ऑफिसला निघायला थोडा उशीरच झाला होता. पावसामुळे स्कूटीचे इंजिन थंड पडल्यामुळे गाडी बटनस्टार्ट होत नव्हती. किक मारून पाय दुखू लागले. तितक्यात समोरून मधू आली.
“ काय ग वेदा, चालू होत नाही का गाडी? सोडू का स्टेशनला? येताना ये शेयर रिक्षाने.”
“देवासारखी भेटलीस. चल पटकन, ९.२० ची ट्रेन चुकली तर पुढच्या ट्रेनला खूपच गर्दी असते. गाडी पार्किंगला लावायचा पण वेळ वाचेल.”
गाडीवर जाताना दोघींच्या गप्पा चालू झाल्या. मी बोलत असताना मध्येच मधू म्हणाली “ अग, आता लक्षात आलं सकाळी पाठकआजी भेटल्या होत्या. संध्याकाळी तुझ्या घरी येणार आहेत.”
“ काय म्हणत होत्या?”
“ काहीतरी काम आहे म्हणाल्या. मला सुध्दा बोलावले आहे.”
स्टेशन आल्यामुळे मी उतरले. “ संध्याकाळी भेटू गं.” मला बाय करून ती पुढे गेली.
ट्रेनमध्ये बसल्यावर आजींचे काय असं काम असेल? मधुला सुद्धा बोलावले आहे ह्याचा विचार चालू झाला.
पाठकआजी माझ्या शेजारीच पहिल्या मजल्यावर आणि मधु तिसऱ्या मजल्यावर माझ्याच अपार्टमेंट मध्ये राहतात. ठाण्याच्या मध्यवर्ती भागात असलेलं आमचं छोटसे ३ मजली ‘आनंदवन’ अपार्टमेंट अगदी नावाप्रमाणेच आनंदी आहे. प्रत्येक मजल्यावर ४ फ्लॅट असे एकूण १२ फ्लॅट्स..२ गुजराथी फॅमिली आणि बाकी सर्व मराठीभाषिक,बहुतेक फ्लॅटमध्ये तरुण आणि चौकोनी कुटुंब. फक्त पाठक आणि देशमुख आजी आजोबा तेवढे वयस्कर, वयवर्षे ७५ च्या पुढचेच. देशमुख माझ्या समोरच्या फ्लॅट मध्ये राहतात. पाठकआजीला २ मुलगे.. दोघेही लग्न करून परदेशी स्थायिक.. एक अमेरिका आणि एक लंडनला. देशमुखआजीला २ मुलीच.. एक हैद्राबाद आणि दुसरी नागपूरला. देशमुखआजोबा थोडे अलिप्त आणि मितभाषी त्याच्या विरुद्ध पाठकआजोबा खूप बोलके,हसतमुख आणि चेष्टेखोर. जिन्यात भेट झाली तर १० ते १५ मिनिटे गप्पा मारणारच. कधी संध्याकाळी घरी येऊन “मस्त आल्याचा चहा कर ग वेदा.” असे हक्काने सांगणार.. माझ्या मुलाबरोबर कॅरम, चेस त्याच्याच वयाचं होऊन खेळणार. दोन्ही आजी तर खूपच गप्पिष्ट आणि सर्वच गोष्टींमध्ये प्रचंड उत्साही आणि सर्वांना मदत करण्याचा स्वभाव. म्हणतात ना ‘Age is a just a number, you should be young at heart’ तसेच काहीतरी ह्या आजींचे आहे. आम्ही त्यांना गंमतीत ‘Young old ladies’ म्हणतो.
देशमुखआजीला फुलांची खूप आवड..नेहमी केसांमध्ये गजरा,गुलाब, चाफा अशी सुगंधित फुले माळतातच. लहान मुले बऱ्याचवेळा त्यांना फ्लॉवरपॉट आजी म्हणून हाक मारतात. खेळायला जागा नाही म्हणून अपार्टमेंटमधील मुले पार्किंग एरिया मध्येच खेळतात.. फार आवाज करू नका.. आजी आजोबांना त्रास होईल असे सांगितले तर ‘खेळू दे त्यांना. खेळायचे वय आहे त्यांचे..आम्हाला काही त्रास होत नाही. आवडतो त्यांचा चिवचिवाट’ असे आम्हालाच ऐकवतात मग मुलांना आणखीनच चेव येतो. दोन्ही आजींची छान मैत्री आहे. देवळात भजन,कीर्तन, प्रवचनाला एकत्र जातात. कधी खरेदी तर कधी नाटक सिनेमाला सुद्धा जातात. मोबाईलमधील कितीतरी applications आम्हाला विचारून शिकल्या. ऑफिस मधून घरी येताना आज काहीतरी साधाच स्वयंपाक करू असा विचार करत असताना ह्या दोघी you tube वर नवीन रेसिपी बघून कुठली करायची ते ठरवताना दिसतात..त्यांना बघून मलाही उत्साह येतो. माझी आणि पाठकआजीची बाल्कनी लागून असल्यामुळे काही नवीन पदार्थांची देवाण घेवाण बाल्कनीमधुनच होते.. कधी आले, लसूण, मिरची, विरजण ह्याची सुद्धा. बाई उशिराने येणार आहे तिला किल्ली द्या, कुरियर घ्या अशा बऱ्याच गोष्टींमध्ये मला त्यांची खूपच मदत होते.
सर्व सण आजी उत्साहात साजरे करतात. नेहमी दारात छोटीशी तरी रांगोळी काढतात. गुढीपाडव्याला पहिली गुढी दोन्ही आजींचीच. दिवाळीला दारात पणत्या, तोरण, आकाशदिवा त्यात पण पहिला नंबर. वटपौर्णिमेला छान नटून काठापदराची साडी, आंबाडा, गजरा अगदी नाकात नथ घालून पूजेचे ताट घेऊन आमच्या अगोदर तयार, “ आटपा ग पटकन, गर्दी होईल वडाजवळ” असे म्हटले की मला,मधुला आणि आमच्या सारख्या आळशी बायकांना मग घाई करावी लागते.
अपार्टमेंट लहान असल्यामुळे कुठलेही सार्वजनिक उत्सव करणे शक्य होत नाही. दोन फ्लॅटमध्ये गणपती बसतात तिथेच आम्ही सर्वजण आरतीचा आनंद घेतो. आमच्या मुलांना चालीत आणि स्पष्ट उच्चारात आरती म्हणायला, टाळ वाजवायला आजींचीच शिकवणी.
नवरात्रीत पार्किंगमध्ये आहे त्या जागेत भोंडला करायची कल्पना त्यांचीच. पाटावर रांगोळीने हत्ती काढून फेर धरून गाणी म्हणायची. अनेक गाणी आजींना तोंडपाठ. रोज कोणीतरी एकाने खिरापत आणायची ती सर्वानी ओळखायची. मुले तर भलतीच खूश. सप्तमीला सर्वानीच एक एक पदार्थ घेऊन यायचा मग अंगत पंगत करून जेवायचे. ह्यात काही पुरुष मंडळीही उत्साहाने सामील होतात. पाठकआजोबा तर पहिले. भोंडल्यानंतर दांडिया आणि गरबा सुद्धा.. आमच्या बरोबरीने खेळण्यासाठी आजींनी गुजराथी बायकांकडून गरब्याचे काही स्टेप्स पण शिकून घेतल्या.
आजीआजोबा कधी आपआपल्या मुलामुलींकडे गेले तर आम्हालाच काय आमच्या मुलांनाही करमत नाही. त्यांच्या येण्याची आम्ही आतुरतेने वाट बघतो.
अशा या आमच्या आनंदवनात श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी दुःखाचे सावट आले. सकाळी फिरायला जाताना पाठकआजोबा जिन्यातच पाय घसरून पडले ते बेशुद्ध झाले. हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले पण शुध्द आलीच नाही..एकेक अवयव निकामी होऊन ८ दिवसात आम्हाला पोरके करून गेले. त्यांची मुले, सुना येईपर्यंत सर्वच शेजारी आजींच्या सोबतीला होते. नंतर काही दिवस मुलांचा मुक्काम होता तेव्हा फारसे जाणे झाले नाही आजींकडे.
पाठकआजोबांना जाऊन महिना होत आला होता, आता कुठे आम्ही हळूहळू सावरत होतो, तोच देशमुखआजोबा कसलाही आजार नसताना रात्री झोपतेच गेले.. आमच्या आनंदवनाला आणखी एक धक्का. त्यांच्या मुली इथेच असल्यामुळे त्या लवकर आल्या, त्यांचे काही नातेवाईक सुद्धा होते त्यांच्या सोबतीला.
अशा सर्व अकस्मात घटनांमुळे गणपतीच्या दिवसात कोणीच उत्साहात नव्हते. अधून मधून दोन्ही आजींना भेटत होते.
पाठकआजी आज घरी येणार कळल्यावर बऱ्याच आठवणी डोळ्यासमोरून तरळून गेल्या.
संध्याकाळी ऑफिस मधून घरी आले आणि दहा मिनिटातच पाठकआजी आल्या, देशमुखआजीही सोबत होत्या. पाठोपाठ मधु सुद्धा आली. चहा घेताना पाठक आजी म्हणाल्या “तुमच्या ओळखीत चांगला स्वयंपाक करणारी कोणी आहे का गं?”
सर्वच पदार्थ उत्तम करणाऱ्या.. नवीन पदार्थ शिकून आवडीने बनवणाऱ्या सुगरण आजी त्यांच्या एकटीसाठी स्वयंपाकीण लावणार असे वाटून मनात चर्र झाले. त्या पुढे म्हणाल्या,
“ साधारण ३०/३५ लोकांसाठी.”
“काही कार्यक्रम आहे का आजी?”
“पितृपक्ष चालू आहे ना, तर आपल्या मागच्या गल्लीत जोशींच्या बंगल्याच्या जागी जे अपार्टमेंट होत आहे, तिथल्या कामगारांसाठी जेवण द्यावे असा विचार आहे. तुम्हाला तर माहिती आहे मी देवधर्मात, पोथी, प्रवचनात रमणारी आहे, माझ्या विरुद्ध आमचे हे, तुमचे आजोबा ह्या सर्व गोष्टींपासून लांबच होते. मला मात्र त्यांनी कधीच कुठल्या गोष्टीसाठी आडकाठी केली नाही. मला लागणारे पाने,फुलं,नारळ आणून द्यायचे. कधी कुरकुर नाही की चेष्टा नाही. त्यांचे म्हणणे, ‘दोन हात जोडून त्या सृष्टी निर्मात्यापुढे नतमस्तक व्हावे.’ दोन्ही मुलांना त्यांनी मागेच सांगून ठेवले होते, ‘आमच्या दोघांच्या मृत्यू नंतर कुठलेही श्राध्दाचे विधी करायचे नाही. काही करायचेच असेल तर एखाद्या गरजूला शिक्षणासाठी मदत करा, लायब्ररीला पुस्तके द्या, गरीब आजारी व्यक्तीला उपचारासाठी मदत करा, भुकेलेल्याला अन्न द्या, जे काही कराल ते सत्पात्री करा. श्राद्ध म्हणजे केवळ नातेवाईकांच्या जेवणावळी, ब्राह्मणभोजन, दक्षिणा नाही. सश्रद्धेने एखाद्या व्यक्तीचे स्मरण करणे आणि त्यांच्याप्रती मनापासून आदर आणि कृतज्ञता वाटणे म्हणजे श्राद्ध, मग ते फक्त आप्तजनांचं नाही तर स्वातंत्रसैनिकाचे, देशासाठी सीमेवर लढताना शहीद झालेल्या जवानांचे, थोर कलावंताचे सुद्धा करावे.
मृत्यूनंतर सद्गती, मोक्ष किंवा मुक्ती मिळणे हे ती व्यक्ती जिवंत असताना केलेल्या चांगल्या, वाईट कर्मामुळे ठरते, मृत्यूपश्चात त्याच्यासाठी कोण काय करते त्यावरून ठरत नाही.
क्रियामाण कर्माचेच संचित होते आणि तेच पुढे प्रारब्ध होऊन फळाला येते, म्हणून नेहमी क्रियामाण कर्म चांगले करावे जे आपल्याच हाती असते.
“किती छान विचार आजी.”
“हो ना गं, ह्यांच्या अशा विचारामुळे माझ्या मुलांनी कॅन्सर केअर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची भेट घेतली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार २ तरुण कॅन्सरग्रस्त गरीब मुलींच्या उपचाराचा खर्च मुलं करणार आहेत. मी आहे डॉक्टरांच्या संपर्कात. मला पण उन्हातान्हात कष्ट करणाऱ्यांना जेवण द्यायचे आहे.”
“आजी, माझ्या ओळखीत आहे एक बाई, छान असतो तिचा स्वयंपाक, मी बोलून घेते, त्या ठेकेदाराला पण कल्पना देते.. एक दोन दिवसात ठरवून टाकू.” मधू म्हणाली.
इतका वेळ शांत बसलेल्या देशमुख आजी म्हणाल्या, “ह्यांच्या श्राध्दाच्या वेळेला ५ गुरुजी आले होते, विधी चालू असताना बऱ्याचवेळा मोबाईलवर बोलत होते. तोंडाने मंत्र म्हणताना मेसेज टाइप करून एकमेकांना दाखवत होते. हसत होते, काहीतरी खाणाखूणा करत होते. मीच नाही तर लेकी आणि जावई सुद्धा नाराज झाले. पाठकवहिनींची कल्पना आवडली मला म्हणून मी पण थोडा हातभार लावणार आहे, तेवढीच माझ्या संचितात भर.”
“निघतो गं आत्ता, ठरवू लवकरच.”
कोणीही निघताना कुंकू लावायला मी हॉल मध्ये एक करंडा ठेवला आहे. आजी निघताना सवयीप्रमाणे तो हातात घेतला, पटकन जीभ चावून सॉरी सॉरी आजी म्हटलं.
“अग सॉरी का म्हणतेस? आम्हाला कुंकू लावायला घेतला ना करंडा, लाव ना मग. लाल टिकली लावली आहेच ना आम्ही. फुले, गंध, कुंकू, मेहेंदी ह्याची सवय कुमारिका असल्यापासून आहे. ह्यांनी मला सांगून ठेवले होते, आपल्यापैकी कोणीही आधी गेले तर मागे राहणाऱ्याने रडत-कुढत राहू नये, उरलेले आयुष्य छान जगावे, ते आत्ता सोबत नाही म्हणून काय झाले, इतक्या वर्षाच्या सहवासाच्या कितीतरी आठवणी आहेत.”
देशमुखआजी म्हणाल्या “ मी चाफ्याचं फूल घातले आहे बघ. लहानपणापासून घालते आणि घालत राहणार. लाव तू कुंकू.”
पाठकआजी म्हणाल्या “आणि हो, नवरात्रात भोंडला खेळायचा आहे बरं का, मुलांचा अभ्यास, जेवणं सर्व साडेआठच्या आत उरकून घ्या. ह्या आनंदवनातच मी आनंदी आहे म्हणूनच मुलांचा त्यांच्या सोबत जाण्याचा आग्रह मोडून मी इथेच राहते आहे.
नेहमी खाली वाकून पाया पडणारी मी, पण आज आजींना मिठी मारली, आम्हा सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते. कशाचे ते नेमके शब्दात सांगता येणार नाही पण दुःखाचे किंवा खेदाचे नक्कीच नव्हते.
वृंदा कुलकर्णी पुणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा