गुरुवार, ३० एप्रिल, २०२६

2800. जोपर्यंत तू देवाला आतून बोलत नाहीस

 “शकुनी थांबला नाही. कारण कृष्णाचा धावाच झाला नाही.”
- महाभारताचं सत्य आणि आयुष्याचं धडा
महाभारतात शकुनी हा फक्त एक व्यक्तिरेखा नव्हता.
तो बुद्धीचा चुकीचा वापर, सूड, धोका आणि अंतर्मनातील विष याचं प्रतीक होता.
त्याचा डाव, त्याची योजना, त्याची फसवणूक - हे सगळं चालत होतं कारण कोणीही त्याला थांबवण्यासाठी धावा केला नव्हता.
प्रश्न नेहमी विचारला जातो:
श्रीकृष्ण सर्वशक्तिमान होते. मग शकुनीला थांबवलं का नाही?
उत्तर महाभारताच्या मूळ तत्त्वात आहे:
👉 देव हस्तक्षेप तेव्हाच करतात, जेव्हा तू धावा करतोस.
👉 तू न बोलता देव तुझ्या कर्मात अडकत नाही.
द्रौपदीने धावा केला– म्हणून कृष्ण प्रकट झाले
द्रौपदीने हात सोडले.
सारे मार्ग संपले.
मनातलं अहंकार, “मी सांभाळेन”, “मी एकटी लढेन” - हे सर्व कोसळलं.
आणि जेव्हा ती ने आतून हाक मारली -
“कृष्णा!”
तेव्हा कृष्ण प्रकट झाले.
देहाने नव्हे, पण उपस्थितीने.
यातून महाभारत सांगतं:
धावा हा बाहेरचा आवाज नाही, तो आतला स्वीकार आहे — “मी एकटी / एकटा नाही.”
पांडवांनी धावा केला नाही. म्हणून शकुनीचा डाव सुरू राहिला
युधिष्ठिर जुगारात अडकत गेले,
भीम रागात अडकला,
अर्जुन गोंधळात,
नकुल–सहदेव शांततेत.
कोणी म्हणालं नाही .
“कृष्णा, आम्हाला थांबव.”
श्रीकृष्ण सभेत होते.
सर्व जाणत होते.
शकुनी खोटं खेळतोय,
धृतराष्ट्र अंध आहे,
दुर्योधन चिडतोय.
हे कृष्णांना माहित होतं.
पण देवाने हस्तक्षेप का केला नाही?
कारण-
जितका पापाचा डाव होता, त्याहून मोठा होता माणसांचा मौन.
देव माणसाच्या स्वेच्छा वरती हस्तक्षेप करत नाहीत.
जोपर्यंत तू म्हणत नाहीस:
“कृष्णा, मला सांभाळ.”
तोपर्यंत कृष्ण अधिकाराने येत नाहीत.
कृष्ण सर्वत्र होते. पण बोलावलं नाही म्हणून हस्तक्षेप झाला नाही
ही आयुष्याची सर्वांत मोठी शिकवण आहे:
👉 देवाला बोलावलं की देव येतो.
देवाला विसरलास की शकुनी जिंकतो.
इथे “देव” म्हणजे काय?
तुझं जागृत भान
तुझा विवेक
तुझी अंतर्ज्ञान
तुझी योग्यतेची जाणीव
तुझ्यातला प्रकाश
ज्या क्षणी तू त्याला बोलावतोस,
त्या क्षणी तुला बळ मिळतं.
निर्णयाचं, धैर्याचं, स्पष्टतेचं.
शिकवण - योग्य वेळी धावा करा.
आयुष्यात कधी तुम्हाला कोणीतरी फसवतं,
कुठे चुकीचं ओढलं जातं,
कुठे शंका, भीती, गोंधळ येतो,
कुठे तर्क हरतो,
कुठे सत्य डोळ्यासमोर असूनही हात थरथरतात.
त्या क्षणी शकुनीची ऊर्जा काम करते.
तेव्हा महाभारत सांगतं:
“कृष्णाला बोलाव. शकुनीचं जाळं कोसळेल.”
धावा म्हणजे काय?
मनातला एक आतला surrendered क्षण:
“हे कृष्णा, मी इथं अडकले / अडलो आहे.
मला मार्ग दाखव.”
आणि मग जे घडतं ते चमत्कारच असतं.
देव प्रकट कधी होतात?
👉 मन शांत झालं की.
👉 अहंकार खाली आला की.
👉 सत्य स्वीकारलं की.
👉 आतली हाक प्रामाणिक झाली की.
देव दाराबाहेर थांबलेले नसतात.
देव अंतर्मनातच बसलेले असतात.
फक्त तू बोललास की ते उठतात.
जीवनातील महान तत्त्व
महाभारत म्हणतं:
“जोपर्यंत तू देवाला आतून बोलत नाहीस,
तोपर्यंत देव तुझ्या आयुष्यात प्रकट होत नाही.”
आणि हेच सत्य प्रत्येक संकटात लागू आहे. 
                    
🙏राम कृष्ण हरी माऊली 🙏

2799. मुलगी..फक्त एक नाजूक फुल?

 "लग्न ठरलं होतं, कार्ड छापून झाले होते आणि संपूर्ण घर आनंदाने फुलून गेलं होतं."
पण एका फोन कॉलने त्या आनंदाच्या महालाला क्षणात पत्त्यांच्या घरासारखं कोसळवलं.
शेवटी वराच्या वडिलांनी अगदी शेवटच्या क्षणी नातं का तोडलं? कारणच् असं होतं की प्रत्येक आई- वडिलाचं हृदय कळवळून जाईल."
अविनाशजी त्यांची एकुलती एक मुलगी आंचल हिच्या लग्नामुळे खूप आनंदात होते. जावई शहरातील मानाचा अधिकारी होता आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हे लग्न पूर्णपणे 'हुंडामुक्त' होतं. अविनाशजींना असं वाटत होतं की जणू त्यांना आयुष्यातली सर्वात मोठी लॉटरी लागली आहे. पण लग्नाला अवघे २० दिवस बाकी असताना, मुलाच्या वडिलांचा फोन आला.
"अविनाशजी, माफ करा, पण आम्ही हे नातं पुढे नेऊ शकत नाही." खन्नाजींच्या आवाजात एक वेगळीच गंभीरता होती.
अविनाशजींच्या पायाखालची जमीन सरकली. "पण खन्ना साहेब! काय झालं? आमच्याकडून काही चूक झाली का? स्वागत-सत्कारात काही कमी राहिली का?"
खन्नाजींनी एक खोल सुस्कारा सोडला आणि म्हणाले, "अविनाशजी, मागील दोन महिन्यांत मी अनेक वेळा न सांगता तुमच्या घरी आलो. मी तुमच्या मुली आंचलच्या पदव्या पाहिल्या, तिचं सौंदर्य पाहिलं, पण जे दिसलं नाही... ते म्हणजे संस्कार आणि संवेदनशीलता."
अविनाशजी थक्क झाले. खन्नाजी पुढे जे बोलले, ते प्रत्येक त्या आई-वडिलांसाठी धडा आहे जे आपल्या मुलीला फक्त 'नाजूक फुल' समजून वाढवतात:
"मी जेव्हा-जेव्हा तुमच्या घरी आलो, तेव्हा तुमच्या पत्नीला घामाने ओलेचिंब होऊन स्वयंपाकघरात काम करताना पाहिलं, कधी झाडू मारताना तर कधी जड वस्तू उचलताना पाहिलं. पण आंचल? ती प्रत्येक वेळी आपल्या खोलीत सजून-धजून मोबाईलमध्ये गुंतलेली किंवा सोफ्यावर बसून टीव्ही पाहत होती. तिला एकदाही जाणवलं नाही की तिची आई थकत आहे."
"अविनाशजी, मला माझ्या घरासाठी फक्त सजावटीची बाहुली नको आहे जी फक्त शोकेसमध्ये उभी राहील. मला अशी 'सून' हवी आहे जी नात्यांची जाणीव ठेवेल. जी मुलगी आपल्या आईचे अश्रू आणि थकवा पाहू शकत नाही, ती उद्या माझ्या वृद्ध पत्नीची सेवा कशी करेल? जे हात आईचं ओझं वाटून घेत नाहीत, ते आमच्या घराच्या जबाबदाऱ्या कशा पेलतील?"
अविनाशजींच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. त्यांना समजलं की मुलीला 'राजकुमारी' बनवण्याच्या नादात त्यांनी तिला एक जबाबदार 'माणूस' बनवणं विसरून गेले होते.
आजकाल प्रत्येक आई- वडील आपल्या मुलीला खूप लाड-प्रेम देतात, जे योग्यच आहे. पण त्या प्रेमाच्या आड आपण तिला कमकुवत तर बनवत नाही ना?
नक्की विचार करा: 🤔
👉 मुलीला घरकाम शिकवणं म्हणजे तिला 'मोलकरीण' बनवणं नाही, तर तिला स्वावलंबी बनवणं आहे. जेणेकरून उद्या तिला कोणासमोर असहाय वाटणार नाही.
👉 वेळोवेळी तिच्या चुका दाखवणं गरजेचं आहे. जर तिला माहेरी ओरडा सहन करायला शिकवलं नाही, तर सासरी मोठ्यांचं बोलणं तिला 'अपमान' वाटेल आणि तिथूनच नात्यांमध्ये तडे जाऊ लागतील.
👉 अनेकदा लोक मुलांवर दोष टाकतात की त्यांनी आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवलं. पण लक्षात ठेवा, त्या निर्णयामागे कुणाच्या तरी 'मुलीची' विचारसरणीही कारणीभूत असते. जर आपण आपल्या मुलीत सेवाभावाचे संस्कार अगदी चांगल्या प्रकारे रुजवले, तर समाजात वृद्धाश्रम कधीच तयार होणार नाहीत हो..
आपल्या मुलीला फक्त 'मुलगी' म्हणून वाढवू नका, तिला एखाद्या घराची 'मान-प्रतिष्ठा' आणि 'संस्कारित सून' बनण्यास योग्य बनवा. नाहीतर शिक्षा फक्त तिलाच नाही, तर संपूर्ण कुटुंबाला भोगावी लागेल हो, विचार करा ..!!

2798. Return Theory

 सहजच एक पुस्तक वाचत असताना.. "Return Theory" बद्दल वाचलं.  आपल्या अनेक अध्यात्मिक ग्रंथामध्ये याबद्दल लिहिलंच आहे..पण मला जे भावलं ते मांडायचा हा छोटासा प्रयत्न..
"Return" म्हणजे “परत येणं”.. खरंतर किती साधा शब्द. पण त्यामागे दडलेलं तत्त्वज्ञान मात्र खूप गहिरं !  आपण आयुष्यात जे काही देतो, ते कुठेतरी, कधीतरी, कोणत्यातरी रूपात आपल्याकडे परत येतंच. पण ते नेहमी तसंच, त्याच रूपात परत येतं का? की त्याचा अर्थ काही वेगळाच असतो?
कदाचित...
आपण ज्या भावना जगतो, त्या विश्वात विरघळून जात नाहीत;  तर त्या एखाद्या प्रतिध्वनीसारख्या आपल्याच दिशेने पुन्हा प्रवास सुरू करतात.
तुम्ही कधी डोंगरकड्यावर उभं राहून आपल्याच नावाची हाक मारली आहे?
पहिल्यांदा आपला आवाज दूरवर हरवतोय असं वाटतं. पण क्षणभरात तोच आवाज परत येतो. 
थोडा बदललेला, थोडा हलका, कधी अधिक गूढ.
Return theory म्हणजे असाच काहीसा प्रतिध्वनी. पण हा आवाजाचा नाही, आपल्या कृतींचा, विचारांचा, आणि सर्वात महत्त्वाचं. आपल्या भावनांचा.
आपण एखाद्याला बहाल केलेला हसरा क्षण, त्याच व्यक्तीकडून परत येणार नाही कदाचित. पण एखाद्या अनोळखी चेहऱ्यावर उमटलेल्या स्मितहास्यातून तो आपल्याला परत मिळेल.
आपण कुणाला तरी दिलेली वेदना सुद्धा तशीच. ती जशीच्या तशी परत येईल असं नाही; पण एखाद्या नात्यात, एखाद्या प्रसंगात, ती आपल्याला अनुभवावी लागेलच.
हे ऐकताना थोडं भीतीदायक वाटतं, नै का?
पण खरंतर, ही भीती नाही तर एक जाणीव आहे. जबाबदारीची जाणीव.
कारण return theory आपल्याला सांगते.
“तू जे काही करतेयस , ते फक्त त्या क्षणापुरतं मर्यादित नाही. ते एक बीज आहे आणि त्या बीजाचं फळ तुला कधीतरी चाखावंच लागणार आहे.”
मग विचार करायला लावणारा प्रश्न असा उभा राहतो..
आपण आपल्या आयुष्यात कोणती बीजं पेरतोय?
रागाची?
अहंकाराची?
की प्रेमाची, समजुतीची, आणि शांततेची?
कारण पेरिले ते उगविले. अस आपण म्हणतोच की.
खरं सांगायचं तर, आयुष्य म्हणजे एक विशाल शेत आहे.
आपण नकळत रोज काही ना काही पेरत असतो. 
शब्दांनी, नजरेने, स्पर्शाने, आणि कधी कधी आपल्या शांततेने सुद्धा.
आणि मग काळ, अगदी शांतपणे, त्या बीजांना अंकुरायला मदत करतो.
काही बीजं लगेच उगवतात.
काही वर्षानुवर्षं मातीत दडून राहतात. हं,पण ती नष्ट होत नाहीत.
Return theory इथेच आपलं खरं रूप दाखवते.
ती आपल्याला घाई करू देत नाही.
ती सांगते, “थांब… वेळ येईल तेव्हा सगळं परत येईल.”
आपण अनेकदा म्हणतो, “मी इतकं चांगलं केलं, तरी माझ्याबरोबर असं का झालं?”
किंवा “मी कुणाचं वाईट केलं नव्हतं, मग मला का भोगावं लागतंय?”
कदाचित...
आपण जे ‘आता’ अनुभवतोय, ते ‘आत्ता’चं नसतंच.
ते आपल्या कालच्या, परवाच्या, किंवा कधी काळी नकळत केलेल्या कृतींचं परतणं असतं.
पण याचा अर्थ असा नाही की आयुष्य  हिशोबाची वही आहे, जिथे प्रत्येक गोष्टीचा ताळेबंद जुळवला जातो.
नाही. आयुष्य इतकं कोरडं नाही.
कारण काही वेळा, आपण दिलेलं प्रेम हजारपट वाढून परत येतंचं की..
आणि काही वेळा, आपण सहन केलेल्या वेदना आपल्याला इतकं मजबूत करून जातात, की त्या वेदनांचं परतणंही आपल्याला सुंदर वाटायला लागतं.
Return theory ही फक्त कर्माची गोष्ट नाही... ती ‘ऊर्जेची’ गोष्ट आहे.
आपण ज्या भावनेने काही करतो, ती भावना विश्वात साठवली जाते.
जर तूम्ही एखाद्याला मदत केली, पण मनात अपेक्षा ठेवली “तो मला परत काही देईल”..
तर तूम्ही खरंतर एक व्यवहार केलाय, ते देणं नव्हे.
पण जर तूम्ही मनापासून, कोणतीही अपेक्षा न ठेवता दिलं
तर त्या देण्याची ऊर्जा इतकी शुद्ध असते, की ती तुम्हाला परत येताना अनेक पटींनी समृद्ध करून जाते.
म्हणूनच, काही लोक खूप कमी मिळालं तरी समाधानी असतात.
आणि काही लोक खूप काही असूनही रिकामे वाटतात.
कारण परत येणारं फक्त ‘काय’ आहे हे महत्त्वाचं नसतं…
तर ‘कसं’ आणि ‘का’ दिलंय हे अधिक महत्त्वाचं असतं.
आयुष्यात काही नाती अचानक तुटतात…
काही लोक अचानक दूर जातात…
आपण विचार करतो, “हे का झालं?”
कदाचित, तेही एक प्रकारचं return असतं.
आपण स्वतःला, आपल्या भावनांना, आपल्या गरजांना विसरून जेव्हा दुसऱ्यांसाठी जगतो…
तेव्हा आयुष्य आपल्याला परत एकटं करून सांगतं,
“आता स्वतःकडे परत ये.”
Return theory म्हणजे फक्त बाहेरचं परतणं नाही…
तर तो स्वतःकडे परत येण्याचा प्रवासही आहे.
आपण अनेकदा बाहेरच्या जगात इतके गुंततो, की स्वतःला हरवून बसतो.
आणि मग एखाद्या वळणावर, एखाद्या प्रसंगात, आयुष्य आपल्याला थांबवतं....
आणि म्हणतं,
“परत ये… स्वतःकडे.”
किती विलक्षण आहे ना हे?
जगात सगळं पुढे जात असताना, ‘परत येणं’ हीच खरी प्रगती ठरते.
Return theory आपल्याला शिकवते,
तू जे देतेयस, तेच तू आहेस.
तू जे अनुभवतेयस, ते तुझंच प्रतिबिंब आहे.
मग जर आयुष्य सुंदर हवं असेल.
तर सुंदर गोष्टींची अपेक्षा करण्यापेक्षा, सुंदर गोष्टी देणं सुरू करायला हवं...
कारण शेवटी, आयुष्य हे एखाद्या आरशासारखंच आहे ना..
त्यात जे दाखवणारं , तेच तुला परत दिसणारं....
 म्हणूनच...
देताना जपून द्या , बोलताना जपून बोला , आणि प्रेम करताना तर अजून जपून प्रेम करा..
कारण प्रत्येक भावना, प्रत्येक शब्द, प्रत्येक स्पर्श..
एक दिवस तुमच्याकडे परत येणार आहे…
कदाचित वेगळ्या रूपात, वेगळ्या वेळी…
पण नक्कीच, अनिवार्यपणे.
आणि त्या दिवशी,
तूम्ही जेव्हा स्वतःकडे पाहाल...
तेव्हा  समजेल..
“मी जे दिलं होतं,
तेच आज मला परत मिळतंय…”

© ®वृंदा दाभोलकर

2797. एखाद्या बाईचा नवरा गेला की...

 एखाद्या बाईचा नवरा गेला की…
तिचं आयुष्य संपत नाही,
पण समाज तिचं जगणं मात्र हळूहळू संपवायला लागतो.
कालपर्यंत तिच्या कपाळावरचं कुंकू, गळ्यातलं मंगळसूत्र आणि चेहऱ्यावरचं हसू पाहून
“भाग्यवान” म्हणणारेच लोक…
आज त्याच हसण्यावर आक्षेप घेतात…
ती जरा हसली, तर प्रश्न…
ती नीट तयार झाली, तर कुजबुज…
ती बाहेर पडली, तर नजर…
आणि ती शांत राहिली, तरीही तिला सोडलं जात नाही…
का…?
तिचा नवरा गेला म्हणून तिने जगणंही थांबवावं का…?
एक पुरुष बायको गमावतो,
तर समाज त्याला धीर देतो…
“पुन्हा संसार कर” असं सहज सांगतो…
पण तीच वेळ जेव्हा एका स्त्रीवर येते,
तेव्हा तिच्या आयुष्याभोवती नियमांचं जाळं विणलं जातं…
तिला रंगीत कपडे घालू नको म्हणतात…
तिच्या सण-उत्सवात सहभागी होण्यावर बंधन घालतात…
तिच्या आनंदालाच जणू पाप ठरवलं जातं…
कधी तिच्या चारित्र्यावर शंका घेतली जाते…
कधी तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न होतो…
कधी “लोक काय म्हणतील” या नावाखाली तिचं आयुष्यच कैद केलं जातं…
हे सगळं सहन करत ती जगत असते…
कारण तिच्याकडे पर्याय नसतो…
तिच्यावर घराची जबाबदारी येते…
मुलांचं भविष्य तिच्या खांद्यावर येतं…
स्वतःचं दुःख बाजूला ठेवून ती सगळ्यांसाठी उभी राहते…
पण समाजाला तिचं धैर्य दिसत नाही…
दिसतं ते फक्त तिचं “विधवा” असणं…
खरं तर तिचा गुन्हा काहीच नाही…
तरीही शिक्षा मात्र तिलाच…
ती हसली तर तुम्हाला त्रास होतो…
पण तिच्या रडण्याने तुमची कधी झोप उडाली का…?
तिच्या चारित्र्यावर बोट ठेवणारे तुम्हीच…
तिच्या सुरक्षिततेसाठी एक पाऊल पुढे टाकता का…?
“लोक काय म्हणतील” म्हणून तिला थांबवणारे तुम्ही…
लोकांपुढे तिच्यासाठी उभं राहता का…?
तिच्या आयुष्यावर मर्यादा लावणारे तुम्ही…
तिच्या वेदनांचा थोडा भाग उचलू शकता का…?
तिला सांगता “जपून राहा”…
पण तिच्या आयुष्याची जबाबदारी घ्यायला तयार आहात का…?
तिच्या दुःखाच्या वेळी दोन शब्द दिले नाहीत…
आणि आज तिच्या जगण्यावर निर्णय देत बसलात…
हेच खरं आहे समाजाला तिचं दुःख नाही दिसत…
फक्त तिच्यावर बोलायचा विषय दिसतो…
ती एकटी पडली म्हणून कमकुवत नाही…
ती एकटी उभी आहे म्हणून मजबूत आहे… 
आता बदलायला हवं…तिच्या कपड्यांवर नाही, तिच्या जखमांवर लक्ष द्यायला हवं…
तिच्या हसण्यावर प्रश्न नाही, तर तिच्या आयुष्याला आधार द्यायला हवा..

2796. या जगात काहीही घडू शकतं

 James Harrison यांना “Man with the Golden Arm” म्हणून ओळखलं जात होतं.
1951 मध्ये, जेम्स हॅरिसन नावाचा 14 वर्षांचा ऑस्ट्रेलियन मुलगा हॉस्पिटलच्या बेडवर जागा झाला. त्याच्या छातीवर 100 टाके होते.
डॉक्टरांनी त्याच्या एका फुफ्फुसाची शस्त्रक्रिया करून काढली होती. जिवंत राहण्यासाठी त्याला 13 युनिट रक्ताची गरज होती—अशा लोकांकडून, ज्यांची नावे त्याला कधीच कळणार नव्हती.
त्याचे वडील, Reg Harrison, त्याच्या बाजूला बसले आणि त्यांनी एक वाक्य सांगितलं ज्याने त्याचं आयुष्य बदललं:
“तू आज जिवंत आहेस कारण कुणीतरी रक्तदान केलं.”
त्याच क्षणी जेम्सने एक वचन दिलं—18 वर्षांचा होताच तो रक्तदान करणार. त्याने ठरवलं की ज्यांनी त्याचं प्राण वाचवलं, त्या उपकारांची परतफेड करायची.
पण एक अडचण होती...
जेम्सला सुयांची प्रचंड भीती वाटायची.
पण 1954 मध्ये, तो पात्र ठरला त्या दिवशी तो रक्तदान केंद्रात गेला. तो खुर्चीत बसला, छताकडे पाहिलं आणि नर्सने सुई टोचू दिली.
त्याने कधीही सुईकडे पाहिलं नाही—एकदाही नाही. तब्बल 64 वर्षे.
जेम्सला माहित नव्हतं की त्याचं रक्त वेगळं आहे. काही वेळा रक्तदान केल्यानंतर डॉक्टरांना एक आश्चर्यकारक गोष्ट समजली—त्याच्या प्लाझ्मामध्ये एक दुर्मिळ अँटिबॉडी होती, जी कदाचित त्याला लहानपणी दिलेल्या रक्तामुळे तयार झाली होती. ही अँटिबॉडी Rhesus disease या घातक आजारापासून बचाव करू शकत होती.
या शोधापूर्वी, ऑस्ट्रेलियात दरवर्षी हजारो बाळं मृत्युमुखी पडत होती.
Rh-negative आई आणि Rh-positive बाळ असताना आईचं शरीर बाळाच्या रक्तावर हल्ला करत असे—गर्भपात, मृतजन्म, मेंदूचं नुकसान.
जेम्सच्या रक्तात याचं उत्तर होतं.
डॉक्टरांनी त्याला प्लाझ्मा डोनेशन करण्याची विनंती केली. यासाठी जास्त वेळ लागत होता—20 मिनिटांऐवजी 90 मिनिटे—आणि आयुष्यभर दर काही आठवड्यांनी येणं आवश्यक होतं.
जेम्सने आपल्या भीतीचा विचार केला...
आणि मग त्या बाळांचा.
त्याने होकार दिला.
64 वर्षे जेम्स हॅरिसनने एकही अपॉइंटमेंट चुकवली नाही.
तो आनंदातही रक्तदान करत राहिला, दुःखातही. रेल्वे क्लर्क म्हणून काम करत असताना, निवृत्तीनंतरही. 2005 मध्ये त्याची पत्नी बार्बरा निधन पावल्यानंतरही—जे दिवस त्याने “सर्वात कठीण” म्हटले—तो थांबला नाही.
प्रत्येक वेळी—एकूण 1,173 वेळा—तो छताकडेच पाहायचा. नर्सशी गप्पा मारायचा. भिंतीकडे लक्ष द्यायचा. सुईकडे पाहणं टाळण्यासाठी काहीही करायचा.
भीती कधीच गेली नाही.
पण तरीही तो दरवेळी हजर राहिला.
एक सुंदर योगायोग म्हणजे - त्याच्या स्वतःच्या मुलीला गर्भधारणेदरम्यान त्याच्याच रक्तापासून तयार झालेलं औषध घ्यावं लागलं. त्याचा नातू स्कॉट आज जिवंत आहे, कारण त्याच्या आजोबांनी वर्षांपूर्वी घेतलेला निर्णय.
मे 2018 मध्ये, 81 व्या वर्षी, ऑस्ट्रेलियाच्या कायद्यामुळे जेम्सला शेवटचं रक्तदान करावं लागलं.
त्या दिवशी खोलीत अनेक आई आणि त्यांच्या निरोगी बाळांचा जमाव होता. त्याच्या शांत पराक्रमाचं जिवंत उदाहरण. त्यांनी डोळ्यांत अश्रू घेऊन त्याचे आभार मानले.
जेम्स शेवटच्या वेळेस खुर्चीत बसला, शेवटच्यांदा नजर वळवली आणि त्याचं 1,173वं रक्तदान केलं.
1967 पासून त्याच्या रक्तावर आधारित Anti-D औषधाच्या 30 लाखांहून अधिक डोस देण्यात आले आहेत. वैज्ञानिकांच्या मते, त्याच्या योगदानामुळे केवळ ऑस्ट्रेलियात सुमारे 24 लाख बाळांचे जीव वाचले.
लोक त्याला हिरो म्हणायचे, पण तो ते सहजपणे नाकारायचा.
तो म्हणायचा:
“मी एका सुरक्षित खोलीत बसून रक्तदान करतो. ते मला कॉफी आणि खायला काही देतात, आणि मग मी माझ्या मार्गाने निघून जातो. यात काहीच कठीण नाही.”
James Harrison यांचं 17 फेब्रुवारी 2025 रोजी शांत झोपेत निधन झालं. ते 88 वर्षांचे होते.
आपण अनेकदा हिरोंचा शोध चित्रपटात किंवा इतिहासात घेतो. असामान्य शक्ती, संपत्ती किंवा प्रसिद्धी असलेल्या लोकांत.
पण कधी कधी खरा हिरो तो असतो.
जो 64 वर्षे शांतपणे एक वचन पाळतो.
जो भीती असूनही. खूप खोल भीती असूनही. योग्य तेच करतो.
आज लाखो लोक जिवंत आहेत, कारण एका माणसाने आपल्या भीतीपेक्षा इतरांच्या आयुष्याला अधिक महत्त्व दिलं.

2795. कसोटी...ममतेची !

 सोना शेवटचा पेपर देऊन काॅलेजातून घरी आली तेव्हा ती आपल्याच विचारात होती. तिच्या दादीच्या ते लक्षात आल्यावर तिने विचारलं, "सोना, परेशान दिसतेयंस तू ! काय झालं ?"
सोना म्हणाली, "काही नाही गं दादी ! उद्यापासून दीड महिना काॅलेजला सुट्टी आहे. या सुट्टीत कुठे जायचं याचा विचार करत होते. पिताजी घरी आले की विचारते त्यांना !"
घरी आल्यावर तिचे पिताजी दादा दादीबरोबर चहा घेत बसले होते. सोना आपल्याच विचारात असल्याचे पाहून त्यांनी तिला विचारल्यावर ती आपल्याच नादात म्हणाली, "पिताजी, या सुट्टीत महिनाभर मी मां कडे राहायला जाऊ का?"
तिच्या अनपेक्षित विचारण्याने तिचे पिताजी विचारात पडले. बराच वेळ ते काही बोलले नाही. ते पाहून ती थोडी भानावर आली होती. मांचा विषय काढल्याने त्यांची मनःस्थिती कशी झाली असेल याची सोनाला थोडीशी कल्पना आली म्हणून तीसुद्धा गप्प बसली. थोड्या वेळाने खुर्चीवरून उठत ते म्हणाले, "ठीक आहे बेटी, तुझ्या मनात आलं ना, मग जाऊन ये. परवा आपण मोनाचा वाढदिवस मनावला की तू तेरवा नीघ. मी फ्लाईटचं तिकिट मागवून घेतो."
पिताजींपाठोपाठ ती त्यांच्या खोलीत शिरली आणि त्यांना बिलगत तिनं विचारलं, "पिताजी, रागावलात माझ्यावर?"
ते म्हणाले, "नाही गं बेटी ! मी रागावलो नाही पण थोडा विचलित झालो. तुझ्या मांपासून दूर झालीस तेव्हा तू चार वर्षांची होतीस. गेल्या सतरा वर्षात तुझ्या मांबद्दल तू कधीच काही विचारलं नाहीस. तिच्याकडे जाण्याबद्दलही तू कधी विषयसुद्धा काढला नाहीस. पण आज अचानक तिच्याकडे जाण्याबद्दल मला विचारलंस म्हणून मी थोडा विचारात पडलो. त्याचबरोबर तिने तुला तिच्याकडेच ठेवून घेतलं, तू परत आली नाहीस तर काय ही भीतीसुद्धा वाटली मला !"
ती म्हणाली, "पिताजी, घरातल्या तीन फोटो आल्बममध्ये असलेल्या फोटोत आणि या खोलीत भिंतीवर टांगलेल्या या दहा बारा फोटोत आणि हाॅलमधल्या मांच्या पोट्रेटमध्ये मी मांला पाहात आलेय. ते फोटोसुद्धा सतरा वर्षांपूर्वीचे आहेत. आपण दरवर्षी मांचा आणि मोनाचा केक कापून वाढदिवस साजरा करतो हे खरंय पण दादीनं मला वाढवलं, जोपासलं तेव्हा तीच माझी मां आहे असं मी मानत आलेय. मां मला सोडून गेली तेव्हा मी इतकी लहान होते की मला तिची माया, प्रेम आठवतसुद्धा नाही, मग मी तिची आठवण कशाला काढत बसू ?"
त्यांनी विचारलं, "मग तिच्याकडे जाण्याचं आज अचानक कसं तुझ्या मनात आलं ?"
ती म्हणाली, "आज नाही तर महिन्यापूर्वी माझ्या मनात आलं. मागच्या महिन्यात मी सहा दिवस तन्वीबरोबर चंदिगडला तिच्या घरी गेले होते ना, तेव्हा आम्ही घरात शिरताच तिच्या मांने अत्यंत ओढीने व उत्कटतेनं तिला आपल्या मिठीत घेतलं होतं तेव्हा मला मांची खूप आठवण आली आणि तीसुद्धा मला पाहिल्याबरोबर मला अशीच मिठीत घेईल अशी भावना माझ्या मनात उमटली. म्हणून काही दिवस तिच्या बरोबर राहावं असं मला वाटायला लागलं. सहा दिवस तन्वीची मां तिला कशी लाडप्यार करायची ते मी पाहात होते. त्या त्या वेळी मला मांची आठवण यायची. यापूर्वी मला असं कधी वाटलं नव्हतं. ती मुंबईला राहाते हे तर मला माहीत होतं ना, तरी वर्षापूर्वी आपण खंडेलवाल अंकलकडे लग्नाला गेलो होतो तेव्हा तिची आठवण तरी मी काढली होती का ? तरी पिताजी, मी परत येणार नाही ही भीती तुमच्या मनात राहाणार असेल तर मी नाही जाणार तिच्याकडे !"
पिताजी म्हणाले, "हे बघ, ती भीती माझ्या मनात राहाणारच, तुझी उणीव मला खूप जाणवेल. तरी तुझ्या मांने तुला तिच्याकडे ठेवून घेतलं तर मला आनंदच होईल. तिची इच्छा मी नाही डावलू शकणार ! नाही तरी दोन तीन वर्षात तुझं लग्न होईल त्यानंतर तं तुझ्या ससुरालला जाशील तेव्हा तुझी पोकळी निर्माण होणारच आहे. ती आधीच निर्माण झाली असं मी समजेन. तुझी मां आणि माझ्यात वाद, मतभेद कधीच नव्हते. सतरा वर्षांपूर्वी मी तिच्यावर जितकं उत्कट प्रेम करत होतो तितकंच मी आजही करतोय. तीसुद्धा माझ्यावर अतिव प्रेम करत असणार हा मला विश्वास आहे."
सोना म्हणाली, "मग तुम्ही वेगळे का व कसे झालात ? मी कधी विचारलं नाही पण आज विषय निघालाय म्हणून विचारतेय."
ते म्हणाले, "बेटी, ..."
ती म्हणाली, "पिताजी, सांगणं अवघड वाटत असेल तर नका सांगू. मला माहीत झालं नाही तरी चालेल."
ते म्हणाले, "बेटी, तुला माहीत झालं तरी त्यात विशेष असं काही नाहीये. तू आता एकवीस वर्षांची झालीस. तुला माहीत असणं हे चांगलंच आहे. आम्हाला वेगळं व्हावं लागलं ते तुझ्या नानाजी व नानीमुळे आणि त्यावेळी उद्भवलेल्या विचित्र परिस्थितीमुळे ! एकमेकांशी चर्चा करून पूर्ण रजामंदीनं आम्ही विभक्त झालो. आम्ही वेगळे होतानाही आमच्यात वाद झाले नाहीत. आम्ही प्राप्त परिस्थिती स्वखुशीने, स्वमर्जीने स्वीकारून वेगळे झालो. तुझ्या नानाजींसाठी तुझ्या मांनं केलेला तो मोठा त्याग होता."
ती म्हणाली, "मला समजेल असं सांगा ना !"
ते म्हणाले, "बेटी, तुला आधीपासून सगळंच सांगतो. मी मुंबईला काॅलेजात शिकायला होतो. तिथे आमची ओळख झाली. मग आम्ही एकमेकांवर प्रेम करायला लागलो. आम्ही दोघे एकाच बिरादरीतले असल्यामुळे आमच्या लग्नाला सगळ्यांची रजामंदी मिळाली. तुझ्या नानाजींचा सगळा कारोबार मुंबईला होता पण आमचं लग्न चितोडगढला त्यांच्या खानदानी हवेलीत झालं. मी बारात घेऊन दिल्लीला आलो. सात वर्षे आमची खूप सुखात गेली. तुझा जन्म चितोडगढला झाला. मोनाचा जन्म दिल्लीला झाला. त्यानंतर एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. तुझे मामाजी एका अॅक्सिडेंटमध्ये वारले. ते फक्त चोवीस वर्षांचे होते. इतक्या तरुण वयात तुझे मामाजी वारले यांचा प्रचंड धक्का तुझ्या नाना नानींना बसला. ते खूप विकल झाले, पूर्ण खचून गेले. त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं. पंधरा दिवस आपण सगळे तिथेच होतो. मग मी परत दिल्लीला आलो. त्यांची देखभाल करण्यासाठी तुझी मां तीन महिने तिथेच होती. एकुलता एक मुलगा गेला, आता आपली मुलगी आपल्याला आयुष्यभर आधार देईल अशी भावना हळुहळू तुझ्या नाना नानीच्या मनात बळावत गेली. दोघेही त्या भावनेच्या पूर्ण आहारी गेले. त्या तीन महिन्यांत त्यांनी तुझ्या मांला पूर्णपणे आपल्या आधिन करून घेतलं. ते तिला सतत इमोशनल बॅकमेल करत होते. त्यांच्यावर खूप प्रेम असल्यामुळे आणि त्यांच्या पूर्ण आधिन झाल्यामुळे तुझी मां त्यांची व त्यांच्या कारोबाराची सगळी जिम्मेदारी स्वीकारायला तयार झाली तेव्हा कुठे ते दोघे सावरत गेले. तीन महिन्यांनी मी तिथे गेलो. तुझ्या नाना नानींचा आणि तुझ्या मांचाही आग्रह होता की मीसुद्धा तिथे राहून त्यांचा कारोबार पाहावा. तुझ्या नाना नानीला सोडून जायची तुझ्या मांचीही इच्छा नव्हती. मी तिथेच राहावं असं तिचंही म्हणणं होतं पण मला ते शक्य नव्हतं. इथं तुझे दादा दादी होते. तुझ्या दोन बुआंची लग्न व्हायची होती. त्या जबाबदा-या मी टाळू शकत नव्हतो. बरीच चर्चा, विचारविनिमय केल्यावर आम्ही राजीखुशीने व एकमेकांच्या रजामंदीने ठरवलं की तिने तिच्या पिहरमध्ये राहावं, मी दिल्लीला दादा दादीबरोबर राहावं. तू माझ्याकडे राहाशील आणि मोना तिच्याकडे राहील."
सोनाने विचारलं, "सगळं एकमेकांच्या रजामंदीनं ठरलं होतं मग तुम्ही तुमचे संबंध का संपवलेत ? एकमेकांना भेटणंसुद्धा का थांबवलंत ?"
ते म्हणाले, "आम्ही एकमेकांकडे जात येत राहिलो तर तुझी मां कधी तरी माझ्याकडे कायमची निघून येईल या भीतीचा प्रचंड पगडा तुझ्या नाना नानींच्या मनावर होता. त्या भीतीपायी आम्ही कायमचे वेगळे होऊ, सोनाचा मोहसुद्धा ती बाळगणार नाही, आम्ही फोनवरही बोलणार नाही असं वचन त्यांनी तुझ्या मांकडून घेतलं होतं. आम्ही घटस्फोट घ्यावा असा त्यांचा आग्रह होता पण आम्ही दोघांनीही तुमच्या दोघींसाठी त्यांच्या इच्छेला जुमानलं नव्हतं मग त्यांनी माघार घेऊन त्यांचा हट्ट सोडला होता. आम्ही वेगळे राहातोय तरी पती पत्नी नात्याने आजही आम्ही जोडलेलो आहोत. मी दिल्लीला परतलो. तुझ्या नशिबी तुझ्या मांचा आणि मोनाच्या नशिबी तिच्या पिताजीचा वियोग आला."
तिने विचारलं, "नंतर तुम्ही एकमेकांना कधीच भेटला नाहीय का ?"
ते म्हणाले, "त्यानंतर तीन महिन्यांनी मला मुंबईला जायचं होतं. मी तुझ्या मांला फोन करून तसं सांगितलं. तिने ते तुझ्या नाना नानीला सांगितलं. मी तिला न्यायला येतोय या भीतीने तुझ्या नानाला धक्का बसला होता. त्यांची तब्येत बिघडली. त्यांना हाॅस्पिटलला अॅडमिट करावं लागलं होतं. ते पाहून तुझ्या नानीने तुझ्या मांवर पुन्हा भावनिक दबाव टाकला. मग मला फोन करुन काय झालं ते सांगून तुझी मां म्हणाली की, 'मी माझ्या मां पिताजींच्या वचनाला बांधलेली असल्यामुळे आपण बाहेर भेटणंसुद्धा उचित ठरणार नाही.' मग मी तिच्या भावनेचा आदर करायचा म्हणून मुंबईला जाऊनही तिला भेटलो नाही. नंतर मात्र आमचा संपर्क संपला."
ती म्हणाली, "माझाही मोह ती बाळगणार नाही असं वचन तिने तिच्या मां पिताजींना दिलं, तर मग ती मला विसरलीसुद्धा असेल !"
ते म्हणाले, "नाही बेटी ! मांची ममता इतकी लेचीपेची नसते. इतक्या वर्षाने तुला पाहिल्यावर ती कदाचित तुला ओळखणार नाही पण तुला विसरणे शक्य नाही."
ती म्हणाली, "पिताजी, मी तिला भेटायला जाणार होते पण नेमकं काय घडत गेलं हे मला समजल्यामुळे तिच्याकडे जाऊन तिला ओळख न देता ती मला विसरलीय का याचा अनुभव घ्यावा असं मला वाटायला लागलंय."
ते म्हणाले, "बेटी, तुझ्या वेडेपणाला काय म्हणायचं ! मोनाची आठवण माझ्या मनात असतेच. फक्त आपल्या बोलण्यात तिची आठवण क्वचितच निघते पण मी तिला विसरलेलो नाही. आजही आपण तुझ्या मांचा आणि मोनाचा वाढदिवस इथं खुशीत मनावतो आणि त्यांच्या फोटोला शुभेच्छा देतो. आज सतरा वर्षांनंतर मोना माझ्यासमोर आली तर कदाचित मीसुद्धा तिला ओळखणार नाही. तिला ओळखणं जवळजवळ अशक्य आहे. त्यावेळी फक्त दोन वर्षांची होती ती ! पण म्हणून माझी तिच्याबद्दलची ओढ, माया संपलीय असं म्हणता तर येणार नाही ना ? तशीच तूसुद्धा फक्त चार वर्षांची होतीस. तुझी मांसुद्धा तुला ओळखणार नाही पण ती तुला विसरली असेल असं म्हणू नकोस."
ती म्हणाली, "पिताजी, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण तिने मला ओळखलं तर मला किती आनंद होईल ते बघा ना ! म्हणून म्हणते ..."
ते म्हणाले, "पण ओळख न देता तू तिला कशी भेटणार आहेस ? तिच्याकडे तू एक दिवस तरी राहू शकणार आहेस का याचा विचार कर. अजून एक प्रश्न आहेच. तू तिथे गेल्यावर तुझे नाना नानी कसा विचार करतील याचा अंदाज करणं अवघड आहे. तुझी मां आपल्याला सोडून गेली तर ... ही सतरा वर्षांपूर्वीची त्यांची भावना अजूनही तितकीच तीव्र असेल तर ? हे गहन प्रश्न आहेत."
ती म्हणाली, "पिताजी, मांला पारखायचा विचार माझ्या मनात आला. तिच्याकडे गेल्यावर ओळख द्यावी लागली तर मी चार दिवसात परत येईन. माझ्या नाना नानीला तुम्ही दोघांनी जपलंत, त्यापायी वेगवेगळं आयुष्य जगण्याचा पर्याय स्वीकारलात व गेली सतरा वर्षे तुम्ही तसं जगता आहात. मग माझ्यामुळे काही गुंतागुंत होणार नाही याची काळजी मी घेणारच ना !"
ते म्हणाले, "तिथे गेल्यावर लगेच ओळख द्यायची नसेल तर तू आधी खंडेलवाल अंकलकडे जा. त्यांच्या नेहाला घेऊन तू तुझ्या मांकडे जा. ती सोबत असली तर काही तरी बहाना सहज तुझ्यासमोर येईल."
ती म्हणाली, "ठीक आहे पिताजी, मी तसंच करते."
दोन दिवसांनी ती मुंबईला आली. विमानतळावर तिला घ्यायला नेहा आली होती. तिने विचारल्यावर सोनानं मुंबईला येण्याचा कारण सांगितले. ते ऐकून नेहा आश्चर्याने म्हणाली, "सतरा वर्षांनी आईला भेटतेयंस तू ? इतकी वर्षे मांपासून दूर कशी गं राहू शकलीस तू ? आणि तुझी मांसुद्धा तुझ्याशिवाय कशी गं जगत आली असेल ? मी तर बाई, एक दिवसही माझ्या मांशिवाय जगू शकणार नाही आणि माझी मांसुद्धा एक दिवसही मला नजरेआड होऊ देत नाही."
सोना म्हणाली, "अगं, मी फक्त चार वर्षांची होते. मला माझ्या दादीनं मोठं केलं, मी माझ्या दादीलाच माझी मां समजत आले. आता माझी मां माझ्याशिवाय कशी जगत आली हे विचारण्यासाठीच मी इथे आलेय ना !"
दुस-या दिवशी सोना नेहाबरोबर मांच्या बंगल्यासमोर आली. बराच वेळ गेल्यावर नेहा म्हणाली "किती वेळ असं गाडीला टेकून उभी राहाणार आहेस ? तुझ्या मांला भेटायला आत जाणार नाहीस का ?"
सोना म्हणाली, "आत जाऊ की नको अशी द्विधा स्थितीत सापडलेय मी ! मला काय हंशील होईल हा प्रश्नही मला पडलाय. थांबू या थोडा वेळ !"
नेहा म्हणाली, "पण तू वेडेपणा करतेयंस असं नाही वाटत तुला ? अगं, सतरा वर्षांनी तू तुझ्या मांला भेटतेयंस. ती कदाचित तुला ओळखणार नाही पण तू तिला ओळख दिल्यावर ती तुझ्याशी कशी वागते याचा अनुभव घे ना !"
सोना म्हणाली, "नाही गं, मी ओळख दिल्यावर माझ्या मांची ममता उमडून येईल, मला मिठीत घ्यायला तिची तडफड होईल ही जाणीव आहे मला ! पण तिला अजून एक मुलगी आहे हे तिला आठवतंय का आणि ती त्या मुलीला मनात जपतेय का हे मला जाणून घ्यायचंय."
नेहा म्हणाली, "हा वेडेपणा करण्यासाठी अंकलनी तुला इथं पाठवलं का ?"
सोना म्हणाली, "त्यांनी नाही गं, माझ्याच मनात हा वेडेपणा आलाय !"
थोड्या वेळाने एक बाई बंगल्यात शिरणार हे पाहून सोना पुढे झाली आणि त्या बाईला थांबवून तिनं विचारलं, "तुम्ही या बंगल्यात कामाला येता का ? नाव काय तुमचं ?"
ती बाई म्हणाली, "माझं नाव कौशल्या. मी इथे चहा, नाष्टा, स्वयंपाक करायला येते."
अचानक एक विचार सोनाच्या मनात आला तशी ती म्हणाली, "मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. आपण गाडीत बसून बोलू या का ?"
गाडीत बसल्यावर सोनानं तिच्याबद्दल, कामाच्या स्वरुपाबद्दल, पगाराबद्दल जाणून घेतलं आणि ती म्हणाली, "कौशल्याबाई, तुम्ही मला एक मदत कराल का ? मी माझा सगळा प्लॅन तुम्हाला समजावून सांगते."
सोनाचा सगळा प्लॅन ऐकून व काम न करता एक महिन्याचा पगार देतेय हे पाहून कौशल्या तिला मदत करायला तयार झाली.
सोना म्हणाली, "नेहा, मी आत जाते. तू आता घरी जा. मी टॅक्सीने येईन तुझ्याकडे."
नेहा म्हणाली, "त्यापेक्षा माझं एक काम उरकून तास सव्वा तासात तुला घ्यायला मी परत येते. आपण दोघी बरोबरच जाऊ घरी."
बंगल्यात शिरताच कौशल्याबरोबर सोनाला पाहून तिची मां विचारात पडली आणि एकटक ती सोनाकडे पाहात जागीच थबकली. सोनासुद्धा आपल्या मांकडे डंवरून पाहात उभी होती. तिच्या मनात वेगवेगळ्या भावनांचे तरंग उमटत होते. मां समोर उभी आहे तरी आपण तिला मिठीत घेत नाही आहोत या विचाराने ती काहीशी विकल झाली. तिचं मन भरून आलं आणि तिचे डोळे अश्रूंनी डबडबले.
तिच्या अश्रूभरल्या डोळ्यांकडे पाहात तिच्या मांनं कौशल्याला विचारलं, "कोण आहे ही ?"
कौशल्या म्हणाली, "ही सोनाली. माझी भाची आहे."
सोनाली तिची भाची असण्याबद्दल मांच्या मनात एक अविश्वासाची भावना उमटली. सोनालीचे कपडे, चेह-यावरचे खानदानीपणाचं तेज पाहून मां विचारात पडली. सोनालीला पाहून आपला जीव तिच्याकडे ओढावला, तिची ओढ वाटली याचं तिला नवल वाटलं.
कौशल्या म्हणाली, "मी उद्यापासून महिनाभर गावी जातेय. तुमचा सकाळ संध्याकाळचा नाष्टा, दोन वेळेचं जेवण याची अडचण होऊ नये म्हणून मी हिला बोलावून घेतलं. ही सगळं काम करेल."
मां म्हणाली, "ठीक आहे पण ..."
कौशल्या म्हणाली, "तुम्हाला एक विनंती आहे. माझ्या घरात माझा तरुण मुलगा एकटाच राहील. हिने एकटीने त्याच्याबरोबर महिनाभर राहाणं मला धोक्याचं वाटतं म्हणून तुम्ही हिला तुमच्याकडेच राहू द्या."
मां म्हणाली, "ते ठीक आहे पण ही किती लहान आणि नाजूक आहे ! हिने तिच्या घरातसुद्धा कधी कामाला हात लावला नसेल असं मला वाटतं. हिला सगळं काम झेपेल का ? वेळच्या वेळी ही सगळं काम करेल का ?"
सोना म्हणाली, "तुमच्या सेवेत मी अजिबात कमी पडणार नाही. सगळी कामं वेळच्या वेळी आणि नीट करेन. तुम्हा कुणाला तक्रारीला वाव देणार नाही."
मां म्हणाली, "मग ठीक आहे."
सोना म्हणाली, "तुम्ही मला इथं राहू द्यायला हो म्हटलंत याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देते. मी इथं नीट काम करेनच पण माझ्या काही सवयी तुम्हाला सांभाळाव्या लागतील."
मां हसत म्हणाली, "तू इथं काम करायला आलीस की तुझं कोडकौतुक करून घ्यायला ?"
सोना हसत म्हणाली, "मी इथं काम तर करणारच आहे पण तुमच्याकडून माझं थोडं कोडकौतुकही करून घेणार आहे. त्या बदल्यात मी पगार घेणार नाही. तुम्ही मावशीलाही एक महिन्याचा पगार देऊ नका. माझ्या दोन तीन सवयी आहेत. एक म्हणजे माझ्या घरी मी सगळ्यांबरोबर जेवायला बसते. इथंसुद्धा मी एकटी जेवायला बसणार नाही. तुमच्याबरोबरच जेवेन मी."
मांच्या चेह-यावर स्मित उमटलं. ती म्हणाली, "अजून काय ?"
सोना म्हणाली, "रात्री मला एकटीने झोपायला भीती वाटते. मी तुमच्या किंवा तुमच्या मुलीच्या खोलीत जमिनीवर चटई, सतरंजी टाकून झोपत जाईन."
मोना लगेच म्हणाली, "मां, माझ्या खोलीत नको ही !"
मां म्हणाली, "ठीक आहे. तू माझ्या खोलीत झोपत जा. अजून काय ?"
सोना म्हणाली, "मला राजमाची भाजी आवडत नाही. तुमच्यासाठी ती भाजी बनवली तर माझ्यासाठी मी वेगळी भाजी बनवत जाईन."
मां थोडीशी कौतुकाने म्हणाली, "तू इथं काम करायला आलीस की तुझे नखरे दाखवायला ? घरी कोण असतं गं, तुझे नखरे सांभाळायला ?"
सोना म्हणाली, "माझे पिताजी व दादा दादी ! खूप लाडात वाढलेय मी घरात ! महिनाभर तुमची अडचण होऊ नये म्हणून कौशल्यामावशीच्या आग्रहाखातर तुमच्याकडे काम करायला राजी झाले. मावशी, यांचा दुपारचा चहा झाला की तू नीघ. मी संध्याकाळी बॅग घेऊन येते इथे. रात्रीचं जेवण मी बनवेन. आता मी निघतेय."
नेहा आल्यावर सोना बाहेर पडली. ती कारमध्ये बसून बाहेर पडली हे पाहून मोना चकित झाली. घरात येत कौशल्या रसोईत गेलेली पाहून मोना म्हणाली, "मां, या चढेल मुलीला रसोईसाठी ठेवायला तू कशी तयार झालीस गं ? बोलताना कशी रुबाबात बोलत होती हे लक्षात आलं ना तुझ्या ? जशी ती आपल्यावर मेहेरबानी करतेय अशीच तिची भाषा होती. तिचे एक एक नखरे काय तू सांभाळत बसणार आहेस ?"
मां म्हणाली, "अगं, तिचं वागणं बोलणं, तिचे कपडे, तिच्या चेह-यावरचा तजेलपणा पाहून मी विचारात पडलेय. ती काम करणारी मुलगी असेल, कौशल्याची भाची असेल असं मला वाटतच नाही. पगारसुद्धा देऊ नका हे तिचं सांगणं माझ्या शंकेला पुष्टी देतंय. तिच्या बोलण्याच्या टोनिंगवरून ती मराठी मुलगी नाही हे स्पष्ट आहे. किती तोडकंमोडकं मराठी बोलत होती. तिला स्वयंपाक तरी नीट करता येत असेल का हाही प्रश्न मला पडलाय. पण कौशल्या अचानक गावी जायला निघाली. आपली अडचण होऊ नये म्हणून तिनेच हिला आणलं म्हणून होकार देणं मला भाग पडलं."
मोना म्हणाली, "तिच्या चढेलपणाचा नखरेलपणाचा तुला त्रास होऊ नये एवढंच मला वाटतं."
मां म्हणाली, "मोना, तुला अजून एक सांगू ? अगं, तिला पाहिलं त्या क्षणी, का कोण जाणे पण नकळत मला तिची ओढ वाटायला लागली."
मोना रोषानं म्हणाली, "मग झेलत बस तिला ! म्हणे, नकळत तिची ओढ वाटायला लागली ! अजून काही वाटलं नाही का ?"
मां म्हणाली, "हो, अजून वाटलं ना. तिला आपल्याकडे कायमचं ठेवून घ्यावं असं वाटलं !"
मोना रोषानं म्हणाली, "मग रसोई बनवायला कशाला ? तिला गोदच घेऊन टाक ना !"
मोनाचा रोष पाहून मांला गंमत वाटली. ती मनमोकळेपणाने हसली आणि म्हणाली, "छान कल्पना आहे. माझ्या मनातलंच बोललीस. मी विचार करते."
तसं तिला मिठी मारून मोना म्हणाली, "मला चिडवू नकोस. तू फक्त माझीच मां आहेस."
संध्याकाळी सोना आपली बॅग घेऊन आली तेव्हा मोना मांच्या मांडीवर डोकं टेकून आडवी झाली होती. मां तिच्या केसांवरून हळुवारपणे हात फिरवत होती. ते पाहून सोनाच्या मनात मोनाबद्दल क्षणभर असूया उमटली पण महिनाभर असे प्रसंग नेहमी समोर येत राहातील हे स्वाभाविकच आहे तेव्हा आपण धाकट्या बहिणीचा हेवा करता कामा नये असा विचार तिने केला आणि ती म्हणाली, "वा ! काय कोडकौतुक चाललंय आपल्या लाडक्या मुलीचं ! जशी काही ती मुलगी ब-याच वर्षांनी मांला भेटायला आलीय."
तिच्या मांने चमकून विचारलं, "काय म्हणालीस तू ?"
मोना म्हणाली "मां, हिने तुला टोमणा मारला हे तुझ्या लक्षात आलं तरी तू गप्प का बसलीस ? आपण इथं काम करायला आलोय याचंही भान नाही हिला !"
सोना म्हणाली, "मी तुझ्याकडे बिनपगारी काम करणार असल्यामुळे मालक नोकर या नात्याने वागणं, इथं राहाणं मला जमणार नाही हे मी आधीच तुला सांगून ठेवते."
मोना म्हणाली, "मां, ही अशीच आपल्यावर रुबाब करणार असेल तर तू सरळ हिला कामाला नाही म्हणून सांग. दुसरी बाई सहज मिळेल आपल्याला."
सोना म्हणाली, "हो, मिळेल ना दुसरी बाई ! अगदी सहज मिळेल पण दुसरी मिळत नाही तोपर्यंत मला झेलणं तुला आणि तुझ्या मांला भाग आहे. तुझी मां तिच्या पिताजींच्या व्यापात अडकलीय आणि तुझ्या मांनं आपल्या एकुलत्या एक लाडक्या मुलीला जेवण बनवायला काही शिकवलं नसणार ! मग कोण करणार आहे गं चहा, नाष्टा आणि जेवण ?"
सोनानं एकुलती एक लाडकी मुलगी, शिवाय तुझी मां तिच्या पिताजींच्या व्यापात अडकलीय असा उल्लेख केल्यामुळे मां विचारात पडली. आपण पिताजींचा कारोबार बघतो हे तिला कसं समजलं ? तिला सोनाची आठवण झाली आणि नकळत तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले. सोना अशीच हिच्यासारखी इतकी मोठी झाली असणार असं तिला वाटलं. मोना इथं एकटीच आहे म्हणून सोनालीनं तसा उल्लेख केला असेल असं मांला वाटलं. 
थोड्या वेळाने सोनाच्या मोबाईलची रिंग वाजली. फोन घेऊन ती म्हणाली, "हॅलो पिताजी, कसे आहात तुम्ही ? दादा दादी कसे आहेत ?
" ... "
सोना म्हणाली, "हो, मी मजेत आहे. तुमची खूप आठवण येते."
" ... "
सोना म्हणाली, "नाही पिताजी, महिनाभर तरी मला तिकडे येता येणार नाही. कौशल्या मावशीला मी कबूल करून बसलेय. पिताजी, मी रात्री याबद्दल तुमच्याशी व दादा दादीबरोबर बोलते. तुम्ही तुमची व दादा दादीची काळजी घ्या. चला, ठेवते फोन !"
रात्री जेवताना नानी म्हणाली, "ब-याच वर्षांनी असं घरचं जेवण जेवायला मिळालं. मन तृप्त झालं ! कौशल्याच्या हातचं मराठी जेवण खाऊन आमची मूळ चवच विसरलो होतो आम्ही !"
मांनं विचारलं, "स्वयंपाक करायला कुणी शिकवलं तुला ? तुझ्या मांनं ?"
सोना म्हणाली, "मी चार वर्षांची होते तेव्हा माझी आई मला सोडून गेली."
मां म्हणाली, "साॅरी हं !"
सोनानं विचारलं, "साॅरी कशाबद्दल ?"
मांकडे रोखून पाहात ती पुढे म्हणाली, "ती काही देवाघरी नाही गेली. मस्त सुखात जगतेय ती माझ्याशिवाय आपल्या पिहरमध्ये ! मला विसरलीसुद्धा असेल ! माझ्या दादीने शिकवलं मला सगळं जेवण बनवायला."
सोनाच्या बोलण्याचा रोख पाहून मां विचारात पडली. त्या विचारातच तिने विचारलं, "तू कौशल्याची भाची आहेस असं मला अजिबात वाटत नाही. तू शुद्ध हिंदीत बोलतेस. तू केलेल्या स्वयंपाकाची चव घेतल्यावर तर माझी ठाम खात्री झालीय. कुठली आहेस तू ?"
सोना रोखानंच बोलली, "चित्तोडगढची आहे मी ! चित्तोडगढ कुठे आहे ते सांगू का ?"
मां म्हणाली, "नको, मला माहीत आहे. चित्तोडगढवर एवढा जोर द्यायची काही गरज नव्हती."
चित्तोडगढची आहे मी असं सोनाच्या रोखून सांगण्याने मां विचारात पडली होती.
रात्री अंगावर गाऊन चढवून चटईवर सतरंजी टाकून आडवी होत सोना म्हणाली, "तुमच्या हृदयातली माया फक्त मोनासाठीच आहे असं मला वाटतं. तिच्यापेक्षा वयाने थोडी मोठी मुलगी चटईवर खाली जमिनीवर झोपलीय पण पलंगावर आपल्या शेजारी तिला झोपू द्यावं असं तुम्हाला वाटलंही नाही. तरी बरं, तीन माणसं ऐसपैस झोपतील इतका मोठा पलंग आहे !"
मां म्हणाली, "त्या कौशल्याने नको ती ब्याद माझ्या घरात पाठवलीय. महिनाभर तुला झेलणं माझ्या नशिबी आलंय ! चल, ये पलंगावर झोपायला."
पलंगावर सोना बराच वेळ जागीच होती. मां झोपलीय असं पाहून सोना तिच्याजवळ सरकली आणि मांच्या अंगावर एक हात टाकून तिच्या कुशीत शिरली. तिच्या मांची झोप चाळवली आणि नकळत तिनेही सोनाच्या अंगावर एक हात टाकला.
सकाळी जाग आल्यावर मांच्या लक्षात आलं की रात्रभर आपण दोघी एकमेकींच्या मिठीत झोपलो होतो. सोनाबद्दल तिच्या मनात नकळत ममता उमडून आली. सोनाची झोपमोड होऊ नये म्हणून अलगद तिच्या मिठीतून दूर होऊन तिने सोनाच्या कपाळावर आपले ओठ टेकून तिचं हलकंसं चुंबन घेतलं.
चहा घेताना मांनं विचारलं, "नवीन जागेत रात्री झोप चांगली लागली ना तुला ?"
मोनाकडे पाहात ती म्हणाली, "रात्रभर तू  मला मिठीत घेऊन झोपली होतीस. मग तुझ्या मिठीत शांत झोप लागणारच ना ! तू मला जवळ घेतलंस, तेव्हा मला वाटलं की माझ्या मांनंच मला जवळ घेतलंय."
मांनं हलकंसं स्मित केलं तशी मोना म्हणाली, "तू माझ्या मांचा 'अगं' असा उल्लेख करून बोललीस ?"
सोना म्हणाली, "हो, तू हिला तसंच म्हणतेस ना ! मग ही काय मला  नोकरासारखीच थोडीच वागवणार आहे ?"
मोना चिडून म्हणाली, "तू इथं रसोईचं काम करायला आलीस ना, मग स्वतःच्या मर्यादा सांभाळून वाग."
सोना म्हणाली, "तुझ्या मांच्या प्रेमात मी तुझी वाटेकरी होईन अशी भीती वाटली की काय तुला ?"
मोना चिडूनच म्हणाली, "जेवण बनवण्याचं काम करणारी एक मुलगी एका दिवसातच माझ्या बहिणीची जागा घ्यायचा विचार करतेय या तुझ्या धार्ष्ट्याबद्दल काय बोलू मी ! तुझी मर्यादा सोडून तू वागलेलं मां खपवून घेईल पण मी खपवून घेणार नाही एवढं लक्षात ठेव."
सोना हसतच म्हणाली, "ठीक आहे, मी लक्षात ठेवेन. ही फक्त तुझीच मां आहे हे मी जाणून आहे."
आपल्या बोलण्यातून सोनाली प्रश्नांची गुंतावळ तेवढी समोर उभी करतेय, त्यातून तिला काही सुचवायचं तर नाही ना, कोण आहे ही, आपल्या मनात हिची ओढ का वाटायला लागलीय या प्रश्नाने मां विचारात पडली.
आपल्या आसपास कुणी नाही हे पाहून सोनानं पिताजीला फोन करून काय घडलं ते सांगितल्यावर ते म्हणाले, "बेटी, तुझ्या वेडेपणाबद्दल काय बोलू मी ! तू तुझ्या मांला ओळख दिलीस तर तिथे तू आनंदाने, समाधानाने राहू शकशील. मी तुझ्या मांला ओळखतो. तू ओळख दिलीस तर तुझ्यावरची तिची माया ओसंडून  वाहायला लागेल."
सोना म्हणाली, "पिताजी, मी वेगळं समाधान शोधतेय आणि मला ते मिळेलच ! मां माझ्याकडे येतेय. मी ठेवते फोन."
दुस-या दिशशी चहा नाष्टा झाल्यावर सोना बाहेर गेली आणि सहा अॅप्रन घेऊन आली.
स्वयंपाकघरात अॅप्रन वापरणारी मुलगी नक्कीच आधुनिक परिवारातली आहे, मग ही कोण आहे हा प्रश्न पुन्हा मांला पडला.
तिस-या रात्री सोना पलंगावर मांशेजारी आडवी झाली तशी मां म्हणाली, "दोन दिवस पाहातेय मी, मी झोपल्यावर माझ्या कुशीत शिरतेस. आज मी झोपायची वाट पाहू नकोस. ये माझ्या कुशीत."
सोना आवेगानं मांजवळ सरकली तसं मांनं तिच्या अंगावर एक हात टाकून तिला जवळ ओढलं आणि तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं. सोनाचं मन पुलकित झालं. तिनेही मांच्या अंगावर एक हात टाकून तिच्या गालावर आपले ओठ ठेवून चुंबन घेतलं तसं मांने अपार समाधानाने आपले डोळे बंद केले.
चार दिवसांनी मां ऑफिसातून आली आणि डोकं दुखतंय म्हणून आपल्या खोलीत पलंगावर आडवी झाली.
तिच्या पाठोपाठ जाऊन सोनानं विचारलं, "तब्येत बरी नाहीये का गं तुझी ?"
मां म्हणाली, "हो, थोडं डोकं दुखतंय."
तिने विचारलं, "खूप काम असतं का गं ऑफिसात ?"
मां म्हणाली, "खूप काम नसतं गं पण पिताजींच्या कारोबाराचा व्याप खूप मोठा आहे. सगळीकडे मलाच लक्ष द्यावं लागतं. कधी कधी कामाचा ताणतणाव येतो."
बामची बाटली घेऊन तिच्या उशाशी बसत सोना म्हणाली, "चल, तुझ्या डोक्याला बाम लावून तुझं कपाळ चेपून देते."
सोनानं आधी तिच्या कपाळाला बाम लावून हलक्या हातानं तिचं कपाळ चेपून दिलं. मग हलक्या हाताने मांच्या डोक्याला मालिश करू लागली होती. मांला खूप बरं वाटत होतं. एक विलक्षण सुखद अनुभूति तिला जाणवत होती. नकळत तिने डोळे मिटून घेतले होते. सोनाला वाटलं, तिला झोप लागलीय. थोडा वेळ तिच्या डोक्याला अजून मालिश केल्यावर सोनानं मालिश बंद केले आणि मांचा चेहरा निरखून पाहात तिचा चेहरा आपल्या दोन्ही हाताच्या ओंजळीत घेऊन तिनं मांच्या कपाळावर ओठ टेकून तिचं चुंबन घेऊन ती उठली. तिने घेतलेल्या चुंबनाच्या अनुभूतीनं मांचं मन पुलकित झालं. डोळे मिटून त्या स्पर्शाची सुखद अनुभूति अनुभवत असताना मोना आत आली तसं सोना म्हणाली, "तुझ्या मांचं डोकं दुखतंय म्हणून ती आडवी झालीय. आलं, मिरपूड, वेलची, अग्याघास टाकून मी तिच्यासाठी चहा बनवायला चाललेय. तुझ्यासाठीही बनवू का ?"
मोना म्हणाली, "मांचं डोकं दुखतंय म्हणून ती लवकर घरी आली का ? मला वाटलं, माझ्याबरोबर बाहेर जाण्यासाठी ती लवकर आली. आता मी एकटी कशी जाऊ मी बाहेर ?"
सोना म्हणाली, "वा ! काय प्रेम आहे लाडक्या मुलीचं आपल्या मांवर ? मांचं डोकं दुखतंय म्हणून मांची काळजी तर वाटली नाहीच उलट मुलीला बाहेर एकटीने कसं जायचं हा प्रश्न पडलाय. वा !"
