गुरुवार, ३० एप्रिल, २०२६

2703. तुटलेल नात, जिंकलेला आत्मसन्मान

      ती एक सुशिक्षित, सुसंस्कृत आणि तेजस्वी इंजिनीअर तरुणी होती. प्रेम, विश्वास आणि स्वप्नांच्या पायावर तिनं संसाराची इमारत उभी केली. पण लग्नानंतर काही दिवसांतच नियतीनं तिची कठोर परीक्षा घ्यायला सुरुवात केली. काहीही खाल्लं की तिला उलटी होऊ लागे; शरीर थकत गेलं, मन खचत गेलं. अनेक दवाखाने पालथे घातले, असंख्य औषधं घेतली, पण आजार काही मानेना. तिच्या वेदनांपेक्षा नवऱ्याच्या मनात भीतीच अधिक वाढू लागली “ही आजारी आहे. आपल्याला मूल होणार नाही. आपलं आयुष्य अडचणीत येईल.” प्रेम हळूहळू जबाबदारीपासून पळ काढू लागलं आणि अखेर त्यानं तिला घटस्फोट दिला. तिचे उपचार सुरू असतानाच, जखमा ताज्या असतानाच, त्यानं त्वरित दुसरं लग्न केलं. ती मात्र शेवटचा आशेचा किरण म्हणून दुबईतील डॉक्टरांकडे गेली. अन्ननलिकेवर शस्त्रक्रिया झाली आणि नियतीनं तिच्यावर कृपा केली. ती बरी झाली.
     कोर्टात तिनं पोटगी म्हणून पन्नास लाखांची मागणी केली. तो म्हणाला, “माझ्याजवळ एवढे पैसे नाहीत.” तेव्हा तिच्या आवाजात कटुता नव्हती, फक्त ठामपणा होता. “मग लिहून दे, की तुझ्याजवळ एक रुपयाही नाही.” त्याची प्रतिष्ठा पणाला लागली. नातेवाईक जमले, चर्चा रंगली आणि अखेर त्यानं पन्नास लाखांचा चेक तिच्या हाती दिला. कोर्टाबाहेर येताच तिनं पत्रकारांना बोलावलं. कॅमेऱ्यांचे फ्लॅश चमकले, लोकांची गर्दी झाली. साऱ्यांना वाटलं, आता ती या पैशांतून आपली वेदना विसरणार, आपलं आयुष्य नव्यानं उभारणार.
     पण तिनं त्या चेककडे पाहिलं आणि शांतपणे जाहीर केलं, “हा पैसा मी शेतकऱ्यांच्या निधीत सरकारकडे देत आहे.” आणि आपल्या माजी नवऱ्याकडे रोखून पाहत ती म्हणाली, “आजारी असताना तू मला अर्ध्यावर सोडलंस. हा आजार तुला झाला असता, तर मी तुला सोडलं असतं का?” तिच्या शब्दांत सूड नव्हता, होता फक्त माणुसकीचा सवाल. त्या क्षणी पैसा लहान झाला आणि तिचा स्वाभिमान मोठा झाला. ती कोर्टातून बाहेर पडली. हरलेली स्त्री म्हणून नाही, तर समाजाला मानवतेचा आरसा दाखवणारी विजयी व्यक्ती म्हणून.
     अनावधानाने पाहिलेली एक रील शेअर न करता नजरेआड झाली; पण तिच्यातील कथा मात्र मनाला स्पर्शून गेली. मैत्रिणीच्या सल्ल्यानुसार त्या भावनेला शब्दरूप देत मी ती कथा लिहून काढली.

 सौ शैलजा लोखंडे गोरडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...