गोरेगाव स्टेशन आलं तशी शारदा उठून दरवाजात गेली. 'बरं झालं, लक्षात आलं. नाही तर नेहमीच्या सवयीनं बोरिवलीलाच उतरले असते. दरवाजात पाय पसरून बसलेल्या कामाठी बायकांना पाहून तिच्या डोक्यात तिडीक गेली, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून ती दरवाजाच्या मधल्या दांड्याला धरून उभी राहिली. किती दिवस झाले.. आज जाऊ, उद्या जाऊ म्हणून राहूनच जातंय. देसाई मॅडम काय म्हणत असतील? देसाई मॅडम जरी शारदाच्या बॉस असल्या तरीही तिच्याशी त्यांचं नातं मैत्रीचं होतं. तिच्याशीच नाही तर इतरांशीही. वर्षच झालं असेल त्यांना आपल्या ऑफिसात येऊन, पण किती पटकन मिसळल्या त्या सर्वांमध्ये! आता नाही ते संकट आलंय बिचार्यांवर, एकुलत्या एका मुलाच्या लग्नासाठी कधी नाही ते महिनाभराची रजा टाकली त्यांनी आणि लग्नानंतर अवघ्या चार दिवसांनी मोठा अपघात झाला त्यांचा आणि त्यांच्या यजमानांचा. खरं तर शारदालाही आमंत्रण होतं लग्नाचं, पण काही कारणानं तिला गावी जावं लागलं होतं आणि तिचं लग्नही चुकलं होतं. गावाहून येतेय तो ही भयानक बातमी ऐकून जिवाचा थरकाप झाला. स्कुटरचा अपघात म्हणजे गंभीर असण्याचीच शक्यता जास्ती.
इतक्या सज्जन, परोपकारी बाईवर दैवानं असा घावा घालावा? तशा खंबीर आहेत म्हणा त्या. पेलतील सारं समर्थपणे. बाहेरही पडतील यातून. त्यातून घरी मुलगा, सून आहे. गाठीशी मुबलक पैसा आहे. गाडीत चढणार्या बायका अंगावर यायच्या आत शारदेनं प्लॅटफॉर्मवर झेप घेतली. गाडीच्या गतीशी आपली गती साधत! समोरच्या माणसांना चुकवत, नागमोडी वळणं घेत आता ती स्टेशनबाहेरच्या रस्त्याला लागली. खरं तर गावाहून येऊनही तिला आठवडा झाला होता. इतके दिवस तिला जाणं शक्य झालं नसतं असं नाही पण उगाचच ती ते टाळत होती. पुढे ढकलत होती. खरं तर स्वतःच्याच मनाला जपत होती. देसाई मॅडमना आणि त्यांच्या यजमानांना अशा अवस्थेत पाहून तिला पुन्हा ते कठीण दिवस आठवणार होते आणि तेच नको होतं तिला. आता कुठं ती या सार्यातून बाहेर येत होती. शारदाचा उभा जन्मच आडव्या माणसांचं करण्यात गेलेला. ती दहावी झाली आणि आईला कॅन्सर झाला. तिच्या दुखण्यात सातआठ वर्षे गेली. लग्न होऊन ती सासरी आली आणि दोनतीन वर्षांतच सासर्यांना अर्धांगवायूचा झटका आला. मग ते आजारी. नंतर सासूबाईंना कुठलासा मसल्सचा रोग झाला आणि त्यात त्या आडव्याच झाल्या. सासरे गेले पर सासूबाई मात्र सतरा अठरा वर्ष अंथरुणात होत्या. आधी आधी उठून तरी बसत. सरकत सरकत बाथरूमपर्यंत जात. पण नंतर नंतर तर सारंच अंथरुणात. अगदी शेवटपर्यंत.
सासूबाईंबरोबर काही वर्षांनी जेव्हा सुधीर अंथरुणाला खिळला, तेव्हा मात्र शारदेचा धीर सुटला. देवानं परीक्षा तरी किती घ्यावी एखाद्याची? नोकरीही सोडता येण्यासारखी नव्हती. पैसा तर घरी यायलाच हवा होता.
चालत जायचं असं ठरवलं असतानाही शेवटी गर्दीला कंटाळून तिनं रिक्षा केली. रिक्षात बसताना देसाई मॅडमना त्या अवस्थेत पाहायचं या कल्पनेनंही तिच्या छातीत धडधडू लागलं. कधीकधी स्वतःच्या दुःखाचा पहाड माणूस सहज झेलतो. पण दुसर्याचं दुःख पाहताना मात्र वेगळीच धडकी भरते. तसंच तिचं झालं होतं.
अपघातात देसाई मॅडमचा एक पाय तर गेलाच होता, पण माकडहाडाचंही फ्रॅक्चर झालं होतं. जवळजवळ तीन ऑपरेशन्स करावी लागली होती. मिस्टर देसाईच्या पाठीच्या कण्याचीही दोन ऑपरेशन्स करावी लागलेली. त्यांच्या उभं राहण्याची शक्यता खूपच कमी होती.
मिस्टर देसाईंना शारदानं पूर्वी पाहिलं होतं. उंचापुरा आणि करारी व्यक्तिमत्त्वाचा हा माणूस. देसाई मॅडम नेहमीच त्यांच्या स्वावलंबी आणि शिस्तबद्ध स्वभावाचे गोडवे गात. असा हा माणूस परावलंबित्व इतक्या सहजी स्विकारेल?
कायम अंथरुणावर असलेल्या माणसाची अगतिकता शारदानं अनेक वर्ष पाहिली होती. मी मी म्हणणारी माणसं कोलमडतात. सकारात्मक दृष्टिकोन वगैरे बोलणं ठीक असतं पण प्रत्यक्षात असं आयुष्य म्हणजे एक शापच असतो आणि हा शाप फक्त त्या माणसालाच नाही तर सार्या घरादाराला असतो.
शारदा या सार्यातून गेली होती. सासूबाई आणि नवरा दोघं एकाच खोलीत समोरसमोरच्या बेडवर आडवे. मध्ये पडदा. तीनच खोल्यांची जागा. हॉलमध्ये येणाराजाणारा. पेशंटला आराम मिळावा. सर्वांसमोर बेडपॅन, अंग पुसणं वगैरे नको म्हणून दोघांची सोय एकुलत्या एक बेडरूममध्ये. दिवसभराला एक बाई होती आणि रात्रीच्या वेळी शारदा. ऑफिस करून ही जागरणं खूप जड जायची तिला. पण दोन्ही वेळा माणूस ठेवणं परवडणारही नव्हतं. हॉस्पिटलायझेशनमुळे सार्या सुट्ट्या संपलेल्या. मग ऑफिसमध्ये कन्सेशन्स घेऊन सुधीरला डायलेसिसला नेणं. आणणं. सासूबाईंना फिजिओथेरपिस्ट. सगळ्यांबरोबर वेळा जुळवून घेणं वगैरे वगैरे. हे सारे शारीरिक कष्ट निदान सहन करण्यासारखे तरी होते, पण मानसिक त्रास? कधी सुधीरला जेवण नको व्हायचं तर कधी सासूबाई औषधं फेकून द्यायच्या. सारंच तापदायक!
दोघांच्या दुखण्यानं शंतनुच्या आयुष्यालाही ग्रहण लागलेलं. चांगला शिकला सवरलेला, देखणा मुलगा. वधूपक्षाच्या यादीत पहिला नंबर पटकावेल असा. पण या अशा परिस्थितीमुळे त्याला मुलीकडूनच नकार यायचे.
सिग्नलला रिक्षा थांबली. बाजूला फुलांनी मढवलेली कार होती. त्यात नववधूच्या वेषात एक मुलगी होती. बहुधा ब्युटीपार्लरमधून हॉलवर जात असावी. तिच्याकडे बघून शारदाला राधिका आठवली. अशीच गोरीगोमटी आणि नाजूक. शंतनूला शोभेशी. त्याच्या ऑफिसात होती. शंतनूनं आपल्या मित्राच्या लग्नात शारदाला दाखवलेली. तिला पाहून शारदाही खूश झाली होती. लव्ह मॅरेज म्हणजे नकाराचा प्रश्नच नाही, तिला वाटलं.