मोना चिडून म्हणाली, "माझ्या मांबद्दल मला काळजी वाटते की नाही याची उठाठेव तू करू नकोस. समजलं ?"
डोळे उघडत मां म्हणाली, "अगं, खरंच माझं डोकं खूप दुखत होतं. हिने कपाळावर बाम लावून चेपून दिल्याने आणि माझ्या डोक्याला हलक्या हातानं मालिश करून दिल्याने आता मला खूप आराम वाटतोय. अजून थोडा वेळ आराम करते मग येईन मी तुझ्याबरोबर. हवं तर हिला घेऊन टॅक्सीने जा."
मोना म्हणाली, "ठीक आहे. तू आराम कर. मी हिला घेऊन टॅक्सीने जाते."
सोना म्हणाली, "ड्रायव्हर नाही म्हणून टॅक्सीने जावं लागणार असेल तर मी चालवेन गाडी."
मोना आश्चर्याने म्हणाली, "तू ? तुला ड्रायव्हिंग येतं ? मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये तू गाडी चालवणार आहेस ?"
सोना म्हणाली, "अनुभव घेऊन बघ. तुझ्या मांच्या गाडीला साधा ओरखडासुद्धा पडू देणार नाही मी !"
कपडे बदलून दोघी बाहेर पडल्या. सोनाचं ड्रायव्हिंग पाहून मोना चकित झाली. तिनं विचारलं, "तुला पहिल्या वेळी पाहिलं तेव्हा तू स्वयंपाक करणारी मुलगी असशील असं मला वाटलंच नव्हतं. आता तर तुझं एक एक वेगळं रुप समोर येतंय. कोण आहेस तू ? कुठे राहातेस ?"
सोना म्हणाली, "तुझ्या  समाधानासाठी मला खोटं बोलायला जमणार नाही. महिनाभर तुझ्या घरी रसोई सांभाळणारी एक मुलगी आहे असंच समज ना ! महिना झाला तर मी निघून जाईन."
दुस-या दिवशी मां घरी आली तेव्हा सोना दादीच्या गुडघ्याला तेलानं मालिश करत होती. मोना सोफ्यावर आडवी होऊन टि.व्ही. पाहात होती.  मां जवळ आल्यावर सोना म्हणाली, "घरात एक बेटी आहे, एक नवासी आहे पण नानीच्या दुखणा-या गुडघ्याला तेलानं मालिश करून द्यावं असं दोघींनाही वाटत नाही. आपण आणि आपली मुलगी एवढ्यात कोषात जगायचं एवढंच माहीत आहे तिला !"
मां म्हणाली, "कौशल्या तुझी ब्याद माझ्या नशिबी घेऊन आली आली याचा त्रास आहेच पण तू जेवण छान बनवतेस म्हणून तुझे टोमणेही सहन करावे लागणार आहे मला !"
सोना म्हणाली, "तुझी, नानीची सेवा करते, वेळच्या वेळी तुम्हाला चहा नाष्टा देतेय, तुम्ही समाधानाने जेवावं असं तुमच्या आवडीचं जेवण बनवते तरी मला ब्याद समजतेस तू ?"
मां म्हणाली, "पण मला सतत टोमणे मारून तू त्याचा मोबदला तू पुरेपूर वसूल करतेस मग का समजू नको तसं ! पण बरं वाटतं, तू मला असे टोमणे मारून बोलतेस ते !"
तिच्या टोमण्याने मोना मात्र भडकली होती. ती चिडून म्हणाली, "कशाला गं माझ्या मांला सतत टोमणे मारत असतेस ?"
सोना म्हणाली, "तुझ्या मांला ? मी तर ज्या घरात रसोई सांभाळते, तिथल्या आपल्याच कोषात जगणा-या एका मांला बोलत असते. माझ्या साध्या बोलण्याला तुम्ही दोघी टोमणे हा काय माझा दोष आहे ?"
मांबरोबर मोनासुद्धा तिच्या बोलण्याने विचारात पडली.
रात्री पलंगावर पडल्यावर मांच्या कुशीत शिरत सोना म्हणाली, "तुझ्या कुशीत शिरले ना की मला वाटतं, माझ्या मांची उणीव दूर झाली."
मांनं विचारलं, "तुझी मां तुला सोडून तिच्या पिहरमध्ये का राहाते ?"
सोना म्हणाली, "ते मला माहीत नाहीये गं ! मी फक्त चार वर्षांची होते. मला तर ती आठवतही नाही. मला तिची कधी आठवणही येत नसे पण तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मला तिची खूप आठवण आली आणि तुझ्या कुशीत शिरले तेव्हा मी तिच्याच कुशीत शिरलेय असं मला वाटतं."
मां म्हणाली, "तुझ्या दादीने तुला तुझ्या मांची माया ममता देऊन तुझ्या मांची उणीव भरून काढली ना, मग वाईट कशाला वाटून घेतेस ?"
सोना म्हणाली, "नाही गं, मी वाईट वाटून घेत नाही पण तुझ्यामुळे मला माझ्या मांची आठवण झाली हे पण सांगू नको का तुला ?"
मां म्हणाली, "ठीक आहे. तुला काहीही सांगावंसं वाटलं तर मला सांगत जा."
सोनानं अपार ओढीनं मांच्या गालाचा मुका घेऊन तिला अजूनच आपल्या जवळ ओढलं.
मांनं विचारलं, "तुला तुझ्या मांची आठवण होत असते का गं ?"
सोना म्हणाली, "तुझ्या प्रश्नाचं उत्तर 'नाही' असं आहे. अगं, मी चार वर्षांची असताना ती निर्ममतेनं मला सोडून गेली. मला सोडून जाण्यापूर्वीच्या त्या चार वर्षे वयातल्या आठवणी मला कशा आठवणार ? तिला पाहिल्याचं मला आठवतही नाही. तिला फक्त फोटोत पाहात आलेय. ते फोटोही सतरा वर्षांपूर्वीचे आहेत. मग तिची आठवण मला कशी होणार ? मला सोडून जाताना ती निर्ममच झाली असणार ना !"
मां म्हणाली, "असं म्हणू नको. तुला सोडून जाताना तिला किती क्लेश, वेदना, दुःख झालं असेल याचा विचार कर ना ! तिचीही खूप मोठी मजबुरी असेल, ती परिस्थितीसमोर लाचार, मजबूर झाली असेल, त्या परिस्थितीला दुसरा काहीच पर्याय नसेल म्हणूनच मनावर दगड ठेवून तुला सोडून जाण्याचा निर्णय तिला घ्यावा लागला असेल ना !"
सोना म्हणाली, "मी इथे आल्यावर तुझी मोनावरची माया, ममता, प्रेम पाहीपर्यंत मला माझ्या मांबद्दल काही वाटत नव्हतं. इथे आल्यावर मला एकच प्रश्न पडलाय. काही मजबुरीमुळे माझी मां मला सोडून गेली हे मान्य करते पण नंतरही तिने माझ्याशी सगळे संबंध तोडले हे मला नाही स्वीकारता येणार !"
मां म्हणाली, "तुला सोडून जाण्याची तिची मजबुरी तू स्वीकारतेस तशी नंतरच्या तिच्या मजबुरीचाही तू स्वीकार कर. चार वर्षाच्या मुलीला सोडून जावं लागलं म्हणून ती खरोखर दुर्दैवी आहे असंच म्हणावं लागेल. तिला माफ करून टाक आणि खंत वाटून घेऊ नकोस. ती कुठल्या गावात राहाते हे तुला माहीत आहे का ?"
सोना म्हणाली, "हो, ती मुंबईतच राहाते."
मां म्हणाली, "अगं, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. तू इथेच आलीयंस. हवं तर उद्या आपण जाऊ या तिला भेटायला !"
सोना म्हणाली, "आता नको, मी तुझ्याकडून परत जायला निघेन ना, तेव्हा ठरवेन, तिला भेटायचं की नाही ते !"
सोनाच्या कपाळावर ओठ टेकून तिचं चुंबन घेऊन मां म्हणाली, "बरं, आता तू तुझ्या मांच्याच कुशीत आहेस असं समजून शांत झोप."
दुस-या दिवशी संध्याकाळी सोना रसोईत जेवण बनवत होती. मां तिथे आली आणि म्हणाली, "चल, आजपासून मी तुझ्याकडून जेवण बनवायचं शिकते. काय बनवतेस ?"
सोना म्हणाली, "मला मदत करायला आलीयंस का ? तू आताच आलीयंस ना ऑफिसातून, थकली असशील तू ! मग जा, तू आराम कर."
मां म्हणाली, "मी थकलेली असेन ना, तेव्हा नाही येत जाणार रसोईत तुला मदत करायला ! आजपासून आपण दोघी जेवण बनवत जाऊ."
सोना म्हणाली, "इतकी माया लावू नकोस मला ! वीस बावीस दिवसांनी मी इथं नसेन."
मां म्हणाली, "तू नसशील इथे पण माझ्या मनातून तू जाणार आहेस का ? आणि तूसुद्धा मला मनात घेऊन जाणारच आहेस ना ?"
सोना हसत म्हणाली, "चल, नको ती स्वप्नं पाहू नकोस."
एकदा आईच्या मांडीवर डोकं टेकून मोना टि.व्ही.वर एक डान्स पाहात होती. मां कौतुकाने तिच्या केसांवर हात फिरवत होती. बाहेर येत सोनानं ते पाहिलं आणि काही क्षण तिथेच उभी राहून आईच्या चेह-यावरची अपार खुशी निरखू लागली. भानावर येत ती म्हणाली, "काय कोडकौतुक चाललंय लाडक्या मुलीचं ! त्यापायी कसले फालतू डान्स पाहातोय याचंही भान नाहीये."
मोना म्हणाली, "माझी मां मला लाडप्यार करते हे पाहिल्यावर सतत टोमणे का मारत राहातेस तू ? तुझी मां लहानपणीच तुला टाकून गेली म्हणून जळतेस का माझ्यावर ?"
सोना म्हणाली, "मी कशाला तुझ्यावर जळू ? पण तुझ्या मांची तुझ्यावरची अपार माया पाहिल्यावर तिला टोमणा मारायचा मोह मला आवरता येत नाही."
मोना म्हणाली, "आणि आम्ही फालतू डान्स पाहातोय असं म्हणतेस तू ? मग चांगले डान्स कुठले असतात गं ? तूच करून दाखव ना चांगला डान्स कसा असतो ते !"
आपल्या खोलीत जाऊन सोना आपलं गॅझेट घेऊन आली आणि म्हणाली, "नानाजी, तुम्ही इथं बसा, विश्वामित्रासारखं !"
तिने टि.व्ही. बंद करून आपल्या गॅझेटवर म्युझिक सुरु केलं आणि नानाजींसमोर मेनकेची भूमिका बजावत भरतनाट्यम् नृत्याला सुरुवात केली. तिची आई, नानी आणि मोनासुद्धा मंत्रमुग्ध होऊन तिचं नृत्य बघत होत्या. वीस मिनिटांनंतर विश्वामित्रांसमोर ती नतमस्तक झाली तेव्हा मां सोनाजवळ गेली आणि तिला वर उचलून आपल्या मिठीत घेऊन म्हणाली, "सुंदर ! अति सुंदर ! खूप प्रसन्न वाटलं मला ! लहानपणी मीसुद्धा भरतनाट्यम् शिकलेय पण तुझ्या इतकं सुंदर नृत्य मी कधीच करू शकले नव्हते."
मोना जवळ येऊन म्हणाली, "सुंदर नृत्य केलंस तू ! मन सुखावलं माझं आणि मी तुझ्यावर भडकले होते हे सहज विसरून गेले मी ! किती वर्षांपासून नृत्याचा सराव करतेस तू ?"
सोना म्हणाली, "सात वर्षे मी दररोज तासभर शिकत होते मी !"
मोना म्हणाली, "तू जेवण छान बनवतेस, तुला ड्रायव्हिंग येतं, तू भरतनाट्यम् नृत्यही सहज करतेस, तू मां, नानी नानांजींनी काळजी घेतेस, तुझे कपडेसुद्धा खूप काॅस्टली आहेत. आता आम्हाला समजू दे, तू कोण आहेस ते !"
सोना म्हणाली, "कौशल्याला मदत व्हावी म्हणून मी तुझ्याकडे जेवण बनवण्याचं काम स्वीकारलंय एवढी माझी ओळख पुरेशी आहे."
मोना म्हणाली, "जा, मर !"
चार दिवसांनी संध्याकाळी बाहेर पडून सोनानं एक फुलांचा मोठा गुच्छ आणला आणि कुणाच्या नजरेत पडणार नाही याची काळजी घेत स्वयंपाकघरात लपवून ठेवला. रात्री मध्येच जाग आल्यावर तिने तो खोलीत आणला.
सकाळी मांला जाग आल्यावर तो गुच्छ मांला देत ती म्हणाली, "वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !"
फुलांचा गुच्छ पाहून मांचं मन मोहरून आलं. थोडं पुढे झुकून सोनाला मिठीत घेत ती म्हणाली, "थँक यू !"
मांने विचारल्यावर सोना म्हणाली, "एकदा तुझं पॅन कार्ड बघितलं होतं तेव्हा त्यावरची तुझी जन्म तारीख बघितली होती."
मां हसली तसं सोना म्हणाली, "मी खोटं सांगतेय असं वाटतंय तुला ?"
मां म्हणाली, "नाही ! इतकी प्रेमळ आणि अभिजात प्रसन्न चेह-याची माझी मुलगी मांशी खोटं बोलणार नाही."
सोना खोटं सांगत होती हे मांच्या लक्षात आलं होतं. आपलं पॅन कार्ड ऑफिसात असतं हे मां जाणून होती.
तेवढ्यात मोना तिथे आली आणि आईच्या बाजूला मोठा पुष्पगुच्छ पाहून ती भडकून  सोनाला म्हणाली, "तू काय माझे सगळे हक्क हिरावून घ्यायला आलीयंस का येथे ? दरवर्षी नाना नानीच्या आधी मी मांला जनमदिनची बधाई देत आलेय. मांनं तुला खूप लाडावून ठेवलंय. जेवण बनवणारी मुलगी आहेस ना तू, मग तुझ्या मर्यादेत राहा."
सोना म्हणाली, "भडकतेस कशाला माझ्यावर ? मी दिलेला पुष्पगुच्छ पाहून तुझ्या मांचा चेहरा आनंदाने किती फुललाय ते बघ ना ! तिची प्रसन्नता कशाला हिरावून घेतेस. आता तू आलीयंस ना, मग तूसुद्धा दे हिला शुभेच्छा."
आईला मिठी मारून तिला शुभेच्छा देऊन मोना म्हणाली, "मां, ही ब्याद केव्हा जाणार आहे इथून ? ही गेली तरी हिचा आजचा आगावूपणा मी कधी विसरणार नाही."
सोना म्हणाली, "म्हणजे तू मलाही विसरणार नाही हे तू कबूल करतेयंस ! मी भाग्यवान आहे. तू तरी मला विसरणार नाहीयेस. तुझ्या मांला सांग, आज ऑफिसला जाऊ नकोस. आपलं आटोपून आपण तासाभरात निघू. नाशिकला एक छान बोटॅनिकल गार्डन झालंय असं मला समजलंय. ते पाहायला जाऊ आपण. रात्री आठपर्यंत आपण परत येऊ. मी नाना नानीला आटोपून तयार व्हायला सांगते. आपण नाष्टा, दुपारचं जेवणसुद्धा बाहेर घेऊ."
मोनानं विचारल्यावर मांने खुशीनं संमती दिली पण ती म्हणाली, "मी एखादा ड्रायव्हर बघते. एका दिवसात इतकं ड्रायव्हिंग मला नाही जमणार !"
सोना म्हणाली, "मी आहे ना ! मी करेन ड्रायव्हिंग."
बोटॅनिकल गार्डन पाहून सगळे खुश झाले. सोनानं अचानक प्रोग्राम बनवला म्हणून मां खूपच खुश होती. आपला असा वाढदिवस आपण प्रथमच साजरा करतोय व ते सोनामुळे म्हणून मांला तिचं खूप कौतुकही वाटत होतं. आपल्याला आराम मिळावा म्हणून संपूर्ण ड्रायव्हिंग तिने केलं होतं. तिला थोडा आराम मिळावा म्हणून जाता येताना हट्टाने मांने तासभर ड्राईव्ह केलं होतं. ती आपली किती काळजी घेते या भावनेनं मांचा ऊर भरून आला होता.
घरी आल्यावर सोनाला मिठीत घेऊन ती म्हणाली, "गेल्या सतरा वर्षात आजच्या इतका आनंदाचा दिवस पहिल्यांदा अनुभवला. खूप खुशी, आनंद दिलास मला तू ! माझी एक इच्छा कबूल करशील का ?"
मांभोवतीची मिठी थोडी घट्ट करत सोना म्हणाली, "तू खूप खुश, आनंदी आहेस ना, म्हणून मीसुद्धा खूप खुश आहे. सांग तुझी इच्छा ! आज मी तुला नाराज करणार नाही."
मां म्हणाली, "यापुढे तू कुठेही असलीस तरी माझा जनमदिन मनवायला तू माझ्याकडे यायचंस !"
सोना म्हणाली, "इतकंच ना, यापुढे वर्षातला माझा एक दिवस तुझा, फक्त तुझाच ! या दिवशी मी तुझ्याजवळ असेन."
मां म्हणाली, "तुझ्या आयुष्यातला दरवर्षी एक दिवस मला दिलास तर त्या एका दिवसात वर्षभराची बेगमी मी करत जाईन."
सोना म्हणाली, "तुझी इच्छा असेल तर माझं लग्न होईपर्यंत मी इथेच तुझ्याजवळ राहाते."
मोना रोखानंच म्हणाली, "काही नको. इतके दिवस इथे राहिलीस ती तुझी खूप मोठी मेहेरबानी आमच्यावर झाली. अजून तुझी मेहेरबानी नकोय मला, समजलं ?
सोना म्हणाली, "बरं बाई, नाही थांबणार मी इथे. तू इतकी असुरक्षित होऊ नकोस. तुझ्या मांच्या तुझ्यावरच्या प्रेमात वाटेकरी व्हायला मी इथे आले नव्हते. कौशल्या परत आली की दुस-या दिवशी मी निघेन इथून !"
सोना महिनाभर आपली ओळख न देता आपल्या मांकडे होती तरीही तिला खूप सुख लाभलं होतं. तिची मां तिच्यावर तिस-या दिवसापासूनच प्रेम करायला लागली होती. तिची काळजी करायला लागली होती. तिला जपायला लागली होती याचं अपार समाधान तिला लाभलं होतं. पण मां मोनासमोर आपल्यावर जपून प्रेम करते हे सोनाच्या लक्षात आलं होतं. त्याबद्दल तिची तक्रारही नव्हती.
ती सकाळ संध्याकाळचा चहा नाष्टा बनवणं, दोन वेळेचं जेवण बनवणं, अधूनमधून आईच्या डोक्याला मालिश करणं, तिच्या केसांना मेहेंदी लावून देणं, नानीच्या गुडघ्याला दररोज तेलानं मालिश करणं, नानाच्या थोडंसं टक्कल पडलेल्या डोक्यावर तेल जिरवून मालिश करणं अशी कामं मोठ्या आनंदाने करत होती. तिने नाना नानीचंही प्रेम मिळवलं होतं. पण मोनावरून मांला टोमणा मारायची एकही संधी ती सोडत नसे. मांच्या गालावर हसू उमटत असे पण मोना खूप भडकत असे. ती भडकली की सोना आईकडे पाहून छद्मीपणानं हसत असे.
मां जवळजवळ दररोजच रात्री सोनाला जेवण बनवायला मदत करायला लागली होती. त्यावेळी दोघी गप्पा मारत. कधी कधी सोनाला प्रश्न पडे की मांनं आपल्याला ओळखलंय की काय ? ओळखलं असेल तर ती तसं बोलत का नाही ?
तिच्या पिताजींचा दररोज संध्याकाळी फोन येत असे त्यावेळी मां व मोना तिचं  बोलणं ऐकत असत. ब-याच वेळा तिच्या एकतर्फी बोलण्यातून दोघींना अर्थबोध होत नसे.
एकदा मांनं विचारलं, "खूप प्रेम करतेस ना तुझ्या पिताजींवर ?"
ती म्हणाली, "हो. खूप प्रेम करते मी पिताजींवर ? माझी मां तर मला निर्ममतेनं सोडून गेली."
तिची माँ म्हणाली, "असं म्हणू नकोस. तिचीही काही मजबूरी असेल ना ?"
ती म्हणाली, "तू नको माझ्या माँची पैरवी करूस. चार वर्षाच्या मुलीला सोडून जायचं म्हणजे तिने निर्ममताच स्वीकारली होती ना ! खूप कठोर आहे ती !"
तिची आई म्हणाली, "एकदा तुझ्या आईला समोरासमोर ओळख दे आणि विचार तिलाच ! मला नको त्रास देऊस."
सोना हसत म्हणाली, "माझी मां माझ्या जवळ नाही मग मी तुलाच त्रास देणार ना !"
तसं मांनं तिला एका हातानं जवळ घेतलं.
सोना दररोज रात्री जेवण बनवून झालं की मांच्या खोलीत जाऊन पिताजींना फोन करून मोकळेपणानं आज काय घडलं हे त्यांना सांगत असे. पिताजी तिला समजावत असत की ओळख देऊन मोकळी हो. मग बघ, तुझ्या मांची ममता तुझ्यावर कशी बरसते ते ! तिला तर खूप आनंद, खुशी होईलच पण तुझ्या नाना नानीलाही आनंद होईल. मोना तुझ्यावर भडकणं विसरून तुझ्यावर प्रेमच करेल."
एकदा मांनं तिला विचारलं, "दररोज माझ्या खोलीत जाऊन दार बंद करून फोनवर कुणाशी बोलत असतेस गं ?"
सोना मिश्किलपणे हसत म्हणाली, "असं दार बंद करून मी कुणाशी बोलणार आहे ? एवढंही कळत नाही तुला ? बुद्धू कुठली !"
मांनं विचारलं, "तुझ्या पिताजींना माहीत आहे का हे ?"
सोना म्हणाली, "हो, मी पिताजी, दादा दादी यांच्यापासून काहीही लपवत नाही."
मां म्हणाली, "त्याचा फोटो दाखव ना मला !"
सोना म्हणाली, "त्याचा फोटो नाहीये माझ्या मोबाईलमध्ये. त्याला काढू दे अशी मिन्नत करते तेव्हा तो म्हणतो की, डोळे मिटायचे आणि तुझ्या मनःचक्षूने मला पाहात राहायचं "
मांनं विचारलं, "मला आवडेल असा आहे ना ?"
ती म्हणाली, "पिताजींना आवडला म्हणजे तुलाही आवडेलच ना !"
मां दररोज रात्री तिला आपल्या कुशीत घेऊन झोपत असे. झोपण्यापूर्वी सोना तिच्या कपाळावर ओठ टेकून मांचं चुंबन घ्यायची. सकाळी उठल्यावर मां तिच्या कपाळावर आपले ओठ टेकून अपार मायेनं तिचं चुंबन घ्यायची. कधी कधी अर्धवट जाग आलेल्या सोनाला तिच्या स्पर्शाची संवेदना जाणवायची. तिचं मन खुशीनं पुलकित व्हायचं आणि ती विलक्षण आवेगानं मांला आपल्या मिठीत घ्यायची. मांसुद्धा तिला आपल्या मिठीत जखडून ठेवायची.
कधी कधी तिघी शाॅपिंगला जायच्या. गाडी सोनाच चालवायची. एकदा मोनाला एक ड्रेस घ्यायचा होता तेव्हा मांनं आपल्या आवडीने सोनालाही एक ड्रेस घेतला होता.
सोना परत जायचा दिवस जवळ येत होता. संध्याकाळी सोना म्हणाली, "मोना, चार एक दिवसांनी मला दिल्लीला माझ्या घरी परत जावं लागणार आहे. तिकडे कुणा कुणाला भेट देण्यासाठी मला शाॅपिंग करायचीय. येतेस का माझ्याबरोबर ?"
मोना म्हणाली, "असं का विचारतेस ? चल, कपडे बदलून लगेच निघू या."
एका दुकानात सोना म्हणाली, "तुझ्या पसंतीने, तुला खूप आवडेल असा एक महागडा ड्रेस माझ्या लहान बहिणीसाठी घ्यायचाय. तुझ्या आवडीचा तू पसंत कर."
ड्रेस विकत घेतल्यावर तिने दोन महागड्या रेशमी साड्या आणि एक सफारी सुटाचं, शर्टाचं महागडं कापड विकत घेतलं. क्रेडिट कार्ड वापरून तिने केलेली महागडी खरेदी पाहून मोना चकित झाली होती. ही नेमकी कोण आहे आणि आपल्या घरी जेवण बनवण्याचं काम करायला कशी तयार झाली हा प्रश्न पुन्हा मोनाला पडला.
चार दिवसांनी कौशल्याचा फोन आला. दोन दिवसांनी सकाळी कामावर येते असं तिने सांगितलं.
सोना म्हणाली, "म्हणजे उद्या रात्री माझं इथलं जेवण बनवणं शेवटचं ! मी परवा सकाळी माझ्या घरी जायला मोकळी !"
मां म्हणाली, "तू महिनाभर इथे होतीस. तुझी आठवण आम्ही कधीच विसरणार नाही."
सोना म्हणाली, "मीसुद्धा आपल्याच कोशात जगणा-या एका मांला कधीच विसरणार नाही."
मोना म्हणाली, "तुझी जायची वेळ आली तरी माझ्या मांला टोमणा मारायची संधी तू साधतच राहा."
मां म्हणाली, "अगं मोना, ती मला टोमणा मारत नाहीये तर तिच्या मनातला असंतोष, असंतुष्टता, रोष प्रकट करतेय. हो ना गं सोना ?"
सोनाली ऐवजी मां सोना म्हणाली हे ऐकून सोनानं मांकडे चमकून पाहिलं.
सोना उठली. तिने खरेदी केलेले कपडे ती घेऊन आली. नानांच्या हातात सफारी सुटाचं कापड व नानीच्या हातात साडी देवून ती म्हणाली, "हे कपडे माझ्याकडून तुम्हाला भेट म्हणून देतेय." असं म्हणून ती वाकली आणि नाना नानीच्या पायावर डोकं टेकून त्यांना नमस्कार केला.
मोनाच्या हातात ड्रेस देऊन तिला घट्ट मिठी मारत सोना म्हणाली, "मेरा ये प्यारभरा नजराना मेरी खूबसुरत गुडिया जैसी बहनको !"
तिच्या बोलण्याने चकित होऊन मोना तिच्याकडे पाहात स्तब्ध झाली. नाना नानीप्रमाणेच तिने आपल्याला दिलेल्या महागड्या ड्रेसने ती चकित झाली होती.
मांच्या हातात साडी देऊन सोना म्हणाली, "मां असलेल्या एखाद्या घरात महिनाभर राहाण्याची माझी खूप इच्छा होती. इथे महिनाभर राहून मी माझी इच्छा पुरी करून घेतली. तू मोनाचं खूप कोडकौतुक करत होतीस ते पाहून मला मोनाचा हेवा वाटायचा. पण एकुलत्या एक मुलीवरचं तुझं प्रेम पाहून तुझ्यात मांची ममता अजून जिवंत आहे हे पाहून मला खूप बरं वाटायचं. तू माझ्यावरही अपार प्रेम कदायचीस. तू एक प्रेमाचा सागर असलेली मां आहेस हे पाहून माझा ऊर भरून यायचा. चौथ्या दिवसापासून तू माझ्यावरही मोनाइतकंच प्रेम करायला लागलीस, माझ्या मनातली मांची उणीव दूर केलीस याबद्दल मी तुझी ऋणी राहीन. तू माझीसुद्धा मां आहेस अशी भावना माझ्या मनात उपजत गेली याबद्दल मला तुझा अभिमान वाटतो. तुम्ही चौघांनी माझं वागणं बोलणं सहन करत मला खूप प्रेमानं वागवलंत त्याची कणभर परतफेड म्हणून मी तुम्हाला भेटी दिल्यात. त्या आनंदाने स्वीकारा आणि मला प्रेमानं निरोप द्या. दरवर्षी मांच्या वाढदिवसाला एक दिवस तुमच्या बरोबर राहण्यासाठी मी येत राहाणारच आहे." असं म्हणून तिने मांला उभं केलं आणि तिला घट्ट मिठी मारून रडायला लागली. मां तिच्या पाठीवरून, केसांवरून हात फिरवत तिला शांत करत होती.
सोनाचा उमाळा शांत झाल्यावर तिने मांला आपल्या मिठीतून दूर केलं. तिचे डोळे पुसत मांनं विचारलं, "इथं तू ज्या हेतूनं आली होतीस तो साध्य झाला का ?"
सोना म्हणाली, "म्हणजे ? माझा कुठला हेतू ?"
मां म्हणाली, "तू तुझ्या मांच्या ममतेची कसोटी पाहायला आली होतीस ना माझ्याकडे ? मग तुझी मां तुझ्या कसोटीला उतरली की नाही ?"
सोना म्हणाली, "तू काय बोलतेयंस ते मला काही कळलं नाही. असं कोड्यात का बोलतेयंस ?"
मां म्हणाली, "मला ओळख न देता इथून जाणार आहेस का तू ? ओळख न देता जाऊ शकशील का तू ? हो, तू आल्यावर पहिल्याच नजरभेटीत मला तुझी विलक्षण ओढ वाटली होती. पहिल्या रात्री तू माझ्या कुशीत शिरून झोपली होतीस. त्याच वेळी तू कोण आहेस याची पुसटशी जाणीव माझ्या अंतःर्मनाला झाली होती. पहिल्याच दिवशी तू मोनावरून मला डिवचलं होतंस म्हणून मी विचारात पडले होते. तुझं वागणं बोलणं, तुझे कपडेलत्ते, तुझ्या चेह-यावरचा खानदानीपणा पाहून मला खूप उत्सुकता वाटत होती. तू कोण आहेस आणि अशी अवचित माझ्या घरी का आलीस हा प्रश्न मला पडला होता. मग तिस-या दिवशी कौशल्याच्या घरी जाऊन तिला भेटले. तेव्हा सोनाली म्हणून माझ्या घरात येण्यासाठी तू काय नाटक केलं हे तिने मला सांगितलं. तिला महिन्याचा पगार दिलास म्हणून ती माझ्यापासून तुझं नाटक लपवून ठेवेल असं वाटलं होतं का तुला ? तुझं नाटक मला समजलं होतं पण तू कोण आहेस, माझ्याकडे येण्याचा तुझा मानस काय याचा उलगडा झाला नव्हता. मग रात्री तू रसोईमध्ये असताना मी तुझी बॅग उलथीपालथी केली. बॅगेत मला काही मिळालं नाही. मग मी तुझी पर्स पाहिली. तुझी ओळख पटेल यासाठी तुझं ड्रायव्हिंग लायसेन्स, दिल्ली मुंबई फ्लाईटचा बोर्डिंग पास पुरेसा होता. तुझी ओळख पटली. तुला पाहता क्षणी मी तुला ओळखू शकले नाही याबद्दल मला क्षमा कर. पण पहिल्यांदा तुला पाहिलं तेव्हा तुझ्याबद्दल माझ्या मनात तुझी ओढ उभरून आली होती हे खरंय !  म्हणूनच रात्रभर तुला माझ्या कुशीत घेऊन झोपले होते. तुझी अपार ओढ मला वाटली होती. सकाळी उठल्यावर तुझ्या कपाळाचं मी चुंबन घेतलं तेव्हा मला अपार सुख लाभलं होतं. तुझी ओळख पटल्यावर मी मोनावर करते तसं प्रेम तुझ्यावर करायला लागले. पण मोनासमोर माझ्या प्रेमाला आवर घालावा लागायचा कारण तिचा रोष वाढून तिने तुझा तिरस्कार करू नये म्हणून ! माझ्या मनातली तुझ्याबद्दलची ओढ तीव्र होत गेली. मी तुला जेवण बनवायला मदत करायला लागले. रात्री तुला कुशीत घेऊन झोपायला लागले. तेही मोनाला आवडायचं नाही. तिला सांभाळताना मला दोघींचा तोल सांभाळतच वागावं बोलावं लागायचं."
सोना म्हणाली, "हो, मोनाच फक्त तुझी एकुलती मुलगी आहे हे मी जाणून आहे."
मां म्हणाली, "असं म्हणू नकोस. तुझ्या पिताजींचीसुद्धा तूच एकुलती एक मुलगी आहेस तशी मोना ..."
तिला मध्येच तोडत सोना म्हणाली, "नाही ! माझ्या पिताजींना दोन मुली आहेत. ते आपल्या दुस-या मुलीला कधीही विसरले नाहीत. तिचा आणि माझ्या मांचाही वाढदिवस आम्ही दरवर्षी मनावत असतो. आता सात एप्रिलला माझ्या पिताजींच्या दुस-या मुलीचा वाढदिवस मनावूनच मी आठ एप्रिलला मुंबईला आले."
या दोघी नेमकं काय बोलताय ते मोनाला नीट आकलन होत नव्हतं तरी ती पटकन म्हणाली, "अगं, सात एप्रिलला माझाही वाढदिवस असतो."
सोना म्हणाली, "मग तुझ्या मांने तिच्या एकुलत्या एक मुलीचा वाढदिवस मोठ्या कौतुकानं, उत्साहानं साजरा केला असेल, नाही ?"
मां म्हणाली, "का छळतेस मला अशी ? मला छळण्यासाठी तू इथं आलीस का ? मोनावरून मला टोचून बोलण्यात तुला खूप सुख वाटतं का ?"
सोना म्हणाली, "मग कसं बोलू मी तुझ्याशी ? गेल्या सतरा वर्षात कधी जपलंस मला ? माझ्यासाठी झालीस कधी व्याकूळ ? सांग, झालीस कधी माझ्या आठवणीने बेचैन ? आईशिवाय मी कशी जगतेय हे जाणून घ्यावं असं कधी वाटलं नाही कधी तुला ?"
मां म्हणाली, "तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं होकारार्थी आहेत. सुरुवातीची तीन चार वर्षे मी तुझ्याशिवाय कशी जगले हे मलाच माहीत आहे. तुझ्यासाठी मी रडत बसायचे. रात्र रात्र मी बेचैनी अनुभवत मी जागी राहायचे. सकाळी उठल्यावर फोन करुन तुझ्याशी बोलावं असं वाटायचं. पण मी तुझ्या नाना नानीच्या शब्दात बांधले गेले होते. शिवाय तुझी काळजी घ्यायला तुझे दादा दादी, पिताजी आहेत यावर विश्वास ठेवूनच मी जगत आले. माझ्या काळजाचा एक कोपरा तुझ्यासाठी रिक्त ठेवूनच मी जगत आले."
नानी म्हणाली, "सोनाबेटी, तुझ्या मांने तुला दूर केलं यासाठी आम्ही जिम्मेवार आहोत. त्यावेळची परिस्थिती तशीच होती. तुझे गुन्हेगार आम्ही दोघे आहोत. आम्हाला माफ कर."
सोना म्हणाली, "नानी, तू तर काही बोलूच नकोस. तूसुद्धा एक मां होतीस ना, तरी मला, हिच्या चार वर्षाच्या मुलीला हिच्यापासून लांब केलंस ? इतकी निर्दयी कशी झाली होतीस गं तू ? त्यावेळची परिस्थिती तशी होती हे मला मान्य आहे पण तुझी मुलगी तुला, नानांना सोडून जाणार नाही याची दोन चार वर्षांनी खात्री झाल्यावर तरी तू हिला तुझ्या शब्दांतून मुक्त करायला हवं होतंस ना ? तू करायला हवा होतास ना तसा विचार ! पण तू तर आमचे मां बेटीचे सगळे पाश तोडून टाकले होतेस. माझ्या मांला मजबूरीच्या हवाली बहाल केलं होतंस ! आणि हिनेही करायला नको होता का तसा विचार ? मां मोनाबरोबर इथे राहिली असती आणि मी आजसारखी पिताजींबरोबर दिल्लीला राहिले असते. आम्ही दूरच राहिलो असतो पण आपल्यात जवळीक, संपर्क तर राहिला असता ना ? वर्षातून दोन तीनदा दोन चार दिवसांसाठी आपण एकत्र येऊ शकलो नसतो का ? आणि हिचा काहीच दोष नाही का ? आताचं बघ ना, मी हिचीच मुलगी आहे हे हिने जाणून घेतलं होतं तरी सव्वीस दिवस मला स्वतःपासून दूरच ठेवलं ना ? अजूनही ही तुमच्याच बंधनात बांधलेली आहे ना ?"
नाना म्हणाले, "सोनाबेटी, आमच्या कमकुवत, सैरभैर मनापायी तुम्हाला अलग व्हावं लागलं. खरे दोषी आम्ही आहोत. बेटी, आम्हाला तू माफ कर."
मां म्हणाली, "सोना, तू समजतेस त्या कारणाने नाही. तू कोण आहेस हे जाणून घेतल्यावरही मी मुद्दामच दुस-या कारणाने तुला ओळख दिली नाही. मी तुला ओळखते का याची कसोटी पाहाण्यासाठी एक नाटक करून तू इथे आली होतीस ना ! पण सतरा वर्षांनंतर मी माझ्या मुलीला ओळखणं शक्य आहे का हा विचार नाही आला का तुझ्या मनात ? तू चार वर्षांची होतीस तेव्हा मी तुला पाहिलं होतं, आता एकवीस वर्षांची झालीस. किती बदल झालाय तुझ्यात ! तरी माझ्या ममतेची पारख करायला, कसोटी पाहायला आलीस तू इथे ? मला ओळख न देता तू माझ्या ममतेची पारख करायलाच आली होतीस ना तू इथे ? सरळ आली असतीस आणि ओळख देऊन माझ्या मिठीत शिरली असतीस, आपल्या अश्रूंत सतरा वर्षांचा काळ वाहू दिला असतास तुला मांच्या ममतेचा प्रत्यय आला नसता का ? पण नाही ! तू तर माझ्या ममतेची कसोटी पाहायला आली होतीस ! मी तुला जाणून घेतलं पण तुझा मानस माझ्या लक्षात आल्यावर मीसुद्धा तुझी परीक्षा घ्यायचं ठरवलं. आम्हाला ओळख न देता तू कशी परत जातेस याचा अनुभव मला घ्यायचा होता. तू किती कठोर आहेस हे मला पाहायचं होतं. सलग महिनाभर माझ्या कुशीत झोपत होतीस. आपण आपल्या मांच्या कुशीत झोपलोय हे तुला माहीत होतं ना ? मीसुद्धा माझ्या कुशीत माझी मुलगी झोपलीय हे सुख अनुभवत होतेच ना ! असं सुख तर गेल्या पंधरा वर्षात मोनाच्याही नशिबी आलं नव्हतं ! ती तुझ्या नानीच्या कुशीत झोपायची. माझी परीक्षा घेण्याच्या नादापायी तर तूच माझ्यापासून अंतर ठेवून वागत होतीस ना ? आणि वरून आपल्या मांलाच दोष देतेस !"
सोना म्हणाली, "तू अजूनही परीक्षेच्या लपंडावात अडकून पडणार आहेस का? अजूनही नाना नानीच्या शब्दात बांधलेली राहाणार आहेस का? माझाही मोह तू बाळगणार नाहीस असं वचन तू नाना नानीला दिलं होतंस म्हणून सतरा वर्षे मला तुझ्या हृदयापासून दूर ठेवलं होतंस तशीच आजही वागणार आहेस का? तुझ्या मिठीत नाही घेणार मला ?"
आईनं उत्कटतेने तिला आपल्या मिठीत घेतलं. सतरा वर्षांनी आई मुलीची पुनर्भेट होत होती. त्या मिठीच्या अनुभूतीने  दोघींच्याही डोळ्यांतून अश्रू मुक्तपणे वाहू लागले.
सोना आपली मोठी बहीण आहे हे आईच्या बोलण्यातून जाणवताच मोनाचं मनही भावनाधिन झालं आणि ती आतुरतेनं त्या दोघींना बिलगली तेव्हा सतरा वर्षांतलं हृदयांतर निमिषार्धात मिटलं होतं.

© रमेश नागपुरे
मुलुंड (पूर्व), मुंबई ४०० ०८१
मोबाईल 98690 75238

2794. रघुनाथची पाणपोई

 लातूरच्या 'गंज गोलाई' बाजारात उन्हाळ्याच्या दिवसांत नेहमीच भयंकर गर्दी आणि उकाडा असायचा. या गर्दीत एका मोठ्या कडुनिंबाच्या झाडाखाली 'रघुनाथराव' रोज सकाळी आठ वाजता न चुकता येऊन बसायचे. वय साधारण अडुसष्ट. त्यांच्या अंगात एक अत्यंत जुना, विटलेला सदरा आणि चेहऱ्यावर एक मूक शांतता  असायची.
​त्यांच्या जागेजवळ नेहमी दोन मोठे मातीचे माठ पाण्याने भरलेले असायचे. बाजारात येणारे शेतकरी, हमाल आणि खरेदीदार तिथे थांबून पोटभर थंड पाणी 🚰 प्यायचे. रघुनाथराव कुणाशीही जास्त बोलायचे नाही. पाणी संपलं की ते कुठूनतरी जाऊन माठ पुन्हा भरून आणायचे. जवळच किराणा दुकान चालवणारा 'श्रीकांत' हे रोज बघायचा. रघुनाथरावांनी हे काम का सुरू केलंय, हे कुणालाच माहिती नव्हतं, आणि कुणी कधी त्यांना विचारण्याची तसदीही 🤷‍♂️ घेतली नव्हती. लोकांना फक्त फुकटच्या पाण्याची सवय झाली होती.
​मे महिन्याचे कडक ऊन तापत होते. आणि अचानक... सलग तीन दिवस रघुनाथराव त्या झाडाखाली दिसले नाहीत.
​ते दोन्ही माठ पूर्णपणे कोरडे पडले होते. कडक उन्हात पाणी पिण्यासाठी येणारे लोक माठ रिकामा बघून, "म्हाताऱ्याला आज काय झालं, पाणी का नाही भरलं?" अशी कुरबुर करत 🚶‍♂️ पुढे निघून जायचे. सुरुवातीला श्रीकांतनेही या गोष्टीकडे फारसे लक्ष दिले नाही. त्याला वाटले की आजोबा आजारी असतील किंवा गावी गेले असतील. पण चौथ्या दिवशीही जेव्हा ते आले नाहीत, तेव्हा श्रीकांतला थोडी शंका आली.
​रघुनाथराव बाजाराच्या पाठीमागेच एका जुन्या पत्र्याच्या खोलीत 🏠 राहायचे, हे श्रीकांतला माहिती होते. दुपारच्या वेळी दुकान थोडे शांत झाल्यावर तो त्या पत्र्याच्या खोलीकडे गेला.
​खोलीचा दरवाजा आतून लावलेला नव्हता. तो नुसताच लोटलेला होता. श्रीकांतने दरवाजा हळूच ढकलला.
​खोलीत फक्त एक जुनी कॉट आणि एका कोपऱ्यात काही मोजकीच भांडी होती. रघुनाथराव तिथे नव्हते. शेजारी राहणाऱ्या एका महिलेने  श्रीकांतला दारात बघून सांगितले, "भाऊ, ते आजोबा परवा रात्रीच झोपेत शांतपणे गेले. त्यांना कुणीच नातेवाईक नसल्यामुळे नगरपालिकेच्या गाडीने काल सकाळीच त्यांना नेलं."
​श्रीकांत तिथेच दारात थांबला. त्याला आतून खूप वाईट वाटले. तो खोलीच्या बाहेर येणार, तेवढ्यात त्याची नजर कॉटवर ठेवलेल्या एका जुन्या, फाटलेल्या पिशवीवर गेली. त्या पिशवीतून काही कागदपत्रे आणि एक छोटीशी डायरी 📔 बाहेर डोकावत होती.
​श्रीकांतने अत्यंत संकोचाने ती डायरी हातात घेतली. त्या डायरीच्या पानांमध्ये पाण्याचे टँकर 💧 विकत घेतल्याच्या शेकडो पावत्या ठेवलेल्या होत्या. रघुनाथराव हे एका शाळेत शिपाई म्हणून निवृत्त झाले होते. त्यांना मिळणाऱ्या अत्यंत तुटपुंज्या पेन्शनचा जवळजवळ ऐंशी टक्के हिस्सा ते बाजारातल्या लोकांसाठी रोज पाण्याचा टँकर 🚎 विकत घेण्यावर खर्च करत होते.
​श्रीकांतने डायरीचे पहिले पान उघडले. त्यावर थरथरत्या हस्ताक्षरात फक्त काही ओळी लिहिल्या होत्या.
​"१२ मे १९९८...माझी सुशीला याच गंज गोलाई चौकात उन्हाने चक्कर येऊन पडली होती. ती अर्धा तास रस्त्यावर तडफडत होती. तिला कुणीही एक घोट पाणी दिलं नाही. पाण्यावाचून तिचा जीव गेला. आता या बाजारात मी कुणालाही तहानलेलं मरू देणार नाही."
​श्रीकांतची नजर त्या ओळींवरच थिजून राहिली. तो माणूस कोणताही समाजसेवक नव्हता किंवा त्याला कुणाकडून कौतुकही नको होतं. स्वतःच्या बायकोचा तडफडून झालेला मृत्यू  आणि समाजाच्या कोरडेपणाची ती भयंकर शिक्षा, तो माणूस गेली सव्वीस वर्षे स्वतःचे पैसे खर्च करून निमूटपणे भोगत होता. तो लोकांची तहान भागवत नव्हता, तर तो दररोज स्वतःच्या बायकोच्या आत्म्याला शांत करत होता.
​श्रीकांतने ती डायरी तिथेच कॉटवर अत्यंत आदराने ठेवली. तो खोलीतून बाहेर आला आणि त्याने दरवाजा हळूच ओढून घेतला. तो पुन्हा बाजारात त्या कडुनिंबाच्या झाडाखाली आला. ते दोन रिकामे माठ तिथेच उन्हात ☀️ तापत होते. आजूबाजूची गर्दी स्वतःच्याच कामात आणि स्वार्थात मग्न होती.
​श्रीकांतने कोणताही विचार केला नाही. त्याने स्वतःच्या दुकानातून पाण्याचे दोन मोठे कॅन आणले आणि ते दोन्ही माठ काठोकाठ भरून ठेवले. त्याने आजूबाजूच्या कुणालाही रघुनाथरावांबद्दल काहीही सांगितले नाही. 
रघुनाथरावांचा तो अत्यंत शांत आणि मूक प्रवास आता संपला होता, पण एका अनोळखी माणसाने लावलेली ती माणुसकीची तहान, आता श्रीकांत अत्यंत शांतपणे  पुढे चालवणार होता.

2793. अक्षय नातं

 “आजही उठायला उशीरच केलास ना? अग आज अक्षयतृतीया. माझ्या लेकाला पाणी पाजायचं. करा, केळी घेऊन यायची…निदान मेल्यावर तरी त्याला वेळेत दे सगळं.” मालतीबाईंचा तोंडाचा पट्टा सुरूच झाला, अवनीला उठलेलं पाहून. तिनं आपले लांबसडक केस बांधले आणि दोघींचा चहा टाकला. त्या कितीही घालून पाडून बोलत असल्या तरी ती शांत असायची. चहा त्यांना देत ती म्हणाली,
“रात्रीच ताईचा फोन आला होता. करा, केळी तिचा मुलगा आणून देणार आहे. बाकी काय करायचंय सांगा. मग मला लवकर निघायचं आहे आज.”
त्यांनी रागारागानं सगळा स्वयंपाक सांगितला. ती पटकन पळाली आंघोळीला. लगेच स्वयंपाक घरात वळाली, कुकर लावला, कणिक भिजवली, आंबे पाण्यात टाकले आणि शिट्ट्या होईपर्यंत ती आपल्या आवडत्या अंगणात पळाली. खिडकीतून कितीवेळ खुणावणाऱ्या मोगऱ्याजवळ आधी गेली. मोगरा गच्च बहरला होता. त्या घमघमाटानं तिला एकदम प्रसन्न वाटलं. पटकन पाण्याचा पाईप घेऊन सगळ्या तहानलेल्या झाडांना पाणी द्यायला लागली. कडकडीत उन्हामुळं झाडांची जमीन सुकून गेलेली होती. अवनीला वाटलं, ‘आपल्याला संध्याकाळी लवकर येणं होत नाही, तर आईंना झाडांची सुद्धा कीव येत नाही. त्यांना पाणीही देत नाहीत !’
हा विचार मनात सुरू होता आणि एकीकडे ती रखरखीत माती गटागटा पाणी पीत होती आणि अहाहा. मातीचा सुंदर सुगंध आला ! अवनीनं आपले डोळे मिटले आणि तो गंध श्वासात भरून घेतला. तिला त्या क्षणी, भोवताली अवीच्या श्वासाची जाणीव झाली.
     त्यानंच तर शिकवलं होतं आपल्याला. निसर्गात येऊन त्याचे आनंद घ्यायला. आपलं पहिलं मूल पोटातच गेल्यावर आपलं नैराश्य त्यानंच तर साथ देऊन पळवून लावलं. नाहीतर डॉक्टर म्हणाले होते, 
“ह्या अश्याच शॉक्ड राहिल्या तर अवघड आहे… सतत मिळणारा आंनद शोधा !”
त्यांच्या ह्या वाक्याला अवीनं उचललं आणि सुरू केला असा आनंद मिळवण्याचा शोध. एके दिवशी ही सगळी रोपं आणली आणि म्हणाला, 
“चल, आज आपल्या घरामागच्या मोकळ्या जागेत आपण आपला टी पॉईंट बनवू…” म्हणत त्यानं ओढत आणलं आपल्याला. आपण मरगळलेल्या मनानं आणि चेहऱ्यानं आलो होतो. अशीच कोरडीठाक माती. त्यानं खड्डे बनवले आणि ही रोपं आईकडून आणि आपल्याकडून लावून घेतली. त्यानंतर ह्या पाईपनं पाणी मारलं त्यानं आणि असाच सुंदर सुगंध आला होता. मग सगळ्या झाडांवर पाणी मारलं आणि म्हणाला, 
“बघ कशी छान चकचकीत दिसताहेत… त्यावरचे थेंब बघ जरा…”
बळंच ह्या मोगऱ्याजवळ बसवलं. खरंच, आपणही हरखलो मग ह्या आनंदात. मग रोजचंच झालं हे. अवी आवर्जुन पकडून आणायचा इथं. आई रोज येत नव्हत्या. अगदीच त्यानं आग्रह केला तर आणि आता तर नाहीच येत. ह्या मोगऱ्याला आणि ह्या लडिवाळ चाफ्याला कळी आली तेव्हा तर किती खूश झाला होता. अगदी लहान लेकरसारख्या उड्या मारत आपल्याला दाखवल्या होत्या. आपणही असंच खूश झालो होतो आणि आपल्यालाही आवडायला लागलं होतं हे सगळं. रोपटी छान फुलं द्यायला लागली होती. त्या फुलांचे गंध, देवासाठी अशी झाडावरची ताजी फुलं घेताना किती प्रसन्न वाटायचं. त्या लडिवाळ चाफ्याखाली त्यानं हौसेनं आणून मांडलेल्या त्या केनच्या खुर्च्या, तो सोबतीचा चहा. सगळं अगदी छान !
      पण अविला लिव्हर सोरायसिस झाल्यावर मात्र आपण हादरून गेलो. प्रत्येक वेळी डॉक्टरकडून आलं की अवी बागेत यायचा.
“हे माझं खरं औषध आहे ग ! हा आयुष्यातला अक्षय आनंद आहे अवनी…! हा पैसा, आता तर शरीरही काही कायम टिकणार नाही. पण हा मातीचा सुगंध, हा फुलांचा गंध हा तर कधीही न संपणारा आहे बघ.”
अवनीच्या जवळ येत तो म्हणायचा, “अवनी, आज डॉक्टर म्हणाले, ‘आता फार तर महिना आहे हातात.’ मला जर बेडवर पडून राहायची वेळ आली, तर बागेजवळच्या खोलीत माझा बेड टाक तू. असं झाडांना तृप्त केलं की ती माती आपल्याला सुखावेल. शेवटी नातं तिच्यापाशी संपतं आपलं; हेही किती छान ना ! शेवटी आपला देह सोडून आत्म्याचं अक्षय जगणं तिच्यात एकरूप होऊन सुरू होत असेल, म्हणून तर हा तिचा सुगंध हा मला कायम अक्षय आनंद देणारा वाटतो.”
मग आपला हात हातात घेत म्हणाला होता, “अवनी, मी जाणार हे तर आता नक्की आहे. तू दुसरं लग्न कर किंवा नको करू, तू ठरव. आई जगेल तिला जशी परमेश्वर बुद्धी देईल. माझ्या आजारपणात एवढं घर सोडलं, तर तसं हाताशी काही नाही. त्यामुळं मी तुला, मला गवसलेल्या ह्या अक्षय आनंदाशिवाय दुसरं काही देऊ शकत नाही ग…!” म्हणत अवी अक्षरशः ढसाढसा रडला होता. आपण कोलमडून गेलो नाही कारण सहा महिन्यांत तशी अवीनं आपली मानसिक तयारी करून घेतली होती.
”राहिलीस ह्या घरात, तर भेटू रोज ह्या जागेत आणि गेलीस जरी इथून, तरी ह्या सुगंधा सोबत आठवेन मी तुला आनंद द्यायला…!”
म्हणून तर आताही तिला वाटलं, तो आहेच सोबत. कारण आज तर अक्षय तृतीया ना !
मनात ती म्हणाली, ‘अवी, रितीप्रमाणं पितरांना पाणी तर दिलं जाईलच. पण मला तर आताच ह्या सगळ्या आठवणी आणि ह्या सुगंधानं तुला तृप्त केल्यासारखं जाणवलं रे !’ म्हणत तिनं आपले पाणावलेले डोळे पुसले. घरात येताच तिला सासुबाईंची चिडचिड जाणवली. मनात तिला फार वाईट वाटलं. ह्यांच्यासाठी मला नाही थाटावा वाटला संसार, त्यांच्यासाठी तर आपण ही नोकरी करतोय. पण ह्या मात्र सतत आपल्याला त्यांच्या मुलाची मारेकरी म्हणून बघतात !
पण असो. पोटातलं न पाहिलेलं बाळ गेलं, तर आपण उद्ध्वस्त झालो होतो. त्यांचा तर एवढा मोठा मुलगा गेला म्हणून अश्या वागत असतील. मनातला विचार बाजूला करून त्या सांगतील तसं सगळं आटपून ती निघाली. सासूबाईंनी आपल्या खास मैत्रिणीला फोन करून बोलावलं होतं जेवायला. जेवण सगळं छान झालेलं बघून मैत्रीण म्हणाली,
“मालती, अगं लेक गेला तरी ह्या सुनेच्या रुपातल्या लेकीनं तुला नाही सोडलं. अगं, अक्षय साथ दिलीय तिनं तुला. आज तिच्यासाठी काहीतरी सोनं घे. परवा तुला माहेरच्या शेतीचे पैसे आलेत ना? मग काय करणार आहेस ते बँकेत ठेवून? तिला छोटेसे कानातले तरी कर. तुझ्या लेकाच्या आजारात सगळं मोडलं ना तिनं? चल, मला आज माझ्या सुनेसाठी बांगड्या करायला जायचंय, तू ही चल आणि तिथं बघ आवडलं तर.”
मैत्रिणीच्या वाक्यावर चिडत मालती म्हणाली, “काही नको. माझ्या लेकाला खाल्लं आणि आता नोकरीच्या नावाखाली हिंडतेय बाहेर. ‘काय करते’, मी तर कधी विचारलं नाही. पण नट्टापट्टा करून जाते घरातून. मी तुझ्या सोबत येते, पण मला तिच्यासाठी काही घ्यायला लावू नको. तशी मला पोसते ती. पण उगाच लाड नको भटकभवानीचे !”
मालतीचं वाक्य ऐकून मैत्रिणीला वाईट वाटलं. अवनी खूप कष्टाळू मुलगी. अवीनंतर सासूची जबाबदारी झटकून पळाली नाही, उलट एका सोन्याच्या शोरूम मध्ये कामाला लागली. पण हिला कधी विचारायचं नसतं तिला, 
‘काय काम करते?’ ‘कसे पैसे आणते?’ उलट तिच्याविषयी मनात वाईट विचार करते.
मग मैत्रिणीला वाटलं, हिला तिच्याच शोरूम मध्ये घेऊन जाऊ. दोघी रिक्षात बसून शोरूम समोर आल्या, तसं दोन मिनिटं मालतीला तिथंच उभं करून मैत्रीण आत गेली. अवनीला म्हणाली,
“आम्हाला दागिने दाखवायला तू येऊ नकोस. तुझ्या सासूला घेऊन आलेय मी. इथल्या तुझ्या एखाद्या छान मैत्रिणीला सांग आम्हाला अटेंड करायला.”
अवनी हसत ‘बरं’ म्हणून गेली. मालतीबाई शोरूम बघून जरा बिचकल्या. मैत्रिणीला जवळ ओढत म्हणाल्या,
“एवढ्या मोठ्या दुकानात कशाला? किती गार आहे इथं आणि लखलखाट तर बघ उगाच जीव दडपल्यासारखं झालंय मला !”
हसत मैत्रीण म्हणाली, “अग आपल्याला कुठं इथं नोकरी करायचीय? मस्त बस ह्या खुर्चीत आणि बघ, इथं ह्या बायका कशी नोकरी करतात.”
मालतीनं सभोवती पाहिलं. अगदी सुंदर. सगळ्या जणी मस्त साड्या, लांब बाह्यचे ब्लाऊज, त्यावर छान हेअरस्टाईल, हलका मेकअप आणि अगदी तरतरीतपणे त्या गुळगुळीत फरशीवर अगदी पटपट चालत होत्या. हसऱ्या चेहऱ्यानं कस्टमरशी बोलत होत्या. प्रत्येकीवर त्या सोन्याची जबाबदारी होती. ती अगदी सजगपणे त्या निभावत होत्या.
मालती म्हणाली, “बघ किती छान राहतात आणि कामही किती चपळतेनं करतात. इतक्या नजरा त्यांच्यावर पण त्यांना फक्त कामपुरतं बोलून आपली नोकरी सांभाळणं सोपं नसेल. नाहीतर आमची भटकभवानी कुठं हिंडतेय की.”
तेवढ्यात त्यांच्या समोर बांगड्या डिझाईन ट्रे आले. मैत्रिणीनं सुनेला व्हिडीओ कॉल करून डिझाईन निवडलं. मालती मध्येच एकदोन डिझाईनवर बोट फिरवत होती. मध्येच ती मैत्रिणीला म्हणाली,
“कशाला ग सुनेला घेतेस? स्वतःला घे.”
मैत्रीण हसून म्हणाली, “अग झाली आपली हौस. आता ह्या लेकरांचे दिवस. आणि ह्या पोरी आपल्या पोरांना एवढी साथ देतात म्हणून तर आपली पोरं समाजात एवढी सोन्यासारखी चमकतात! मग खरं सोनं ह्या पोरी…! हे वस्तुरूपी सोनं गौण आहे ग त्यांच्यापुढं. म्हणून ही नात्यातली अक्षय प्रेमाची भेट मी या वेळी सुनेला द्यायची ठरवलीय.”
मालतीबाईनं सवयीप्रमाणे तोंड वाकडं केलं. तेवढ्यात त्या समोरच्या मुलीला कुणीतरी, 
‘जेवायला चल कुणाला तरी उभं करून…’ असं म्हणताच मालतीनं विचारलं,
“दुपारचं जेवण चार वाजता का…?”
तशी ती मुलगी म्हणाली, “हो काकू, आज अक्षय तृतीयेची गर्दी आहे ना, म्हणून. पण रोजही असाच वेळ होतो. तासन् तास उभं राहून पाय दुखतात. पण काय करणार ! त्याशिवाय पैसे कोण देईल आम्हाला?”
ती निघून गेली, तश्या मालतीबाई सभोवती काचेवर हात फिरवत त्यातले चमकणारे दागिने बघू लागल्या. एका मोहरी दाण्याच्या माळेवर त्यांची नजर थबकली. तिथल्या एका लेडीजला बोलवून त्यांनी किंमत विचारली. मैत्रिणीला दाखवत त्या म्हणाल्या,
“मंगळसूत्र तर तारुण्यात उतरलं अंगावरून. आता ही माळ आवडली. पण फार महाग आहे. चाळीस हजार म्हणे…! बरं चल, झालं का तुझं सगळं?”
ती म्हणाली, “हो, ऑर्डर दिलीय. आठ दिवसांनी मिळतील.”
दोघी निघाल्या. रात्री अवनी उशिरा आली. दोघी न बोलताच जेवल्या. झोपताना अवनी त्यांच्याजवळ गेली.
“आई, अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा !” म्हणत तिनं ती माळ त्यांच्या समोर धरली, तश्या त्या पहातच राहिल्या.
“तुला कसं कळलं मला ही आवडली म्हणून? आणि खूप महाग आहे ग ती !”
अवनी म्हणाली, “आई, त्या शोरूममध्येच मी काम करते. तुम्ही ही माळ निवडलीत, त्याच्या काचेपलीकडे होते मी. तुम्हाला पहात होते. खरंच खूप दिवसांनी तुम्हाला काहितरी आवडलं ना आई? आणि पैश्याची काळजी करू नका. स्टाफला अक्षय तृतीयेच्या निमित्त हप्त्यानं सोनं घेता येत होतं, म्हणून घेतलं !”
त्या दुकानातली अवघड वाटणारी नोकरी आपली सून करते. जेवते उशिरा. दिवसभर उभी आपल्यासाठी आणि आपण वाट्टेल ते बोलतो. हे सगळं मनात येऊन सासुबाईंना आता घळाघळा रडू आलं. अवनीला त्यांनी घट्ट मिठी मारली.
“अगं मी अशी वागते, तरी तू नातं अक्षय्य टिकवलंयस गं !”
मनापासून दोघी रडत होत्या अश्रू जमिनीवर पडत होते आणि आताही मातीचा सुगंध आला. अवनी मनात म्हणाली, ‘आलास का आमचं अक्षय प्रेम बघायला…!’
तिच्या कानात आवाज घुमला, ‘हो तर, ह्या प्रेमातला दुवा मी अक्षय नसलो, तरी तू टिकवलंस नातं अक्षय. खूप थँक्स अवनी…!’
त्या जमिनीवर पडलेल्या अश्रुतूनही अवनीला घमघमणारा सुगंध आला. आयुष्यातलं अक्षय नातं टिकवणारा !

- स्वप्ना मुळे (मायी), छ.संभाजीनगर.

2792. वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही...!

  बाहेर पाऊस पडत होता आणि आत वर्ग चालू होता.
तेवढ्यात, शिक्षिकेने मुलांना विचारले, "जर तुम्हा सर्वांना १०० रुपये दिले, तर तुम्ही काय खरेदी कराल?"
कोणीतरी म्हणाले, "मी एक व्हिडिओ गेम खरेदी करेन..."
कोणीतरी म्हणाले, "मी एक क्रिकेट बॅट खरेदी करेन..."
कोणीतरी म्हणाले, "मी स्वतःसाठी एक गोंडस बाहुली खरेदी करेन..."
मग, आणखी एक म्हणाले, "मी खूप सारे चॉकलेट्स खरेदी करेन."
एक मूल विचारात गढले होते.
शिक्षिकेने विचारले, "तू काय विचार करत आहेस? तू काय खरेदी करणार आहेस?"
मूल म्हणाले, "शिक्षिका, माझ्या आईला थोडे कमी दिसते, म्हणून मी तिच्यासाठी चष्मा खरेदी करेन!"
शिक्षिकेने विचारले, "तुझे वडील तुझ्या आईसाठी चष्मा खरेदी करू शकतात, पण तुला स्वतःसाठी काही नको आहे का?"
मुलाच्या उत्तराने शिक्षकांच्या डोळ्यात पाणी आले.
मुलगा म्हणाला, "माझे वडील आता या जगात नाहीत."
माझी आई लोकांचे कपडे शिवते आणि मला शिकवते. तिच्या कमी दृष्टीमुळे तिला नीट शिवता येत नाही. म्हणूनच मला माझ्या आईला चष्मा द्यायचा आहे, जेणेकरून मी चांगले शिकू शकेन, एक महान माणूस बनू शकेन आणि तिला आवश्यक असलेला सर्व आनंद देऊ शकेन.
शिक्षक: बाळा, तुझे विचार हीच तुझी कमाई आहे! वचन दिल्याप्रमाणे मी तुला हे १०० रुपये उसने देत आहे. जेव्हा तू हे कमवशील तेव्हा परत कर. आणि माझी इच्छा आहे की तू इतका महान माणूस बनावास की तुझ्या डोक्यावरून हात फिरवताना मला धन्य झाल्यासारखे वाटावे.
२० वर्षांनंतर....
बाहेर पाऊस पडत आहे आणि आत वर्ग चालू आहे.
अचानक, दिवे चालू असलेली जिल्हाधिकाऱ्यांची गाडी शाळेसमोर थांबते. शाळेतील कर्मचारी सावध होतात.
शाळेत शांतता पसरते.
पण हे काय आहे?
जिल्हाधिकारी एका वृद्ध शिक्षकाच्या पाया पडतात आणि म्हणतात, 
"साहेब, मी उसने घेतलेले शंभर रुपये परत करायला आलो आहे."
संपूर्ण शाळा थक्क होते.
ते वृद्ध शिक्षक वाकलेल्या तरुण जिल्हाधिकाऱ्याला उचलतात. त्याला मिठी मारतात आणि ढसाढसा रडू लागतात.

मित्रांनो, प्रसिद्ध व्हा, पण गर्विष्ठ होऊ नका.
साधे राहा, दुर्बळ होऊ नका.
काळ बदलायला फार वेळ लागत नाही.
राजाला भिकारी व्हायला आणि भिकाऱ्याला राजा व्हायला फार वेळ लागत नाही.
फार वेळ लागत नाही...!!
🙏🏻😊😊🙏🏻🙏🏻😊😊🙏🏻

2791. भेट

 दुपारची अडीच-तीनची वेळ होती. पावसाळी कुंद दुपार. त्यातून ऑड डे. त्यामुळं कॅफे मध्ये अगदीच तुरळक डोकी होती. ‘केनी जी’ लागला होता बॅकग्राऊंडला. नी पुढं चटपटीत मुलं-मुली उपस्थित लोकांना काय हवं-नकोय पहात होती.
टू स्टार्ट अ कन्व्हर्सेशन, तिच्यासाठी एकदम पर्फेक्ट वातावरण बनलं होतं. तो तिच्या समोरच, दोन्ही हातांनी काॅफीच्या रिकाम्या मगाशी खेळत बसला होता. गप्प.
“शुड आय आस्क फाॅर वन मोअर काॅफी?” तिनं विचारलं. 
“ओह ! शुअर… ईफ यू गीव्ह मी कंपनी.” तो उत्तरला.
तिनं आणखी दोन ‘कॅपेचिनो’ ऑर्डर केल्या.
ती - “तुमची मॅट्रिमोनीतली ॲड बघुनच मी ठरवलं, तुम्हाला भेटायचंच… सो ईन्टरेस्टींग ईट व्हाॅज!”
तो - “का बरं…? एवढं काय होतं त्यात?”
ती - “अपेक्षेमध्ये लिहिलेलंत की, ‘पाऊस ऐकता येणारी हवी’… ‘प्राजक्त श्वासात भरुन घेता येणारी हवी’… ‘दिवसाच्या कुठल्याही प्रहरी काॅफी सूर्रर्रर्र करत पीता येणारी हवी’… माय गाॅड, किती ते प्रिसाईज्ड असावं…! हाऽऽ… हाऽऽऽ… हाऽऽऽऽ…”
तो - “अच्छा… म्हणून आभाळ भरून यायची वाट पहात होता का तुम्ही, ह्या आपल्या पहिल्या भेटीसाठी? रविवारी भेटायला नाही म्हणाला होतात ते…”
ती - “ऑफकोर्स यस्स…! टळटळीत दुपारी, घाम निथळणार्‍या अंगानं, लोकांच्या गजबजाटात कुठल्याशा ऊडुपी हाॅटेलात तुम्हाला बोलावून, तुमच्या रसिकतेचा अपमान नव्हता करायचा मला.”
तो - “दॅट्स रिअली ग्रेट… पण तुमची ॲडही काही कमी नव्हती… अहो, ‘रस्त्यावरून कायम माझ्या बरोबरीनं राहणारा हवा’… ‘कुठल्याही प्रसंगी मला एकटीला टाकून, न पळून जाणारा हवा’… ‘माझ्या पावलांंना कायम सरळ पडू देणारा हवा’… आय रिअली ॲप्रिशिएटेड दॅट!”
तो आणि ती - “ॲन्ड दज वुई फाऊंड दॅट, वुई आर पर्फेक्टली मॅच वीथ ईच अदर…”
एकत्रच बोलले दोघं, आणि अगदी मनापासून मोकळेपणानं हसले.
बाहेर जोराचा गडगडाट झाला नी तीचा टेबलावरचा हात थरथरला… आधार शोधू लागला. त्यानं पटकन् त्याचा हात हलकेच तिच्या उपड्या हातावर ठेवला. त्या कोमट स्पर्शात तिला कमालीची विश्वासार्हता जाणवली.
पाऊस सुरू झाला होता… त्याचीही ही पहिलीच ‘भेट’ होती जमिनीशी… ह्या दोघांच्या भेटीसारखीच.
एव्हाना बराच वेळ झाला होता… निघायला हवं होतं. 
त्यानं त्याची व्हिलचेअर ‘मागं’ घेतली… मात्र, ह्यानंतर ती ‘पुढं’ जाणार होती, फक्त तिच्या हातांनी…
तिनं तिची स्टीक… व्हाईट केन फोल्ड करून तिच्या खांद्यावरच्या बॅगेत ठेवली. त्याच्या व्हिलचेअरची हॅन्डल्स पकडून ती उठून उभी राहिली…
आतापासूनच तो तिचे नसलेले डोळे बनणार होता… अन् ती त्याचे नसलेले पाय !
दोघं बाहेर आली. तो पावसासारखाच संयतपणे बरसला होता तिच्या अंतरावर आणि ती जमिनीसारखीच घमघमली होती, त्याच्या अंतरातून.

- सचिन श. देशपांडे

2790. झोपाळा

 कुसुम आगाशे जानेवारीतच मुंबईला आलेल्या, आपल्या नातसूनेच्या डिलिव्हरीकरता. केशव आगाशे मात्र रत्नागिरीला, त्यांच्या वाड्यावरच थांबणार होते. दोनेक महिने घर बंद ठेवणं पटत नव्हतं, त्या पंच्याऐंशी वयाच्या शरिराला. अर्थात हे देखल्या देवा सादर केलेलं कारण आहे, हे कुसुम बाईंना नक्की कळलं होतं. यजमानांचा पाय घराबाहेर पडत नाहिये, हे पक्क जाणून होत्या त्या. पण त्यांनीही फार काही आग्रह केला नव्हता केशवरावांना... कारण त्या जाणून होत्या, रत्नागिरीच्या या घराबद्दलची अपार ओढ त्यांची. कुसुमबाईंचाही जिव अडकलाच होता खरंतर घरात. पण कर्तव्य पार पाडणं ही, अत्यावश्यक होतं. मुलगा नी सून दोन वर्षांपुर्वीच एका अपघातात गेले होते... त्यांच्यानंतर एकुलत्या एक नातवाला, त्याच्या ह्या रत्नागिरीच्या आजी - आजोबांचाच तर आधार होता. 
गणपतीत नातू आणि नातसून, दोघेही रत्नागिरीला आले होते. नातसूनेचं पुढे आलेलं पोट बघून, कोण खूष झाले होते केशवराव अन् कुसुमबाई. सातही दिवस रोज मिठ - मोहरी ओवाळून टाकत होत्या, कुसुमबाई नातसूनेवरुन. मुंबईला निघतांना नातवाने विचारलं होतं आजी - आजोबांना, डिलिव्हरीच्या वेळी मुंबईला येण्याबद्दल. दोघांचेही आई - वडिल हयात नव्हते... त्यामुळे घरात कुसुमबाई - केशवरावांखेरीज मोठं कोणीच नव्हतं... आधार असा ह्यांचाच होता त्या दोघांना... त्यामुळेच त्याना नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. ठरल्याप्रमाणेच जानेवारीला नातसूनेला नऊवा महिना लागला, आणि कुसुमबाई मुंबईला आल्या. ईथे येण्यापुर्वी फक्त एकच काम, न विसरता करायला सांगितलं होतं कुसुमबाईंनी नातवाला. एक छान ऐसपैस सागवानी लाकडाचा, झोपाळा बनवून घ्यायला सांगितला होता त्यांनी. नेरुळला बर्‍यापैकी मोठं रो हाऊस असणार्‍या नातवाला, जागेचा तसा काही प्राॅब्लेम नव्हताच. त्यामुळे आजीची आज्ञा शिरसावंद्य मानत, त्याने मस्त झोपाळा तयार करवून... आजीच्याच सांगण्यानुसार अंगणात, म्हणजेच ईकडच्या भाषेत फ्रंट यार्डमध्ये बसवून घेतला होता. 
कुसुमबाईंनी निघतांना केशवरावांना बजावलं होतं, पायंडा न मोडण्याबद्दल. रोज रात्रीचं जेवण झाल्यावर शतपावली आटोपून... बरोब्बर दहा वाजता दोघं, रत्नागिरीच्या अंगणातल्या ऐसपैस सागवानी झोपाळ्यावर बसत असत. अगदी तासभर... आजुबाजूच्या निरव शांततेत, ऐकत फक्त एकमेकांना... तर कधी ऐकत, फक्त धडधड एकमेकांच्या हृदयाची... एकमेकांच्या खांद्यावर ठेऊन डोकं, आलटून - पालटून. कुसुमबाईंनी सांगितलं होतं केशवरावांना की, बरोब्बर दहा वाजता आपण आहोत तिथे झोपाळ्यावर बसायचं... नी हळूवार झोके घ्यायचे बाजूच्या कडीवर डोकं टेकून. मनातल्या मनात एकमेकांची ख्याली - खुषाली विचारायची... गुजगोष्टी करायच्या एकमेकांबरोबर... आणि अकरा वाजता कुशीत घेऊन एकमेकांची आठवण, झोपी जायचं. 
ठरल्याप्रमाणेच अगदी सगळं चालू होतं. जानेवारीच्या मध्यावर, पणतूचं चंद्रमुख दिसलं होतं कुसुमबाईंना. केशवरावांनीही रत्नागिरीला अख्ख्या आळीत पेढे वाटले होते मग. ऐशी वर्षांच्या कुसुमबाई, जणू काही तरुणाईने सळसळत होत्या आता. अख्खा दिवस भुर्रकन ऊडून जात होता समोरुन, नातसूनेचं नी नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाचं करण्यात. पण दहा वाजता मात्र कुसुमबाई... अगदी क्षणभराचाही विलंब न करता, झोपाळ्यावर येऊन बसत असत. आणि ठरल्याप्रमाणे अगदी तसंच, रत्नागिरीच्या घरी केशवरावही. आता तर परतण्याचे वेधही लागले होते कुसुमबाईंना. केशवरावांचेही डोळे आसुसले होते पत्नीला बघण्यासाठी केव्हाचे. लवकरच दोघं एकत्रपणे एका झोपाळ्यावर बसणार होते. पंचवीस मार्चची तिकिटं काढली होती नातवाने दोघांची... तो स्वतः सोडून येणार होता आजीला रत्नागिरीला. आणि... आणि तिकिटं कॅन्सल करावी लागली होती त्याला. पुढची तिकिटं काढताही येत नव्हती, अनिश्चित कालावधीकरीता. 
हा प्रचंड मोठा धक्का होता, दोन्ही म्हातार्‍या जिवांना. मनाशी पक्की ठरलेली एखादी साधी गोष्टही... जर का पार पडली नाही, की घोर लागतो जिवाला या वयात... मग ही तर अत्यंत महत्वाची गोष्ट होती दोघांसाठीही. एकमेकांना बघण्यासाठी होणार्‍या विलंबातील प्रत्येक तास, विषारी डंख मारत होता दोघांनाही. आपापल्या ठिकाणच्या झोपाळ्यावर बसून, दोघांनाही भरुन येऊ लागलं होतं सध्या. फक्त रिकामं शरिर जसं काही झोके घेई... दोघांचीही मनं मात्र मध्य वाटेत कुठेतरी, एकमेकांत विलीन झालेली असत. आणि अशाच कुसुमबाई दोन दिवसांपुर्वी... झोपाळ्यावर बसलेल्या असतांना, हाॅलमध्ये वाजलेली फोनची रिंग ऐकू आली त्यांना. त्यांनी त्या आवाजाच्या दिशेने पाहिलं... आणि बाजूच्या कडीला डोकं टेकून... जिवणी किंचितशी पसरवत, खिन्न हसल्या त्या. त्यांचा नातू धावतच बाहेर आला होता... आजीला सांगायला की... की आजोबा गेले... दहा मिनिटांपुर्वीच... रत्नागिरीच्या अंगणातील झोपाळ्यावरच... कडीला डोकं टेकून... बसल्या बसल्या. नातू ओरडत, रडत हे सांगू पहात होता आजीला... पण कुसुमबाई गेल्या होत्या, अगदी पाच मिनिटांपुर्वीच... फोनची रिंग ऐकल्या ऐकल्याच... काय ते समजून - ऊमजूनच... सताड ऊघड्या डोळ्यांनी.
तितक्यात जोराची झुळूक आली वार्‍याची... ईथेही आणि तिथेही. झोपाळाही आपसुकच पुढे - मागे होऊ लागला होता मग, ईथलाही अन् तिथलाही.

- सचिन देशपांडे

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...