गुरुवार, ३० एप्रिल, २०२६

2773. अटींचा बॉम्ब

 राज - एक अतिशय हुशार इंजिनिअर. नामांकित कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी. लग्नासाठी अनुरूप मुलीच्या शोधात. विवाहेच्छुक तरुण-तरुणींसाठीच्या ऑनलाइन संकेतस्थळावर एक छान प्रोफाइल मिळाले, अपेक्षा जुळणारे. दोन दिवसांपूर्वी राजच्या घरी बघण्याचा कार्यक्रम झाला. नेहा आणि तिचे आई-बाबा राजच्या घरी आले. गप्पा मारत प्रश्नोत्तरे झाली. राज आणि नेहा चांगला तासभर एकमेकांशी बोलत होते, तोपर्यंत दोघांच्या आई-बाबांनी इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. निघताना “मी उद्या फोन करतो”, नेहाचे बाबा म्हणाले.
दोन दिवस झाले पण त्यांचा फोन आला नाही. त्यांचा फोन आला नाही म्हणून काय झालं? “सदा, तूच फोन कर. मला बाई, नेहा आवडली आहे, अगदी शोभून दिसेल आपल्या राजला”, सावित्रीबाई म्हणाल्या.
सदानंदांनी नेहाच्या बाबांना फोन केला आणि सांगितले, “तुमची मुलगी आम्हाला पसंत आहे. तुमचा काय निर्णय आहे?” “आम्हालाही मुलगा पसंत आहे पण... सांगू का?”
“सांगा सांगा, बिनधास्तपणे सांगा.” “आमच्या नेहाच्या काही अटी आहेत.”
“हरकत नाही, सांगा काय अटी आहेत? मी लगेच मान्य करतो.”
“सदानंद, नेहा वकील आहे आणि तिने तिच्या अटी स्टॅम्प पेपरवर लिहिल्या आहेत. राज, रीना आणि तुम्हा दोघांना ती अटी वाचून दाखवेल. तुम्ही अटी मान्य आहेत असे लिहून सह्या करा. मी आणि आमची सौ. साक्षीदार म्हणून सह्या करू. आम्ही उद्या केव्हा यायचं ते सांगा.”
सदानंदांनी ही गोष्ट सावित्रीबाईंना सांगितली.
“अटी घालणारी सून! मला नाही चालणार”, सावित्रीबाईंनी ठणकावून सांगितले.
“आई, अटी काय आहेत, ते तर ऐकून घेऊ”, राज म्हणाला. नेहा आवडल्याचं त्याच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवत होतं.
“राज म्हणतो ते बरोबर आहे”, रीना म्हणजे राजची धाकटी बहीण म्हणाली.
“ठीक आहे, बोलवा त्यांना पण तुम्ही दोघं नीट ऐका, वेड्या-वाकड्या अटी मी मान्य करणार नाही”, सासूबाईंचा तोरा साहजिकच होता.
ठरल्याप्रमाणे नेहा आणि तिचे आई-बाबा आले.
आज नेहाने आकर्षक पंजाबी ड्रेस परिधान केला होता, खूप गोड दिसत होती ती. काही मिनिटांतच रीना आणि नेहाची गट्टी जमलेली बघून राज खुश झाला.
चहा, पोहे झाले. “नेहा, तुमच्या अटी सांगा”, सदानंद म्हणाले.
“मी प्रथम अटींचा पहिला भाग ऐकवते आणि तो तुम्हाला पटला तर पुढचा भाग सांगेन.” सर्वत्र पिन ड्रॉप शांतता पसरली. “यू मे प्रोसीड”, सदानंदांनी अॅडव्होकेट नेहाला ग्रीन सिग्नल दिला.
नेहाने अंगावर काळा कोट चढवला आणि ती बोलू लागली.
अट १- मी फक्त सकाळचा चहा करीन. ९ वाजता ऑफिसला जाताना मला डबा लागेल. रात्रीचा स्वयंपाक मी करणार नाही.
सावित्रीबाई कुजबुजल्या, “मग हिचा मला काय उपयोग? हिचंही जेवण मीच करायचं? आलीया भोगासी असावे सादर.”
अट २- लग्नानंतर लवकरच आपण या घरापासून दूर एक फ्लॅट घेऊ.
“सदा, समजलं का? आपली लवकरच आपल्या घरातून हकालपट्टी.”
अट ३- मला आणि राजला शनिवारी आणि रविवारी सुटी असते. दर शनिवारी राजचे आई-बाबा सकाळी १० ते रात्री १० पर्यंत घराबाहेर जातील.
“कठोरपणालाही काही मर्यादा असावी.” ही अट ऐकून राज आणि रीनालाही धक्का बसला.
अट ४- राजच्या आईंचा पार्लरचा खर्च राज करणार नाही.
“नको करू देत, माझा नवरा सक्षम आहे”, सावित्रीबाईंनी नाक मुरडलं.
अट ५- मी मदत मागितली की रीना मला मदत करेल.
“आमच्या मुलीला नोकर बनवायचा विचार, काय संस्कार केलेत आई-बापाने”, सदानंद आणि सावित्रीबाई मनोमनी संतापले.
अट ६- राजच्या आई-बाबांच्या औषधांचा खर्च राज करणार नाही.
“आमच्या मुलाला तोडणार आमच्यापासून”, राजचे आई-बाबा दुखावले.
अट ७- राजच्या आईंना मी एकेरी संबोधेन.
ही अट ऐकून नेहाचे आई-बाबाही शरमले.
अट ८- मला गोड खायला आवडतं. सणाच्या दिवशी
आई गोड पदार्थ बनवतील. सण शनिवारी असला तर आई-बाबांना घराबाहेर जाण्याची आवश्यकता नाही.
“गोड खायला आवडतं मग गोड का बोलत नाही?” सावित्रीबाईंची सहनशक्ती संपत आली होती.
अट ९- मी घरी नसताना बाबांचे मित्र आले तर चालेल पण आईंच्या मैत्रिणी यायला नको.
सदानंदाच्या चेहऱ्यावर समाधान तर सावित्रीबाईंच्या चेहऱ्यावर संताप.
अट १०- आई-बाबांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा नाही.
“बाई-बाई, ही बाई आहे की चेटकीण?”, सावित्रीबाईंना आता सहन होत नव्हते.
अट ११- लग्नाचा खर्च माझे आई-बाबा करणार नाहीत.
गुड वन, नेहाचे बाबा जाम खुश झाले पण राजच्या बाबांचे टेन्शन वाढले. आमच्या मुलाला का मुलगी मिळणार नाही? सावित्रीबाई संतापल्या.
अट १२- सगळ्यात महत्त्वाची.
सर्वांनी कान टवकारले.
हं तर ऐका. मी ऑफिसला जाताना राजच्या आई मला नमस्कार करतील, अगदी वाकून.
हे सर्व तुझ्या बहिणीचे संस्कार. नेहाचे बाबा तिच्या आईवर ओरडले. राजच्या आईंचा संताप शिगेला पोहोचला. रीनाने कसेबसे त्यांना सावरले.
“राज, तुम्ही चर्चा करा मग मी अटींचा पुढचा भाग सांगते,” नेहा म्हणाली.
“नेहा काय भारी आहे! सॉलिड बोल्ड, मी तर तिची फॅन झाले. राज, मला अटींची कॉपी दे हं. मला उपयोगी पडतील”, रीनाने दूरदृष्टी दाखवली.
“सदा, मला ही असली पीडा घरात नको. सांग त्यांना यू मे गो नाऊ आणि गेले नाही तर बाहेर काढ त्यांना.”
“दादा, काय करायचं?” रीनाने राजला संकटात टाकलं. नेहाच्या अटी आवडल्या नव्हत्या पण नेहा मात्र आवडली होती त्याला.
“आपण पुढचा भाग ऐकू आणि नंतर निर्णय घेऊ”, सदानंद म्हणाले.
धीर एकवटून सर्वजण हॉलमध्ये जमले. “यापुढचा भाग ऐकताना तुम्हाला एकामागून एक धक्के बसणार आहेत आणि तुमचं ब्लडप्रेशर शूट होऊ शकेल म्हणून मी ब्लडप्रेशर कंट्रोल करण्याच्या गोळ्या आणल्या आहेत. अस्वस्थ वाटायला लागलं तर सांगा.” नेहाचा पुढचा भाग सुरू होण्यापूर्वीच दोन्ही आई-बाबांना गरगरू लागलं. “नेहा, काय चाललंय?” नेहाच्या आई-बाबांनी नाराजी दर्शवली.
“असं करूया, मी पुढचा भाग आधी राज आणि रीनाला सांगते. त्यांना फार त्रास झाला नाही तर मी दोघा आई-बाबांना सांगेन. तुम्ही निवांत आत बसा.”
दोन्ही आई-बाबा आत गेलेत. सावित्रीबाईंनी केलेला कडक चहा पिताना त्यांचं टेन्शन बरंच कमी झालं.
“या तुम्ही आता”, म्हणत नेहाने त्यांना बोलावलं. “राज आणि रीना कुठे आहेत?” सावित्रीबाईंनी विचारलं. “रीनाला जरा अस्वस्थ वाटत होतं आणि ब्लडप्रेशरचं औषध घ्यायला ती नाही म्हणाली म्हणून राजने तिला मोकळ्या हवेत नेलं आहे. लवकरच ती नॉर्मल होईल”, नेहाला विश्वास होता.


“तर मग ऐका… भाग दोन-”


अट १- मी फक्त सकाळचा चहा करीन. ९ वाजता ऑफिसला जाताना मला डबा लागेल. रात्रीचा स्वयंपाक मी करणार नाही.
सर्व कामं करायला मी बाई लावेन आणि तिचा पगारही मीच देईन.
“काय ऐकते मी? सदा, तुही तेच ऐकलं ना?” सावित्रीबाईंनी न राहवून विचारले.
अट २- लग्नानंतर लवकरच आपण या घरापासून दूर एक फ्लॅट घेऊ.
म्हणजे दर रविवारी आपण सर्व तिथे जाऊन एन्जॉय करू. माझे आई-बाबा पण येतील हं.
“काय मस्त प्लॅन!” चारही म्हातारे आनंदाने म्हणाले.
अट ३- मला आणि राजला शनिवारी आणि रविवारी सुटी असते. दर शनिवारी राजचे आई-बाबा सकाळी १० ते रात्री १० पर्यंत घराबाहेर जातील.
दोघांचे आई-बाबा शनिवारचा दिवस बाहेर घालवतील, मस्त मजा करत आणि सर्व खर्च मी आणि राज करू.
म्हाताऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला.
अट ४- राजच्या आईंचा पार्लरचा खर्च राज करणार नाही.
खर्च मी करेन.
“सून नाही, ही तर मुलगीच आहे”, सावित्रीबाई मनात म्हणाल्या.
अट ५- मी मदत मागितली की रीना मला मदत करेल.
रीनाचा फॅशन सेन्स जबरदस्त आहे आणि मी तिची मदत घेईन कपडे खरेदी करायला. मी जितके ड्रेस मला घेईन तितकेच माझ्या रीनूसाठीही घेईन.
“वैरीण नाही, तू तर मैत्रीण”, म्हणताना सदानंद आणि सावित्रीबाई सुखावले.
अट ६- राजच्या आई-बाबांच्या औषधांचा खर्च राज करणार नाही.
तो खर्च मी करेन.
“काय असावे, हीचे आपुले गतजन्मीचे नाते?” इति राजचे आई-बाबा.
अट ७- राजच्या आईंना मी एकेरी संबोधेन.
मी त्यांना “ए आई” म्हणेन.
“सून असावी मुलीसारखी, नकोत उगीच कटकटी.” सावित्रीबाईंना अश्रू अनावर झाले.
अट ८- मला गोड खायला आवडतं. सणाच्या दिवशी
आई गोड पदार्थ बनवतील. सण शनिवारी असला तर आई-बाबांना घराबाहेर जाण्याची आवश्यकता नाही.
मी सर्व तयारी करून देईन आणि त्यांच्याकडून शिकेन, त्यांची शिष्या बनून.
किती कौतुक करावं? शिकायची केवढी इच्छा आहे! राजच्या आई आनंदल्या.
अट ९- मी घरी नसताना बाबांचे मित्र आले तर चालेल पण आईंच्या मैत्रिणी यायला नको.
“माझ्या आईंच्या मैत्रिणींशी ओळख व्हायला नको का?”
“वकीलीण बाईंना क्लायंट मिळवायचे वाटतं. हुशार आहे,” सावित्रीबाई मनातल्या मनात म्हणाल्या.
अट १०- आई-बाबांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा नाही.
घरात नाही पण साजरा करायचा तो कुठेतरी बाहेर, मस्त जागी.
“खूप भाग्य लाभले आम्हाला
काय कशाची कमी” अशी अवस्था झाली होती, राजच्या आई-बाबांची.
अट ११- लग्नाचा खर्च माझे आई-बाबा करणार नाहीत.
सर्व खर्च मी आणि राज फिफ्टी-फिफ्टी करू.
राजचे बाबा प्रसन्नपणे हसले.
अट १२- सगळ्यात महत्त्वाची.
सर्वांनी कान टवकारले.
हं तर ऐका. मी ऑफिसला जाताना राजच्या आई मला नमस्कार करतील, अगदी वाकून.
मला म्हणायचं आहे, मी आईंना नमस्कार करणार आणि तोही अगदी वाकून कारण मातृ देवो भव.
सावित्रीबाईंनी अत्यानंदाने टुणकन उडी मारली.
वातावरण अगदी हलके-फुलके आणि प्रसन्न झाले. तेवढ्यात रीना आणि राज घरात शिरले. 
“बेटी, बरं वाटतं ना तुला?” सावित्रीबाईंनी विचारले. “मला काय झालं आई? आम्ही पेढे आणायला गेलो होतो.”
“रीना, पेढे देऊन सर्वांचे तोंड गोड कर”, सावित्रीबाई म्हणाल्या.
“थांब रीना. माझीही एक अट आहे. नेहा, चालेल का?” म्हणत एक कागद सदानंदांनी नेहाला दिला.
“इतकं मस्त होतं आहे आणि तुम्ही उगाचच काय प्रॉब्लेम निर्माण करता?” सावित्रीबाई चिडून म्हणाल्या.
नेहाने थोडा विचार केला आणि ती म्हणाली, “नाही, मला अजिबात मान्य नाही.”
“बाबा काय हे? तुम्ही मागे घ्या तुमची अट”, राज आणि रीना म्हणाले.
बाबा संकोचले.
“बाबा, अहो तुम्ही आजपासूनच मला बेटी म्हणालात तर मी तुमच्या बेट्याशी लग्न कशी करणार?”
सगळे खळखळून हसले.
रीनाने स्वतःच्या हाताने सगळ्यांना पेढा भरवायला सुरुवात केली. नेहाने काळा कोट उतरवताच राजने नेहासह तिथून पळ काढला. पेढा न भरवता त्या दोघांनी एकमेकांचे तोंड गोड केले असणार यात शंका नाही. नेहाने टाकलेला अटींचा बॉम्ब तिने स्वतःच निकामी केला होता आणि त्यामुळे कोणत्याही क्षणी आरंभ होईल असं वाटणारं युद्ध सुरूच झालं नव्हतं.


-दिलीप कजगांवकर, पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...