आपल्याला मुळातून हादरवून टाकणारे - जागं करणारे - जीवन काय असतं हे दाखवून देणारे लोक भेटले - की खाडकन डोळे उघडतात आणि मग जाणवतं की आपल्याला प्रेम म्हणजे काय माहीतच नसतं. आपल्याला सकारात्मक विचार म्हणजे काय कळतच नसतं. आपल्याला हिमालया एवढ्या उंच संकटांच्या लाटेत पाय रोवून ठामपणे उभं राहणं म्हणजे काय ते माहीतच नसतं.
४ दिवसांपूर्वी असाच एक अनुभव आला आणि तेव्हापासून आत्ता पर्यंत सतत बेचैन आहे मी. अंगावर शहारे येत आहेत, डोळे पाणावत आहेत आणि मनातल्या मनात हात जोडले जात आहेत. जवळच्या नात्यातलं एक जोडपं गेलं वर्षभर गायब होतं. कुठल्याही समारंभात येणं नाही, फोन नाही, व्हॉट्सअप ग्रुपवर संभाषण नाही. काहीच नाही. एकदम अदृश्य. कधी अचानक भेट झालीच तर बिझी आहे, कामं आहेत अशी कारणं. आम्ही सगळेच जरा बुचकळ्यात होतो वर्षभर.
४ दिवसांपूर्वी त्यांच्या शहरात जाणं झालं तर त्यांनी आग्रहाने घरी बोलावलं. गेलो आम्ही. आणि पुढचे २-३ तास सोफ्यावर थिजून बसलेलो होतो. नवरा बायको गेल्या वर्षभरातली कहाणी सांगत होते, आम्ही आवंढा गिळत होतो. वर्षभरापूर्वी त्या जोडप्यावर आभाळ कोसळलं. अचानक. कसलीही पूर्वकल्पना न देता. चाळीशीत असलेल्या, व्यवस्थित फिट असलेल्या तीच्या एका साध्या आजाराचं निमित्त ठरलं आणि त्यातून झालेलं इन्फेक्शन डोळे, कान, अख्खी नर्व्हस सिस्टीम डॅमेज करून गेलं. धडधाकट असलेली घरातली लक्ष्मी एका रात्रीत थेट आयसीयूत गेली.
परिस्थिती किती गंभीर असावी?
हिमोग्लोबीन थेट २ वर. दोन !!!
डॉक्टरांनी “नातेवाईकांना बोलवून घ्या” असं सांगितलं नवऱ्याला.
दुपारी आपल्याशी हसतखेळत गप्पा मारणारी बायको रात्री या अवस्थेत आली…काय झालं असेल त्याचं !!!
त्याने शांतपणे डॉक्टरांना “ती यातून बाहेर पडणार आहे असाच अप्रोच ठेवून तुम्ही योग्य वाटेल ती ट्रीटमेंट करा” असं सांगितलं. आणि परीक्षेची सुरुवात झाली.
सख्खा भाऊ, वहिनी आणि आईवडील - यांच्या आधारावर पुढे १५ दिवस - दिवसरात्र जिवाचं रान करून तिला संकटातून बाहेर काढलं. पण लढाई संपली नव्हती. जीवाचा ढोका टळला होता पण डोळे, कान, मेंदू आणि शरीराचं कोऑर्डीनेशन - सगळं फिस्कटलं होतं. इतकं की आकडे मोजणं, नावं लक्षात रहाणं, घरात फिरताना हवं तेव्हा हवं तसं वळणं देखील होत नव्हतं !
आपल्याला माहीत असलेलं एकही अद्ययावत हॉस्पिटल नसेल जिथे यांची केस गेली नाही.
एकही तज्ज्ञ नसेल ज्यांच्यापर्यंत यांची केस गेली नाही.
सर्वांनी एकच उत्तर दिलं - यावर इलाज नाही.
पण - एक आशेचा किरण दिसला - पुण्याच्या आयुर्वेदिक वैद्य - डॉक्टर जमदग्नी यांच्या रूपाने.
त्यांनी “तुला बरी करतो” हे ३ शब्द ठामपणे उच्चारले आणि या कुटुंबाने स्वतःला जमदग्नींच्या स्वाधीन केलं. पुढे वर्षभर - विविध लेप, काढे, फिजिओ, प्राणायाम, अध्यात्मिक साधना (सगळं जमदग्नींच्या हुकुमानुसार) सुरू होतं.
बायकोची शुश्रुषा करता यावी म्हणून नवऱ्याने व्यवसाय थांबवला. थांबवला ! पूर्णवेळ घरी ! यांची १२ वर्षांची गोड पोर…वर्षभर बापाच्या खांद्याला खांदा लावून आईची देखभाल करत होती. (आणि एवढं करून शाळेत परीक्षेत पहिली येत होती, सुंदर ड्रॉइंग करत होती.)
कुटुंब संस्था किती महत्वाची आहे याची हजार व्याख्यानं एकीकडे - आणि हे एक उदाहरण एकीकडे.
भाऊ - वहिनी, आईवडील ठामपणे उभे होते यांच्याबरोबर. मुलीची शाळा, काढे तयार करणं, डबा बघणं, सतत सोबत रहाणं…सगळं केलं.
डॉक्टरांनी कटाक्षाने सांगितलं होतं की पेशंट शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अत्यंत नाजूक आहे. कसलं ही इन्फेक्शन होता कामा नये आणि - तिच्या आजूबाजूला नकारात्मक वातावरण अजिबात असता कामा नये. म्हणून यांनी कुणालाही हे सगळं सांगितलं नाही. नवऱ्याने लोकांच्या तक्रारी, टोमणे. सगळं शांतपणे सहन केलं.
वर्षभर हे कुटुंब लढत राहिलं. आता पेशंट ६०-७०% बरी आहे. एका डोळ्याची साईट बरीच बरी झाली आहे, दुसरा डोळा सुधारतो आहे. ऐकू येत आहे, घरात व्यवस्थित वावर होतो आहे. डॉ. जमदग्नींनी विश्वास दिलाय की ती १००% बरी होणार.
नवरा हळूहळू बिझनेस पुन्हा सुरू करतोय. पेशंट आता बाहेर पडायला, स्वतःचं काम सुरू करायला तयार झाली आहे. सगळ्यात धक्कादायक गोष्ट काय आहे सांगू?
हे सगळं सांगताना - हे दोघे नवरा बायको छान हसत होते, जोक करत होते, एकमेकांची थट्टा मस्करी करत होते.
त्या दोन तीन तासांत किमान १० वेळा “आम्ही फार नशीबवान आहोत” असं म्हणून गेले. जमदग्नी “लाभले” म्हणून, वेळेत योग्य उपचार झाले म्हणून, कुटुंबाचा आधार लाभला म्हणून. कारणं भरपूर होती त्यांच्याकडे नशिबाला धन्यवाद द्यायला !
बायको म्हणते नवऱ्यामुळे हे सगळं होऊ शकलं…!
नवरा म्हणतो ही सतत पॉजिटिव होती - न वैतागता माझ्याकडून शुश्रुषा करून घेत होती, माझ्या जोक्सवर हसत होती म्हणून हे सगळं होऊ शकलं !
काय बोलावं यार !
प्रेम, आत्मविश्वास, सकारात्मक विचार. येता जाता फेकतो मी हे शब्द. काही अक्षरांचा ग्रुप असलेले हे शब्द. सोप्पे आहेत फार. मला फार वाटतं की मला लै भारी अर्थ समजला आहे यांचा.
बट आय कन्फेस… आय नो नथिंग. ॲब्सोल्युटली नथिंग.
या कुटुंबाने मात्र हे शब्द, यांचे अर्थ गेले वर्षभर जगले आहेत. जागले आहेत. इथे टाईप करत बसलो तर दहा हजार शब्द ही कमी पडतील असे किस्से आहेत यांचे. पण ते सांगण्याचा हक्क माझा नाही. या दोघांनीच सांगायला हवंय. त्यांना पुस्तक लिहिण्याचा आग्रह केलाय मी. ही स्टोरी जगासमोर यायला हवी. जगाने, आपण सर्वांनी यांच्याकडून शिकायला हवं. आपण सर्वांनी जगणं शिकायला हवं.
या अख्ख्या कुटुंबाला उदंड प्रेम, उदंड शुभेच्छा
(आणि हो - वैद्य जमदग्नी यांच्या सारख्या मानवी रूपातील धन्वंतरींना दंडवत !)
ओंकार दाभाडकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा