दादा यायचा तेव्हा सासू आणि नवरा खूप चांगले वागायचे... त्यामुळे दादाला शंकेला वावच नव्हता...
सीमा मनोमन म्हणाली सुद्धा ... काय देवा एकेकाच नशीब घडवतो तू..! ना माहेरी सुख ना सासरी... इतक्या वेदनेने भरलेले जीवन देण्यापेक्षा जन्मालाच का घालतो... पुन्हा आपले प्रारब्ध समजून गुपचूप बसायची... सीमाचा ताप काही उतरत नव्हता... आणि वरून धुनी, भांडी ही पाण्यातली कामं करून ती खंगुन गेली होती... शुभम ला आपल्या आईची ही अवस्था बघवत नव्हती...
रात्री शुभंम आईच्या बाजूला अंथरून टाकून झोपला... खरंतर त्याला आईच्या कुशीत झोपायचे होते... पण सीमा त्याला म्हणाली.. बाळा मला खूप ताप आहे.. तू थोडं लांबच झोप.. माझं काय बरंवाईट व्हायचं ते होऊ दे..! तुला काही होता कामा नये..! शुभम सीमाला म्हणाला... आई थांब तुझ्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवतो... आणि तो एक फडकं घेऊन ... सीमाच्या डोक्यावर ठेऊ लागला... थोडं अंग थंड झालं.. सीमा शुभंमला म्हणाली... शुभम बाळा... आता मी काही जगत नाही... तुझ्यासाठी तरी देवानं थोडे वर्ष मला जिवंत ठेवावे... असं त्या परमेश्वराला रोज प्रार्थना करते... पण त्याने सुद्धा माझी परीक्षा घायचे ठरवले... आणि आता या आयुष्याच्या परीक्षेत मी साफ नापास आहे.. खरंतर जन्माला आल्यापासून मी सुख असं पाहिलंच नाही... घरची गरिबी... त्यात मुलगी त्यामुळे शिक्षण नाही... दादाला म्हणजे तुझ्या मामाला मात्र चांगले बारावी पर्यंत शिकवले... त्यामुळे तो एका शेजाऱ्यांचा ओळखीने कंपनीत कामाला लागला... मी जेमतेम सोळा वर्षाची असेल... तापाचे निमित्य होऊन माझी आई वारली... मग आधी दादाचे लग्न केले... त्याची बायको खूप कजाग बाई... टोचून बोलून बोलून... तुझ्या आजोबांना जेवायला द्यायची... म्हणायची हे दोघे... म्हणजे मी आणि तुझे आजोबा... खायला काळ अन भुईला भार आहे...
त्यातच बाबांना लकवा मारला ... त्यामुळे त्याचा उजवा हात आणि पाय निकामी झाले होते.. पैसा नाही म्हणून डॉक्टर नाही... आणि तिच्या त्या टोचून टोचून बोलण्याने... त्यानीं अन्न पाणी सोडले... एक दिवस त्यानीं सुद्धा या जगाचा निरोप घेतला... आता काय तुझी मामी सैराट सुटली होती... मामा कामाला गेला, की सगळं काम मला करायला लावायची... संध्याकाळी दादा आला की वन्सं वन्सं करून भरभरून पण कोरडी माया करायची... तुझ्या मामाला वाटायचे, माझी बायको किती चांगली आहे... सीमाचे किती करते... नाटकी नुसती...
दादाला मी खरं कधीच सांगितले नाही... कारण मला भीती वाटायची... मी खरं सांगितलं तर... त्या दोघात भांडण होणार... त्यामुळे गुपचुप सगळं सहन करायची...
एक दिवस तुझ्या मामीच्या नात्यातले कोणीतरी घरी आले... त्यांना मी आवडली... लग्नाची मागणी घातली... पाहिले तेव्हाच मला तुझे बाबा आवडले नव्हते... मी तुझ्या मामीला बोलले सुद्धा... वहिनी मुलगा जरा उनाडच वाटतो... पण मामीने काही ऐकले नाही... दादाला खूप पटवून सांगितले तीने... मुलगा खूप चांगला आहे... शिवाय आमच्या परिचयाचा आहे... शेवटी लग्न झालेच... पण नशिबाने इथेही माझी साथ दिली नाही... मग तू झाला.. .तुझ्याकडे बघून ... तू मोठा होशील... तुला खूप शिकवायचे... चांगली नोकरी लागली की... मग तुझा सुखाचा संसार पाहून... सगळे दुःख विसरणार होते... आणि आनंदाने डोळे मिटणार होते... पण हे सुख सुद्धा माझ्या नशिबात नाही... शुभम बाळा, मला नाही वाटत मी जास्त दिवस जगेन... तू उद्या जरा उशिराने मामाला फोन कर... म्हणजे मामा फोनवर सापडेल... मामीने उचलला, तर ती काही निरोप देणार नाही... दादा इथे आला की मी त्याला सांगते... मी मेल्यावर तुला त्याच्या सोबत घेऊन जायला...
तिथे तू मामीच्या हाताखाली पडेल ते काम कर... पण शाळेत जा...खूप शिक मोठा साहेब हो... मी वरून तारा होऊन तुला रोज पाहत जाईन... तुला जेव्हा माझी आठवण येईल... तेव्हा बाहेर येऊन आकाशात पाहत जा.. जो मोठ्ठा चमकणारा तारा दिसेल, ती तुझी आई.. तू माझ्याशी गप्पा मारत जाशील... मी बोलणार नाही पण सगळे ऐकत जाईन... पण काही झालं, तरी तू इथं राहू नको... इथं तुझं काहीच भविष्य नाही... मामी वाईट असली.. .तरी मामा खूप चांगला आहे... एक लक्षात ठेव, माहित आहे मला हे तुझं खेळायचं बागडायचं वय आहे, पण तुझं पुढचं भविष्य उज्ज्वल करायचे असेल तर... मामीला कामात मदत करणं जरुरी आहे... तुला असंही वाटेल... मामाची दोन मुलं ती काही करत नाही... मग त्याच्या पेक्षा छोटा मी... मी का करू..?
पण एक लक्षात ठेव... जसं मला म्हणाली खायला काळ भुईला भार... तसंच तुलाही बॊलेलं... आपलं भविष्य घडवायचे तर... शब्द रुपी हे घाव तुला सहन करावे लागेल... या आईचे हे स्वप्न पूर्ण करशील न राजा.. खूप शिकून मोठा होशील न..!
खूप बोलून सीमाला थकवा जाणवत होता... म्हणाली, शुभम झोप आता... उद्या मामाला नक्की फोन कर... शुभम झोपी गेला... सीमाला मात्र आपले मरण समोर दिसत होते... ती आता तिचा दादा येण्याची वाट पाहत होती... सकाळ झाली... सीमाला जागेवरून उठवत नव्हते... शुभम शाळेची तयारी करून जायला निघाला... मग त्याने विचार केला, आज शाळेत जातच नाही... सकाळी सकाळी मामा घरी मिळेल... आधी मामाला फोन करू... पण सगळे बूथ बंद होते... सकाळी साडेआठला एक बूथ उघडले... मामाला फोन केला... नशीब बलवत्तर होत... मामाने फोन उचलला.
शुभम... हॅलो मामा... म्हणून आधी रडायला लागला... मग त्याच्या लक्षात आलं... आपल्याकडे पैसे कमी आहेत... मामाशी बोलून नीट सगळं सांगून झालं पाहिजे... डोळे पुसले... म्हणाला मामा तू लवकर ये... आई खूप आजारी आहे... बाबा आणि आजी तिला डॉक्टरकडे पण घेऊन जात नाही... पुन्हा म्हणाला.. मामा... परवा मी फोन केला होता मामीने उचलला होता... मामीने सांगितले नाही का तुला... मामा प्लीज तू लवकर ये... आणि पुन्हा रडायला लागला... फोन चालूच होता.. मामा जोरात ओरडला... सुमित्रा लवकर इकडे ये... शुभमचा फोन आला होता..? ती म्हणाली हो... आला होता... मग मला का नाही सांगितले..? म्हणाली मी सांगायचे विसरली हो... सॉरी...
शुभम चा फोन कट झाला... पैसे संपले होते... बरोबर शाळा सुटायच्या वेळेवर तो घरी आला... कोणाला संशय नको म्हणून... आईला म्हणाला आई ... सकाळीच मामाला फोन केला... येणार बोलला आज.. इकडे मामाने बायकोला चांगले फैलावर घेतले... बॅग भरून दुपारच्या एस टी नें निघाला... सोबत डबा घेऊन आला होता... सीमा डोळ्यात प्राण एकवटून आपल्या दादाची वाट पाहत होती... शुभम आईजवळ बसून होता... गणेश कामाला गेला होता... शारदाबाई बाहेर गेल्या होत्या... इतक्यात दार वाजले.. का कोण जाणे पण सीमाला वाटले तिचा दादा आला... ती शुभम ला म्हणाली... शुभम दिनू मामा आला वाटते .. मला तरी तसाच भास होतो आहे... जा जरा दार उघडून पाहा तरी... शुभंमने बाहेर येऊन ओसरीचे दार उघडले... दारात दिनू मामा पाहून... त्याला घट्ट मिठी मारली.
म्हणाला, मामा आई बघ ना कशी झाली... आणि रडायला लागला... मामाने शुभम ला कडेवर घेतले...
म्हणाला, मी आलो न..! आता काळजी करायची नाही...! सीमा कुठे आहे..? शुभमने खोली कडे बोट दाखवलं... आणि दिनू मामाला घेऊन शुभंम आई जवळ आला... खोलीत अंधार होता... पण चाहुली वरून सीमा म्हणाली... दिनू दादा कारे..! होय सीमा..! तुझा दिनू दादाच आहे.. आणि शुभंम ने खिडकी उघडली... सीमाच्या डोळ्यातून अश्रू गळत होते... दिनू सीमा जवळ गेला...म्हणाला ए वेडाबाई आता रडायचे नाही.. तुझा दादा आला न..! आणि सीमाचे डोळे पुसले... सीमा उठून बसत म्हणाली.. दादा..! आता मी काही जगत नाही... माझी शेवटची इच्छा पूर्ण करशील..?
दिनू म्हणाला, सीमा मी तुला काही होऊ देणार नाही..! चल आपण आत्ताच्या आत्ता तालुक्याच्या दवाखान्यात जाऊ..! हा दादा तुला नाही मरू देणार..! सीमा म्हणाली..! दादा तुझ्या मांडीवर डोकं ठेऊ दे... शेवटची झोप तुझ्या मांडीवर घेते... दिनूने तिचं डोकं आपल्या मांडीवर ठेवलं... आणि तिच्या गालावरून हात फिरवत राहिला...
सीमा म्हणाली, दादा..! आता मी काही जगत नाही... तुझ्याच येण्याची वाट पाहत होते... माझे मरण मी डोळ्याने पाहत आहे... फक्त तुला एक विनंती आहे... माझ्या शुभमला तू तुझ्या सोबत घेऊन जा... इथे त्याचं काहीच भविष्य नाही.. मला वचन दे दादा..! तू त्याला घेऊन जाशील..! दिनूने सीमाचा हात हातात घेतला, म्हणाला... सीमा मी शुभमला पोटच्या पोरा सारखं पाहीन.. तू काळजी करू नको...
सीमा म्हणाली... नाही दादा तुझ्या प्रेमावर शंकाच नाही रे..! पण तुझी बायको..! ती त्याला इतक्या सहज नाही स्वीकारणार... आता तुझी खरी कसोटी आहे... कारण... तुला माहित नाही पण... बाबा केवळ तुझ्या बायकोची बोलणी खाऊन... सुमित्रा वहिनी च्या जाचाला कंटाळून गेले... माझं सुद्धा तिनेच वाटोळं केलं... तिचे हे नातेवाईक म्हणजे माझा नवरा आणि सासू... कसे आहे तिला चांगले ठाऊक होते... पण मुद्दाम माझं लग्न करून दिलं... तू कामावर गेल्यावर खूप त्रास दिला मला... पण तुझ्या सुखासाठी मी गप्प बसली... आता माझ्या मुलाच्या भविष्याचा प्रश्न आहे दादा.. त्याला खूप शिकून मोठ्ठा साहेब करायचं स्वप्न होत माझं.. सारंच संपल आता..! दादा माझ्या शुभम ला पदरात घे..! खूप हुशार आहे तो..! त्याला खूप शिकव..! पडेल ते काम करेल तो.. सुमित्राला सगळ्या कामात मदत करेल ...! शुभम करशील न बाळा या सीमाची ..! तुझ्या आईची..! शेवटची इच्छा पूर्ण...
इतकं लहान मुलं ते... परिस्थितीने खरंच खूप शहाणं झालं होतं... त्याने सीमाचा हात हातात घेतला ... म्हणाला ... आई हा तुझा शुभम .. तुला वचन देतो... काही झालं, तरी... मी खूप अभ्यास करीन..! आई, मी तुझं नाव खूप मोठं करीन..! पण आई तू मला सोडून मरणाच्या गोष्टी नको करू..! मामा म्हणतो न... आपण मोठया डॉक्टर कडे जाऊ.. मामा... जायचे न आपण डॉक्टर कडे.. मामा ने शुभंमला कवटाळले.. हो रे राजा...आपण तुझ्या आईला मोठ्या डॉक्टर ला दाखवू... काही होणार नाही माझ्या सीमाला... फक्त तू बरी हो सीमा... जर तुझं काही बरं वाईट झालं, तर... हा तुझा दीनुदादा या तुझ्या नवऱ्याला आणि सासुला बघ कशी जेलची हवा खायला लावतो की नाही ते...
सीमा म्हणाली. नको दादा... ही माणुसकी नसलेली माणसं... यांना कोर्टात खेचून काय होणार... जेलच नं... पण त्या पायी तुझा पैसा किती वाया जाणार... या कोर्ट कचेरीत... तोच पैसा माझ्या शुभंमला शिकवायला लाव... माझ्या आत्म्याला तेव्हाच शांती मिळेल.. बरं बाई..! चल सीमा.! आता इथे वेळ घालवू नकोयात... शुभम बाळा आईचे दोन लुगडे... आणि तुझे दोन कपडे घे एका थैलीत टाकून ... आपण आत्ताच जाऊ डॉक्टर कडे... सीमा मी येतांना डबा घेऊन आलो होतो..! चार घास खाऊन घे..! अग तुझी हि अवस्था बघून मी विसरूनच गेलो ग..! शुभम आईसाठी पाणी घेऊन ये बाळा..! सीमा म्हणाली नको दादा... आता जेवणाची वासनाच गेली रे..! तोंडाला चवच नाही... तेवढ्यात शुभम म्हणाला... मामा आज सहा दिवस झाले... आईच्या पोटात कणभर पण अन्न नाही... काम मात्र सगळेच करायला लावतात... मामा माझ्या आईला हे लोक जेवायलाच देत नव्हते.. पुन्हा रडवेला चेहरा करून म्हणाला...
मामा तू लवकर का नाही आला..? आता आलो न बाळा..! सगळं नीट होईल.. दिनूने आपली शिदोरी काढली... आणि सीमाला एक घास भरवायला घेतला... सीमा आ करायचा प्रयत्न करत होतीच... तेवढ्यात तिचे डोळे गरगर फिरायला लागले... छातीची धडधड वाढली... दिनूने तसाच घास खाली ठेवला... चमच्याने पाणी पाजायला घेतले... तोंडातून पाणी दोन्ही बाजूने खाली आले... सीमाची प्राणज्योत मावळली... दिनूने तिच्या डोळ्यावरून हात फिरवून डोळे बंद केले...
तेवढ्या शारदाबाई घरात शिरल्या... अनोळखी चप्पल दारात बघून जरा थबकल्या... थोडं पुढं आल्या तर शुभंमचा आणि अजून एका कोणाच्या रडल्याचा आवाज आला ... लगोलग घरात गेल्या... शुभम आणि दिनू दोघे रडत दिसले... ती कळून चुकली... सीमा आता या जगात नाही... सीमा जवळ जाऊन जोरात हंबरडा फोडला... आणि जोरजोरात रडायला लागली... खूप चांगली होती माझी सीमा..! इतके औषध पाणी केले..! काहीच गुण आला नाही..! देवा माझ्या सीमाच्या जागी मला का नाही नेले रे.. माझी सीमा.. कशी आम्हाला सोडून गेली ग..! या लहान लेकराचा तरी विचार करायचा न..! सीमा तुझ्या विना हे घर, घर नाही ग..!
इतक्या वेळचा गप्प असलेला दिनू, सीमाचा भाऊ म्हणाला... खबरदार...! या पुढे एक अक्षर बोललात तर..! जीभ कापून हातात देईन..! नाटकी नुसती..! तू आणि तुझ्या नालायक पोरानं माझ्या बहिणीचे काय हाल केले... हे शुभमने फोनवर सांगितलं मला.. तसाच लगोलग निघालो... आज मी आलो नसतो, तर... तुम्हा माय लेकाचे कारनामे मला कधीच कळले नसते... सुमित्रा, माझी बायको ती सुद्धा यात सामील होती... हे ही कळले मला ... तिला तर मी बघून घेइनच..! तेवढ्यात गणेश कामावरून आला... त्यानेही असेच नाटक करायचा प्रयत्न केला... दिनूने त्यालाही गप्प बसवले...
शेजाऱ्याच्या मदतीने सीमा चे क्रियाकर्म केले... लहानग्या शुभमने आईला अग्नी दिला... तेव्हा ते पोरं... ओरडून ओरडून सांगत होते... माझ्या आईच्या अंगावर इतके लाकडं का ठेवता... काढा ती लाकडं... आधीच आजी आणि बाबाने तिला खूप मारलं..! आता तुम्ही का ही लाकडं ठेवता..! माझी आई खूप दिवसाची उपाशी आहे..!आधी तिला जेवायला द्या..! मामा आईला खूप भूक लागली होती..! तिला जेवायला द्या..! प्लीज ती लाकडं काढा..! आई..! आई..!
दीनु मामा ने त्याला जवळ घेतले... म्हणाला बाळा तुझी आई देवाघरी गेली... आता ती आकाशात तारा होऊन तुला रोज बघेन.. चल आपण आईला अग्नी देऊ.. त्याच्या हातात जळतं लाकूड देऊन... त्याला त्या सरणा जवळ नेले... आणि त्याचा हात पुढे केला... सरणा जवळ हात जाताच तो जोरात कींचाळला.. नका माझ्या आईला चटके देऊ..! खूप आग होणार तिच्या अंगाची..! एकदा आजीने चुलीतलं जळक लाकूड तिच्या हाताला लावलं होत..! खूप भाजलं होत तिला.. मी ...मी.. फुंकर मारत होतो... माहित आहे तेव्हा आई काय म्हणाली..? शुभम तुझी फुंकर न...औषधीच काम करते..! थांबा..! थांबा.. माझ्या आईला चटका देऊ नका..!
मग दीनुमामाने त्याला जवळ घेऊन ... जळत्या लाकडाचा हात त्या सरणाला लावला.. सरण पेटलं... शुभम दुरूनच आपल्या आईच्या जळत्या सरणाला हळूच फ़ुंकर मारत होता... म्हणत होता .. आई... खूप आग होते का ग.. बघ मी फुकर घालतो..! आई तू म्हणतेस न..! शुभंम तुझी फुंकर म्हणजे थंडगार औषध. आई फार आग होत नाही न गं... आई... ये ...आई... बोल ना ग.. शुभंमचे बोल एकूण उपस्थित सगळेच हुंदका देत... डोळ्याच्या कडा पुसत होते.. शुभम आकाशात सर्वात मोठा तारका कुठे दिसतो का पाहत होता....
समाप्त.
सौ प्रभा कृष्णा निपाणे, कल्याण. कृपया कथा माझ्या नावानेच शेअर करावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा