मंगळवार, ९ जानेवारी, २०२४

848. बालपण.... नको देवा ?

    ‘लहानपण देगा देवा,’ ‘बालपणीचा काळ सुखाचा,’ ‘रम्य ते बालपण’ असं प्रामाणिकपणे समजण्यासारखे बालपण ज्यांना लाभले, त्या नशीबवान लोकांचा मला कमालीचा हेवा वाटतो. रम्य, सुखाचे वगैरे बालपण असूच शकत नाही असा मला ठाम विश्वास आहे. 
माझ बालपण कोंकणातल्या एका लहानशा गांवांत गेलं. अगदी जन्मापासून ते तिसरीची परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत मी गावीच होतो. माझी पांच आतेभावंडे, एक चुलत बहिण. सर्वजण माझ्यापेक्षा वयाने किमान चार ते दहा वर्षांनी मोठे. माझ्या मोठ्या आत्याचा एक मुलगा तर माझ्या वडिलांपेक्षा दोन वर्षांनी मोठा होता. यावरून त्या काळच्या वडीलधाऱ्या माणसांची, स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करण्याची, महत्वाकांक्षा किती जबरदस्त होती याचा अंदाज येईल. या भावंडाखेरीज माझ्या दोन आत्या, माझी चुलती व माझी आई अशी आणखी चार माणसे होती. शिवाय आमची गुरे चारायला नेणारा व इतर किरकोळ कामासाठी शांताराम नांवाचा नोकर होता. माझे चुलते व वडील नोकरीनिमित्त बाहेरगांवी असत. त्यांच्या वरचेवर बदल्या होत असत. त्यामुळे ते फक्त सुट्टीतच घरी येत. मी शाळेत जाऊ लागल्यापासून, माझा दिवस सकाळी सहा वाजता सुरु व्हायचा. अलीकडे मुलांच्या केसांतून मायेने हात फिरवत त्यांच्या आया “राजा, उठ ना सोन्या ! शाळेत जायचं ना आपल्याला ? शहाणा ना तू . बघ तुझ्याकरता मस्त पोहे केले आहेत. (इथे प्रत्येकाने आपापल्या सोयीप्रमाणे त्यांचा  आवडीचा पदार्थ टाकावा. माझ्या आवडीची कमाल मर्यादा पोह्यांची लक्ष्मणरेषा ओलांडू शकत नाही. )” अशा मधाळ आवाजांत हिंदी सिनेमातल्या आयांसारख्या उठवतात, ते ऐकलं की मला भडभडून येत. 
“उठ मेल्या, आरासारखो (अजगरासारखा) पडलोसा. शाळेत कोण तुझो बापूस जातलो ?” या माझ्या जन्मदात्रीच्या भूपाळीने माझा दिवस उजाडे. या प्रेमळ हांकेला एका मिनिटात मी प्रतिसाद दिला नाही, तर लाथ कंबरेवर बसायची (कंबर नुसते उदाहरण म्हणून. खरं म्हणजे शरीराचा जो भाग लाथेच्या आवाक्यात प्रथम येईल तो.) तोंड धुवून, आंघोळ  करून शर्ट पँट चढवून मी स्वैपाकघरात आलो की “तो ‘चा’ आणि लाडू गिळ, आणि हंयसून तोंड घेवन जा“ हा हुकुम जनरल आईकडून सुटायचा. खरोखरच तो गुळाचा काळसर चहा आणि काळाकभिन्न गुळाचा लाडू, गिळायच्या लायकीचे पण नसत. त्यांना चव नसायची. पण “खाणार नाही मी” असं बाणेदारपणे म्हणायची सोय नसायची. कारण “नाय खावचंय, तर उपाशी मर मेल्या. “ हा मौलिक सल्ला असायचा. गांवी आमची शाळा दोन सत्रात असायची. सकाळी सात ते दहा. मग सुट्टी. त्यानंतर साडेअकरा ते दीड वाजेपर्यंत. दहा वाजता सुटली की घरी येईपर्यंत सव्वा दहा वाजायचे. हातपाय धुवून पाटावर बसलं की समोर ताटली (आमच्याकडे त्याला पितळी म्हणतात ) यायची. त्यांत उकड्या तांदळाची पेज असायची. बरोबर पापड किंवा लोणचे नाहीतर घराभोवतीच्या आवारातली कुठली तरी भाजी. बहुतेक केळफूल, कच्ची केळी, लाल माठ, वाली (चवळीची शेंग) किंवा त्याचा पाला, दोडकी, पडवळ, तोंडली, शेकटाचा (शेवग्याचा) पाला, लाल भोपळा वगैरे. बाजारातली भाजी आम्हाला ठाऊक नव्हती. टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, पालक, मटार, भोपळी मिरची या 'क्लास वन' भाजी मंडळीशी माझी ओळख मुंबईला आल्यावरच झाली. बरं, “ही भाजी नको” असे म्हणायची सोय नव्हती. एकदा मी तसा निषेध नोंदवलाही होता. पण आमच्या जन्मदात्या जनरल डायरने समोरची गरम पेजेची ताटली माझ्या डोक्यावर आपटून तिथे ‘जालियानवाला आग’ केली होती. “ जेव बाळा, तुला मोठं व्हायचं ना “शक्तीमान”सारख ?(हा प्राणी आमच्या लहानपणी अस्तित्वांत नव्हता. माझ्या लहानपणी “तो राक्षस येतलो आणि तुका घेवन जातलो “ ही दहशतवादी धमकी असायची) .
“बाळा आपण संध्याकाळी पिझ्झा आणि चॉकलेट आईस्क्रीम   करूया हं “ अशी आतासारखी प्रेमळ आश्वासने नव्हती. “पानांत टाकलंय, तर दोन दिवस उपाशी ठेवतलंय.” अशी सत्यात उतरणारी धमकी असायची. ते आटोपलं की परत शाळेत. व दुपारी घरी परतल्यावर जेवण ... म्हणजे उकड्या तांदळाचा भात, आमटी व भाजी. पूर्णविराम. सोमवार, मंगळवार गुरुवार व शनिवार आणि संकष्टी, पंचमी, एकादशी यादिवशी शिवराक (शाकाहारी) जेवण. इतर दिवशी मासळी असायची. पण मासळी म्हणजे तारल्या, पेडवे, धोडकारे, बांगडे, वेरल्या, गुंजुले (मुंबईच्या भाषेत बोय ) असे स्वस्तात-स्वस्त मासे. क्वचितच मुडदुशा किंवा कोलंबी असायची. पापलेट, सुरमई, रावस, हलवा (सरंगा) अशी ‘क्लास वन’ऑफिसर मासळी मी मुंबईलाच पाहिली. मासळीच्या आमटीत ज्याला दोन-तीन तुकड्यापेक्षा जास्त मिळाले तो नशीबवान. आमच्याकडे खास पाहुणे आले तरच बटाट्याची भाजी त्यांच्यासाठी होत असे. त्या दिवशी आमच्या पानांत मोजून एक-एक चमचा बटाट्याची भाजी पडायची. मग शाळेत दिलेला गुरपाठ (गृहपाठ) पाटीवर करायचा . तो पुसून जाऊ नये म्हणून दोन्ही बाजूला पुठ्ठ्यांचे आवरण बांधून दप्तरात (म्हणजे गोणपाटाच्या पिशवीत) ठेवायचा. संध्याकाळी स्तोत्रं म्हणायची. त्यानंतर पाढे घोकायचे. दोन ते तीस. आणि मग पावकी, निमकी, पाउणकी , सवायकी, दिडकी अशा चेटकीणींची आळवणी करायची.   
पण आयुष्य एवढे सरळही नसायचे. संध्याकाळी थोडंफार भावंडांबरोबर खेळणे व्हायचे. त्यांत वाद, आरोप, प्रत्यारोप व्हायचे. माझ्या जन्मदात्रीचे व माझे ऋणानुबंध जगजाहीर होते. मग त्यातलं कोणीतरी माझ्याविरुद्ध तक्रार करे. कधी कधी खोटं-खोटं रडून “मी दगड मारला“ वगैरे दखलपात्र गुन्हे नोंदवले जात. मग माझी जन्मदात्री साऱ्या परिस्थितीचा आढावा घेई. तीच प्रशासक, तीच न्यायाधीश व तीच फिर्यादी पक्षाची वकील. मग मला चोपण्याचा जाहीर कार्यक्रम होत असे. म्हणजे प्रेक्षक माझी भावंडे. माझ्या आत्या मध्ये पडत नसत. हो ! चिखलात दगड कोण मारणार ? कारण माझ्या आईच्या तोंडाचा पट्टा सुरु झाला की ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि आरण्यके - उपनिषदे या सर्वांचे पठण होत असे. बरं माझ्या आत्या या घरी आश्रयाला. म्हणजे माझ्या आईच्या दृष्टीने दुय्यम दर्जाचे नागरिक. त्यामुळे तिच्या मंत्रपठणाला भयंकर धार येई. फक्त माझी चुलती असली तरच माझी खैर असे. पण ती सुद्धा कांही वेळा परगावी असली की आमच्याकडे दुःशासन – द्रौपदीचा प्रवेश रंगत असे. माझ्याकडे  कायम द्रौपदीचा रोल. माझ्या आईचं एक वैशिष्टय होते. तिच्या हातात अमुकच शस्त्र पाहिजे, अशी तिची अट नसायची. मग वेताची छडी, नारळाच्या हीरांची केरसुणी, फूटपट्टी, चामड्याचा पट्टा, लाटणे, चुलीतले लाकूड यापैकी कांहीही तिला चालायचे. मला फोडून काढतांना तिला मध्येच ब्रेक घ्यावासा वाटला (ती पण माणूस आहे ना ? दमायला होणारच) तर ती माझ्याकडे बघत उभी रहायची. (मी वाघाच्या समोर बांधलेल्या बकऱ्यासारखा ... पण बेंबे न करता. कारण रडलं, ओरडलं तर “मेल्या आवस मेली काय तुझी ? गळो कित्या काढतसय ?” म्हणून दुप्पट जोराने आक्रमण होत असे. ) बघता बघता ती हंसायची. त्यावेळी मला कळत नव्हते. पण पुढे मोठा  झाल्यावर ‘ भेसूर ’ हा शब्द वाचनात आला, तेव्हां माझ्या डोळ्यासमोर जन्मदात्रीचाच चेहरा आला आणि त्याचा अर्थ डोक्यांत पक्का बसला. समजा गाफील राहून मी हंसलो आणि आता प्रवेश संपला अशा समजुतीने तिथून विंगेत जायचा प्रयत्न केला, तर “निलाजरो  मेलो. हंसतासा बघ कसो दांत काढून. माजा खंयच्या जन्माचा पाप हेच्या रूपांन समोर आयला देवाक ठावक“ असं म्हणून ती नव्या दमाने मला हाणायला सुरवात करे. 
सुरवातीला मी मार चुकवण्याचा प्रयत्न करीत असे, पण त्यामुळे टॅक्स चुकवणाऱ्या माणसाला आयकर विभाग ‘ टॅक्स अधिक दंड’ लावतो, तसा मला हा “आईकर” विभाग मूळ मार अधिक दंडाचा मार अशी शिक्षा देत असे.मला चोप देणे हा माझ्या जन्मदात्रीचा छंद असल्याचे माझ्या भावंडाना कळल्यापासून ते मला जास्तच घाबरवत असत. माझ्या आईला माझ्याबद्दल खोटेनाटे सांगून मला मार द्यायला लावू, अशी धमकी देत. त्यामुळे त्या काळांत म्हणजे ‘वय वर्षे चार ऑनवर्डस’ मी सतत दहशतीखालीच असे. माझी आई तशी शिक्षेच्या बाबतीत खूपच कल्पक होती. म्हणजे तिला मारण्याच्या चाकोरीबद्ध हत्यारांचा कंटाळा आला की ती त्यांत बदल करीत असे. म्हणजे प्रथम दोन-तीन फटके मारून ती मला सतरंजीवर लोळवी. मग कांदा बुक्कीने फोडून तो माझ्या दोन्ही डोळ्यांत घालत असे. डोळ्यांची आग होई. घळाघळा पाणी येत असे. पण कांदा काढून टाकायची सोय नव्हती. कारण आईकराच्या कारवाईत अडथळा आणला म्हणून कलम तीनशेदोन अन्वये (कलमांचा आंकडा महत्वाचा नाही, मार महत्वाचा) दंडात्मक कारवाईची टांगती तलवार असे. मोठा झाल्यावर मी ते आठवून परमेश्वराचे आभार मानत असे. समजा कांद्याच्या बदल्यात माझ्या जन्मदात्रीने मिरचीचा ठेचा वापरला असता तर ? या कल्पनेनेच शहारा येतो अंगावर. पण एवढा मार, कधीही अजिबात मस्ती न करता (तेवढी हिम्मत  होती कुठे ?), सातत्याने खाऊनही माझ्या डोक्यात आत्मघातकी विचार आले नाहीत ? तर याचं उत्तर आहे “नाही “. कारण मुळातच तुम्ही लहान मुलाला ज्या वातावरणांत वाढवता, त्याची त्याला संवय होते. त्याचे मन आणि शरीर दोन्हीही त्या अत्याचाराला सामोरे जाण्यास तयार होते. मुळात तो अत्याचार आहे हेच त्याला कळत नाही. त्याच्या दृष्टीने तीच त्याची जीवनपद्धती असते. किंबहुना आपण मार खाण्यासाठीच जन्म घेतला आहे, हे याची त्याने मनाशी खूणगाठ बांधलेली असते. 
पण एकदा अचानक “सोनियाचा दिनु आजे  अवतरला माझे जीवनी“ असा चमत्कार घडला. मी तिसरीत असतांना माझ्या वडिलांची बदली मालवणला झाली. त्यांनी बिऱ्हाड करायचे ठरवले. त्यामुळे माझी आई व माझी सख्खी भावंडे मालवणला गेली व मी शाळेत असल्यामुळे गांवीच राहिलो. तो माझ्या जीवनातला अत्यंत आनंदाचा दिवस होता. आता माझी मारातून सुटका झाली होती. ज्याने गजेंद्रमोक्ष केला, ज्याने कासव होऊन विश्वाचा  भार आपल्या पाठीवर घेतला,तो ईश्वरच माझ्या मदतीसाठी धावला असे मला वाटले. आता मला माझी मोठी आत्या सकाळी अतिशय प्रेमाने उठवी. माझा चहा खाणे आटोपले की नाही ते जातीने बघे. माझे जेवण-खाण, अभ्यास, विश्रांती सर्वांकडे तिचे बारीक लक्ष असे. तिचे पती ब्रिटीश आर्मीत होते व त्यांचे युद्धात निधन झाले होते. तिला पेन्शन मिळत असे. ती माझ्यासाठी गोळ्या, चॉकलेट, बिस्किटे आणून ठेवत असे. व गुपचूप मला देत असे. रात्री एखादी छानशी गोष्ट तिच्याकडून ऐकत असतांना डोळे झोपेला फितूर होत. मग ती माझ्या अंगावर हळूच चादर घाली व तिच्या खोलीत जाई. पण अशा आरामदायी आयुष्याला दृष्ट लागली.‘चौथ्या इयत्तेसाठी मी मालवणला टोपीवाला हायस्कूलमध्ये जावे’ असा ठराव मंजूर झाला. पॅरोलवर सुटलेला कैदी जसा पुनः तुरुंगात जातो, तसा मी परत  जन्मदात्रीच्या तावडीत अलगद सांपडलो. तीन-चार महिने मी अक्षरशः भूलोकीच्या नंदनवनात होतो. मी आत्याची परोपरीने विनवणी केली. पण ती हतबल होती. तिच्या मताला कांहीच किंमत नव्हती. माझी चुलती व चुलते मुंबईला स्थायिक झाले होते. त्यामुळे मी कोणाचा धांवा करणार ? व कसा ? मालवणला माझ्या हालांत भरच पडली. मधल्या चार महिन्याचे उट्टे फिटले होते. माझे वडील आणि आई एखाद्या तरबेज टेबल टेनिस खेळाडूसारखे कांही वेळां मला दोन्ही बाजूंनी टोलवत असत. माझ्या वडिलांचे हात मजबूत होते. त्यांचे फटके जास्त जोराने लागत एवढाच काय तो फरक होता. एकदा तर त्यांनी मला एवढ्या जोरांत मुस्काटीत मारली की मी जवळ जवळ दहा फूट लांब फेकला गेलो व समोरच्या भिंतीवर थाडकन आपटलो. भिरभिरलो ... डोळ्यांसमोर अंधार आला. पण थोड्याच वेळांत पुनः उठून उभा राहिलो. पुढचा बाउन्सर खेळण्यासाठी. मला आज कौतुक वाटते माझ्या आई-वडिलांच्या धीरोदात्त वृत्तीचे. मी कांही क्षणभर जमिनीवर निश्चेष्ट पडलो होतो खरा, पण ते जरासुद्धा डगमगले नाहीत. “ काय मरणा नाय हो रेडो ! सगळी नाटका आसत “ हे वाक्यही मी ऐकल. त्यांच्या आत्मविश्वासाने मला जास्त बळकट  बनवले. टोपीवाला हायस्कूलमध्ये चौथ्या इयत्तेत शिकत असतांना वार्षिक परीक्षेत माझा दुसरा नंबर आला. मी संवयीप्रमाणे घाबरत घरी आलो. रिझल्टचा कागद थरथरत जन्मदात्रीच्या हातांत दिला. आणि मार खायच्या तयारीत उभा राहिलो. पण महदआश्चर्य ! तिने मारलं नाही. म्हणाली “जा यांना ऑफिसांत जाऊन दाखव.” 
माझ्या वडिलांचे ऑफिस समुद्रकिनाऱ्यावर होते. आमच्या घरापासून पांच मिनिटांच्या अंतरावर. मनांत शंका आली. इथे मार चुकला, आता तिथे मिळेल कां ? पण “नाही” म्हणून उपयोग नव्हता. सांगितलेलं ऐकत नाही म्हणून पाद्यपूजा झाली असती. मी वडिलांच्या ऑफिसात गेलो. मला पाहिल्याबरोबर ते ओरडले “हंयसर कित्या आयलय जीव देवक ?” (इथे कशाला आलास जीव द्यायला ?) “चल घराकडे जा, नायतर लाथ घालतंय कंबरेत” ते गरजले. त्यांचे इतर सहकारी आश्चर्याने बघत होते. एवढ्या लहान मुलावर हा माणूस विनाकारण कां आग पाखडतोय याचे त्यांना कोडे पडले होते. माझा रिझल्ट ... दुसरा नंबर, बक्षीस मिळालेली ग्लोबची कंपासपेटी हे सारे कांही मी त्या गर्जनेपुढे विसरलो. मागे वळून, घाबरलेल्या सशासारखा पळत सुटलो तो थेट घराकडे येऊन थांबलो. आईने ‘ काय झालं ?’ असं विचारले, म्हणून मी सर्व घटनाक्रम सांगितला. त्यावर “ तुजा नरडा कोणी धरलेला की दांतखीळी बसली ? सांगूक येणा नाय, माजो रिझल्ट बघा म्हणून ?” अशी एक्स्पर्ट कॉमेंट तिने केली. मी पांचव्या इयत्तेत असतांना अखेरीस परमेश्वराला माझी फुल आणि फायनल दया आली. माझ्या वडिलांची बदली अलिबागला झाली. माझं पार्सल मुंबईला काकांकडे रवाना करण्यात आले. तेव्हांपासून मी नोकरीला लागेपर्यंत, माझ्या चुलत्यांकडे मुंबईत प्रथम गोरेगांवला व नंतर अंधेरीला राहिलो. त्यांनी व माझ्या चुलतीने मला अपार माया, प्रेम, आधार दिला. माझ्यावर चांगले संस्कार केले. मला वाटतं, माझ्या आयुष्यात आईवडिलांची माया काय असते, त्यांची जबाबदारी काय असते, याचा अनुभव मला यावा, म्हणूनच त्या जगन्नियंत्याने माझ्या काका-काकूंना माझ्या आयुष्यात आणले असावे. कदाचित ‘आपल्या चुकीच्या नियोजनाने या पोराचे हाल-हाल झाले’ असा ठपका आपल्यावर येईल असे देवाला वाटले असेल आणि चित्रगुप्ताला “अर्जंट अँड इमिजियेट” उपसूचना त्याने दिली असावी म्हणून माझ्या प्रेमळ, कनवाळू चुलता-चुलतीचे छत्र मला लाभले. 
     मी नोकरीला लागलो तेव्हां माझे आई-वडील गांवी आमच्या घरी स्थायिक झाले होते. आधी मी त्यांच्यासाठी त्यांची वैफल्ये, नैराश्य यांतून निर्माण होणाऱ्या संतापाला वाट देण्याचे साधन होतो. पण नोकरीला लागल्यावर मी दरमहा त्यांना मनीऑर्डरने ठराविक पैसे पाठवीत असे. त्यामुळे वेळच्या वेळी न सांगता ‘घरपोंच पैसे पाठवणारे ए.टी.एम.मशीन’ अशी बढती मला मिळाली. कधीतरी त्यांचे पत्र येई. त्यांत माझे कसे चालले आहे ? मी कसा आहे ? अशा फालतू चौकश्या नसत. “घराचे नळे (कौले) बदलायचे आहेत, आंतल्या खोलीत फरशी बसवायची आहे, मांगराची दुरुस्ती करायची आहे, इथे रेशनवर मिळणारा गहू, तांदूळ तोंडात घालवत नाही. तरी ओळखीच्या दुकानदाराकडून चांगल्या प्रतीच्या गहू/तांदळाची पोती  विकत घेण्याची गरज आहे. म्हणून जास्तीत जास्त पैसे पाठवावे. तिथे थोडी काटकसर करावी.” इत्यादी हितोपदेश व आदेश असत. ते असे कां वागत ? यांचे भाकड मनोवैज्ञानिक विश्लेषण करण्यात मला रस नाही. कारण त्यामुळे मी जे भोगले त्याच्यावर चंदनाचा लेप लागणार नाही. पण त्यांच्या छळसंवत्सरीचा एक फायदा मला नक्कीच झाला. मी एक संवेदनशील माणूस झालो. दुसऱ्याला यातना होतील, क्लेश होतील असे वर्तन आपल्याकडून होऊ नये या बाबतीत मी जागरूक झालो. कितीही मनाविरुद्ध घडलं तरी आपला हात उचलता कामा नये, हे बंधन मी स्वतःवर घालून घेतलं. मात्र त्यांच्या संदर्भात ‘आपल्या कोंवळ्या मुलाला विनाकारण बडवतांना ज्यांच्या काळजाला कधीच पाझर फुटत नाही ते माझे माता-पिता होत ‘ अशीच जन्मदात्या आई-वडिलांची व्याख्या माझ्या मनावर कोरली गेली आहे.  
          
@ ©️✍अनिल  रेगे . 
08 सप्टेंबर, 2015.
मोबाईल:9969610585

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...