''बरं झालं शंतनू. तुझं तूच जमवलंस ते.''
''आई, अगं अजून कशात काहीच नाही गं. तुला पसंत असेल तर पुढे जायचंय आणि ते कामही तूच करायचंस.'' शंतनु या बाबतीत जरा मागासलेला होता. कदाचित इतके नकार पचवून न्यूनगंडही निर्माण झाला असेल मनात.
''तिला थोडी तरी कल्पना आहे का?'' शारदा परत चिंतित झाली.
''मुळीच नाही. तू बोलशील का तिच्या आईशी?''
''अरे, पण तिचं कुठं जमलेलं असेल तर?''
''नाहीये पण, मी तेवढं कन्फर्म केलंय.'' शंतनूची अधीरता ती समजू शकत होती. नुकतंच एकतिसावं वर्ष संपवून बत्तिसावं लागलं होतं.
रिक्षाला कचकन ब्रेक लागला आणि विचारशृंखला तुटली. रिक्षासमोर एक आजोबा आले आणि त्यांना वाचवण्यासाठी रिक्षावाल्यानं जोरात ब्रेक दाबला. शारदा मीटरवर चांगलीच आपटली. पण आजोबांना वाचवलं म्हणून तिनं रिक्षावाल्याला दुवाच दिल्या. आणि पुन्हा रिक्षाबरोबर तिची विचारशृंखलाही चालू झाली. शंतनूबरोबर राधिकाला मागणी घालायला तिच्या घरी गेली तो दिवस तिला आठवला. खरं तर अंथरुणाला खिळलेल्या माणसांना पाहून आपण दुःखी होतो. पण त्या दिवशी तिनं राधिकाकडे आपल्यासारखीच परिस्थिती पाहिली आणि ती मात्र खूश झाली.
राधिकाचे आजोबा आणि बाबा आजारी होते. राधिकाला या वातावरणाची चांगलीच सवय असणार. आपल्याला समजून घेऊ शकेलं ती. इथे शंतनूचं नक्कीच जमेल. शारदाला वाटलं. त्या आजारी वातावरणाचा सुखदसा शिडकावा तिच्या मनावर शिंपडला गेला.
राधिकाच्या आईशीही शारदाचं चांगलंच जमलं. समदुःखी माणसांची पटकन मैत्री होते. दोघींनी एकमेकींना समजावून घेतलं. मनातल्या मनात नातं पक्कंही केलं. पण राधिकाचा चेहरा मात्र वेगळीच भाषा बोलत होता.
घरी परतताना शंतनू खूप खुश होता. पण शारदाच्या डोक्यात मात्र चिंतेचा किडा वळवळत होता. एक स्त्री म्हणून तिनं राधिकाला जास्त चांगलं ओळखलं होतं का?
दुसर्याच दिवशी राधिकाचा फोन खणखणला, 'काकु, संध्याकाळी जॉगर्स पार्कमध्ये भेटाल?'' शारदेच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
''आणि हो, एकट्याच या प्लीज. शंतनूसमोर बोलणं जड जाईल मला.''
आजपर्यंत बर्याच मुलींनी त्याला वेगवेगळ्या कारणांनी नकार दिला होता. पण त्याचं खरं कारण शारदाला पक्कं ठाऊक होतं. आता ही कोणतं कारण देणार आहे?
'चला काकू, हॉटेलात बसून कॉफी घेऊया का?' शारदाला साधारण कल्पना आली होती. मनाचा दगड करून ती तिच्याबरोबर गेली.
''काकु, म्हणजे असं आहे ना...'' एवढी ठरवूनही राधिकाला अडखळायला झालं.
''राधिका, जे वाटतं ते मनमोकळेपणानं बोल. मला साधारण अंदाज आलाय पण तरीही तुझ्या तोंडून ऐकू दे.''
''काकु, काल आमचं घर पाहिलंत ना. अगदी तुमच्या घरासारखीच परिस्थिती आहे. पण खरं सांगू? या आजारीपणाचा, त्या वातावरणाचा ना अगदी कंटाळा आला आहे. माझ्या घरातली ही परिस्थिती मी बदलू शकत नाही. पण जर लग्न होऊन मी घराबाहेर जाणारच आहे तर परत अशाच घरात जाणं नको वाटतंय मला.''
शारदानं डोळे मिटून घेतले आणि हुंदका आतल्या आत दाबला. ते पाहून राधिकाला कसंतरीच झालं.
''सॉरी हं, तुम्हाला दुखवलं मी.''
''छे! नाही गं! उलट तू स्पष्टपणे खरं कारण सांगितलंस ना ते भावलं मला.''
''खरं तर शंतनू खूप चांगला मुलगा आहे. स्थळ म्हणून विचार केला तर! पण हा काही प्रेमविवाह नाही. निदान माझ्या दृष्टीनं तरी. आणि जे लग्न ठरवून केलं जातं त्यात भावनेपेक्षा वास्तवाचाच जास्त विचार लागतो हो ना?''
''तू अगदी बरोबर बोलते आहेस राधिका.''
आता दोघींच्याही बोलण्यात जरा मोकळेपणा आला होता. एखाद्या मैत्रिणीशी बोलावं तसं राधिका बोलत सुटली होती. तिचं बोलणं शारदाला पटत होतं कारण ती स्वतः या सर्व अग्निदीव्यातून गेली होती, जात होती.
''काकु, तुम्ही फक्त आमची आताची परिस्थिती पाहिली आहे. पण माझ्या लहानपणापासूनच आमच्या घरी आजारपण आहे. आधी आजी, मग आजोबा आणि आता बाबा. शिवाय मी पाचवीत असताना माझा भाऊही कॅन्सरनं गेला.''
हे सर्व ऐकून शारदाला खूप वाईट वाटलं.
''तुझं मन मी समजू शकते राधिका. मी आपली माझ्या मुलाच्या सुखासाठी आशेवर होते. फक्त एक सुचवणार होते. हवंतर तुम्ही दोघं वेगळे राहा ना. आपण दुसरी जागा बघू तुमच्यासाठी.'' शारदानं शेवटचा खडा टाकला.
''न... नको काकु. मी एकत्र कुटुंबात राहणार. मला नाही आवडत दोघांनीच वेगळं राहणं आणि त्यातून या कारणासाठी वेगळं होणं तर मला अजिबात नाही पटत.''
आता मात्र शारदाचं बोलणंच खुंटलं. राधिकाचे एकत्र वुत्र्टुंबाचे विचार ऐकून मात्र तिला तिचं कौतुक वाटलं. आपल्या डोळ्यांवरील स्वार्थाचा पडदा दूर करून न्यायदृष्टीनं विचार केला तर राधिकाचं म्हणणं काही चुकीचं नव्हतं. शेवटी तिलाही स्वप्न पाहण्याचा, आपलं आयुष्य आपल्या इच्छेप्रमाणे व्यतीत करण्याचा अधिकार होताच की!
राधिकाचा नकार पचवणं शंतनूला खूप जड गेलं होतं. नंतर मुली बघणंही टाळू लागला होता तो. पुढे राधिकानं नोकरी बदलली आणि शंतनू हळूहळू या सर्वांतून बाहेर आला. सुधीर गेल्यापासून चार मुली सांगून आल्या होत्या त्याला. त्यातली मानसी पोतदार आवडली होती शारदाला. त्या संदर्भतच ती गावी गेली होती. कुलदेवतेचा कौल घ्यायला. शंतनूलाही मनवायला हवं होतं. काही केल्या त्याच्या लग्नाचा विचार तिच्या डोक्यातून जात नव्हता.
इंद्रधनू अपार्टमेंटसमोर रिक्षा थांबली. बेल वाजवण्यापूर्वी सारं काही धैर्यानं पाहता यावं म्हणून तिनं डोळे मिटून एक दीर्घ श्र्वास घेतला. देसाई मॅडमच्या मुलानं दरवाजा उघडला. त्याला पाहून शारदेच्या पोटात गलबललं. खरं तर हनिमून साजरा करून एव्हाना परतणार असता हा!
शारदा आत गेली. एक प्रकारचं दुःखाचं सावट जाणवलं तिला त्या वास्तूत. खरं तर अजून डोळ्यांनी काहीच पाहिलं नव्हतं. तरी दुःखाच्या, वेदनेच्या लाटा त्या वास्तूत भरून राहिल्या आहेत असं जाणवलं तिला. माणसांच्या मनातील भावरंगांचा आसमंतात वावर असतो हे पटतं अशा वेळी.
मुलानं त्यांना दबक्या पावलांनी बेडरूममध्ये नेलं. देसाई मॅडम झोपल्या होत्या. दुसर्या दिवाणावर मिस्टर देसाई झोपले होते. त्यांना न उठवता त्यांचा मुलगाच बोलत बसला शारदाशी. अपघाताची हकीकत सांगून झाल्यावर म्हणाला, ''एक मुलगी सकाळी येते आणि एक रात्री, पण आज सकाळच्या मुलीची रजा आहे. बहुतेक लग्न ठरतंय तिचं. मग दुसरी मुलगी शोधायची.''
''मला कल्पना आहे रे. या सर्वांतून गेलेय मी.'' त्याला धीर देत शारदा म्हणाली.
''तसं आता आम्ही दोघंही घरी आहोत म्हणा. लग्नासाठी घेतलेली रजा वाढवून घेतली आहे. नंतर मात्र कसं होणार याचीच धास्ती वाटतेय.'' मुलगा खूपच समजूतदार वाटत होता.
शारदाला वाटलं, खरंच काय दैव असतं नाही? ध्यानीमनी स्वप्नीही नसेल याच्या की आपल्या आयुष्यात असं काही संकट आगंतुकपणे येणार आहे. तेही थोड्या दिवसांसाठी नाही तर कायमच्या वास्तव्यासाठी! हा तर रक्ताचा मुलगा.. पण ती बिचारी नवीन मुलगी. या घरातल्या माणसांना अजून पूर्णपणे ओळखतही नसेल. किती स्वप्नं उराशी बाळगून आली असेल. आल्या आल्या तिचा या दुःखाशी, या संकटाशी सामना व्हावा?
शारदानं मग त्याला मानवसेवा संघ, जिजामाता ट्रस्ट अशा तीनचार ट्रस्टचे लिहून आणलेले पत्ते पर्समधून काढून दिले. व्हीलचेअर, कुबड्या भाड्यानं मिळतात. तसंच चांगली विश्र्वासू माणसंही या संस्थेकडे असतात. एखाद्याची रजा असेल तर बदली माणसंही पाठवतात, अशी सर्व माहिती त्याला दिली. त्याला धीर देत म्हणाली, ''काही काळजी करू नकोस रे. देसाई मॅडम इतक्या जिद्दी आहेत ना आणि त्यांची इच्छाशक्ती तर इतकी जबरदस्त आहे की या सार्यावर मात करून यातून त्या बाहेर पडतील बघ.''
''हं. त्याच आशेवर आहोत आम्ही. बरं बसा हं. जरा चहाचं सांगून येतो.'' असं म्हणून तो वळणार तोच त्याची बायको चहा घेऊन बाहेर आली.
शारदानं मागे वळून पाहिलं आणि ती केवढ्यांदा तरी चमकली ती.
समोर उलट्या वाट्यांचं मंगळसूत्र घातलेली, हिरवा चुडा भरलेली राधिका अपराधी चेहर्यानं उभी होती.
तिच्या कपाळावरची प्राक्तनाची ती रेषा आता अगदी ठळक झाली होती
**समाप्त**
© राजश्री बर्वे
संग्रही: श्रुती मुंदडा (काबरा)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा