गुरुवार, ३० एप्रिल, २०२६

2706. ऑम्लेट

 गोपाळराव अन श्रीधरराव लहानपणापासूनचे मित्र. सध्या वय ब्याऐंशी. शरीर थकलं तरी त्यांचं मनं अजून ताजीतवानी होती. दोघंही खूप मिश्किल स्वभावाचे. सतत हसणं अन हसवणं यामुळं ते मित्रांमध्ये खूप प्रिय होते. हे दोघं सहज कुणाला काय बोलतील, याचा नेम नसायचा.
एकदा फिरत असतांना अनेक वर्षानंतर एक जुना मित्र पत्नीसह भेटला. नमस्कार चमत्कार झाल्यावर त्यानं आपल्या पत्नीची ओळख करून दिली. इतक्या वर्षात कधीच भेटलेले नसूनही गोपाळराव संशयी चेहरा करून हळूच म्हणाले, “अरे, मग त्या दिवशी तुझ्यासोबत होत्या त्या कोण?”
हे ऐकून श्रीधरराव आणि तो मित्र दिलखुलास हसले. मध्ये काही दिवस गेले अन त्या मित्राचा श्रीधररावला फोन आला. तो म्हणाला,
“अरे गोपाळला सांग, अशी मस्करी करू नको म्हणावं. त्या दिवसापासून माझी बायको रूसून बसलीय. ‘कोण होतं सोबत?’ हा एकच प्रश्न विचारतीय. तिला तुमच्या दोघांच्या स्वभावाची माहिती दिली पण तिचा विश्वास बसत नाहीये. ऐंशीवं लागलंय, तरी हिचा संशय कमी होत नाही, काय करू सांग.’”
श्रीधररावला हे ऐकतांना खूप हसू येत होतं. पुढं काही निमित्तानं ते त्याच्या गावी गेले असतांना वहिनींचा गैरसमज दूर करून आले. तर, असे हे दोन वल्ली मित्र. 
गोपाळरावचं प्रोस्टेटचं ऑपरेशन झालं; त्याचवेळी श्रीधररावचं गुडघ्याचं ऑपरेशन झालं. दोन्ही मित्र अनेक दिवस एकमेकांना भेटू शकले नाहीत. मोबाईलशी त्यांची अजून चांगली नाळ जुळली नव्हती. मुलांनी फोन लावून दिला, तरच दोघं एकमेकांशी बोलून विचारपूस करत होते. फोनवरही त्यांचं अवखळ बोलणं ऐकून सर्वांना खूप गम्मत वाटायची. 
“ब्याऐंशीव्या वर्षी वाट्या बदलून कुठं मॅरेथॉनला पळणार आहेस का?” गोपाळराव.
“मग तू काय परत जवान होणार आहेस काय?” श्रीधरराव.
अशा गप्पा मारत ते हसत रहायचे. काय व्याधी, काय त्रास, काही फरक पडत नसे. या ऑपरेशननंतर जवळपास वर्षभरानंतर त्यांची प्रत्यक्ष भेट झाली. दोघांच्याही घरचे लोक त्यांना एकेकट्याला सोडत नसत. फिरायला गेले तर मुलगा, नातू कुणीतरी सोबत जायचे. रस्त्यात चक्कर बिक्कर आली तर काय, ही काळजी असायची.
एके दिवशी योगायोगानं गोपाळरावच्या घरी कुणीच नव्हतं. पत्नीला ‘फिरून येतो जवळच’ असं सांगून ते बाहेर पडले अन् तडक श्रीधररावच्या घरी आले. बाहेरूनच ‘श्रीधऽऽर…’ म्हणून आवाज दिला.
श्रीधरराव बाहेर आले, “अरे ये ना आत.”
“नाही नको, बाहेर फिरायला जाऊ, चल…”
गोपाळरावांनी आत जाणं टाळलं आणि वहिनींची परवानगी घेऊन त्याला बाहेर काढलं. गोपाळच्या मनात काही वेगळं आहे हे श्रीधररावनं ओळखलं अन मफलर घालून, धोतराचा खोचा व्यवस्थित करत काठी टेकत ते बाहेर आले.  
“सांभाळून जा… आणि लवकर या.” कमरेतून वाकलेल्या वहिनींनी सल्ला दिला.
‘हो हो’ म्हणत दोघंही निघाले. रस्त्याच्या कडेनं चालत चालत गोपाळराव म्हणाले,
“बरीच वर्ष झाली यार, आपण ऑम्लेट नाही खाल्लं… लग्न व्हायच्या आधी आपण चोरून किती ऑम्लेट खायचो! ते दिवस आठवतायत. तोंडाला पाणी सुटलंय. आज खायची खूप इच्छा झाली, म्हणून संधी साधून बाहेर पडलो.”
“मला वाटलेच तुझ्या मनात काहीतरी आहे… पण कुठं खायचं? गाडीवर खाणं शोभणार नाही आणि हॉटेलमध्ये गेलो, तर नक्की कुणीतरी ओळखीचे भेटतील…” श्रीधररावनी शंका व्यक्त केली.  
“काही का होईना… आज खायचंच. आता काय राहिलंय आपलं? इथपर्यंत रेटलंय हेच खूप झालं. उगं मन मारून काय जगायचं?” गोपाळराव इरेला पेटले. 
“पोरं, सुना, नातवंडाला कळलं तर खूप हसतील आपल्याला. आधीच आपल्या दोघांच्याही घरी सोवळं ओवळं कडक. हे असलं अभक्ष भक्षण केलं, तर गंगेला नेऊन स्नान घालतील. माहित नाही का? मागे आमचा पप्पू आणि तुझा पिंट्या मित्राकडे उकडलेलं अंडं खाऊन आले तर किती गोंधळ उडाला होता! शेवटी गंगास्नानासाठी आपली काशीयात्रा घडली होती. कशाला या वयात उपद्व्याप. जाऊ दे…”
पण गोपाळराव ऐकेनात. हो नाही करत एकदाचं ठरलं… लांबचं एक हॉटेल त्यांना ठाऊक होतं. मुला-बाळांसोबत ते तिथं काहीवेळा जेवायला गेले होते.
दोघांनी डोक्याला रूमाल गुंडाळला आणि हॉटेलमध्ये शिरले… वेटरला ‘दो ऑम्लेट’ अशी ऑर्डर दिली. मेनू कार्ड परत घेत वेटर म्हणाला, “इथं फक्त व्हेज मिळतं आजोबा…!”
आली का पंचाईत! ग्लासमधले पाणी रिचवून दोघं उठले. बाहेर पडून चालत बरेच पुढे गेले. जातायेता एका बारची पाटी त्यांनी वाचलेली होती. बार म्हणजे तिथे नक्की ऑम्लेट मिळणारच. पाय खरडत ते तिथं पोहोचले. नेमकं हॉटेल बंद!
हात् तिच्या… घरापासून खूप लांब येऊनही मोहिम फत्ते झाली नाही.
“तुझ्या नशीबात आज फजिती योग दिसतोय…” श्रीधररावनी छेडलं.
“काहीही असो, आज ऑम्लेट योग आणायचाच!” गोपाळराव जिद्दीवरच पडले. 
त्यांनी एक रिक्षा थांबवली. त्याला त्यांनी सरळ “इथं कुठं व्हेज नॉनव्हेज हॉटेल आहे का” विचारलं.
“बसा…” म्हणत त्यानं रिक्षा सुरू केली. काही वेळ गोल गोल फिरवत एका हॉटेलच्या रंग उडालेल्या पाटीसमोर त्यानं रिक्षा थांबवली. दोघांनी परत रूमाल गुंडाळला. पाटी पहिली तर वर तोंड केलेला लाल बाण दिसला…
अरे बापरे! म्हणजे हॉटेल वरच्या मजल्यावर आहे तर! 
घाम पुसत दोघांनी दोन क्षण विचार केला. आता इतक्या जवळ आलोय तर काम फत्ते करूनच जायचं, हा निर्धार करून एकेक पायरी चढत ते हळू हळू वरती पोहोचले.
धाप लागलेल्या दोन वृद्धांना पाहून दारातल्या वॉचमननं “क्या चाहिये बाबाजी?” विचारलं.
“कुछ नै, जरा खाना खानेका है…” हाश हुश करत गोपाळराव म्हणाले. कुत्सित हास्य करतच वॉचमननं दार उघडलं.
आत फुल्ल गर्दी होती. नुसता सिगारेटचा धूर आणि बाटल्या-ग्लासचा आवाज घुमत होता. “जाऊ दे… आपल्याला काय, फक्त ऑम्लेट तर खायचंय,” म्हणत दोघं एका टेबलवर बसले. 
बर्‍याच वेळाने वेटर आला. _“दो ऑम्लेट और स्लाईस लाना” त्यांनी ऑर्डर दिली.
इथं येऊन फक्त खायला मागणारे पाहून वेटरनं तोंड वाकडं केलं.
“स्लाईस नही है, रोटी दुं क्या?”
दोघांनीही नसलेले दात चावले. बोळक्या तोंडानं रोटी कशी खायची हे त्याला कोण सांगणार? बिकट प्रश्न होता. 
“मऊ क्या है?”
“नान है…” घाईघाईत वेटरनं सांगितलं. आता वेळ लावला तर हा निघून जाईल अन् लवकर परत येणार नाही म्हणून त्यांनी “आण बाबा, जो भी मऊ है…” म्हणत झटकन ऑर्डर दिली.
काही वेळाने ऑम्लेट आलं. तोंडाला पाणी सुटलं होतं. थरथरत्या हातानं दोघांनी काटा-चमच्यानं खायला सुरूवात केली. पहिल्याच घासाला मिरची झोंबली. ‘हुशश्… हुशश्…’ करत ‘पाणी’ असा इशारा केला.
वेटरनं पाण्याची बाटली आणून समोर ठेवली. घटाघटा पाणी प्याल्यावरच थोडी आग थांबली.
“बहुत तिखट है…!” वेटरला श्रीधरराव म्हणाले.
“इधर ऐसाईच मिल्ताय…” म्हणत वेटर पसार झाला. मिरची काढत काढत त्यांनी खायला सुरूवात केली.
वेटरच्या भाषेतले मऊ असलेले कडक नान तुटता तुटत नव्हते. जवळजवळ पन्नास वर्षानंतर ऑम्लेट खायला मिळालं होतं म्हणून तिखट असूनही त्यांना ते सोडवत नव्हतं.
जिद्दीवर संपूर्ण ऑम्लेट त्यांनी संपवलंच. नान मात्र अर्ध्यापेक्षा जास्त उरले. हात धुऊन पैसे देऊन ते बाहेर पडले.
रिक्षाने घरी आले तोवर रात्रीचे नऊ वाजून गेले होते. घरी नुसता गोंधळ उडाला होता. बराच आरडाओरडा झाला. दोघांचीही मुलं त्यांना शोधायला बाहेर पडली होती. नातवांनी फोन करून त्यांना बोलावून घेतलं.
जेवणाची ताटं मांडली. पण जेवणार कसं? पोटात जागा तर पाहिजे! दोघांनीही आधीच ठरवल्याप्रमाणे पोट बरोबर नाही ही सबब सांगितली आणि एक कप दूध पिऊन झोपले.
दुसर्‍या दिवशी दोघांची भेट थेट हॉस्पिटलात झाली! रात्रभर पोटात दुखतंय म्हणून त्यांनी घरच्यांना जागवलं होतं. मुलांनी सकाळीच त्यांना दवाखान्यात नेलं. योगायोगानं दोघंही एकाच दवाखान्यात शेजारी शेजारी अ‍ॅडमिट झाले.
डॉक्टरांनी विचारलं, “रात्री वेगळं काही खाल्लं होतं का?”
त्याचं उत्तर मुलांनीच दिलं, “नाही, फक्त दूध पिऊन झोपले होते.”
डॉक्टरनी सर्व टेस्ट्स केल्या. आता बिंग फुटणार होतं. मुलं औषध आणायला गेलीत, ही संधी साधून नर्समार्फत दोघांनी डॉक्टरला बोलावलं आणि खरं काय घडले ते सांगितलं.
“अहो, या वयात असं कुठल्याही फालतू हॉटेलमध्ये जायचं नाही! बघा कसे हाल झाले तुमचे.’” डॉक्टर म्हणाले. 
गोपाळराव म्हणाले, “यापुढं असं करणार नाही, पण एक विनंती आहे… कृपा करून आमच्या घरच्यांना हे कळू देऊ नका. नाहीतर या वयात काशीयात्रा करावी लागेल.”
श्रीधरकडे पहात त्यांनी डोळे मिचकावले. त्या डोळे मिचकावण्याचा अर्थ डॉक्टरला कळल्यावर ते खूप हसले. खो खो हसतच म्हणाले,
“मग जा ना… गंगास्नान चांगलं असतं!”
श्रीधरराव म्हणाले, “गंगाजल प्यायची वेळ आलीय आता… गंगास्नान कुठं घालता?” हे ऐकून नर्ससहित सर्वजण खूप हसले. 
त्याचवेळी मुलं औषधं घेऊन आली. हास्याचे फवारे पाहून त्यांना हायसं वाटलं. बरं झालं, तब्येत ठीक झाली!
दुसर्‍या दिवशी डिस्चार्ज मिळाला. मात्र, डॉक्टरच्या कृपेमुळं ऑम्लेटचं गुपित कायम गुपितच राहिलं.

- नितीन म. कंधारकर, छ.संभाजीनगर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...