गुरुवार, ३० एप्रिल, २०२६

2747. पत्नीला घडवावं लागतं

 त्या रुबाबदार व्यक्तिमत्वाच्या तरुणाने त्याची जन्मपत्रिका मला दिली आणि मला म्हणाला, " माझा फक्त एकच प्रश्न आहे. माझ्या पत्रिकेत दुसरे लग्न आहे की नाही एवढेच मला विचारायचे आहे. " 
मी त्याची जन्मपत्रिका काळजीपूर्वक तपासली आणि त्याला म्हणालो, " तुमच्या सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा , पण तुमच्या पत्रिकेत दुसऱ्या लग्नाचा योग नाही. तुमच्या वैवाहिक स्थानावर गुरुची पूर्ण दृष्टी आहे. तसेच विवाहस्थानात शनि असला तरी तो नातं बळकट करत आहे. शनिमुळे विसंवाद उत्पन्न झाला तरी तुमचं नातं मात्र तुटणार नाही. "
माझं बोलणं ऐकून तो हताशपणे म्हणाला, " मी माझ्या बायकोबद्दल खूप अपेक्षा बाळगल्या होत्या. पण ती अगदीच काकूबाई निघाली. तशी ती घरकामात हुशार आहे आणि स्वयंपाकपण छान करते. पण मी जेवढा रसिक आहे तेवढीच ती रुक्ष आहे. नवऱ्याच्या रुबाबाला शोभेलसं आपण राहिलं पाहिजे असं तिला वाटतच नाही. त्यामुळे तिला कोणत्याही फंक्शनला सोबत नेणं कठीण होऊन बसलं आहे. इतर सर्व मित्रांच्या बायका कशा स्टायलिश राहतात. पण ती मात्र चप्प तेल लावून मधोमध भांग पाडून जुनाट पद्धतीची वेणी घालून येते.
मला जीवनाच्या सर्व अंगांचा भरभरुन आस्वाद घ्यायचा आहे. पण ती उत्साहाने प्रतिसादच देत नाही.  
रात्रीपण ती तसंच अलिप्तपणे वागते. मला खरं तर  "तरुण आहे रात्र अजुनि, राजसा निजलास का रे" असं लाडिकपणे म्हणणारी बायको हवी होती. ती मात्र उरकल्यासारखं करुन लगेच पाठ फिरवून झोपून जाते. या सर्व कारणांमुळे माझ्या मनात सतत दुसऱ्या लग्नाचा विचार येत असतो. " 
त्याचं बोलणं शांतपणे ऐकून घेतल्यावर मी काही वेळ विचार केला आणि दीर्घ श्वास घेऊन बोलायला सुरुवात केली , "या जगात प्रत्येकाला मनासारखी पत्नी मिळत नसते. पण प्रत्येकजण प्रयत्न  करुन त्याला मिळालेल्या पत्नीला मनासारखी बनवू शकतो. तुम्हीसुद्धा तुमच्या पत्नीला तुम्हाला हवी तशी घडवू शकता. पण त्यासाठी तुम्हाला खूप संयम व चिकाटी दाखवावी लागेल. त्यासाठी तुम्हाला  तुमच्या पत्नीचा बारकाईने अभ्यास करावा लागेल. अधूनमधून तिला टूरवर फिरायला न्यावं लागेल. तिच्याशी संवाद साधावा लागेल. तिच्या आवडीनिवडी समजून घ्याव्या लागतील. तिचे प्लस आणि मायनस पाॅइंटस लक्षात ठेवावे लागतील. त्याप्रमाणे तुम्ही जर समजूतदारपणाने तिच्याशी वागलात तर ती हळूहळू पण निश्चितपणे  बदलेल.
तुमचा दुसरा मुद्दा म्हणजे श्रृंगाराबद्दल बोलायचं झालं तर, श्रृंगाराच्या बाबतीत पुरुष हा नैसर्गिकपणे नेहमीच कड्याच्या टोकावर असतो आणि स्त्री ही नेहमीच नैसर्गिकपणे काहीशी दूर पठारावर असते. तिथून तिला हळूहळू खुलवत, फुलवत कड्याच्या टोकापर्यंत आणणं ही पुरुषाची जबाबदारी असते. त्यामुळे तुमच्या पत्नीला नक्की कसं फुलवायचं याचा तुम्ही बारकाईने अभ्यास करावा असा माझा तुम्हाला सल्ला आहे. "
माझं बोलणं ऐकल्यावर तो काही क्षण शांत बसला. त्याला माझं बोलणं कितपत पटलं माहीत नाही पण तो सावकाश उठला आणि मला नमस्कार करुन निघून गेला.
या प्रसंगाला बराच काळ लोटला. रोजच्या कामाच्या रहाटगाडग्यात मी हा प्रसंग साफ विसरुन गेलो. 
एके दिवशी मी शहरातील एका मंगल कार्यालयाजवळून जात होतो. ते ओलांडून पुढे जात असतानाच मागून कुणीतरी पळत येऊन मला थांबवलं. मी वळून पाहिलं तर मला थांबवणारा तोच रुबाबदार तरुण होता. त्याने मला फक्त पाच मिनिटं आत येण्याची विनंती केली. त्याच्या विनंतीला मान देऊन मी आत गेलो. आत गेल्यावर त्याने एका गप्पांचा फड जमवलेल्या घोळक्याकडे बोट दाखवले. त्या घोळक्यात पाहताक्षणीच लक्ष वेधून घेणारी एक तरुणी प्रचंड आत्मविश्वासाने बोलत होती आणि घोळक्यातील प्रत्येक जण तिचं बोलणं अत्यंत लक्षपूर्वक ऐकत होता. माझ्या नजरेचा रोख ओळखून तो म्हणाला ," ती माझी बायको आहे. तुमच्या सल्ल्याप्रमाणे मी चिकाटीने प्रयत्न केला आणि ती आमूलाग्र बदलली. इतकी बदलली की आता मी तिच्यापुढे फिका पडतो की काय या भीतीने मला सतत अपडेट राहावं लागतं आहे." 
त्याचं बोलणं ऐकून मला खूप आनंद झाला. कोणतीही नवविवाहित मुलगी म्हणजे अनमोल हिरा असते आणि या हिऱ्याला हवे तसे पैलू पाडण्याचं कौशल्य तिच्या पतीनेच संयम व चिकाटीने आत्मसात करायचं असतं. मग त्यानंतर त्याच्याशी थोडावेळ बोलून मी समाधानाने तिथून निघालो. 

--  जितेंद्र अभ्यंकर 
   8605396156

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...