गुरुवार, ३० एप्रिल, २०२६

2780. छोट्या चिऊताईची श्रध्दा

 (वाचण्यापूर्वी क्षणभर,आपले डोळे अलगदपणे बंद करा. असे अनुभवा की आपले हृदय प्रेमाने भरले आहे.)
       कुरुक्षेत्रातील युद्ध क्षेत्राला प्रचंड सेनेच्या रहदारीच्या सुविधेसाठी तयार केले जात होते. वृक्ष उपटण्यासाठी व जमीन साफ करण्यासाठी हत्तींचा उपयोग केला जात होता. अशाचं एका वृक्षावर एक चिऊताई आपल्या चार पिल्लांसोबत राहत होती. जेंव्हा तो वृक्ष पाडला गेला, तेंव्हा तिचे घरटे जमिनीवर पडले. परंतु आश्चर्यकारकरित्या तिची पिल्ले, त्या अनपेक्षित दुर्घटनेपासून बचावली. परंतु ती पिल्ले अजून खूप लहान असल्याकारणाने उडण्यासाठी असमर्थ होती. असहाय्य व घाबरलेली चिऊताई मदतीसाठी इकडेतिकडे नुसती बघत राहीली. तेव्हां तिने श्रीकृष्णाला अर्जुनाबरोबर तिथे येताना बघितले. ते युद्ध क्षेत्राची पाहणी करण्यासाठी आणि युद्धाच्या प्रारंभी जिंकण्याची रणनीती तयार करण्यासाठी तिथे आले होते. त्या चिऊताईने श्रीकृष्णाच्या रथापर्यंत जाण्याकरता आपले छोटेसे पंख फडफडविले आणि कशीबशी श्रीकृष्णाकडे पोहोचली आणि म्हणाली,
“हे कृष्णा, कृपया माझ्या पिल्लांना वाचव. कारण उद्या लढाई सुरू झाल्यावर त्यांना चिरडून टाकले जाईल."
सर्वव्यापी भगवंत म्हणाले, "मी तुझे बोलणे ऐकतो आहे परंतु, मी प्रकृतीच्या कार्यात हस्तक्षेप करू शकत नाही.”
चिऊताई म्हणाली, “हे भगवंत, मी जाणते की तुम्ही माझे उद्धारकर्ते आहात. मी माझ्या पिल्लांचे भाग्य आपल्या हाती सोपवत आहे. आता हे तुमच्यावर आहे की आपण त्यांना मारणार की तारणार."
"कालचक्रावर कोणाचाही अधिकार नाही." श्रीकृष्ण एका सामान्य माणसाप्रमाणे त्या आई असलेल्या चिऊताईशी बोलले. याचा अर्थ होता की या प्रकरणात ते काहीही करू शकत नव्हते. चिऊताई पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने म्हणाली, "प्रभू आपण काय आणि कसे करणार, ते मला माहित नाही. आपण स्वतःचं काळाचे ( वेळेचे ) कर्ता-करविता आहात हे मला माहित आहे. मी सर्व स्थिती आणि परिस्थितीनिशी, माझ्या परिवारासह आपल्याला समर्पित होत आहे."
भगवंत त्या चिऊताईला एवढेचं म्हणाले, "आपल्या घरट्यात तीन आठवड्यांचे दाणापाणी साठवून ठेव.”
चिऊताई व श्रीकृष्णाच्या संवादाबाबत अनभिज्ञ असलेला अर्जुन, चिऊताईला दूर पळवण्याचा प्रयत्न करीत होता. चिऊताईने आपले पंख पसरले आणि आपल्या घरट्यात परत गेली. दोन दिवसानंतर शंखनादाने युद्ध सुरू झाल्याची घोषणा दिली गेली. श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की,
"तुझे धनुष्य आणि बाण मला दे." अर्जुन आश्चर्यचकित झाला. कारण श्रीकृष्णाने, युद्धात कुठलेही शस्त्र उचलणार नाही, अशी शपथ घेतली होती. शिवाय अर्जुनाला असेही वाटत होते की तोचं सर्वात चांगला धनुर्धर आहे.
"मला आज्ञा द्या, भगवंत" अर्जुनाने दृढ विश्वासाने सांगितले."माझ्या बाणांसाठी अभेद्य असे काहीच नाही."
कृष्णाने चुपचाप अर्जुनाकडून धनुष्य घेऊन एका हत्ती वर नेम धरला. परंतु हत्तीला मारून खाली पाडण्याऐवजी, तो हत्तीच्या गळ्याजवळ जाऊन आदळला आणि वेगाने निघून गेला. कृष्णाचा एक साधा नेम हुकलेला पाहून अर्जुनाला हसू आवरले नाही.
"मी प्रयत्न करू का?" अर्जुनाने स्वतः पुढे होत विचारले. त्याच्या प्रतिक्रियेकडे दुर्लक्ष करत श्रीकृष्णांनी त्याला धनुष्य परत दिले आणि म्हणाले की आता अजून काही करण्याची गरज नाही.
"परंतु केशवा, आपण हत्तीला बाण का मारलात?" अर्जुनाने विचारले.
"कारण त्या हत्तीने, चिऊताईचे घरटे पाडले. ते घरटे त्या झाडावर होते."
"कोणती चिऊताई?" अर्जुनाने विचारले.
"पण हत्ती तर अजूनही व्यवस्थित आणि जिवंत आहे. फक्त घंटा तुटून पडली आहे."
अर्जुनाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत, श्रीकृष्णांनी त्याला शंखनाद करण्याची आज्ञा दिली. युद्ध सुरू झाले.पुढे १८ दिवसात खूप जणांचे जीव गेले. सरते शेवटी पांडव जिंकले. पुन्हा एकदा श्रीकृष्ण अर्जुनाच्या बरोबर, युद्धभूमीवर पाहाणी करण्यासाठी गेले. अजूनही बरेचं मृतदेह अंत्यसंस्काराची वाट बघत तिथे पडले होते. युद्धाचे ते मैदान, भयाण अवयव, मस्तकं,  मृत शरीर व मृत हत्तींनी भरलेले होते. कृष्ण एका ठराविक ठिकाणी थांबले आणि तिथे पडलेल्या एका घंटेकडे पाहू लागले, जी हत्तीच्या गळ्यात बांधली जात असे.
"अर्जुना, तू ही घंटा, माझ्यासाठी उचलून बाजूला ठेवू शकतोस का?" त्यांनी विचारले. 
सूचना अगदी साधी होती. पण अर्जुनाला काहीचं समजले नाही. एवढ्या प्रचंड रणभूमीवर अशा खूप गोष्टी होत्या ज्या साफ करण्याची गरज होती. तरी श्रीकृष्णाने या धातूच्या तुकड्यांना रस्त्यातून हलवायला का सांगितले? त्याने प्रश्नार्थक दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले.
"हो ही घंटा." कृष्ण म्हणाले." ही तीच घंटा आहे, जी हत्तीच्या गळ्यात होती. ज्यावर मी बाण मारला होता." 
कोणताही पुढचा प्रश्न न विचारता अर्जुन ती घंटा उचलण्यासाठी खाली वाकला. जशी त्याने ती घंटा उचलली तसे तेथील दृश्य पाहून तो अत्यंत आश्यर्यचकीत झाला. चार छोटी पिल्ले आणि त्यांच्यानंतर चिऊताई त्या घंटे खालून बाहेर आले. बाहेर येऊन, आई आणि त्या चारही छोट्या पिल्लांनी कृष्णाच्या अवतीभोवती फेर धरला. खरं तर आनंदाने त्यांना प्रदक्षिणा घातली. १८ दिवसांपूर्वी कापून टाकलेल्या त्या घंटेने संपूर्ण परिवाराचे रक्षण केले होते.
"मला क्षमा कर, हे श्रीकृष्णा", अर्जुन म्हणाला.
"तुला मानवी रूपात बघून आणि सामान्य माणसासारखे वागताना बघून मी विसरूनच गेलो होतो की तू कोण आहेस.” तुमची श्रद्धा किती दृढ आहे.
श्रद्धा हा अस्तित्वाचा पाया आहे. श्रद्धा नसेल तर आपले अस्तित्व एका पाया नसलेल्या इमारतीसारखे असते जे घोंघावणाऱ्या वाऱ्याच्या आणि वादळाच्या कृपेवर अवलंबून असते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...