गुरुवार, ३० एप्रिल, २०२६

2784. मास्टरपीस

 कोमल चित्र काढण्यात हरवून गेली होती. आज तिच्या कुंचल्यातून शुभ्र कागदावर बच्चन साहेब साकारले गेले होते. हुबेहूब ! केबीसी वर जसे दिसतात अगदी तस्से.
काल आजीचं चित्र इतकं पर्फेक्ट जमलं होतं की, जणू काही फोटोच वाटावा. परवा काढलेलं निसर्गचित्र मन शांत करत होतं.
“कोमल, चित्रं काढण्याचा सध्या काहीही उपयोग नाही. आधी बारावीचा अभ्यास सुरू कर आणि वेळ उरला तर मार या रेघोट्या!” आई कडाडली आणि सोळा वर्षांच्या कोमलची तंद्री भंगली. आईला हे सगळं वेस्ट ॲाफ टाईम वाटत होतं.  
“आई, मला यातच करिअर करायचंय ग!” कोमल निर्धारानं म्हणाली आणि जे नेहमी व्हायचं तेच झालं… 
आईनं लांबलचक लेक्चर दिलं, “यात पैसा नाही. मान नाही. हॉबी म्हणून ठीक आहे… महागाई केवढी वाढलीय… अशानं भीक मागण्याची वेळ येईल एक दिवस!”
कोमलने रंगपेटी बंद केली. जे आवडतं ते करण्यातला आनंद अस्ताला जाण्याऱ्या सुर्यासारखा खाली खाली जात निघून गेला होता व मनात एक अनोळखी काळोख पसरला होता.
आई-बाबांच्या सततच्या लेक्चरमुळं कोमलनं मन घट्टं केलं. रंगपेटी, ब्रश बाजूला केला… ह्रुदयाचा एखादा भाग दूर केल्यासारखा. त्यात आईचं एक वाक्य सतत मनावर आघात करत होतं…
“बरी काढतेस तू चित्रं… पण यात काही फारसं वेगळेपण नाही. कितीतरी लोकं काढू शकतात अशी चित्रं!”
आईला कधी कळेल की, चित्र आधी मनात तयार होतं. अनेक कल्पना समोर येतात. त्यातून हृदयाला अत्यंत भिडणारी एक कल्पना कागदावर उतरते. मनातले बच्चन महाशय कागदावर जसेच्या तसे उतरले की मन वेडं होतं! 
यालाच क्रिएशन म्हणतात! ते कसंही असलं तरी ते स्वत:चं असतं. त्याला अनेक नाजूक पदर असतात! भावनांचे, स्पंदनांचे, कौशल्याचे! कुंचला कागदाला लागताच बाकीचं जग कसं स्तब्ध होऊन जातं!
तेवढ्यात आईची चाहूल लागताच तिनं पटकन सायन्सचं पुस्तक उघडलं. ‘डॉक्टर हो’ म्हणून मागं लागलेली आई ते बघून काही न बोलता खोलीतून बाहेर गेली.
‘हार्ट’बद्दल वाचताना वाटलं. प्रेम, कला, आवड कुठं ठेवलेलं असतं हृदयात, हे यांना कुठं ठाऊक आहे? ‘ब्रेन’ वाचताना वाटलं. क्रिएशन, भावना, सुख, दु:ख कुठं निर्माण होतात याची यांना कल्पना नाही. आहेत याची उत्तरं सायन्सकडे?
आई हॉलमधे कुणाशी तरी फोनवर बोलताना रडत होती. ते ऐकून कोमल धावत बाहेर गेली. आईच्या डोळ्यातून अश्रू वहात होते.
“काय झालं, आई?” कोमल कावरीबावरी झाली.
“आजी पडली ग. बेशुद्ध झालीय म्हणाला मामा.” आई रडत लॅपटॉप वर बस, रेल्वे, विमान यांच्या वेळा बघत होती.
“आई, तू बॅग भर… मी बघते बाकीचं. सध्या सुट्टी सुरू असल्यानं मी पण येते तुझ्यासोबत.” कोमलनं भराभर सर्व जबाबदारी उचलली.
संध्याकाळी दोघी आजीच्या हॉस्पिटलमधे पोहोचल्या. आजी शुद्धीवर आली होती. लेक व नात बघताच तिच्या आनंद-दु:ख-वेदना सारं तिच्या डोळ्यातून ओघळू लागलं.
“मी आलेय ना आई…? आता काही काळजी करू नको.” आईनं आजीचा हात हातात घेतला. कोमल व आई आजीची सेवा करत होत्या. पण म्हातारपणी पडलं की तब्ब्येत एकदम ढासळते. तसंच झालं होतं… बरी होतेय म्हणत असताना एक दिवस आजी सिरिअस झाली. तिला ICU ला हलवलं गेलं.
ICU त जाण्यापूर्वी आजीनं कोमलला जवळ बोलावलं.
“कोमल, घरी जाऊन मला माझ्या श्रीरामाचा फोटो आणून देशील का? रामराया डोळ्यापुढं असावा असं वाटतं.” आजी कृश आवाजात ‘श्रीराम जयराम’ म्हणत होती.
घरी जाऊन रामाचा फोटो आणण्यात दोन अडीच तास सहज गेले असते. या परिस्थितीत आजीला सोडून जाऊ नये असं कोमलला वाटलं.
तिथल्या नर्सकडे तिनं प्रिंटरमधला एक कागद मागितला. बॅकपॅक मधून पेन्सिल व रंग बाहेर काढले आणि कागदावर आजीच्या खोलीतले श्रीराम प्रकटायला सुरूवात झाली. हुबेहूब ! तेच प्रेमाने ओथंबलेले डोळे, सावळा रंग, हातात धनुष्य, पिवळं जरीचं पितांबर, केशरी शेला धारण केलेला आजीचा प्रभू श्रीराम कोमलनं अनेकदा पाहिला होता. तो त्या कागदावर साकार झाला.
कोपऱ्यात एक फुलांचे चित्र लावलेली फ्रेम होती. तिनं नर्सला विनवणी करून ती फ्रेम मागितली व त्या फ्रेममधे तो श्रीराम लावला. ती फ्रेम तिने  ICU च्या नर्सकडे आजीच्या समोर दिसेल अशी लावायला दिली.
आजी समोर लावलेल्या श्रीरामाकडे बघत होती. तिनं हात जोडले…
‘घन:श्याम हा राम लावण्य रुपी |
महाधीर गंभीर पूर्णप्रतापी ||
करी संकटी सेवकाचा कुडावा |
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||’
आजीचे हाललेले ओठ आई व कोमल पाहत होत्या. आईचे डोळे भरून वहात होते.  कोमलकडे अभिमानानं बघत तिनं हात जोडले.
“कोमल, चुकले ग मी… तुझी चित्रकला सामान्य नाही. आजीच्या मनातला, तिच्या हृदयातला श्रीराम तू तिच्यापुढं साकार केलास! आजीची इच्छा पूर्ण केलीस.”
दुसऱ्या दिवशी सकाळी नर्सनं आजीच्या तब्येतीत सुधारणा असल्याचं सांगितलं. दोन दिवसांत आजी ICU मधून बाहेर आली आणि आठवड्याच्या शेवटी चक्क घरी आली.
“श्रीरामानं वाचवलं हो मला… मला बरं वाटेनासं झाल्यावर मी नेहमी समोर रामाचा फोटो ठेवते ना, तो मागितला. त्या फोटोकडे पाहताना माझी चिंता निघून जाते पहा… माझा प्रभू ही माझी नात घरून अगदी वेळेवर घेऊन आला… त्यानं बरं केलं हो मला!” आजी तिच्या मैत्रिणींना सांगत होती.
चार दिवस आजीसोबत राहून कोमल व आई घरी परत आले. दुसऱ्या दिवशी आई बाबा कोमलसमोर येऊन बसले.
“कोमल, तू NID, MIT, J J School of Arts… जिथं हवं तिथं जाऊ शकतेस… आज तुझ्या सरांना बोलावलंय. आपण नीट बोलू त्यांच्याशी!”
“आई, बाबा… लोकांना मदत करण्यासाठी मी डॉक्टरच होणार आहे, पण माझं हॉस्पिटलं अगदी वेगळं असेल. तिथं पेशंट्सना कागद, कॅनव्हास, पेंट, ब्रश दिला जाईल. आजारी लोकं चित्रं काढू शकतील. गाणं शिकू शकतील. वाद्य वाजवू शकतील. खोलीत पडून छताकडे बघत मिनिटं, तास, दिवस मोजत मृत्यूची वाट बघत नसतील.” कोमलचा चेहरा तेजानं उजळला होता.
आई बाबा अवाक् होऊन लेकीकडे पहात राहिले!
सर आले. कोमलनं आजीसाठी काढलेल्या श्रीरामाचा फोटो फोनवर घेतला होता, तो सरांना दाखवला.
“सर, हे चुकलंय. तुम्ही शिकवलेली सिमेट्री मी इथं वापरली नाही. मी हा मुकुट.”
सरांनी तिला थांबवलं.
“बेटा, जे चित्र मृत्युशय्येवर पडलेल्या आजीचा आधार बनलं, त्यात चूक असणं शक्य नाही… It is a masterpiece!” सर त्या श्रीरामाकडे पाहत राहिले.
आई-बाबा पण कोमल कडे आपण घडवलेल्या आपल्या ‘मास्टरपीस’कडे कौतुकानं पहात राहिले.

- ज्योती रानडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...