काय घडतंय हे समजायच्या आतच ती घटना घडून गेली. फूटपाथ वर उभा राहिलेला , जेमतेम सहा-सात वर्षांचा तो मुलगा एकाएकी रस्त्याच्या मध्यभागापर्यंत पळत गेला. मलाच काय पण त्या मुलाकडे लक्ष असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वाटलं की तो मुलगा पलीकडच्या फूटपाथवर जाणार आहे. पण तसं घडलं नाही. तो मुलगा एकाएकी रस्त्यात मध्यावर उभा राहिला . ब्रेकचा कर्कश आवाज झाला. बघे लोकांचा ताबा सुटून ते मोठ्याने ओरडले. टॅक्सीवाला खाडकन् दरवाजा उघडून बाहेर आला. त्या मुलाच्या अंगावर धावत गेला. त्याचा तो राग अनाठायी नव्हता. काही कमीजास्त घडलं असतं तर केवळ तो मुलगाच नव्हे तर टॅक्सीवालाही आयुष्यातून उठला असता. अगदी अभावितपणे मीही त्या घोळक्यात सामील झालो. मुलाला मारण्यासाठी टॅक्सीवाल्याने हात उगारला, इतर दोघातिघांनी 'जाऊ द्या जाऊ द्या' करीत त्या टॅक्सीवाल्याला बाजूला नेलं, मी त्या मुलाला घेऊन पलीकडच्या फूटपाथकडे जाऊ लागलो. पुनः थांबत तो म्हणाला,
'मला रस्ता क्रॉस करायचा नाही.'
एवढं बोलून तो उलटा फिरला. परत पहिल्या फूटपाथवर आला. का कुणास ठाऊक, मला तो सगळा प्रकार काही निराळा वाटत होता. मी सहज घड्याळात पाहिलं , ज्या कामासाठी मी घरातून बाहेर पडलो होतो ते काम अपेक्षेपेक्षा लवकर आटोपलं होतं. त्या मुलासाठी मी थोडा वेळ सहज खर्च करु शकत होतो. मीही त्याच्याबरोबर पहिल्या फूटपाथवर आलो. तो मुलगा लगेच कावराबावरा होऊन इकडेतिकडे पाहायला लागला. 'बाळ काय हरवलं?'-
स्वतःशीच तो पुटपुटला, 'शाम्या करठाने..'
'शाम्या कोण?'-
'माझा मित्र. शाम. आता गेला असेल पळून मुद्दाम, हरला म्हणून...'
'का?'
'तो मला पेन्सिल देणार होता.'
'कशाबद्दल?'
'धावत्या मोटारपुढं उभा राहून दाखव असं त्यानं मला सांगितलं , मी दाखवलं उभं राहून. आता हरला म्हणून गेला पळून... त्याला पिटलं पाहिजे उद्या..' तो बोलत होता. पण स्वतःशीच. तो स्वतः एवढा तंद्रीत होता की त्याला त्या गर्दीची जाणिव नव्हती. फार लहान वयात त्याला मित्रानं दगा दिला होता, त्याचा त्याला धक्का बसला होता. जेवढ्या उपेक्षेच्या भावनेनं तो स्वतःशी बोलत होता तेवढ्याच तंद्रीत तो चालायला लागला. त्याला आता कोणाचीही पर्वा नव्हती, सोबती ची गरज नव्हती. तो एकटा होता. एवढा मोठा विक्रम करावा आणि जिथं त्याची नोंद होऊन कौतुक व्हावं त्यानं अरसिका सारखी पाठ फिरवून जाणं, हा त्याच्यासाठी फार मोठा आघात होता जणू काही .
'काय बोललास?'- मी विचारलं.
खांद्यावरच दप्तर सांभाळीत तो म्हणाला, 'घरी चला.'
'चल. मलाही तुझ्या घरी यायचंय्. वडिलांकडे काम आहे माझं.'
'आत्ताचं हे घडलेलं सांगायचं असेल माझ्या घरी... ' तो ताडकन् म्हणाला.
-मी चमकलो. मघाशी त्याच्या वागण्यानं चमकलो होतो आणि आता त्याच्या बोलण्यानं! आता तर त्याच्या घरी जायलाच हवं होतं; आणि त्यासाठी समजुतीनं घेणं आवश्यक होतं; मी समजावणीच्या स्वरात म्हणालो, 'छे छे, ह्या असल्या गोष्टी घरी सांगणार काय?- तुझे वडील माझ्या चांगले ओळखीचे आहेत, मला त्यांना भेटायचं आहे.'
'मोठे आहात पण तरी खोटं बोलता! मला वडील नाहीत.'
'खरं?'- मी परत चमकलो.
'म्हणजे होते. खूप दिवसांपूर्वी म्हणजे मी खूप लहान होतो तेव्हा ते घरातून निघून गेले.'
'असं?' मी म्हणालो.
'असं आई नेहमी म्हणते.'
-जो जो मी त्या मुलाशी बोलत होतो तो तो माझं कुतुहल जागं होत होतं. ह्या मुलाला वडील नाहीत. ते घरातून निघून गेले होते. ते हयात आहेत की नाहीत, घरी पुन्हा परतणार की नाही- हेही सांगता येणारं नव्हतं. सध्या परिस्थिती एवढीच होती की पालक म्हणून त्या मुलाला फक्त आई होती आणि बाहेर असले उपद्व्याप करणाऱ्या मुलाला साधेपणानं सांभाळायचं ही एक मोठी समस्या होती. ते पोरगं गोड होतं. काळेभोर केस तसेच
काळभोर तेजस्वी डोळे, तरतरीत चेहरा आणि बोलण्यातला रुबाब तर पाहायलाच नको. ओळख, परिचय नसतानाही त्याच्या घरी जाण्याचा मोह मला झाला. ह्याला कारण तो विलक्षण पोरगा !
-मी त्याच्या घरी जाणार होतो, त्याच्या आईला त्याच्या असल्या उपद्व्यापांची जाणीव देणार होतो.
मी त्याच्यासोबत त्याच्या घरी जायला निघालो. घरासमोर आल्यावर,पायरीजवळच्या कट्ट्यावरुन उडी मारीत त्यावर चढून त्यानं कॉलबेल तीनदा वाजवली. मग माझ्याकडे पाहात तो म्हणाला,
'तीनदा बेल वाजवली म्हणजे मी! आमचं ठरलंय असं.'
हसत हसत त्याच्या पाठीवर थोपटत असतानाच दार उघडलं गेलं. त्याची आईच तिथं उभी होती. माझ्याकडे लक्ष जाताच तिनं पदर सावरला. तिचा चेहरा थोडा शरमिंदा झाल्यासारखा वाटला. खुणेची घंटा वाजली म्हणून ती तशीच साडीच्या पदराची फारशी पर्वा न करता दरवाजा उघडायला आली होती. स्वतःला सावरीत तिनं विचारलं ,
'कोण हवंय?'
प्रश्न विचारतानां अभावितपणे तिच्या भुवयांची मोठी गंमतीदार हालचाल झाली. ती हालचाल टिपून घेत मी हसत हसत म्हणालो,
'कोण हवंय, काय?- ओळखलं नाहीस? - 'तिच्यासारखी मी मग माझ्या भुवईची हालचाल केली.
'कोण, प्रभाकर तू?'
'नो, नो, मी प्रभ्या. प्रभाकर नाही.'
तिचा पोरगा माझ्याकडे पाहात म्हणाला,
'आईचे तुम्ही दोस्त, आणि म्हणे बाबांना भेटायंचय.'
-आणि कहर म्हणजे त्याच्याही भुवया छान अगदी तश्श्याच हलल्या. त्या तशा नेहेमीच हलत असणार. एवढ्यात लक्ष नसताना, तो तिथून गेला. मी तिकडचं पाहात राहिलो .
'ये ना, आत ये. खूप बोलायचंय तुझ्याशी. खरं म्हणजे मला तुझ्यावर कडकड हल्ला
चढवायचा आहे. पण ते राहू दे. आधी आत ये. बीऽऽ कम्फर्टेबल .'
- खूप जुना शब्द. खूप जुनी पण अजूनही तेवढीच ताजी वाटणारी लकब. खूप वर्षांपूर्वी तिच्या त्या वरळीच्या आलिशान ब्लॉकमध्ये जाऊन कीती वेळा मी तिचा पाहुणचार स्वीकारला होता. तिची ती लकब अजून कायम होती म्हणून बोलतांना मधली वर्ष एकदम कमी झाल्यासारखी वाटली .
मी बाहेरच्या खोलीत थांबलो. रजनी काही कामासाठी आत गेली. मी इतकी वर्षे मागे गेलो होतो, धुंदावलो होतो की रजनीचा ब्लॉक पाहावा, मांडणी पाहावी, वगैरे भावनाच मला होत नव्हती.
'हं, कसा अचानक आलास असा?' रजनी आतून येता येता म्हणाली.
'तुझ्या मुलानं आणलं.'
'अं. ते कसं काय?'
- मी मग सगळा किस्सा ऐकवला. रजनी शांतपणे ऐकत होती. सगळी हकीगत संपल्यावर मी म्हणालो, 'त्याला तू मारु वगैरे नकोस हं. मोठ गोड पोरगं आहे.' काही वेळ विचार करीत ती म्हणाली,
'मारत नाही मी कधी त्याला. एरव्ही नाही आणि ह्या अशा बाबतीत तर कधीच मारणार नाही.'
'नुसता धाक मात्र जरुर दाखव.'
'त्याचाही उपयोग व्हायचा नाही.'
'वा अस कसं ! काही तरी धाक असायलाच हवां ना पण! '
'नाही रे, कशाचाच उपयोग नाही व्हायचा. तुला काही माहीत नाही म्हणून तू हे उपाय सुचवतो आहेस, पण इथं हे सगळ फोल आहे.'
' मला तर त्याचा धक्का बसलाय.'मी म्हणालो.
रजनी काही काळ विमनस्क होऊन बसली. ती अंतर्यामी आणि फार अस्वस्थ झालेली दिसत होती. तिला माझ्या अस्तित्वाचा विसर पडला... ती विचार करता करता फार मागं गेली. काही इतिहास तिच्या नजरेसमोरुन सरकत असावा. कुठल्यातरी व्रणावरची खपली निघाली होती.. . काहीसं स्वत:शी, काहीसं मला उद्देशून ती म्हणाली,
'हे अटळ आहे. हे असंच व्हायचं, असंच होणार.'
तीचं ते विमनस्क होऊन स्वतःशी बोलणं जणू काही तिच्या माझ्यामध्ये धडाधड असंख्य दरवाजे बंद झाल्याचं भासत होतं. एक भल्या मोठ्या पात्राची नदी मधून वाहू लागली आहे आणि पलीकडच्या तीरावरुन ती कितीही मोठ्या आवाजात बोलली तरी आता ते माझ्यापर्यंत पोहोचणार नव्हतं, एवढं ते पात्र रुंद आहे असे जाणवत होतं....
आणि तेवढ्यात तिचा मुलगा धावत आला. आईसमोर आपली इवलीशी मूठ उघडीत तो म्हणाला,
'हे खाणार?'
रजनी भानावर आली. माझ्या तीरावर आली. तिला मग थोडी जाणीव आली. जाग आली. तिनं मुलाकडं पाहिलं . त्याच वेळी मी तिला आत्ता सांगितलेली गोष्ट आठवली. ती मुलाला म्हणाली,
विजा, काका काय सांगताहेत?"
'मला माहीत आहे.' तिचा मुलगा विजय म्हणाला.
'मग काय विचार आहे तुझा?'
'त्यात काय झालं?' विजयनं विचारलं.
रजनी काही बोलली नाही. 'हे असं आहे' अशा अर्थानं तिनं माझ्याकडे पाहिलं . तेवढ्यात विजय गेला.
'काय प्रकार समजायचा?' मी विचारले.
'तुला आता काय आणि किती सांगू? ह्या फोटोपासूनच सुरुवात करते.'
रजनीनं मला एक फोटो दाखवला. तो फोटो मोठा विचित्र होता. उजवा हात, डावा पाय आणि कपाळ, एवढे अवयव बँडेजमध्ये होते. त्या फोटोखाली आठदहा वर्षांपूर्वीची तारीख होती आणि खाली लिहिलं होतं, 'डेक्कन क्वीन.'
मी विचारलं,' काय अर्थ काढायचा या फोटो तून? '
'अर्थ कसला आलाय? अनर्थ म्हण. मित्रांमध्ये पैज लागली, गाडीतून उडी मारली तर माणूस मरतोच का?- झालं. ह्यांचे मग प्रयोग सुरु झाले.'
'ह्यांचे म्हणजे....?'
'होय, हेच विजयचे वडील. तेव्हा लग्न व्हायचं होतं आमचं. जेव्हां ओळखही नव्हती; तेव्हांची गोष्ट. रोज म्हणे प्रक्टिस करीत होते. रोज कोणत्या ना कोणत्या गाडीतून, कोणत्याही स्टेशनवर उतरण्याचे धाडसी बेत सुरु झाले. बघणारे धास्तावायचे, थक्क व्हायचे,
पण ह्यांचे ते विक्षिप्त उद्योग थांबले नाहीत. आणि शेवटी त्यांनी एक दिवस त्यांच्या मित्रांना संध्याकाळी सव्वापाच वाजता परळ स्टेशनवर अपॉइंटमेंट दिली आणि डेक्कन क्वीनमधून प्लॅटफॉर्मवर उडी मारुन दाखवली.'
'अजब आहे. मित्रांनी, घरच्यांनी असल्या प्रकारांना आळा घालायला हवा होता.'
'ह्यांनी घरच्यांना, मित्रांना
पत्ता लागू दिला नव्हता. नुसती अपॉइंटमेंट दिली होती. नंतर अडीच महिने के. ई. एम. मध्ये पडून होते. तरीही म्हणत होते की, मी मरणार नाही, एवढा जायबंदी पण व्हायला नको होते.. . नक्की उडी मारतानाच जरा गफलत झाली.. .'
त्या हातातल्या फोटोकडे मी पाहात राहिलो . त्यातला अर्थ आता समजत होता. समाधान होईपर्यंत फोटो पाहून झाल्यावर मी तो बाजूला ठेवत म्हणालो,
'पण अशी ही वल्ली तुलाच बरी नेमकी सापडली?'
'तोही काही लहानसहान इतिहास नाही. पपा आणि मी त्या दिवशी मार्केटिंगला चाललो होतो...'
'म्हणजे एकच ब्लाऊजपीस घ्यायला, असंच ना?'
'वा, तुझ्या बरच लक्षात आहे मागचं सगळं?'
'वा, नसायला काय झालं? बरं ते जाऊ दे, पपा कसे आहेत?'
-मी तो प्रश्न विचारला , आणि मग एकदम चपापलो. बऱ्याच वर्षांत गाठभेट नव्हती. पण रजनीच्या चेहेऱ्यावर काही परिणाम झाला नाही तेव्हा बरं वाटलं. तीही उमेदीनं म्हणाली,
तिथंच आहेत. वरळीचा तोच ब्लॉक अजून.'
'अजून तसेच आहेत का ग पूर्वीसारखे?'
'अगदी तस्से. माणसं तशी फार बदलत नाहीत. आता माझ्यात काही फरक दिसतोय का तुला?'
तिच्या भुवयांची परत तशीच झालेली हालचाल टिपून मी म्हणालो,
'नाही, तुझ्यात काहीच फरक नाही. तू तश्शीच आहेस.'
'तसंच असतं. माणसं बदलत नाहीत. ती कायम तशीच राहतात. अगदी लहानपणी जशी असतात तशीच शेवटपर्यंत राहतात. ह्यांच्यातही बदल झाला नाही. लग्न झाल्यावर ते निवळतील असं वाटलं होतं, पण नाही. पूर्वी जसे होते तसेच नंतरही राहिले .' रजनी मधेच थांबली. तिला त्या आठवणी, तो पूर्व इतिहास कदाचित दाहक वाटत असावा. पण मला आता सगळं ऐकल्यावाचून बरं वाटणार नव्हतं. मी उतावीळपणा म्हणालो,
'ओळख कशी झाली सांगतेस ना?'
'हो. आम्ही म्हणजे मी आणि पपा मार्केटिंगला निघालो होतो. गाडी घेऊन आम्ही दादरला आलो. त्या दिवशी आम्ही खूप हिंडलो . अनेक दुकाने पालथी घातली. पण त्या दिवशी खरेदी होतच नव्हती. खरेदीचा देखील एक ठरावीक स्वर असतो. तो स्वर कधी कधीसापडतच नाही. आणि तसं झालं म्हणजे मग सगळ्या वस्तू अळणी वाटायला लागतात. काहीच मनाला येत नाही. त्या दिवशी तेच झालं. मग आम्ही गेलो दादर टी टी ला तिथून. तिथंही मनाला काही आलं नाही. शेवटी खरेदी बंद असे ठरवून गाडीत येऊन बसलो. घरी जाण्यापूर्वी एखाद्या पंजाब्याकडे लस्सी घ्यावी म्हणून परळच्या बाजूला निघालो . वाटेत गाडी उभी करुन मी व पपा चालत निघालो. थोडं अंतर चालतो न चालतो तोच पाठीमागून एका माणसानं पपांना जोरात धक्का दिला. पपा खाली पडायचेच. मी पटकन त्यांना ते पडतानां सावरले. तोपर्यंत धक्का मारणारा माणूस पुढं निघून गेला. आणि मग एकदम शंका येऊन पपांनी खिशात हात घातला. पपांचं पाकीट नाहीसं झालं होतं. पपा मोठ्याने ओरडले, 'चोर, चोर.' धक्का मारणारा माणूस एकाएकी पळायला लागला. मग काय? एकच गोंधळ. तो पुढं पळतोय. मागून पपा पळत राहिले . पपांच्या पाठोपाठ मीही धावत होते. आणखीन बीस-पंचवीस लोकही पाठलागात सामील झाले. मी थकून थांबले' आणि समोर पाहात राहिले . आणि तेवढ्यात तो प्रकार घडला. अगदी माझ्या नजरेसमोर एका इमारतीतल्या माणसानं, पहिल्या मजल्यावरुन, तो खिसेकापू त्याच्या इमारतीसमोर येताच त्याच्या अंगावर उडी मारली. फूटपाथवर तो खिसेकापू आणि त्याच्या अंगावर तो उडी मारणारा माणूस! ते दृश्य पाहिल्यावर मी माझा थकवा विसरले आणि जोमानं पळायला लागले. पंपांच्या जवळ जाऊन उभी राहीपर्यंत त्या गृहस्थानं हातात पाकीट दिलेलं होतं; आणि मग गर्दीतली इतर माणसं त्या खिसेकापूवर आपला हात चालवीत, मारण्याची हौस पुरवून घेत राहिले ! ते अचाट साहस करणाऱ्या माणसाला घेऊन पपा गर्दीतून बाहेर आले. मग आमच्या तिघांचा लस्सीचा कार्यक्रम झाला. तो कार्यक्रम आटोपल्यावर ते गृहस्थ निघाले तसे पपा म्हणाले,
'छे, मी तुम्हाला असं कसं सोडीन? आमच्या घरी चला. घरातल्या मंडळींना मला कौतुक सांगू दे. तुमचा छोटासा सत्कार करु दे. मग जा.'
'चला ना.' मीही भारावून म्हणाले.
-मग ते आमच्या घरी आले. पपांना काय करू आणि काय नको असं होऊन गेलं. त्या दिवशी पपांच्या पाकिटात सुमारे दोन हजार रुपये होते. आमच्या घरी मग त्यांचं फारच मोठं स्वागत झालं. चहापाणी झालं. ती विजयच्या वडिलांची आणि माझी पहिली भेट.'
- रजनीनं लांबलचक हकीकत सांगितली. त्या सगळ्या प्रकाराची मला मोठी मौज वाटली. काही वेळ आम्ही गप्प होतो. नंतर मी विचारले,
'मग ह्या पहिल्याच भेटीत तुझी विकेट पडली का?"
'छे छे. त्यानंतर परत एक भेट झाली. अर्थात ती पहिल्याहून जास्त नाट्यपूर्ण होती. सगळ्या आयुष्यात ते साधे जीवन कधी जगलेच नाहीत. त्या दिवशी निघताना ते मला म्हणाले, 'तुमचे पपा मला आवडले.'
-मी त्यावर म्हणाले, 'मग आता येत जा नेहमी.'
'जरुर.'
'केव्हा भेटणार?'- मी विचारले. तो प्रश्न विचारेपर्यंत माझ्या मनात तसा काही भाव नव्हता. ते म्हणाले, 'येत्या रिववारी बरोबर चार वाजता व्ही.टी. समोर फिरोजशहा मेहताच्या पुतळ्यासमोर याल का?'
-मी हो म्हणाले. आणि त्याप्रमाणे गेले. वेळच्या आधीच गेले जरा. त्या दिवशी का कुणास ठाऊक तिथं बरीच माणसं जमली होती. एवढ्या गर्दीत त्यांची गाठ कशी पडणार हा मला एक प्रश्नच पडला. तरी मी सांगितलेल्या ठिकाणी थांबले. हळूहळू गर्दी वाढायला लागली. फूटपाथ गच्च भरले. माझ्या आजूबाजूला बरीच माणसं उभी राहिली . बोरीबंदरवरचं मोठ घड्याळ सव्वाचार वाजल्याचं सांगत होतं. आता ते जरी आले तरी एवढ्या गर्दीत मला भेटू शकणार नाहीत ह्या विचारानं मी जायला निघाले . तेवढ्यात तिथं जमलेल्या जमावानं कडकडाट कला. एखाद्या मंत्र्याची मोटार आली असेल ह्या कल्पनेनं मी नजर फिरवली. पण तसं नव्हतं. सगळ्यांच्या माना वाकल्या होत्या. नजरा आभाळाकडे होत्या. काहींच्या हातात तर दुर्बिणी होत्या. मी वर पाहिलं . पाहते तो म्युनिसीपालटीच्या त्या इमारतीच्या वरच्या टोकाला टॉवर भोवतीच्या कट्ट्यावर एक गृहस्थ सायकल बॅलन्स करुन दाखवीत होता. खालच्या जमावाकडून वारंवार होणारा टाळ्यांचा
कडकडाट त्याला ऐकायला जात होता की नव्हता ह्याची शंका होती. पण त्याला त्याची जरुरीही नसावी. कुणाचीतरी मी वाट पाहात होते ह्याचाही विसर पडला. मी तो कार्यक्रम पाहात राहिले . कार्यक्रम संपल्यावर घरी परतले. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी वर्तमानपत्रात आदल्या दिवशीचा तो विक्रम वाचला आणि विजूच्या वडिलांचा छापून आलेला फोटोही पाहिला .'
'म्हणजे?' मी मधेच विचारले.
' बाबा. तीच ती वल्ली होती.'
'अजब आहे.'
'म्हणूनच पपांना ते एकदम आवडले. माझ्या आधी पपाच त्यांच्या प्रमात पडले. तो दृष्टिकोन पपांनीच माझ्या डोक्यात भरवून दिला. मी त्यांना म्हटलं, 'पपा, हा प्राणी विक्षिप्त आहे. असेच उपद्व्याप करीत बसतील आयुष्यभर.' त्यावर ते म्हणाले, 'अग, एवढा मी तुझ्या पाठीशी आहे. भितेस काय? पुरुष असा टग्या हवा. गो अहेड.' आणि मग झालं आमचं लग्न.'
रजनी थांबली. तिच्या निवेदनाचा एक टप्पा संपला होता. गतजीवनातली ती खास प्रकरणं सांगताना ती फार हेलावली होती, हरवली होती. आठवणींची धुंदी ओसरल्यावर ती म्हणाली,
'चल, तू आपला विचारीत सुटलास. मी वेड्यासारखं बोलत राहिले . चहापाणी राहिलंच .'
'राहू दे, आपण फार चांगल्या वातावरणात वावरत आहोत. चहापाण्याची औपचारिकता नको. मला पुढची हकिगत सांग.' मी गडबडीनं म्हणालो.
'नंतरचं काय सांगू रे? तेही सगळ तसलंच आहे. पहिल्या रात्री मी त्यांना विचारलं , 'तुमचे हे विक्रम असेच चालू राहणार का?' तर सरळ 'हो' म्हणाले. त्या रात्री त्यांनी मला सगळा इतिहास सांगितला. तू एच. विश्वासराव हे नाव ऐकलंस का कधी?'
- मी नकारार्थी मान हलवली. त्यावर रजनी म्हणाली, 'अरे , नाही काय म्हणतोस? बीस बावीस वर्षांपूर्वीची कथा आहे ती.'
'मग कशी आठवणार? - तुला तरी आठवते का?'
'नाही, मलाही आठवत नव्हती. पण पपांना ते माहीत होतं.'
'बरं, पण पुढे काय?'
'ते आमचे मामंजी. विजयचे आजोबा. आमचे 'हे' दहा वर्षांचे असताना मामंजी नाहीसे झाले. एका फार मोठ्या बैंकेचे मॅनेजर होते. आणि सुमारे चार ते सहा लाख रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.'
'असं?' मी अचंब्यानं विचारलं.
'हो. पहिल्या रात्री मला ह्यांनी सांगितलं . तुरुंगात जाण्यापूर्वी ह्यांच्या आईंनी टाहो फोडून विचारलं, 'तुम्ही हे खरंच केलं का?' तेव्हां ते काहीच बोलले नाहीत. पण ह्यांना म्हणाले, 'धडाडीचा हो. नेभळा होऊ नकोस. काहीतरी वेगळं करुन दाखव. एका वेळी लाखो माणसांनी आपल्याकडे पाहावं, आपल्याबद्दल बोलावं ह्यासारखं काही कर.' एवढं बोलून ते गेले आणि नंतर वीस दिवसांतच त्यांनी तुरुंगातून पोबारा केला. ते अखेरपर्यंत सापडलेच नाहीत.'
थक्क होऊन मी म्हणालो, 'वडिलांचा कित्ता मग तुझ्या यजमानांनी लगेच उचलला?'
'नाही. पहिल्या रात्री मी हेच विचारलं की, तुम्हीही असेच काहीतरी उपद्व्याप करीत बसणार आहात का म्हणून? तेव्हा ते म्हणाले, 'वडिलांच्या बोलण्याचा' अर्थ मला समजलाच नाही. मला तेव्हा वडील मूर्ख वाटले. गाढव वाटले. पण शाळेतली मुलं मला दरोडेखोराचा लेक असं एकमुखानं म्हणायला लागली; तेव्हा सगळ्यांनी एकाबद्दल बोलावं ह्यात किती यातना आहेत त्याचा अनुभव आला. पुढं चारच वर्षांनी वडिलांचं बोलणं समजलं. त्यातला अर्थ समजला. मी व माझा मित्र टेकडीवर गेलो होतो. वेळ संध्याकाळची होती; आणि घरी परतताना माझा डावा पाय सापावर पडला. काय होतंय हे समजायच्या आतच उजवा पायही सापावरच पडला. डाव्या पायाच्या बाहेर शेपटी वळवळत होती. आणि उजव्या पायाच्या बाहेर दोन-तीन इंच तोंड डोकावत होतं. दोन्हींपैकी कोणताही एक पाय उचलला असता तर सापाचे विळखे पायाभोवती पडले असते. दोन पायात साप मधलं अंग हलवीत होता, पण त्यापेक्षा जास्त हालचाल त्याला करता येत नव्हती. सर्पदंश काही टळणार नव्हता. मित्र पंचवीस फूटावर उभा राहून थरथरत होता. मग म्हटलं करायचं धाडस. जादुगाराचे, गारुड्याचे खेळ आठवले. मग खाली वाकलो. शेपटी डाव्या हाताने शेपटी पकडली व डावा पाय काढून घेतला. एकवार मनाचा हिय्या केला आणि त्याच पद्धतीनं त्याचं मग तोंड गच्च चिमटीत पकडलं व उजवा पाय काढून घेतला. एवढं झाल्यावर आमचा दोस्त थरथरत पुढं आला. त्यावेळी त्याची ती नजर, त्यातली भीती, त्यातला माझ्यावरचा आदर, कौतुक, शहारे व असंख्य अव्यक्त-व्यक्त भाव, त्या क्षणी- त्या क्षणी- वडिलांच्या बोलण्याचा अर्थ समजला. मित्राच्या त्या नजरेनं मी झपाटलो. त्याच धुंदीत
सापासकट गावात आलो. घरी आलो. मास्तरांच्या घरी गेलो. मित्रांकडे गेलो. सगळ्यांच्या आश्चर्याच्या, कौतुकाच्या नजरा पिऊन घेतल्या. मग गावात दुसऱ्या दिवशी सत्कार झाला. धिटाईचं कौतुक झालं, प्रसंगावधानाचं गुणगान झालं, आणि मग तसलंच जीवन मुरु झालं.' अशी आहे हकीकत ह्याची .'
'बरं आता काय करताहेत?'
'तेवढंच फक्त माहीत नाही. लग्नातंरची तीन वर्षे मस्त गेली. चैन, मौज, ऐषआराम आणि धुंदी आणणारा त्यांचा सहवास. सर्कसमध्ये नोकरी होती. तीन आयटेम्स करायचे. तेही विलक्षण. मृत्यूचा गोल, वाघाच्या तोंडात मान द्यायची आणि मोटारजम्प, बावीसशे रुपये पगार होता. मी खूप भ्यायची, रात्र रात्र झोप यायची नाही. दिवसातून नऊ वेळा हे मरणाच्या दारात उभे राहून परतायचे. हसत हसत. ते हसायचे, मी रडायची. त्यांना आणखीन जोर चढायचा. अशाच जीवनात, मग विजयचा प्रवेश झाला. नंतरची दोन वर्ष हां हां म्हणता गेली. आणि एके दिवशी...'
रजनीला हुदंका आला. मी तर केव्हाच सुन्न झालो होतो. रजनीनं स्वतःला सावरलं आणि परत ती म्हणाली, 'आम्ही फिरायला चाललो होतो. विजय त्यांच्या कडेवर होता. कसा काय त्यांचा फूटपाथवरुन पाय घसरला आणि तिथंच ते मटकन् खाली बसले. मग कसलं फिरणं न कसलं काय? हां हां म्हणता पाय सुजला. मग टॅक्सी करुन दवाखान्यात, परस्पर हॉस्पिटलमधे . नशीब एवढंच की हे मुंबईतच घडलं. चार दिवस झाले, आठ झाले, पंधरा झाले. एक्सरे झाला; आणि एके दिवशी पपांनी ती वार्ता सांगितली. ह्यांचा पाय गुडघ्याच्या खाली कापायला हवा होता. दुसरा पर्यायच नव्हता.
मला ब्रह्मांडच आठवलं. ह्या बातमीनं त्यांना काय वाटेल ह्याची कल्पनाच होईना. पण अवयवापेक्षा माणूस जास्त महत्त्वाचा. त्यांच्या कानावर हे शेवटपर्यंत घालायचं नव्हतं. डॉक्टरांनी पेपरवर माझी व पपांची सही घेतली व ऑपरेशनचा दिवस ठरला. वेळ ठरली.
'ऑपरेशनच्या आधी तासभर मी हॉस्पिटलमधे गेले तर, ही धामधूम. आदल्या दिवशी रात्रीच हे गायब झाले होते. चिठ्ठी नाही , चपाटी नाही, काही नाही. आज ह्य गोष्टीला सहा वर्ष झाली. त्यांचा पत्ता नाही. पाठीशी पपा आहेत म्हणून मी इतपत आहे. ते नक्की परतणार आहेत. ते जीव द्यायचे नाहीत. असाच कोणता तरी विक्रम करताना ते मला सापडतील. एका तऱ्हेनं , ते असताना मला वाटायचं की विजयला त्यांच्यापासून दूर ठेवायचं. त्यांची सावली नाही पडू द्यायची पण तसं झालं नसतं! गेली सहा वर्ष कुठे आहेत ते!-
तू आज विजयची हकिगत सांगितलीस आणि पडताळा आला. ते इथंच आहेत.
विजयमध्ये आहेत. म्हणून म्हणाले, उपयोग नाही रागावण्याचा! हे रक्त आहे. ती वृत्ती आहे. त्यांच्या परंपरेने जोपासलेली उसळी आहे, लाट आहे. ती मला थोपवता येणार नाही, आडवता येणार नाही की वळवता येणार नाही. नुसतं पाहात बसायचं, पाहात बसायचं...'
कथासंग्रह : हुंकार
व. पु. काळे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा