गुरुवार, ३० एप्रिल, २०२६

2714. वाटणी

 सकाळी वर्तमानपत्र वाचत बसलो होतो. 
“काय कधी आलास?” असं विचारतच भास्कर आत आला. 
बऱ्याच वर्षानी त्याला पाहत होतो. दाढीचे खुंट वाढलेले, अंगात अघळपघळ सदरा पायजमा भास्कर आमच्या पूर्वीच्या घराशेजारी असायचा. अर्थात अजूनही तिथंच राहतो. त्याची आई कुठल्या तरी सरकारी डिपार्टमेंटमध्ये क्लार्क होती. आपल्या दोन्ही मुलांना शिकवायचा तिनं खूप प्रयत्न केला. मुलगी सुनिता पदवीधर झाली, मात्र भास्कर मॅट्रिकही पास होऊ शकला नाही. मग त्यानं खाजगी नोकरी धरली. 
मी विचारलं, “आई कशी आहे?” 
त्यावर मान खाली घालून बोलला, “बरी असेल. वडील गेल्यानंतर ‘आईला काही दिवसांसाठी घेऊन जाते,’ म्हणून सुनिता घेऊन गेली. नंतर आम्ही आईला नीट सांभाळू शकणार नाही म्हणून तिला परत पाठवायचं नांवच काढत नाही. 
“या गोष्टीला तीन वर्ष झालीत… सुरक्षिततेच्या नांवाखाली आईचे सगळे दागिने आधीच सुनितानं स्वत:च्या ताब्यात घेतले. तिचा खरा डोळा आईच्या हजारांच्या पेन्शनीवरही होता. हे सगळं पूर्वनियोजित होतं. माझ्या वाटणीला तेवढं भाड्याचं राहतं घर आलंय बघ.”
एक मात्र खरं की भास्करचं त्याच्या आईवर निस्वार्थी प्रेम होतं, यात शंकाच नाही. ही विलक्षण गोष्ट ऐकून मी चाटच पडलो. 
तो पुढं म्हणाला, “बरं ते जाऊ दे… तुझा मित्र सतीश भेटला होता. त्यानं तुझी आठवण काढली. गेल्या वर्षी त्याला स्ट्रोक आला होता. पठ्ठा चिवट आहे. जरा हालचाली मंद झाल्यात, पण तो आपल्या पायावर उभाय… जमलंच तर भेट त्याला.” असं म्हणून भास्करनं निरोप घेतला.      
मध्यंतरी मी सांगलीला असताना माझा एक वर्गमित्र मला भेटायला आला होता. व्यापाराच्या निमित्तानं आला होता. आम्ही जवळच्याच हॉटेलात जेवायला गेलो. भरपूर गप्पा मारल्या. “गावी आल्यावर नक्की फोन कर,” असं म्हणून त्यानं निरोप घेतला.
नंतर एकदा गावी गेल्यावर त्या मित्राला मोबाईल लावला. मी ‘हॅलो’ म्हणताच तिकडून आवाज आला…
“हां बोल, कसा काय फोन केलास? काही काम होतं कां?”
त्याच्या अशा अनपेक्षित कोरड्या प्रतिसादानं मी चांगलाच वरमलो. “अरे नाही. चुकून तुझा नंबर लागला वाटतं. आय अ‍ॅम सॉरी!” म्हणून फोन कट केला. त्यानंतर कधी कुणा मित्राला फोन करण्याच्या किंवा भेटण्याच्या फंदात पडलो नाही.
सतीश माझा खूप जवळचा मित्र होता. आमचे जिव्हाळ्याचे संबंध होते. ‘चला मित्राला भेटू या’ म्हणून मी स्कूटीवरुन निघालो. वीसेक वर्षानंतर मी त्या परिसरात जात होतो. सगळंच कसं बदलून गेलं होतं. 
शोधत शोधत सतीशच्या घराजवळ आलो. उन्हं उतरली होती. बाहेर सहा सात मुलं अंगणात खेळत होती. त्या मुलांना सतीशच्या विषयी विचारलं. त्यांनी तिथेच झाडाखाली खुर्ची टाकून बसलेल्या गृहस्थाकडे बोट दाखवत, ओरडून सांगितलं, 
“आजोबा तुमच्याकडे कोण आलंय पहा.” 
मी गाडी लावली. बऱ्याच कालावधीनंतर मी सतीशला भेटत होतो. खूपच कोमेजलेला दिसत होता. मुळांपासून उखडलेल्या झाडाची जशी स्थिती होते, तसा तो खुर्चीत आक्रसून बसला होता. 
आपल्या नेहमीच्याच चिरपरिचित पांढरा पायजमा आणि कुर्ता या वेषांत होता. त्याच्या मनाच्या स्थितीप्रमाणंच कपड्यांवर देखील सुरकुत्या पडल्यामुळं तो केविलवाणा दिसत होता. मला आश्चर्य वाटलं. तो किती ऐटीत असायचा… मी पहिल्यांदाच त्याला असा पाहत होतो. 
माझ्या डोक्यावरल्या कॅपमुळं त्यानं मला लगेच ओळखलं नाही. कॅप काढताच, खुर्चीतून सावकाश उठून उभा राहिला आणि हात हातात घेऊन म्हणाला, 
“अरे, किती वर्षांनी तुला माझी आठवण आली? चक्क दहा वर्षानंतर भेटतोयस… तुझी वहिनी नेहमी तुझी आठवण काढायची.”
एव्हाना लांबून पाहणाऱ्या मुलांच्या लक्षात आलं की ‘हा कुणीतरी आजोबांचा जवळचा मित्र असणार’. ते धावतच आले. 
सतीशने त्या पोरांना सांगितलं, “बाळांनो, आत जाऊन दोन कप चहा टाकायला सांगा.”
पोरं पळतच आत गेली. जीभ जड झाल्यानं, त्याला बोलायला काहीसं अवघड जात होतं.   
मी विचारलं, “कसा आहेस?” तर खिन्नपणे म्हणाला, 
“बरा आहे म्हणायचं. आला दिवस ढकलायचा. तुझी वहिनी सोडून गेली, एकटा पडलो.”
मी म्हटलं, “वहिनी अशा अचानक निघून जातील, असं वाटलं नव्हतं!”
सतीश घुश्शातच म्हणाला, “जाऊ दे, गेली तर गेली. मला काही फरक पडत नाही.” 
खरं तर हा वरवरचा त्रागा होता. वयाच्या अठराव्या वर्षीच सतीशचं लग्न झालं होतं. त्यांचं एकमेकावरचं घट्ट प्रेम काही झाकलेलं नव्हतं. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवताच, कसाबसा हुंदका दाबत तो म्हणाला, 
“अरे, तिनं तरी असं मध्येच दगा द्यायला नको होतं. आताच मला तिच्या सहवासाची खरी गरज होती.”
काही वेळ स्तब्धतेत गेला. घसा खाकरत सतीश पुढं सांगत होता, 
“तुला तर माहीतीये, आमचं एकत्र कुटुंब होतं. सगळ्या भावांचा वेगळा व्यवसाय होता. खरेदी विक्रीत मिळणारी दलाली हा माझा बिनभांडवली धंदा होता. सचोटीच्या व्यवहारामुळं मी भरपूर पैसे मिळवत होतो. मी एकटाच निस्वार्थीपणाने घरात लागेल तो खर्च करीत होतो.
‘जो पर्यंत तुम्ही बाजारात उभं असाल तोपर्यंत तुमचं उत्पन्न चालू राहील. त्यानंतर काय? आपल्या म्हातारपणासाठी चार पैसे मागं टाका.’ असं तुझी वहिनी सारखं सांगायची पण मी कधी मनावर घेतलं नाही. 
“ती जिवंत होती तेव्हाच मी गंभीर आजारी पडलो. सहा महिने बिछान्याला खिळून होतो. उत्पन्नाचं साधन गेलं.
“भावांची मुलं कर्तीसवरती झाली होती आणि घर सांभाळायची जबाबदारी जेव्हा त्यांच्यावर आली तेव्हा अचानक वेगळं होण्याचा प्रस्ताव पुढे आला… अखेर भावाभावांच्यात घराच्या वाटण्या झाल्या. माझ्या हिश्श्याला त्या कोपर्‍यातल्या तीन खोल्या आल्या.”
आत डोकावून पाहिलं. भिंती बांधून वाड्याचं रूपांतर असंख्य खोल्यांत झालं होतं. 
“वास्तविक, गेल्या वर्षी या घराचं वाटणीपत्र झालं. तेच तुझ्या वहिनीच्या जिव्हारी लागलं. ‘तुम्ही भावांच्या मुलांना इंग्रजी शाळेत पाठवून चांगलं शिक्षण दिलंत आणि आपल्या मुलांकडे मात्र दुर्लक्ष केलंत… तुम्हीच स्वत:ला घरातला एकमेव कर्तासवरता समजून स्वत:च्या उत्पन्नाची उधळपट्टी करत होतात. कुठलाही भाऊ स्वत:च्या खिशात हात घालत नव्हता. माझ्या या वेडीचं म्हणणं तुम्ही कधीच ऐकून घेतलं नाही. आता अशी पश्चाताप करायची वेळच आली नसती…’ म्हणून ती खंत व्यक्त करायची.
“मी तिला सांगायचो, ‘अगं ज्याच्या त्याच्या नशिबात असतं, ज्याचं त्याला मिळत असतं; आभाळगाणं किंवा माती. भले आपली मुलं जास्त शिकली नसतील. पण आज स्वत:च्या कर्तबगारीच्या जोरावर काहीतरी कमवताहेत ना? ते महत्त्वाचं आहे. आपल्या दोघांना फुलासारखं जपताहेत ना? बस्स, अजून काय हवंय?’ 
“पण ते तिला पटायचं नाही. आणि एके दिवशी ध्यानी-मनी नसताना अचानक हृदयघातानं देवाघरी गेली.”
तितक्यात सतीशच्या सुनेनं चहा आणला. “माझी मोठी सून निर्मला,” असं सांगत सतीशनं तिला माझी ओळख करून दिली. 
निर्मलानं मला नमस्कार केला. “मामंजीकडून आणि आमच्या सासूबाईंच्याकडून मी तुमच्याबद्दल खूप ऐकलंय.” असं म्हणत ती निघून गेली. 
चहा घेता घेता सतीश म्हणाला, “माझी दोन्ही मुलं वेगवेगळा व्यवसाय करतात… तुझी वहिनी गेल्यावर मीच त्या दोघांना दोन खोल्यांत वेगळा संसार थाटून दिला. माझ्या जेवण्याखाण्याची व्यवस्था एक महिना माझी मोठी सून पाहते. एक महिना माझी धाकटी सून पाहते. एरव्ही देखील काही चांगलंचुंगलं केलं की ते माझ्यासाठी पाठवतातच.
“दोघीही सुना मला हवं नको ते पाहतात. न्याहारी, चहा, दोन वेळचं जेवण अगदी वेळेवर माझ्या खोलीत आणून देतात. सकाळी कामावर जाताना आणि रात्री कामावरून आली की दोन्ही मुलं माझ्याकडे येऊन विचारपूस करून जातात. आणखी काय हवंय सांग? 
“तुला आठवतं? तुझ्या आग्रहाला बळी पडून मी एक विमा उतरवला होता… सुदैवानं त्याचे हप्ते नियमितपणे भरत होतो. गेल्या वर्षी त्याची बर्‍यापैकी रक्कम आली आणि तेच पैसे बॅंकेत गुंतवले. महिन्याला बाराशे रूपये व्याज येतं. त्यात माझं औषधपाणी व इतर खर्च भागतात. कुणाकडे एक रूपया मागत नाही. झालंच तर दोन्ही सुनांच्या घरी अधूनमधून पालेभाजी आणून देतो.”           
“तुझा वेळ कसा जातो?” असं विचारल्यावर सतीश थोडासा खुलला. 
“अरे ती काही समस्या नाही. लायब्ररीतली सगळी पुस्तकं आपली मित्र आहेत. बहुतेक करून आत्मचरित्रं वाचतो. आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या आयुष्यात कुठं येतात असे डोळे दिपवून टाकणारे सोनेरी क्षण? तसंच अगदी कडेलोट व्हायच्या क्षणी ही माणसं स्वत:ला सावरून परत कशी ठामपणं उभी राहतात, आणि आपण कसं लहान लहान संकटात कोलमडून जातो हे लक्षात येतं.
“पुस्तक वाचून झालं की उत्तराची अपेक्षा न ठेवता मी त्या लेखकाला पोस्टकार्डावर एक खुशीपत्र लिहून पाठवतो. दुसर्‍याला अत्तर लावताना तुमची बोटंही सुगंधी होतात म्हणतो ना, तसं.
“आता बघ, संध्याकाळचे साडेसहा वाजले की दंगा करणारी ही सगळी कार्टी, हातपाय तोंड धुऊन दप्तर घेऊन माझ्या खोलीत येतात. आसनं टाकून शुभं करोति म्हणून झाल्यावर अभ्यासाला लागतात. मी तिथंच पुस्तकात डोकं खुपसून बसलेला असतो. कुणाला काही अडलं की माझ्या जवळ येऊन विचारतात. गणित, सायन्स, इंग्रजी, हिंदी आणि मराठी या विषयातलं काहीही.
“आपल्या मास्तर लोकांनी असं काही घोटून घेतलंय, की आज पन्नास वर्षानंतर देखील ते पुसलं गेलेलं नाही. माझ्या खोलीत काळा कापडी बोर्ड लटकवलेला आहे. त्यावर मी गणितं सोडवून दाखवतो. निबंध कसे लिहायचे, त्याचे मुद्दे सांगतो. ही मुलं दोन तास अभ्यासात अगदी गढून जातात आणि साडेआठ वाजले की भुर्र्कन उडून जातात. माझाही वेळ अगदी पंख लावल्यागत उडून जातो.”         
सतीशनं समोरच्या हातगाडीवाल्याला बोलावून अर्धा डझन केळी विकत घेतली. तितक्यात खेळ संपवून परत आलेल्या प्रत्येक मुलाच्या हातात सतीशनं एक एक केळं ठेवलं. सगळी पोरं धूम ठोकून पळाली. 
मी सहजच म्हटलं, “सतीश, यात तुझी नातवंडं कुठली?” 
सतीश केविलवाणं हसत म्हणाला, “खरं सांगू? या सहा नातवंडात, चार नातवंडं माझ्या दोघा भावांची आहेत. अरे, या घराच्या वाटण्या झाल्या आहेत. पण नातवंडांच्या वाटण्या झाल्या नाहीत, त्यामुळं ही सहाही नातवंडं अगदी माझ्याच वाटणीला आलीत, असं समजतो!
'“माझे भाऊ, मला मोठा भाऊ मानत असतील की नाही माहीत नाही पण मी या सर्व नातवंडांचा ‘मोठा आजोबा’ आहे. अगदी लहानपणापासून ही मुलं माझ्या अंगाखांद्यावर खेळलेली आहेत. मी या जगातून जाईपर्यंत ही सगळी नातवंडं फक्त माझीच असणार आहेत!” 
सतीश बराच भावुक झाला होता. संध्याकाळ होत आली होती. बाहेर चिमण्यांचा चिवचिवाट वाढला होता. आता निघावं म्हणून मी उठायला लागलो, तेव्हा सतीशनं थरथरत्या हातानं माझा हात घट्ट धरून ठेवला होता. जणू त्याला मला सोडायचंच नव्हतं... 
“पुढच्या वेळी आल्यावर निवांत भेटेन”, असं म्हणत जड मनानं मी माझ्या मित्राचा निरोप घेतला.

- व्यंकटेश देवनपल्ली, बेंगळुरू 
    9535022112

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...