गुरुवार, ३० एप्रिल, २०२६

2766. शेवटची भेट

    आज मानसीला जाऊन वर्ष झालं. या वर्षभरात एकदाही मी तिच्या खोलीत गेले नाही. सारखं वाटतं, अजूनही ती तिच्या त्याच व्याकूळ नजरेने पाहातेय माझ्याकडे नि जाब विचारतेय, "मी मरणार हे माहीत असूनही का रोज मरण दिलंस मला?" घराच्या कोपऱ्या न्  कोपऱ्यातून मानसीचे ते आर्त सूर येऊन माझ्या कानशिलात प्रहार करतात. माझा मुलगा नि हे अपघातात गेल्यावर आम्ही दोघीच एकमेकींचा आधार होतो. मानसी खूप लहान होती हे गेले तेव्हा. माझी तर तिशीही उलटली नव्हती. यांचा व्यवसाय, घर नि माझी ही अपंग मुलगी कसं सांभाळणार होते मी? पण ह्यांचे मित्र राघव यांनी मदतीचा हात दिला नि सावरलं मला, माझ्या घराला. या दरम्यान आम्ही कधी एकमेकांच्या जवळ आलो, हे कळलंच नाही. आम्ही दोघेही आपल्या-आपल्या आयुष्यात एकएकटेच होतो. त्यांना तीन मुलं. पत्नी त्यांना, मुलांना टाकून गेलेली. माझं हे असं झालेलं...आधी मुलं यायची माझ्याकडे; पण मग, का कोण जाणे, आमच्यात जवळीक वाढली नि मुलंही मग वेगळ्याच खोचक नजरेने पहायला लागली. अगदी सहा-सात वर्षांची असूनही मानसीसुध्दा नजरेनंच आपल्यावर चाबूक ओढतेय्, असंच वाटायचं! या शीतयुद्धात तीस वर्षे उलटली. मधल्या काळात राघवही हे जग सोडून गेले...आता मला मानसीचा खूप आधार वाटायचा.
ती बरी व्हावी, म्हणून मी मानसीवर खूप उपचार केले, पण तिचं आयुष्य फक्त एका बेडपूरतंच मर्यादित राहिलं.
नक्षत्रासारखं रुप, मंत्रमुग्ध करून टाकणारा आवाज नि या सगळ्यांत एक वेगळीच देणगी घेऊन आलेले तिचे ते डोळे...हरिणीसारखे करुण! त्याच चमकदार, करुण डोळ्यांनी ती एकेक स्वप्नं रंगवायची...मला कमाल वाटायची तिच्या त्या स्वप्नाळूपणाची...! या अशा आयुष्यात तिला इतकी स्वप्नं रंगवायची उर्जा कुठून येत असावी...?
नवरा गेला तेव्हा खरंतर मला कसलीही कमतरता नव्हती. पैसा-अडका, सुदृढ शरीर...सगळं व्यवस्थित होतं. खाणं-पिणं, कपडा-लत्ता; हिंडणं- फिरणं सगळंच मिळणार होतं मला एक शारिरीक सुख नि प्रेमाची ऊब सोडली तर! तरी मी ढासळले होते...! मग हिला तर फक्त एक कुंपणातलं आयुष्य मिळालंय् लुळं पांगळं, तरी ही इतकी खंबीर कशी...? असं वाटायचं, जणू ती वाट पहातेय् तिचे ऋतू बदलायची, की तिला खात्रीच आहे तिच्यासाठीच कुणीतरी वसंत घेऊन येण्याची...?
राघव असेतोवर मी माझ्याच आयुष्यात गुरफटून होते. मानसी दिवस कसा घालवते? चोवीस तासांचं नियोजन कसं करते? याकडे मी कधी लक्षच दिलं नाही. राघव गेले न् मग मात्र मी तिचा आधार घ्यायला लागले. पण आमच्यात जवळपास तीस वर्षांची दरी होती, ती अशी सहज थोडीच बुजणार होती...! ती, तिची रुम, तिचं गाणं नि पेंटिंग इतकंच तिचं जग होतं...! ती पेंटिंग करते, हे सुद्धा मला योगायोगानंच कळलं. एकदा अचानक तिच्यासाठी फोन आला. पलीकडून कुणीतरी मानसीलाच विचारत होतं. 'तिला कोण फोन करतोय्?', मला नवल वाटलं.
"मानसीजी आहेत का?"
"हो, आपण कोण?"
"मी हेरंब पाटील. मानसीजींच्या पेंटिंगला पहिलं पारीतोषिक जाहीर झालंय्..." एक जागतिक किर्तीचा माणूस तिचं कौतुक करत होता! मी भांबावलेच खरंतर..पलीकडून आवाज आला, "मी भेटू शकतो का त्यांना?"
"हो... या ना... ती येऊ शकत नाही..."
"हो, मला कल्पना आहे त्याची..." मी फोन ठेवला. मानसीला सांगितलं, "हेरंब पाटील येणार आहेत तुला भेटायला."
नेहमीसारखी माझ्या बोलण्याची दखल फक्त तिच्या टपोऱ्या डोळ्यांनीच घेतली. यावेळी मात्र मला त्यांत कमालीची चमक जाणवली...! नि एक दिवस एक उमदं व्यक्तीमत्व दारात हजर झालं.
"मी हेरंब... मानसी आहेत ना?"
"हो, या..." मी त्यांना तिच्या रुममध्ये घेऊन गेले नि क्षणभर मीही थबकले. गोऱ्यापान चेहऱ्यावर पडलेला तो केसरीया संधीप्रकाश; भूरभूरते, गालावर रेंगाळणारे केस; धारदार नाक नि काळ्याशार झुकलेल्या पापण्या... विधात्यानं काढलेली ती पेंटिंग इतकी निश्चल, आपल्याच भावगर्भात बुडालेली, जन्म-जन्मांतरीचा वेध घेत असलेली...! मी भानावर येऊन वळून पाहिलं, तर दारातले दोन डोळे भरून आलेले. आतड्याला पिळ पाडणारी वेदना त्या चेहऱ्यावर जाणवली. त्या दोघांकडेही पहात किती वेळ गेला कोण जाणे...! मानसीची समाधी भंगली. त्याने तोंड वळवून डोळे टिपले नि तिच्या जवळ जाऊन हात पुढे केला, "हाय मानसी... मी हेरंब..." तिनेही त्यांच्या हाती सहास्य हात दिला. मला का? कोण जाणे! वाटलं, की ते दोघेही किंचित शहारले...मला मानसीचं शहारणं कळलं. तो तिच्या आयुष्यातला पहिला पुरुषस्पर्श होता...पण हेरंबचे डोळे भरून येणे, ती व्याकूळ वेदना कसली नि का होती? ते नाही कळलं... कुंपणातल्या आयुष्यातही स्वप्नं रंगवण्याची मानसीतली ऊर्जा हेरंबच तर नसेल ना...?
त्यानंतर तो वरचेवर मानसीला भेटायला येत गेला...बाह्य जग तिला ओळखायला लागलं. तिचं विश्व विस्तारत होतं नि आम्ही दोघी अजूनच दूर जात होतो... आता तिचं जग फक्त हेरंबनी व्यापलं होतं, जणू तोच तिला हवा असलेला वसंत होता, तिचं दु:ख, तिचं एकटेपण, तिची उपेक्षा सगळं सगळं तिच्यासह जणू तोही सोसत होता...! कमाल वाटते मला या भावनेची... दु:खात, एकटेपणात सोबत करणारं मिळू शकतं, पण तीच वेदना आपल्यासोबत कुणीतरी सोसतोय्, ही जाणीव इतकी सावरते माणसाला, हे मानसीकडे पाहून जाणवायचं... मी राघवमध्ये गुंतले, तेव्हा मानसीला जे जाणवत असेल, तोच अनूभव मी आता घेत होते. मानसी नि हेरंबचं जवळ येणं मला खटकत होतं. कारण मानसीच आता माझा एकुलता एक आधार होती. ती इथून गेली असती, तर माझ्या मरणालाही आली नसती, हे मी जाणून होते... नि या सगळ्याला वाचा फोडली ती हेरंबनी... एक दिवस हेरंब माझ्या समोर आला.
"मला बोलायचं आहे तुमच्याशी..."
"हं... बोला..."
"मला मानसीशी लग्न करायचं आहे..."
"फक्त तुम्हालाच  ना...?”,  माझा खोचक प्रश्न. तो कातर झालेला. तिच्याबद्दल बोलताना नेहमीसारखाच हळूवार, जणू तिचं नाव जरी मोठ्यानं उच्चारलं, तरी तिलाच चरे पडतील...
"ती कधी सांगते तिला काय हवं ते...?"
"अच्छा... म्हणजे तुम्हीच ठरवलंत् का तीला काय हवं ते...?"
"असं का म्हणताय्...? तिचं प्रेम आहे माझ्यावर.
तिला जग पहायचं आहे. एकदा तिला वृंदावनातला तिचा कान्हा पहायचा आहे. तिलाही हसायचं आहे... मन भरून जगायचं आहे..."
"पण, मला सांगा...तुम्हाला कसला स्वार्थ साधायचा आहे? तुमच्यातली कुठली कमतरता, कुठली विकृती मानसीच्या आड लपवायची आहे..." 
बऱ्याच वेळानी त्याच्या तोंडून दोनच शब्द निघाले,
"कमतरता...? विकृती...?"
"हो... कमतरताच... कारण त्याशिवाय कुणीही मानसीशी लग्न करणार नाही...! असा विचार एखाद्या विकृत मनातच येऊ शकतो...! ती फसली असेल तुमच्या भुलाव्याला, मी नाही फसणार... लग्न तर सोडाच, पण मला यापुढे तुमचं तिला भेटणंही चालणार नाही...", असं म्हणून मी शेवटचा घाव केला नि वळून पाहिलं. एक पानाफुलांनी डवरलेला वृक्ष उन्मळून पडल्यावर जसा दिसतो, तसं मला हेरंबकडे पाहताना वाटलं...पण मला खचून चालणार नव्हतं. मी आता एकटी राहू शकत नव्हते... क्षीण आवाजात मला तो वृक्ष विचारत होता,
"मी भेटू का तिला...?
"हो... भेटा, पण शेवटचं..."
माझा शब्द त्यानं पुन्हा उच्चारला, "शेवटचं..."
डबडबले डोळे माझ्याकडे वळले, मानसीला भेटायला आत गेले... मीही त्याच्या मागोमाग गेले. तो तिच्याकडे पाहून फक्त हसला. तिला काय वाटलं, कोण जाणे? तिने आपले हात पसरले नि ते ओथंबलेले आकाश तिच्या कवेत शिरलं...तो फक्त बरसत राहिला नि माझी ही असमर्थ मुलगी त्या सामर्थ्याला पेलत राहिली...खूप वेळानी तो सावरला. तिच्या गालावरचे केस बाजूला करत तिला म्हणाला, "नीट राहशील ना पिल्लू...?"
ती फक्त हुंकारली, "हु"
"आता मी येणार नाही हं..."
ती क्षणभर गोठली अन् सश्यासारखी त्याला बिलगली...त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकले. शक्य असतं, तर तिच्या माथीचे सगळे भोग पिऊन घेतले असते त्याने त्यावेळी...त्या एकाच क्षणी...! त्यानं तिला नीट उचलून हळूवार बेडवर ठेवलं... चादर तिच्या पायांवर घातली...
"निघतो हं मी..."
ती पापणीही न हलवता फक्त पहात होती त्याला. डोळ्यात पाणी आणलं, तर आसवांच्या पडद्याआड अंतरात साठवायची ती साक्षात मूर्ती दिसणार नाही, म्हणूनच जणू तिनं आसवांनाही आवरून धरलं होतं...तो दाराकडे वळला नि मागून तिची हाक आली,
"हेरंब, पुन्हा कधी... कध्धी येऊ नका इथे, मी या जगातून गेले, तरी येऊ नका..."
त्याने एकदाच तिच्याकडे वळून पाहिलं नि तो वेगात बाहेर पडला...इतका वेळ तोलून धरलेला मानसीचा बांध तुटला. तिच्या समोर जायला भिती वाटेल इतकी ती थरथरत होती...मी धीर एकवटून म्हणाले, "मी जे केलं, ते तुझ्या भल्यासाठीच केलं बाळा..." नि तिनं माझ्याकडे नजर वळवली. तीची ती नजर पाहून मी दोन पावलं मागेच सरकले. असं वाटलं, ती नजर एखाद्या प्रेताचीच आहे...!
ती रात्र फार भयानक गेली. मला वाटलं, दुसऱ्या दिवशी मानसी सावरेल, जे झाले, ते स्विकारेल; पण ती त्याच क्षणात गोठली...संध्याकाळी मला अचानक तिचा सूर ऐकू आला-
'भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो
तू मला शिकविली गीते...'
मला तिचा तो करुण स्वर असह्य होत होता, पण तिची ती स्थिरता तर भंगली, याचं थोडं समाधान वाटलं. आता ती नेहमीसारखी वागेल; पण कसलं काय? तिचं गाणं थांबल्यावर मी जाऊन पाहिलं, तर ती अस्ताव्यस्त पडून. मी जाऊन तिला सरळ झोपवलं नि जाणवलं मला, ती पुन्हा त्याच वियोगाच्या क्षणात गेलीय्...आणि मग हे रोजचंच झालं. न खाता-पिता ती दिवसभर पडून राहायची नि संध्याकाळी तिच्यात ते चैतन्य शिरायचं फक्त हेरंबच्या त्या आवडीच्या गाण्यापूरतं...!
असेच पंधरा दिवस गेले. आता ती संध्याकाळी उठायचीसुध्दा नाही. डॉक्टर म्हणाले, "ती जबरदस्त शॉकमध्ये आहे... आता तिला जेव्हा वाटेल, तेव्हाच ती यातून बाहेर पडेल..."
एक दिवस सकाळीच तिच्यात थोडी जाणीव दिसली. मी खूप सुखावले. तिला थोडा ज्युस पाजला. खुपचं तरतरीत दिसायला लागली ती. उठून बसली. मी वेणी घालून दिली, तयारी करून दिली. ही आजारी होती, हे सांगूनही कोणाला खरं वाटणार नाही, इतकी ती फ्रेश दिसायला लागली. मी हळूच तिच्या जवळ जाऊन बसले. आज कितीतरी वर्षांनी ती माझ्याकडे पाहून हसली. मलाच थोडं गलबलून आलं. तिच्याकडे न पाहताच तिला म्हटलं, "मला तुला काही सांगायचं आहे..." ती काहीच बोलली नाही, पण मला जाणवतं होतं, तिची ती काळीशार खोल नजर माझ्याकडेच लागली होती. मी बोलायला सुरुवात केली,
"तरुण वयातच तुझे पप्पा गेले नि मी एकटी पडले-कुणी मायेचं नसताना कसं जगायचं हा प्रश्नच होता; पण राघव आयुष्यात आले नि सगळं एकटेपण भरून निघालं...सुख, दु:ख, आनंद, व्यथा व्यक्त करायला हक्काचं माणूस मिळालं, पण इथेही नियतीनं डाव साधला...जराशा दुखण्यानं राघव गेले...या उतरत्या वयात खरंतर मला फार फार गरज होती त्यांची...आता माझा आधार फक्त तू आहेस...हेरंब वाईट आहे, असं म्हणत नाहीए मी...पण प्रश्न पडतोच ना गं...कोण, कुठला? एका लोळा-गोळा मुलीशी लग्न करतो म्हटल्यावर...? नि आता माझ्यात ताकद नाहीय् गं एकटं राहण्याची... तुला कळतंय् ना, मी काय म्हणतेय्? आई आहे मी तुझी... वाईट करेन का तुझं?"
असं म्हणून मी वळून पाहिलं, तर वाटलं तिची नजर पुन्हा तशीच गोठतेय्... पण यावेळी एक फरक होता. ती काहीतरी पुटपुटत होती. मी नीट जवळ जाऊन ऐकू लागले,
"हॅप्पी...ब...र्थ...डे...हे...रं...ब..."
ती बाजूला कलंडली. मी सरळ करायला गेले, तर ती मला एकदम निर्जीव वाटली. मी घाबरले. डॉक्टरांना बोलावलं, पण तोवर मानसी गेली होती. मला खरंच वाटे ना... आज तर किती फ्रेश होती ती... कधी नव्हे ते माझ्याकडे पाहून हसली... जायचं असतं तिला, तर ती त्याच दिवशी गेली असती...मग आजच असं काय झालं? विचार करून थकले नि डोक्यात लख्ख प्रकाश पडला. मानसीला हेरंबचा वाढदिवस साजरा करायचा असावा नि त्यासाठीच ती इतके दिवस रेंगाळून राहिली असावी. आज तो तिनं तिच्यापरीनं साजरा केलाच...!
अंत्यविधीला तिला ओळखणारे, तिच्या क्षेत्रातले सगळे नामांकित आले. मला हेरंब कुठेच दिसला नाही. तिला अग्नी देतानाही माझे डोळे सारखा त्याचाच ठाव घेत होते. हा शेवटचा विधीतरी त्याच्याच हातांनी व्हावा, असं मला वाटतं होतं, पण तो आलाच नाही. क्षणभर वाटलं, त्याला कळलं नसेल; पण सगळ्यांना कळलं, मग त्यालाच कसं कळलं नसेल...?
     सगळे माझं सांत्वन करून जात होते. सगळ्यांत शेवटी मीही जायला निघाले. थोडं दूर गेल्यावर एक गदगदलेला हुंदका ऐकू आला. मी वळून पाहिलं. विझलेल्या चितेशेजारी कुणीतरी गुढघे टेकून बसलेलं होतं. मी जवळ गेले. हो, तो हेरंबच होता... त्या शेवटल्या भेटीत जसा रडत होता, तसाच या शेवटल्या भेटीतही रडत होता... माझी चाहूल लागताच तो कमालीचा शांत झाला. त्या गरम राखेतून एक एक अस्थिफुल उचलून हळूवारतेनं जवळच्या मखमली पेटीत ठेवू लागला. नजर तशीच ओथंबलेली, स्पर्शही तसाच जरा धक्का लागला, तर तिला दुखेल की काय? या जाणिवेनं बावरलेला...मी दोन पावलं समोर जाऊन हाक मारली, "हेरंब..." तो तसाच निश्चल, पण काहीतरी पुटपुटला तो... मी अजून समोर गेले. तो बोलत होता तिच्याशी, "निट राहशील ना पिल्लू...? येतोय् हं मीही..." अन् मी शहारले... कारण... कारण मला मानसीचा हुंकार ऐकू आला...मी सुसाट वेगानं तिथून निघाले...पण अजूनही मानसीची ती नजर माझा पाठलाग करतेय्... तिचा तो स्वर अजूनही ऐकू येतोय्, "का रोज मरण दिलंस मला...?

- सौ. मंजिरी बंसी कोठेवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...