माणूस जेव्हा स्वतःभोवती देवत्वाचं वर्तुळ आखू लागतो, तेव्हा कृष्ण शांतपणे पाहत असतात. सत्ता माणसाला काय देत नाही? पैसा देते, मान देते, प्रसिद्धी देते. पण ती या सोबतच अशी एक गोष्ट देते जी सहजासहजी कुणाला कळत नाही ती म्हणजे स्वतःबद्दलचा भ्रम. पौंड्रकाच्या आयुष्यात हाच भ्रम हळूहळू खोलवर मुरत गेला.
पौंड्र देशाचा राजा म्हणून तो यशस्वी होता. युद्धं जिंकलेली होती, प्रजा त्याचं नाव आदराने घेत होती. दरबार नेहमी स्तुती करणाऱ्यांनी भरलेला असायचा; आणि अशा दरबारात 'सत्य' फार काळ टिकत नाही. कारण तिथे प्रश्न नसतात, फक्त होकार असतात. कुणीतरी एक दिवस सहज बोलून गेलं, “महाराज, तुमच्यात काहीतरी वेगळंच तेज आहे.” त्या वाक्याला कुणी विरोध केला नाही. उलट दुसऱ्या दिवशी तेच वाक्य थोडं नटवून सजवून परत आलं. आणि काही दिवसांतच तेच 'परम सत्य' मानलं गेलं.
पौंड्रकाला वाटू लागलं, आपण इतरांसारखे नाहीच. आपल्यात देवत्व असणारच. विष्णू अवतार घेतात, असं जर शास्त्र सांगतं, तर तो अवतार आपणच का नसू शकतो? ही कल्पना आधी मनात होती, नंतर ती बोलण्यात आली आणि शेवटी कृतीत उतरली.
त्याने शंख, चक्र, गदा तयार करून घेतली. सोनं, चांदी, रत्न सगळं वापरलं. पितांबर धारण केला, गरुडध्वज उभारला. देवासारखं दिसण्याचा पूर्ण प्रयत्न झाला. आणि मग प्रजेला बजावण्यात आलं “आता माझी पूजा करा.” काही लोक भोळे होते, काही घाबरलेले, तर काही संधीसाधू. पण एकानेही धाडसाने विचारलं नाही, “देवत्व म्हणजे नक्की काय असतं?”
तिथे देवाचं नाव घेतलं जात होतं, पण भक्ती नव्हती. पूजा होती, पण नम्रता नव्हती. आणि जिथे नम्रता नसते, तिथे देव कधीच राहत नाहीत.
याच काळात कृष्णाचं नाव सगळीकडे पसरत होतं. द्वारकेतला तो कृष्ण, जो स्वतःला कधी देव म्हणवत नाही, पण लोक मात्र ज्याला देव मानतात. जो अन्याय पाहून शांत बसत नाही आणि सत्ता असूनही साधेपणात राहतो. हे ऐकून पौंड्रक अस्वस्थ झाला. कारण त्याच्या 'बनावट' देवत्वाला पहिल्यांदाच अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता.
“जर मी वासुदेव असेन, तर मग हा कृष्ण कोण?”
हा प्रश्न भक्तीतून आलेला नव्हता, तो स्पर्धेतून जन्माला आला होता.
त्याने दूत पाठवला. शब्द कठोर होते “तू माझी चिन्हं वापरतोस, ती मला त्वरित परत दे.” देवत्व मागितलं जात होतं, पण भाषेत मात्र अहंकार होता. हा संदेश द्वारकेत पोहोचला तेव्हा सभेत हास्याची लकेर उमटली. कारण देवत्व मागून मिळत नाही, ते जगावं लागतं. पण कृष्ण मात्र हसले नाहीत; त्यांनी फक्त 'वेळ' दिला.
युद्ध ठरलं. पौंड्रक तयार झाला. देवाच्या वेषात तो रणांगणात उभा राहिला. आणि समोर कृष्ण उभे होते कोणत्याही वेषाशिवाय, अगदी सहज.
त्या क्षणी दोन गोष्टी समोरासमोर उभ्या होत्या. एक म्हणजे अभिनय, आणि दुसरी म्हणजे तत्त्व. पौंड्रक गरजला, स्वतःला वासुदेव म्हणाला. कृष्णाने काहीही उत्तर दिलं नाही. कारण सत्याला स्वतःचं स्पष्टीकरण देण्याची गरज नसते.
सुदर्शन चक्र सुटलं. त्या एका क्षणात सगळं संपलं. पौंड्रकाचं शरीर जमिनीवर पडलं, पण त्याआधी त्याचा तो भ्रमाचा डोंगर कोसळला. देवाची नक्कल तिथेच थांबली. जिथे अहंकार संपतो, तिथेच कथेचा शेवट होतो.
पण अहंकाराचा शेवट एवढ्यावरच थांबला नाही. काशीचा राजा सूड घेण्यासाठी पुढे आला. शिवभक्तीच्या नावाखाली अधर्म उभा राहिला. पण देव कुणाच्या नावावर नाही, तर तत्त्वावर चालतात. सुदर्शन तिथेही फिरलं आणि अधर्माचा अंत झाला.
ही कथा सांगते की, कृष्ण लगेच शिक्षा देत नाहीत. ते वाट पाहतात. माणसाला स्वतःला ओळखण्याची पुरेशी संधी देतात. पण जेव्हा माणूस स्वतःलाच देव समजू लागतो, तेव्हा खऱ्या देवाला आपलं सत्य प्रगट करावंच लागतं. देवत्व हे मिरवण्यासाठी नसतं, ते ओझंही नसतं; ती एक जबाबदारी असते. आणि ज्याला ही जबाबदारी समजत नाही, त्याच्या अहंकाराची कथा अशीच अधुरी संपते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा