गुरुवार, ३० एप्रिल, २०२६

2774. आमची पिढी

     नेहाला नववा महिना लागला. बाळंतपणाला आईकडे न जाता आई बाबांनीच बेंगलोरला यावं हे तिनं आईला आधीच सांगितलं होतं व त्याप्रमाणे आई बाबा नेहाकडे आले होते. एका मोठ्या कंपनीत मॅनेजर असलेली नेहा तिथेच काम करणाऱ्या नरेशला भेटली व दोन वर्षांपूर्वी शुभमंगल झालं..
“नेहा, जावईबापू किती मोकळे आहेत ग? आमच्या पिढीत जावई माणसानं सासुबाईंशी बोलायची पध्दतच नव्हती.”
नेहा हसली. “अग, गप्पा/सहवास झाल्याशिवाय कळेल का माणूस? नरेश तुम्हाला खूप आवडेल बघ..तो नास्तिक आहे पण मला देवधर्म करण्यास त्याची आडकाठी नाही आणि मी माझी भक्ती त्याच्यावर लादत नाही..
त्या दिवशी नेहा व नरेश बाबांशी कंपनीच्या कामाबद्दल गप्पा मारत असताना आईनं हॅालमधे मोठ्या आवाजात रामरक्षा लावली. “अगं, तू पोटात असताना मी नऊ महिने रामरक्षा ऐकली! तू ऐकतेस का नाही? आमच्या पिढीत काही गोष्टी फार सुंदर होत्या बघ.” नरेश उठून आत गेला. 
“अग,तो नास्तिक आहे तर अगदी तिथचं रामरक्षा लावणं जरूर होतं का?” बाबांच्या चेहऱ्यावर आठ्या दिसल्या पण नेहा “इटस् ओके, बाबा” म्हणाली.
नंदाची मोठी बहिण मेधा त्याचवेळी अमेरिकेला तिच्या सुनेच्या बाळंतपणाला गेली होती. मुलगा-सून बाहेर पडले की तिचा नंदाला फोन यायचा.
“अग, कसलं ते दूध पंप करणं? बाळाला अंगावर पाजणं दोघांच्या हिताचं असतं. असं करून का होईल जवळीक निर्माण? बरं..ती दूध पंप करून झोपून जाते मग बाबा ते दूध बाळाला देतो आणि मग बाळाला सुटं त्याच्या क्रिब मधे झोपवतात ग बाई!”
“मावशी, पेरेंटिंग बदललय.” नेहा मावशीचं टेन्शन कमी करायला बघत होती..”आपण जेव्हा मदत करायला जातो ना तेव्हा त्यांच्या कलानं घ्यायला हवं ! वहिनी खूप मोठ्या पोस्टवर आहे ग. झोप हवी ना तिला काम करण्यासाठी?”दादा देऊ देत बाळाला दूध. छान बॅान्डिंग होईल त्यांचं! 
आणि बरका मावशी, अमेरिकन पेडियाट्रिक्स अकॅडमीनं Sudden Infant Death (SID) चा धोका टाळण्यासाठी अनेक दशकं रिसर्च केलय. बाळांना सुटं झोपवलं पाहिजे हा निष्कर्ष त्यातून निघाला आहे कारण आई वडिल बाळावर वळून बाळं गेलेली आहेत, बाळ पांघरूण-उशी यात गुदमरून मरू शकतं. हजारो केसेसचा अभ्यास केलाय त्यांनी. भारतात सुध्दा हा प्रॅाब्लेम खूप मोठा आहे पण कोणी याबद्दल उघडपणे बोलत नाही” मावशीला आता थोडंफार समजू लागलं होतं.
“आपल्या पिढीत किती शिकलेल्या मुली मुल होताच काम सोडायच्या गं ! आताची मुलं आई वडीलांकडे नाही डे केअर मधेच वाढतात !” पुढच्या फोनवर नंदानं तिचा मुद्दा मेधापुढे  मांडला व मेधाने त्याला दुजोरा दिला. नेहा काही बोलली नाही. 
सकाळी ब्रेकफास्टला आईनं केलेला लाडू खात नेहानं आईचं कौतुक केलं. “आई, छान झालेत ग लाडू!”
“अग, पण तू कुठे खातीयेस? वजन प्रेगन्सीत वाढलं तर एवढं काय बिघडलं? आमच्या पिढीत तुझी आजी.
“आई, प्लीज बस इथे आणि ऐक. तुझी पिढी व माझी पिढी वेगळी. तुलना कशाला करायची? मी इंजिनिअर होऊन  अमेरिकेत MBA केलं तेव्हा तू खूष होतीस पण बाळ होताच मी नोकरी सोडावी असं तुला का वाटतं? हे काम कुणीही माझ्यावर लादलेले नाही. काम हाच माझा राम आहे. ते चोखं केलं की मला राम भेटतो. तो मला केवळ रामरक्षा ऐकून नाही भेटत. पूर्वीच्या अनेक पध्दती उत्तम होत्या यात दुमत नाही आणि त्यातील जमतील त्या पध्दती जरूर वापराव्या.. पण बघ ..मला प्रेगन्सी रिलेटेड डायबेटिस मुळे गोड खायचं नाही. लाडूचा आग्रह करू नको” नेहा थांबली.
“अगं हे आधी नाही का सांगायचं?” नंदा गडबडून गेली..
“आई, तू “आमच्या पिढीत” फार बुडून गेली आहेस. तुझ्या पिढीचा चष्मा घालून आमच्या पिढीकडे नको बघू. शिवाय बाहेरच्या देशातील सगळं चूक आणि भारत व “आमच्या पिढीतील” बाळंतपण १००% बरोबर”असं तू व मावशी बोलता. तसं नसतं ग ! उदा. बाळ झाल्यावर येणारं पोस्टपार्टम डिप्रेशन अगदी खरंय. बायका डिलिव्हरी नंतर नैराश्यात जातात. अमेरिकेत यावर ट्रिटमेंट मिळते व इथे असं बोललं की. “आमच्या वेळी कुठं काय होतं” म्हणून उडवून लावणं मी स्वतः बघितलंय.
भारताकडे बाळंतपणात स्पेशल पदार्थ, काढे, आयुर्वेदिक उपचार वगैरेचा खजिना आहे. ते अमेरिकेने शिकावं !” नंदा अवाक् होऊन लेकिकडे बघत होती. नेहा झाल्यावर आपण किती नैराश्यात गेलो होतो व कुणी फारसं लक्ष दिलं नव्हतं हे ही तिला आठवत होतं..खूप कठीण होता तो काळ ! 
त्याच रात्री नेहा हॅास्पिटलला गेली व चार दिवसांनी एक गोड परी घरी आली व नंदाला वेळ पुरेनासा झाला. नरेश सुध्दा बाळांचं खूप करत होता. “आई, तुम्हाला बाळासाठी काही देवाचं म्हणायचं असेल तर जरूर म्हणा.” नरेशचे शब्द ऐकून नंदा चकित झाली. एखाद्याच्या श्रध्देचा मान कसा राखायचा हे नरेशनं किती सहजी दाखवलं.
      नंदाला नव्या पिढीचे अनेक गुण दिसू लागले होते. उत्तम निर्णयक्षमता, जो विषय समोर आहे त्यावरील शास्त्रशुध्द वाचन, टीका न करता दाखवलेली स्वीकारात्मकता या गोष्टींच तिला कौतुक वाटत होतं. नेहाने नव्या जुन्याचा किती सुंदर मेळ घातला आहे हे तिला दिसत होतं. लेकीला आई झालेली बघण्यातील अवीट गोडी अनुभवताना आपल्या पिढीतील दाखले द्यावेसे वाटत नव्हते..
“आई, हे बघ कसं बोट पकडलय बाळानं !” नेहा दाखवत होती.
“हो ग.. अगदी अस्सं बोटं पकडायचीस तू माझं. तुझं बोट धरून तुला किती गोष्टी शिकवल्या. पण तुला शिकवता शिकवता मीच तुझ्याकडून कधी शिकू लागले हे कळलंही नाही ! मला तुझे विचार पटले आहेत आणि त्याहून आवडला तुझा व्यापक व अभ्यासू दृष्टिकोन ! प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास करून त्यावर मत बनवणं. स्वत:चा स्वत: विचार करणं…अग आमच्या पिढीत ना.. चेष्टा करतेय ग.. 
दोघी खळखळून हसल्या. तीन पिढ्या गोडी गुलाबीने एकमेकींची बोटं पकडून पुढे जाण्यास सज्ज झाल्या होत्या.

©® ज्योती रानडे
2025 Jyoti Ranade. All rights reserved.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...