गुरुवार, ३० एप्रिल, २०२६

2785. युटोरी

     सुयश गेल्या वर्षभरात कामात पूर्ण बुडून गेला होता. एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी लागली तेव्हा तो किती आनंदात होता. नवीन शिकायचं, काहीतरी स्वतःचं निर्माण करायचं, हे त्याचं स्वप्न होतं पण प्रोजेक्ट्स, डेडलाईन्स, मिटिंग्ज, आणि सततचा ताण वाढतच होता. हळूहळू त्याच्या चेहऱ्यावरचा तजेला कमी होऊ लागला. तब्येतीच्या तक्रारी वाढू लागल्या होत्या. चिडचिड तर फारच वाढली होती. 
एके दिवशी त्याची बायको शर्वरी त्याच्या समोर येऊन उभी राहिली.
 “सुयश, कितीही काम असलं तरी अर्णवसाठी वेळ काढावाच लागेल. हे बघ अर्णवनं काय लिहलय ते!” तिनं एक कागद पुढे केला. आठ वर्षांच्या अर्णवनं लिहलं होतं.. 
“माझे बाबा सतत कामात असतात. ते हसत नाहीत.. काही विचारलं की ते ओरडतात.. सुयश हताश झाला. 
“आपण पुढच्या आठवड्यात हिल स्टेशनला जाऊया. बस्स तीन दिवस. तुलाही चेंज होईल !” शर्वरीनं सुचवलं. 
सुयश आधीच थकलेला होता. तो उखडला. शर्वरीशी त्याचा वाद झाला.
“मी कोणासाठी काम करतो? अर्णवसाठीच ना?” 
तेवढ्यात अर्णव खेळून घरी आला. त्याचा बारीक झालेला चेहरा पाहून सुयशनं नाईलाजाने होकार दिला.
दुसऱ्या दिवशी ते तीन तासांनी ते नेपच्यून हॉटेलमध्ये पोचले. थंड हवा, मंद वारा, आणि पर्वतांवर उतरणारा तांबूस सूर्य बघून सुयशला हुशारी वाटली. 
“सुयश,” शर्वरी म्हणाली, “इथे झेन सेंटर आहे. उद्या डॉ. योशिनावा यांचं प्रवचन आहे. प्लीज, काम बाजूला ठेवून ये.” सुयशने काही न बोलता मान हलवली.
दुसऱ्या दिवशी ते झेन सेंटरमध्ये पोचले. डॉ. योशिनावा शांतपणे बसले होते. डोळे मिटलेले, चेहरा इतका समाधानी की जणू काही वेळ त्यांच्याजवळ थांबला होता. त्यांना कशाचीही घाई नव्हती. त्यांनी माईक हातात घेतला.
“आज मी तुम्हाला जपानने मला शिकवलेली एक अमूल्य गोष्ट शिकवणार आहे. या गोष्टीचं नाव आहे “युटोरी”
युटोरी म्हणजे मोकळी जागा.  
घरातली, मनातली, नात्यांमधली, कामातली.
ही जागा निर्माण करण्याची कला म्हणजे युटोरी.
यासाठी काहीही लागत नाही.. फक्त थोडा वेळ… एक शांत कोपरा आणि स्वतःला भेटण्याची तयारी.
“घरातील, बाहेरील, ॲाफिसमधील एक कोपरा निवडा. तिथे फोन, स्क्रीन, आवाज, गाणी काहीही नको.
तिथे बसायचं. आणि काहीही करायचं नाही.
Do nothing.
१५–२० मिनिटं बसा. डोळे उघडे ठेवा. वाटलं तर कपभर चहा प्या. याव्यतिरिक्त काही करायचं नाही.
फक्त शांतता. मनाला काही काम देऊ नका. कामांची लिस्ट बघू नका. 
हळूहळू एक चमत्कार घडू लागेल.
मन स्वतःच स्वतःला दुरुस्त करू लागेल.”
प्रवचन संपलं. सुयशला थोडा रागही आला “यांचं काय जातं सांगायला?” पण त्याचा फोन तासभर बंद होता आणि त्या शांततेने त्याच्या मनात काहीतरी बदललं होतं. योशिनावांचे शब्द ऐकून युटोरी करून बघावं असं वाटत होतं. घरी परतल्यावर त्याने सकाळी २० मिनिटं युटोरी व Do nothing आपल्या कॅलेंडरमधे लिहलं आणि चहाचा कप घेऊन तो घराच्या एका कोपऱ्यात शांत बसू लागला. काही दिवसांनी त्याला त्या कोपऱ्याची ओढ लागली. आणि मग चमत्कार घडला..कामातली चिडचिड कमी झाली. 
कोड लिहताना होणारा गोंधळ गायब झाला. 
क्रिएटिविटी वाढली. 
तब्येत सुधारली.
बॅास त्यांचं काम बघून खूष झाला.
ऑफिसमधले लोकही म्हणू लागले, “सुयश, तू बदललास. नक्की काय केलंस?” तो हसला..
असाच एका रविवारी सकाळी सुयश त्याच्या युटोरीच्या कोपऱ्यात बसला होता. अर्णव हळूच त्याच्या शेजारी येऊन बसला. दोघेही शांत बसले.. दहा मिनिटांनी अर्णवनं बाबाच्या गळ्यात हात घालून त्याला घट्ट मिठी मारली.. 
“बाबा… तुम्ही आता मला जास्त आवडता. कारण तुम्ही आता माझ्यासोबत काहीही करत नाही. पण मला ओरडत नाही. फक्त जवळ बसता. आणि मला तेच खूप आवडतं.”
सुयशच्या डोळ्यांत पाणी आलं.
त्याला अचानक जाणवलं की युटोरी म्हणजे फक्त स्वतःसाठी स्पेस नव्हे तर आपल्या प्रियजनांसाठीही आपल्या मनात मोकळी जागा निर्माण करणं. ज्यामुळे त्यांना आपल्याजवळ बसायला, मन मोकळं करायला भीती वाटणार नाही. काम सतत असणार आहेच पण त्यात वाहून जायचं कारण नाही. हे कळण्यासाठी कुठेतरी थांबावं लागतं. मनाला वेळ द्यावा लागतो. सतत धावणारं मन त्याला जे हवं ते करू दिलं की विसावतं. शर्वरी त्यांच्याकडे कौतुकाने बघत होती. योशिनावा असेच एका मोठ्या कंपनीतले इंजिनिअर होते. तिथल्या ताणाने त्रस्त होऊन त्यांनी युटोरी वापरायला व शिकवायला सुरूवात केली होती. तिनं मनोमन त्यांना हात जोडले.
त्या दिवशी सुयशनं कॅलेंडरमध्ये कायमस्वरूपी लिहून ठेवलं, “युटोरी – माझ्यासाठी, माझ्या मनासाठी, आणि माझ्या लोकांसाठी. रोज २० मिनिटं ! 
आपणही कितीही गडबड असेल, कितीही डेडलाईन्स असतील तरी स्वतःला पंधरा वीस मिनिटं युटोरी द्या. जपानमधील मोठमोठ्या कंपनींमधे आता युटोरी रूम्स आहेत ज्यामुळे कर्मचाऱ्यांची क्षमता वाढत आहे. 
फक्त पंधरा मिनिटं .. रोज.. युटोरी करून काय फरक पडतो त्याची नोंद करा. 

©® ज्योती रानडे
2026 JyotiRanade. All rights reserved.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...