मंगळवार, ९ जानेवारी, २०२४

846. खरा कलाकार

      ही गोष्ट बरीच जुनी आहे साधारण २००३/०४ या वर्षातली. म्हणजे आता त्याला २० वर्षं झाली.  नेहमीप्रमाणे मुंबईहून परत पुण्याला जायला निघालो होतो. डेक्कन क्वीनचं रिझर्व्हेशन होतं, पण माझं काम २ वाजताच झालं होतं. त्यामुळे सीएसटीला उलटं न जाता ठाणे स्टेशन वरच मी माझं तिकीट कॅन्सल केलं आणि लगेचच येणाऱ्या सिंहगड एक्सप्रेसचं तिकीट काढलं. गाडी आली, गाडीला खूपच गर्दी होती. पण मला बसायला जागा मिळाली. डब्यात माझ्या बाजूला एक युरोपियन जोडपं बसलेलं होतं. बहुतेक ते नेहमी इकडे येत असावेत त्यांना इकडची बरीच माहिती असावी. कारण त्यांच्या बोलण्यातून आपल्याकडची बरीचशी माहिती असल्याचं जाणवत होतं. इतकंच नाहीतर कर्जतचा वडापाव त्यांनी दोनदोनदा खाल्ला.  आता गाडी खंडाळा घाट चढायला लागली. तसे सगळेजण बाहेरील सृष्टीसौंदर्य बघायला लागले. एवढ्यात डब्यात गेंगाण्या आवाजात म्हटलं जाणारं गाणं आणि त्याच्या बरोबरीनं फरशीच्या चपट्या दोन तुकड्यांनी 'पिटपिट' असा आवाज करणारं साईड म्युझिक ऐकू आलं. आधीच गाडीचा आवाज, एकूण कोलाहल यामध्ये या आवाजाची भर पडत होती, पण या सगळ्याकडे  लोक दुर्लक्ष करत होते. थोड्याच वेळात तो आवाज आमच्या कंपार्टमेंटमध्ये आला. त्या आवाजाची मालकीण अगदीच छोटीशी म्हणजे सात-आठ वर्षांची लहान मुलगी होती. वयाच्या मानाने आवाज खूप खणखणीत होता. कदाचित सरावांनं तिचा आवाज मोठा झाला असेल. तिच्या बखोटीला २/३ वर्षांचं छोटं बाळ होतं.  कावऱ्याबावऱ्या नजरेनं इकडं तिकडं बघत ते बाळसुद्धा प्रत्येकाकडं हात पसरत होतं.
आता मोठीनं गाणं म्हणायला आणि सोबत ते फरशांचे तुकडे बोटांच्या सापटीत ठेवून वाजवायला सुरुवात केली. त्यांचा तालबद्ध आवाज खरं तर ऐकायला मजा येत होती. पण आजूबाजूच्या लोकांना त्यात अजिबात रस नव्हता, त्यामुळे ते तिला पुढे जायला सांगत होते. आमच्या बाजूला बसलेलं युरोपियन जोडपं मात्र कुतुहलानं तिचं वाजवणं टक लावून बघत होतं. त्यांनी तिला थांबवलं आणि आम्हाला म्हणाले, 'एक दोन गाणी म्हणूदे, बघू कसं वाजवतीय.' मग त्या मुलीनं गायला आणि वाजवायला सुरुवात केली. तो पाहुणा ते फरशांचे तुकडे वाजवणं खूप कुतुहलानं बघत राहिला. दोन गाणी झाल्यावर मात्र तो उठून उभा राहिला आणि त्याने जोरजोरात टाळ्या वाजवल्या.  मग इतरांनी लाजेकाजेस्तव टाळ्या वाजवल्या. एवढं करून तो थांबला नाही तर, त्यानं शंभर रुपयांची नोट काढून त्या मुलीला दिली. शंभराची नोट बघून ती मुलगी हरकून गेली. पण ती नोट घ्यायला ती धजावली नाही. सर्वांनी आग्रह केल्यावर तिनं ते पैसे घेतले आणि शहाण्या मुलासारखं त्या विदेशी पाहुण्याला 'थॅन्क्यू' म्हणाली. 
आता मात्र सर्वांनी मनापासून टाळ्या वाजवल्या. पण खरी गंमत नंतरच होती. तो पाहुणा तिला म्हणाला बघू मला आणि तिच्या हातातलं ते 'वाद्य' हातात घेतलं, वर खाली फिरवलं आणि तिच्याकडे बघत म्हणाला,  'May I try this?' त्या मुलीला काय कळणार? मग मीच सांगितलं की त्यांना ते वाजवून बघायचं आहे.. त्यावर तिनं तोंडाचा चंबू करून अविश्वास दाखवला पण बरं म्हणाली. पाहुण्यांनं एकदोनदा ते फरशीचे चपटे तुकडे बोटांच्या चिमटीत पकडून ताल पकडला आणि आम्ही आश्चर्यचकित होऊन ते वाजवणं ऐकू लागलो. त्या मुलीला खूप आनंद झाला आणि आश्चर्यही वाटलं. त्या ठेक्यावर तिनं एकदोन गाणी पण म्हंटली. आजूबाजूला बसलेले सगळे जण टाळ्या वाजवत साथ करायला लागले. गाणं संपलं, तसं पाहुण्यांनं मुलीला विचारलं बरोबर वाजवलं का? कसं वाटलं? तेव्हा त्या मुलीनं जे कृत्य केलं त्यानं आम्ही सगळे चाट पडलो. मगाशी मिळालेली शंभर रुपयांची नोट तिनं त्याला दिलीच पण स्वतः जवळचे ५ रूपये सुद्धा त्या पाहुण्यांना दिले आणि तुम्ही माझ्यापेक्षा छान वाजवलं असं म्हणाली, तुम्हाला माझ्याकडून बक्षीस. ते बघून सर्वच जण स्तब्ध झाले. मला तर काहीच सुचेना. माझा गळा दाटून आला आणि या छोट्याशा जीवाचा खूप अभिमान वाटला.
     त्या पाहुण्यांनं शंभर रुपये तिच्याकडून घेतले नाहीत, पण त्या मुलीनं मात्र ५ रुपये त्याला घ्यायला भाग पाडले. आता मात्र आजूबाजूच्या सर्वांनी भरभरून पैसे गोळा केले. चांगले दोन एकशे रूपये जमा झाले असतील. आता परत एक आश्चर्य घडलं. ती मुलगी एवढे पैसे घ्यायला नकार द्यायला लागली. म्हणाली, 'एवढे पैसे घेऊन गेले तर काकाला वाटेल की मला रोज एवढेच पैसे मिळतात पण मी त्याचा वडापाव खाते. मला रोज ७० किंवा ८० रूपये मिळतात. एवढे पैसे दिले तर तो काका रोज मला एवढेच पैसे मागेल नाहीतर मारहाण करेल.' आम्ही कशीतरी तिची समजूत काढली. आणि तिला ते पैसे ठेवून घ्यायला सांगितले. लोणावळा स्टेशन येताच ती मुलगी उतरुन गेली. पण जाताना सर्वांना आनंदानं अजून एक गाणं ऐकवून गेली.आता मात्र आम्ही ते नीट ऐकलं आणि मनापासून तिला दाद दिली.
लोणावळा गेल्यावर आम्हा सहप्रवाशांमधे तिच्याबद्दलच चर्चा झाली. अशा मुलांना कसं पळवून, फसवून आणतात भिक मागायला लावतात इत्यादी इत्यादी. पण जास्त कमाई होत असताना सुद्धा ती नाकारुन त्याच्या मागची खरी काळजी,  खरं कारण समजल्याने सगळेच अंतर्मुख झाले. घरी आलो तरी माझ्या डोक्यात तोच विचार घोळत होता. ही मुलगी झोपडपट्टी किंवा फूटपाथ किंवा अगदी प्लॅटफॉर्मवर राहात असेल हिच्यावर कोणी आणि कसे संस्कार केले असतील. शिवीगाळ, भांडणं, मारामाऱ्या या पार्श्वभूमीवर राहणाऱ्या या मुलीकडे मनाचा मोठेपणा कुठून आला असेल. त्या पाहुण्या युरोपियन माणसाकडून तिला मिळालेले शंभर रुपये परत करुन अजून ५ रूपयांची बक्षीशी त्याला दिली  हे सगळं तिच्याकडे कुठून आलं असेल. अशा ठिकाणी राहून सुद्धा तिच्या वर हे संस्कार कसे झाले असतील?  मग मी असा विचार केला की ती एक जन्मजात कलाकारच असणार आणि रोज येणाऱ्या अनुभवातून तिला हे शहाणपण आलं असणार. अजूनही  पुणे-मुंबई रेल्वे प्रवास करताना कर्जत ते लोणावळा दरम्यान त्या वैशिष्ट्यपूर्ण 'पीटपीट' आवाजाची मला आठवण येते. मग लक्षात येतं की २० वर्षांपूर्वीची ती मुलगी आता तेवढीच कशी असेल? कालाच्या ओघात ती पण आता मोठी झाली असेल.  मोठ्या झालेल्या 'तिला' तिच्या आजूबाजूच्या लोकांनी कसं वागवलं असेल, वाईट नजरा झेलत, सगळ्यांचा सामना तिनं कसा केला असेल. या काळात तिच्यातला कलाकार, तिच्यातील माणूस शाबूत राहिला असेल की या सगळ्या दुष्टचक्रात गुरफटून तिनं पण एखाद्या अशाच एखाद्या बाळाला जन्म दिला असेल किंवा एखाद्या सुहृदानं तिचा छान सांभाळ करून तिच्यातील कलाकार आणि माणूस मोठा केला असेल? कुणास ठाऊक? पण माझ्याकडे तरी याचं उत्तर नाही.

©️ सुधीर खांडेकर, पुणे
१६/१०/२०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...