खूप दिवसांनी पक्याचा फोन. नाक्यावर भेट, सत्याच्या भेळ कट्यावर..सगळेच येतोय.
सलग तीन दिवस सुट्टी आली होती. घरात जाम सडलो होतो. मॅच ,वेब सिरीज सगळ पाहून झालं..पोटभर झोप काढून झाली, चवीचवीच खाऊन झालं...तरी कंटाळा आला होता.
आत्ता पक्याचा फोन आला आणि अंगात एकदम तरतरी आली...
बायकोला सांगून निघणार इतक्यात छोटी चिमणी आडवी आली.."बाबा , तू आज मला बागेत नेणार होतास आता नको जाऊ बाहेर."
" नेक्स्ट संडे जाऊ नक्की..". हे मी म्हणताच क्षणी भला मोठा भोंगा सुरू झाला.
मग बायको आडवी आली, " कशाला चिमुला उगाच प्रॉमिस करतोस..आज मला पण बाहेर पाणी पुरी खायला घेऊन जाणार होतास..दोन दिवस झाला ना आराम.. साड्यांच्या एक्झिबिशनला पण घेऊन जाणार होतास."
" नेक्स्ट संडे नक्की."
" गेले महिना भर हेच सांगतोय तू " डोळे वटारून बायको करवादली, बॅकराऊंड ला भोंगा सुरूच होता .
" आम्ही मित्र किती दिवसांनी भेटत आहोत ग"
" मॅच पाहायला आत्ता दहा दिवसांपूर्वी एकत्र जमला होता ना".
बाकी कुंडली बाहेर यायच्या आत वटारलेले डोळे आणि चिमणा भोंगा दोन्ही कडे दुर्लक्ष करून मी पळ काढला.
भेळ कट्यावर आलो..सत्या भेळेच्या दुकानात गिऱ्हाईक सांभाळत होता. बाहेरून मी तोंडाने " टॉक" आवाज करून त्याला बोलवलं..
" बस कट्यावर...येतो अर्ध्या तासात."
मी एकटाच लवकर आलो होतो. अजून कुणी चांडाळ जमले नव्हते. मी सुकी भेळ घेऊन आलो .. मनात सत्या दिवसाला कसा आणि किती छापत असेल याचा हिशोब मांडत बसलो.
सुट्टी मुळे दुकान भरलेले होते. सत्या, त्याचा भाऊ आणि बापू फुल खपत होते.
इतक्यात एक आज्जी आजोबा आले. आजोबांचे वय अंदाजे ७० आणि आजी चे वय ६५ असावे.
आजीला त्यांनी दुकानाच्या गर्दीत न बसवता माझ्या इथे मोकळ्या कट्ट्यावर बसवले.
"बाळा, मी आत जाऊन भेळ सांगून येतो.जरा हिच्या कडे लक्ष ठेवशील का ?".
" हो ..या.." इती मी.
मनात विचार आला .. वा ! काय हौस आहे भेळ खायची आजी आजोबांना....इथे आपण बायकोला अजून टांग मारतो.
आजी शून्यात बघत बसल्या होत्या.चेहरा एकदम निर्विकार. आजोबा आले आणि आजीशी गप्पा मारायला लागले.पण आजीच्या चेहऱ्याची रेष हालेल तर शपथ..
" आज त्याला सांगितलं आहे दाणे घालू नको तुला त्रास होतो ना चावायला, जास्त कोथिंबीर , जास्त शेव पण घालायला सांगून आलोय. येईलच सत्या भेळ घेऊन हा." आजोबा आजीच्या हातावर थोपटत बसले.पण आजी एकदम फ्रीझ मोड मध्येच.
तितक्यात मिल्या आणि विक्या आले. ..एकेक कट्टींग मागवून आमच्या गप्पा सुरू झाल्या.
सत्यशील छोट्याशा द्रोणात भेळ घेऊन आला ती त्याने आजोबांना दिली , त्यांना वाकून नमस्कार केला, "आजी भेळ खाऊन आवडली का सांग ग "असं काही बोलून आम्हाला जॉईन झाला..
सत्या कस्टमर शी इतकी सलगी का दाखवत होता हे आम्हाला समजलच नाही.सत्याच हे रूप आम्हाला नवीनच होतं. खुणेनी मी," त्याला काय हे ?" अस विचारलं तेव्हा आई आली की सांगतो म्हणाला मग आम्ही पण जास्त विचारत बसलो नाही.
आमच्यात सगळ्यात अतिशहाणा मिलिंद होता.. चहा पित फिदी फिदी हसत म्हणाला, " काय राव आजोबा रोमँटिक आहेत, दोघं एका द्रोणात भेळ खात आहेत."
सत्या नी त्याला जोरात चिमटा काढून गप केलं. पण आजोबांनी ऐकलं. आणि त्याला जवळ बोलावलं.
" बाबा करायच्या वेळी रोमान्स केला असता तर काय हवं होतं रे, आज ही वेळ कदाचित आलीच नसती.पण एक लक्षात ठेव आपल्याला माहीत नसेल तेव्हा आपण काही बोलू नये."
मिलिंद एकदम वरमला. आजीच्या नजरेतला तो निर्विकार भाव पाहून मिल्या अस्वस्थ झाला.
मिल्यानी माफी मागितली.आणि आमच्या कंपूत सामील झाला.
सत्यानी आणि मी मिलिंदला चागलं झापल.तितक्यात सत्याई सत्याच्या बापूला घरचा चहा घेऊन आली.प्रेम करण्यात या बायकांचा हात कुणी धरू शकत नाही, भेळेच्या दुकाना शेजारी चहाची टपरी आहे पण सत्याई बापू ला घरचाच चहा आवडतो म्हणून घरून चहा करून आणते.
सत्याच्या आई ला आम्ही सात्याई म्हणत असू.सत्यानी आईला हाक मारली आणि त्या आजी आजोबांची गोष्ट आम्हाला सांगायला सांगितली.
मग सत्याई नी जे सांगितलं ते सगळ अचंबित करणारं होतं. आजोबांचं नाव अविनाश भोळे..नाव ऐकून आम्ही एकदम चमकलो. भोळे कंपनीच्या उदबत्ती,धूप, लोबान आजही घराघरात वापरले जात होते. आमच्या लहानपणा पासून आम्ही घरात "A.B." कंपनीच्याच उदबत्या वापरल्या आहेत.ते हे भोळे ?
सत्याई सांगत होती..
भोळे आजोबांचा एक तेव्हा छोटासा धंदा होता. आजोबांचं लग्न उषा आजीशी झालं आणि आजोबांना त्यांच्या धंद्यात एकदम यश मिळायला लागलं. कामानी आणि यशानी एकदम वेग घेतला.लग्नानंतरचे नवतीचे दिवस फुलपाखरू बनून उडून गेले. सुरवातीला आजीला आजोबा जमेल तसा वेळ द्यायचे. पण हळू हळू सगळं बदलत गेलं. आजोबांना कामाची, यशाची , पैशाची झिंग चढत गेली. बघितलं तर सगळ आलबेल होत लक्ष्मी घरी पाणी भरत होती. सुबत्ता होती, पण सगळ गोड असून कसं चालेल ना यात वाईट एकच गोष्ट अशी होती की आजीची कुस उजवत नव्हती.आजी या दु:खात होती आणि आजोबा पण कामात खूप गुंतत गेले होते. त्यांनासुधा या गोष्टीची खंत होती पण ते कामात मन गुंतवून घेत होते. आजी मात्र हा मानसिक त्रास एकटी सहन करत होती.
आजी मनापासून आजोबांचं सगळं करायची. खाण्या पिण्याच्या वेळा, आवडी निवडी. पण आजीला पण काही इच्छा असतील, ती मातृसुखा साठी आसुसलेली आहे मनानी कष्टी आहे तिला पण काही हवं नको पाहायला हवं,वेळ द्यायला हवा हेच आजोबा विसरले होते. आणि एक दिवस चमत्कार झाला आजीला बाळाची चाहूल लागली. आजीला वाटलं आता तरी आजोबा वेळ देतील पण आता आजोबांना कामापुढे काही सुचत नव्हते.
घरी काळजी घेणार मोठं कुणी नव्हत एक मुलगी त्यांनी आजीची काळजी घ्यायला सोबत आणून ठेवली होती.पण आजीला आजोबांची गरज होती.आजोबा म्हणायचे आता छोटे भोळे येतील तर व्यवसाय अजून वाढवूयात. ते सतत काम काम काम हाच जप करायचे .यातच आजीला सतत आंबट चिंबट खायचे डोहाळे लागले..सोबतीची मुलगी हवं ते बनवून देई.पण एक दिवस आजी नी हट्ट केला की तिला बाहेरचीच ओली भेळ खायची आहे..
आजोबा म्हणाले घरी बनवून खा, आजी म्हणाली नाही खाणार ,आजोबा म्हणाले घरी आणून देतो ,आजी म्हणाली तशी नाही खाणार आपण सोबत जाऊन एकाच ताटलीत बाहेरच खायची...महिना झाला आजीला आजोबा आज जाऊ उद्या जाऊ करत होते.
एक दिवस आजी हट्टाला पेटली. रड रड रडली.. नाही नेलं आज तर आत्ताच गावी जाईन ,परत येणार नाही म्हणाली
.हे शस्त्र उपयोगी ठरलं.
आजी एका संध्याकाळी गजरा माळून , सजून धजून तयार राहिली पण आजोबा आलेच नाहीत. आजीनी कामाच्या ठिकाणी टेलिफोन केला तर आजोबा मीटिंग घेत आहेत असं कळलं. डोहळतुली बाई काही वेळा हळवी होते,काही वेळा चिडचिड करते .तिच्या मनाचे कल बदलत असतात.
आजोबा सांगून पण आले नाहीत याचा आजीला खूप राग आला..तिरीमिरीत आजी उठली आणि भलं थोरल पोट घेऊन निघाली आणि उंब्र्याला अडकून पडली...
आणि क्षणात सगळ बिनसलं..आजी मरणाच्या दारातून परत आली..पण येणारा नवा जीव यायच्या आधीच देवाला प्यारा झाला . याचा आजीला भयानक मानसिक धक्का बसला. ती पडली तेव्हा डोक्याला वर्मावर मार बसला त्यामुळे की बाळ गेलं हा मानसिक धक्का बसून माहीत नाही पण आजी ही अशी झाली .तिची अनेक गोष्टीची पार ओळखच पुसली गेली देव ,यांत्रिक मांत्रिक, डॉकटर सगळं झालं पण आजी अशी निर्जीव झाली ती आज पर्यंत .
आजोबा या गोष्टीमुळे खूप हादरले..या सगळ्याला त्यांनी स्वतःला जबाबदार धरलं.
चाळीस वर्षापूर्वीचा तो दिवस आणि आजचा दिवस आजोबा आजीला महिन्यातून एकदा तरी भेळ खायला घेऊन येतात त्यांना वाटत कधीतरी भेळ खाऊन तिला जुनं काही आठवेल. तिला आपण आठवू ,तिचा सगळा राग ती बाहेर काढेल.आजही ते म्हणतात देव मला इतकी शिक्षा देणार नाही...तिला एकदा तरी मी आठवेन.
आजोबांकडे बघितल तर आजोबा आजीला प्रेमाने एकेक घास भरवत होते.
" सत्याई तुला कसं माहीत ग हे सगळं ? " विक्यानी विचारलं.
"अरे आजीला सोबतीला जी मुलगी ठेवली होती ना ती मीच होते. हे सगळं माझ्या डोळ्या समोर घडलय."
आम्ही सगळे वेगळ्याच मूड मध्ये गेलो होतो..मला एकदम तो चिमणा भोंगा आणि माझं वटारलेल्या डोळ्यांच प्रेम आठवलं..
" चल यार, मी निघतो चिऊला बागेत आणि हिला पाणी पुरी खायला घेऊन जायचं आहे."
आजी आजोबापण भेळ खाऊन निघाले..सत्या आणि मी पटकन त्यांना आधार देऊन त्यांच्या गाडीपाशी सोडायला आलो.तितक्यात सत्याई नी एक चाफ्याच फुल आणून आजीच्या अंबड्यात खोचलं .चाफा चाचपत आजी पहिल्यांदा एकदम गोड हसली.आजोबा पण त्यामुळे खुश झाले.
दोघं गाडीत बसताना आम्हाला म्हणाले, " मुलांनो तरुण आहात एक सांगतो ऐका, वेळेला जपा..आज करायचं ते आजच करा..एकदा का वेळ गेली की गेली.. मग आयुष्यात येतो फक्त यांत्रिकपणा आजीकडे बघत आजोबा म्हणाले.ओली भेळ कशी लगेच खाण्यात मजा नंतर ती चिवट होऊन जाते..मला हे समजलं तेव्हा खूप उशीर झाला होता . म्हणून सांगतो आयुष्यात योग्य वेळीच प्रत्येक गोष्टीला न्याय द्यायला हवा.उद्याची खात्री द्यायला आपण देव नाही..कायम आज मध्ये जगा.चला निघतो उषा दमली असेल आता."
हे ऐकून डोळ्यात पाणी का जमा झाले समजलेच नाही..पण सगळ्यांना बाय करून मी सुसाट वेगाने घरी निघालो.
संग्रही: श्रुती मुंदडा (काबरा)
रमा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा