माझ्या आयफोनच्या स्क्रीनवर संदेश झळकला. वीणाचा. त्यातील पहिली ओळ मी व्हाट्सअप ओपन न करता वाचू शकले.
"सखी, हे माझे तुला शेवटचे पत्र आहे."
पाहताक्षणी मी चक्रावले. असा का हिने मेसेज पाठवला आहे? काय झालेय तिला? नक्कीच काही गडबड आहे. हिचा मेसेज वाचायच्या अगोदर हिच्याबरोबर बोललेलं बरे. मग खूपच उशीर झाला तर काहीच करता येणार नाही. मी नेहमीच माझ्या सिक्स्थ सेन्सचे ऐकते. कारण खूपदा त्यामुळे माझे निर्णय योग्य ठरतात आणि होतातही.
मग मी तिचा नंबर फिरवला.
"हॅलो, वीणा. कोठे आहेस? काय करतेस?"
वीणा माझी बालपणीची मैत्रीण. दोघी एकाच शाळेत शिकलो. मराठी माध्यमात. अबोल, नाजूक अशी वीणा नेहमी शांत असायची.
तिचे सगळे काम अगदी स्वच्छ आणि नीट असायचे. सगळे ठराविकपणे आणि ठराविक वेळी करायची. गाणी छान म्हणायची.
ती आमच्या वर्गाची गायिका होती आणि कसल्याही कार्यक्रमात तिने गाणे ठरलेलेच असायचे. त्याबरोबर रांगोळ्याही खूप सुंदर काढायची.
मी तिच्या अगदी विरुद्ध होते. माझे सगळे करणे मनमौजी होती. मनात आले तरच मी अमुक एक गोष्ट करणार नाही तर नाही.
आणि मला कधीच कोणी अधिकार गाजवलेले आवडायचे नाही. अभ्यासात मात्र वीणापेक्षा मी हुशार होते. नेहमी वर्गात माझा वरचा क्रमांक यायचा
त्यामुळे असेल की मला खूप आत्मविश्वास होता. तशी भाषणांत भाग घेऊन चर्चा रंगविणे माझा हातखंडाच होता. तर अशा आम्ही विभिन्न प्रवृत्तीच्या असलो तर जीवापाड मैत्रिणी होतो. एकाच बाकावर बरोबर बसून आम्ही दहावीपर्यंत शिकलो. बारावीला मी विज्ञान शाखेला गेले तर ती कला शाखेला. तरीही आम्हा दोघींचे मेतकूट तसेच जमलेले होते. नेहमी एकमेकींना भेटत होतो. हितगुज सांगत होतो.
बारावीनंतर मला विज्ञान शाखा सोडून वकील व्हायचे मनात आले मग मी कायद्याची पदवी घेतली. वीणाचे बीएच्या पदवीनंतर लग्न झाले. मी माझ्या वकिलीत रुळले तर वीणा तिच्या संसारात.
मी लग्नासाठी बाबांच्याकडे थोड्या वर्षांची मुदत मागितली होती.
मध्ये मध्ये दोघी नियमितपणे भेटत होतो. आमच्या बालपणीसारख्याच चर्चा आणि गप्पागोष्टी चालायच्या.
वीणाच्या लग्नाला चार वर्षे झाली पण अजून घरात पाळणा हलला नव्हता. तशी ती माझ्याशी काही गोष्टी लपवित होती असे मला वाटायचे कारण वकील असल्यामुळे ती माझी सवयच होऊन गेली होती उगीचच जास्ती खोदणे पण तिने तसे काही मला सांगितले नव्हते.
एक मात्र खरे होते की वीणा लग्नानंतर पार कोमेजली होती. पूर्वीसारखी दिसत नव्हती. तोंडावर नेहमी काळजीत असल्यासारखा भाव. काहीतरी सलत आहे अशी चर्या.
माहेरी आली की दोन दिवसात ती नवऱ्याच्या घरी परत जायची. सतत काहीतरी चिंता करत असल्यासारखी दिसायची. तिच्या आईने माझ्याकडे खूपदा चौकशी केली पण मला काहीच कळत नव्हते.
सुधीर माझ्याशी नीट बोलायचा . तसा तो बोलका नव्हता. मी कधी वीणाकडे भेटायला गेले की सरळ उठून आत जाऊन बसायचा. पण वीणाचा चेहरा मला आनंदी किंवा निवांत असा कधी दिसला नव्हता.
मग आज अचानक वीणाने का असे शेवटचे पत्र असा मेसेज पाठवला बरा?
माझ्या वकिली बाण्याने उचल खाल्ली आणि माझ्या विचाराची चक्रे गरगर फिरू लागली.
चारदा फोन केल्यावर उचलला तिने. तिचा आवाज थोडा झोपाळू येत होता.
मी तिला विचारले, "वीणा, कोठे आहेस तू आता?"
बरळल्यासारखं तिने उत्तर दिले, "माझ्या घरी' .
तिचा पुढचा प्रश्न होता, "माझे पत्र वाचलेस का गं?"
"नाही अगं. मी कोर्टाच्या कामात बिझी होते, नंतर वाचेन."
मी मुद्दाम वाचले नव्हते पण तिला तसे सांगितले नव्हते कारण मला पहिल्यांदा तिच्याशी बोलून तिच्यापर्यंत पोचायचे होते.
नंतर खूप वेळ तिने माझा फोन तसाच धरून ठेवला होता पण तिची माझ्या कोणत्याही प्रश्नांना उत्तरे आली नाहीत.
वाऱ्याच्या वेगाने मी माझी गाडी पहिली सुरु केली. मला तात्काळ तिच्या घरी पोचायचे होते. तिच्या भावाला उमेशला मी फोन लावला आणि सांगितले की
"मी वीणाच्या घरी पोचतेय. तू ही त्वरित पोच. काहीतरी गडबड आहे."
मी पोचायच्या आत उमेश तिथे पोचला होता. दाराकडेच माझी वाट पाहत थांबला होता कारण वीणाचे घर आतून बंद होते.
तिला फोन लावला पण ती उचलत नव्हती. मग उमेशला सुधीरच्या ऑफिसला पिटाळले. थोड्या वेळात तो स्पेर चावी घेऊन आला. दोघे धावत वीणाच्या बेडरुमला गेलो. तिथे ती गादीवर झोपली होती. निस्तेज आणि निर्जीव अशी.
एका हातात मोबाईल माझ्याशी बोलत असताना धरलेला.
उशीजवळ झोपेच्या गोळ्यांची बाटली.
वीणाने झोपेच्या गोळ्या खाऊन जीवन संपवायचा प्रयत्न केला होता. तिच्या सुदैवाने आम्ही तिथे लगेच पोचलो होतो.
मग अँब्युलन्स घेऊन आम्ही तिला दवाखान्यात नेले. तिला उपचारासाठी ऑपेरेशन थीयेटरात नेल्यानंतर मी लॉबीत बसून तिचा व्हाट्सऍपवरचा मेसेज उघडला.
"सखी, हे माझे तुला शेवटचे पत्र आहे. गेली चार वर्षे मी जे अनुभवले ते तुला सांगून मी जगाचा निरोप घालायचा ठरविले आहे.
तू माझी जिवलग मैत्रिण आहेस आणि तुला न सांगता मी जाणे बरोबर दिसले नाही.
तसे आपण लहानपणापासून सगळे एकमेकींना सांगत आलो होय की नाही?
मीरा, खरंच लग्न हा एक जुगारच आहे गं. आपले आईवडिलांच्या घरचे जीवन एकेकदा पूर्णपणे बदलून जाते बघ.
मी तुला हे का सांगतेय कारण अजून तू बिनलग्नाची आहेस. आणि तुला वैवाहिक जीवनाची काही परिकल्पना नाहीय.
तुम्ही सगळ्यांनी माझे कौतुक केले लग्नात. वीणाला खूप चांगला नवरा मिळाला. उच्चशिक्षित आहे. श्रीमंतांच्या घरचा आहे.भरपूर इस्टेट आहे. नवरा थोडा अबोल आहे. दोघांची जोडी छान जमेल. चला, वीणा आता खूप सुखात राहील.पण खरे सांगू, मीरा, लग्नानंतर माझा एकही दिवस सुखाचा गेला नाही. कधीही सुधीरने मला पत्नीचा दर्जा दिला नाही. मी जशी काही एक कामवाली असेच त्याने मला वागविले. कधी प्रेमाचा शब्द नाही. मायेचा हात नाही. सतत टोमणे मारणे. माझ्या प्रत्येक कामात काहीतरी चूक काढायची. भयंकर संशयी स्वभाव. तो घरात असताना मला कोणाचा फोन आलेला त्याला चालत नाही. आईबाबांशीपण खूप वेळ गप्पा मारायच्या नाहीत. सतत त्याच्या बहिणींशी माझी तुलना करायची. माझ्या नाजुकपणावर उपहास करायचा. त्याला आवडणारे कपडे आणि पातळ मी नेसले पाहिजे.कपाळावरची टिकली सुद्दा. त्याच्या आग्रहामुळे मला माझे लांबसडक केस सुद्दा कापावे लागले.
आम्ही दोघे बरोबर असताना माझे शारीरिक सुख उपभोगणे हे एकच त्याचे काम. त्याच्याबरोबर माझा एकेक क्षण तणावात गेला. मला मुल न होण्याचे हाच कारण आहे.त्याच्या रानटी वागण्यामुळे माझे तीनदा गर्भपात झाले. हे मी आईला आणि तुला कधीच सांगू शकले नाही. परत मलाच त्यासाठी जबाबदार ठरवून हा आणि त्याचे आईवडील मला पाण्यात पाहणार. खरंच किती सहन करू गं मी?
त्याला नकळत मी ज्योतिषाकडे गेले होते. ते म्हणाले,
"तुम्हा दोघांची कुंडली अजिबात जमत नाही मग कसे कसे काय लग्न जुळले?"
मला तरी काय करावे सुचत नाही बघ.
आणि काल तर कमालच झाली. त्याच्या ऑफिसकडून जाताना सहज डोकावले तर त्याचा ऑफिस बॉय एकटाच होता. "साहेब कुठे आहेत रे?"
असे विचारले तर मला काही माहित नाही म्हणाला. मग थोडा वेळ तिथेच बसले तर सुधीर आणि त्याची सेक्रेटरी माला बाहेरून आले. तिच्या कमरेवर त्याचा हात आणि ती त्याला बिलगून. मला तिथे पाहून तो चपापला पण तो काही माझ्याशी बोलायच्या आत मी तिथून निघाले. खरंच सांग, अशा माझ्या जगण्याला काही अर्थ आहे का? आणि मी हे कोणाला सांगू शकेन का? सगळ्यांना धक्का नाही का बसणार? लोकांना माझी कींव नाही का येणार? सखी, मला आता जगण्यात काही इंटरेस्ट नाही अगं. मला माफ कर.
तुझीच, वीणा."
शेवटची वाक्ये मला धुसर दिसू लागली. मरणाच्या दारात उभी असलेली माझी बालमैत्रिण आणि तिचे कष्ट वाचून माझे डोळे डबडबलेले होते.
एकच मिनिट मी देवाशी विनवणी केली, "देवा, काहीही कर पण माझ्या मैत्रिणीला वाचव. तिलापण चांगले जीवन जगण्याची संधी दे."
दोन मिनिटांनी डॉक्टर ऑपेरेशन थिएटरच्या बाहेर आले.
माझ्या जवळ येऊन स्मितहास्य केले आणि सांगितलं, "तुमची मैत्रिण आता सुखरूप आहे. तिच्या जीवाला आता काही धोका नाही."
परत माझे डोळे कृतज्ञतेने भरून आले. मग माझ्या डोक्यात वकिली डावपेच तयार होऊ लागले.
थांब सुधीर, आता तुला दाखवतेच कायद्याचा इंगा. एखाद्याच्या जीवावर उठणे ते पण स्वतःच्या पत्नीवर अक्षम्य आहे.
तिचे वैवाहिक जीवन तू नरक केलेस आणि तिला बंदिवान केलेस. आता तू पाहशील खरे कारागृह काय आहे ते.
तिचे मला लिहिलेले एक पत्र पुरे. खूप मोठा पुरावा आहे तुच्या नीचपणाचा.
दोन वर्षे उलटलीत.
'वीणा संगीत शाळा' सुरु झालीय.
मध्ये मध्ये संध्याकाळी मी जाते वीणाला तिथे भेटायला. तिला तल्लीन होऊन गाणी शिकवताना पाहून मनाला खूप आनंद होतो. एक जीवन फिरुनी उगवले. कोमेजलेली कळी परत फुलली.
जर तिने मला 'शेवटचे पत्र' पाठविले नसते तर.
मी तेच वाचत बसले असते तर.
पण शेवटच्या पत्राच्या पहिल्या वाक्यानेच कमाल केली.
**संध्या राजन**
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा