रीनाचा तो संदेश जेव्हा आला तेव्हा पॉलोमी आश्चर्यचकित वगैरे काही झाली नाही. तिला वाटलेलच कधीतरी रिना आपल्याला भेटायचं म्हणेल म्हणून. रीना. रिन्स म्हणायची पोलोमी लाडाने तिला. तिच्या संपर्कात आली तेव्हा अठरा . एकोणीस वयाची असेल. पोलोमी त्यावेळी कॉलेजमध्ये इंग्रजी विषय शिकवायची आणि तिचा नवरा पॉल गणित शिकवायचा. कॉलेजातून रीना च्या खूप तक्रारी यायच्या. तिचा उडाणटप्पूपणा, हॉस्टेलमधील इतर मुलींच्या खोड्या काढणं, दारू सिगरेट पिणे , कॉलेजमधल्या बहुतेक प्रोफेसरांच्या लेक्चर्स ला न येणं. चुकून आलीच एखाद्या वेळेस तर. मग त्या तासाला अखंड दंगा करणे..' लेडी डॉन ' म्हणून स्वतःची ओळख निर्माण केलेली कॉलेजात रीनाने.
रीना ची कीर्ती पोलोमीच्या कानावर गेली तेव्हा एक मुलगी असूनही एवढ्या खोड्या कशी काय करते म्हणून पोलोमिला तिच्याबद्दल कुतूहल वाटलं. मग त्यातून तिने रीना बद्दल माहिती काढली. तेव्हा कळलं की तिची आई ती फार लहान असतानाच वारली. तिच्या दारुड्या बापाने एकुलत्या एका मुलीला त्रास द्यायला सुरुवात केलेली होती. आपल्या आईच्या मुळावर आली असं तिला तो सारखं म्हणायचा. मग तिच्या जवळच्या काकाने तिला आपल्या घरी आणलेली. तिथेही मग ही ब्याद डोक्यावर नको म्हणून काकी ने कॉलेजातील हॉस्टेलमध्ये तिची रवानगी केली होती. थोडी जास्तीचे पैसे अर्थातच भरावे लागले. मग हॉस्टेलमधील इतर पोरींच्या नादी लागून रीना पण एशोआराम आणि मजा यात गुंतली. अभ्यासाकडे दुर्लक्ष करून इतर गोष्टीतच तिला स्वारस्य वाटू लागलेलं.
पोलोमिने कॉलेजातल्या व्यवस्थापनाशी बोलून तिला स्वतःच्या घरी आणलं. पोलोमीच घर मोठं होतं. नोकरांसाठी असलेल्या खोलीत रिना ची सोय करण्यात आली. पोलोमी आणि तिचा नवरा पॉल आर्थिक रित्या सुस्थितीत होते. त्या दोघेही नामवंत कॉलेजात प्रोफेसर असल्याने बऱ्यापैकी कमाई होती. दोघांनाही नुकतेच एक मूल झालेलं. त्या मुलाकडे लक्ष देण्याचं काम रिन्स कडे सोपवण्यात आलं. पाळण्यातील बाळ रडू लागलं तर त्याला झोका देऊन.. त्याच्याशी बोलून. त्याला झोपवणं , त्याचं खाणं पिणं, आंघोळ घालणं, कपडे, त्याच्याबरोबर खेळणं ही कामं रीना ने स्वतःहून अंगावर घेतली. रात्री नवरा पॉल आणि बायको पोलोमी बेडरूम मध्ये एकांतात असताना बाळाचा पाळणा रिनाच्या खोलीत असे. रात्री बेरात्री बाळ रडू लागला तर झोपेतून उठून रीना बाळाकडे लक्ष द्यायची.
आयुष्य हा शेवटी देणा घेण्याचा व्यवहार असतो. रीन्स काम करायची त्या बदल्यात म्हणा किंवा खरंच तिच्याबद्दल काही वाटतं म्हणून म्हणा पोलोमी तिचा कॉलेजचा खर्च, जेवण खाणं, तिला करावीशी वाटणारी इतर मौज पोलोमी स्वतःच्या जबाबदारीवर करायची. रीनाचा अभ्यासातील प्रगती बद्दल मात्र पोलोमी विशेष आग्रही होती. पोलोमच्या धाकामुळे म्हणा की प्रेमामुळे रीन्स मध्ये फरक पडू लागला. तिचे राहणीमान पण चार सुसंस्कृत लोकांप्रमाणे आपसुकच बदलले. अजागळ. गबाळी राहणारी रीना आता चार चौघांचे विशेषतः पुरुष वर्गाचे लक्ष वेधून घेऊ लागली.
पोलोमी च्या नवऱ्याचं पॉलच लक्ष सुद्धा तिच्याकडे न राहवून जाऊ लागलं. आपली बायको जवळ नाही पाहून तो रिन्सच्या सौंदर्याची तारीफ करे. तिच्याशी शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न सुद्धा त्याने एक दोनदा केला होता. कोवळ्या. उमलत्या वयाची रिन्ससुद्धा वयाने कितीतरी मोठ्या असलेल्या पॉल कडे तिच्या कॉलेजमधील बुद्धिमान प्रोफेसरकडे आकर्षिली गेली. मात्र पॉल करत असलेल्या शारीरिक लगटी विषयी तिने पोलोमिच्या कानावर घातलं होतं.
मग ती सकाळ उगवली. बराच वेळ दार उघडत नाही म्हणून पॉलच्या अभ्यासिकेचे दार पोलोमी ने जोर लावून उघडलं. तर इथल्या सोफ्या वर पॉल नग्नावस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. त्याचं शिश्न कापलेलं होतं. पोलिसांना बोलावलं गेलं.. पोलोमिने सांगितलं की रीना आणि नवरा पॉल चे तसले संबंध होते. पॉलनी तशीच काहीशी अनैतिक मागणी रिन्सकडे त्या रात्री केलेली आणि मग धाडसीपणे त्या अत्याचाराला प्रत्युत्तर देत. संकटाला तोंड देताना रीनाने पॉल चा शेवट केला होता. पुढे पॉलच्या मरणाची, तिची, तिच्या कुटुंबाची चौकशी करणाऱ्या प्रत्येकालाच पोलोमी हेच सांगायची की कशी तिने एका गरीब, गांजलेल्या ,अनाथ ..मुलीला आश्रय दिला आणि मग या उपकाराची फेड त्या मुलीने तिचाच संसार विस्कटून केली. या घटनेला जवळजवळ दहा पंधरा वर्षे उलटून गेली. आज इतक्या वर्षानंतर जवळच्या ऑनलाईन केमिस्ट वाल्याकडून औषध मागवली तेव्हा त्या औषधाच्या पिशवीत तिला रीन्स चा तरुणपणीचा फोटो आणि रीना तिला भेटायला येत असल्याचा संदेश असणारी चिठ्ठी मिळाली. रात्री नऊला रिना तिच्याकडे जेवायला येणार होती.
नऊ वाजत आले तेव्हा पोलोमी ची उत्सुकता वाढू लागली. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. तिच्या मुलाला. रोनाल्ड ला तिने जाणून-बुजूनच त्याच्या मित्राकडे रात्री पाठवून दिले होते. गेली अनेक वर्षे ती आणि रोनाल्ड तर राहायचे तेवढ्या मोठ्या घरात. नऊच्या सुमारास पोलोमी च्या घराची बेल वाजली. दारात रीन्स उभी होती. एवढ्या वर्षात मोठा असा बदल झाला नव्हता रीना मध्ये. कमरे कडून थोडीशी सुटली होती आणि दोन-तीन रुपेरी केस डोकावू लागले होते. तिला पाहून
पोलोमिला तिच्याबद्दल लहानपणी वाटायचं तसंच वाटून आलं... प्रेम.. दया.. कणव.. किंवा या तिन्ही गोष्टीं चे एकत्र मिश्रण. तिनं रीन्स चे स्वागत केलं. फ्रेश झाल्यावर रीन्स आणि पोलोमी किचन मध्ये आल्या.
" रोनाल्ड... रोनाल्ड कुठे आहे??" रीन्सने विचारलं.
" त्याच्या मित्राकडे गेलाय तो.. रात्रभर तिथेच थांबणार आहे." पोलोमी ने सांगितलं.
" काही बनवायचं आहे का मी करते " गाऊन सावरत खुर्चीवरून उठत रीना म्हणाली.
" अगं झालंय सगळं.. वाढायला घेते बघ.." प्लेट्स कोरड्या करत पोलोमी म्हणाली.
" मग सांग... कसं काय चाललंय तुझं..??" पोलोमी सहज चौकशी करावी तशी रीनाला म्हणाली.
रीना खळाळून हसली त्या हसण्यात वैषम्य.. विशाद वगैरे काही नव्हतं.
"पॉलच्या मृत्यूनंतर पोलिसांनी मला अटक केली तुझ्या माझ्या विरुद्धच्या साक्षी मुळे गुन्हा सिद्ध झाला. मला तुरुंगवास झाला. तुरुंगात साध्या कारणासाठी गेलेला माणूस एकतर पुढे अट्टल गुन्हेगार तरी बनतो किंवा मग मनोरुग्ण तरी बनतो. मला तर खुनी, बलात्कारीत बायकांबरोबर ठेवलं गेलं. त्यामुळे मी दोन्ही झाले. मनोरुग्ण असलेली खुनी स्त्री. पुढे तुरुंगातल्या माझ्या वागणुकीमुळे आणि नंतर कोणी एका भल्या माणसाच्या सांगण्यावरून मला निर्दोष ठरवून सुटका झाली. पण माझ्यावर बदनामीचा शिक्का बसला तो कायमचा."
"मला सुपाऱ्या मिळू लागल्या लोकांना मारण्याच्या. मी अत्यंत क्रूरपणे. थंड डोक्याने.. कसली पर्वा न करता खून करू लागले. प्रत्येक खुना मागे एक मजबूत रक्कम मला मिळू लागली. पुढे पुढे तर खून करते म्हणून पैसे मिळतात की खून करण्याचं व्यसन जडले आहे तेच कळेना. आज मुंबईमध्ये उच्चभ्रू लोकवस्तीत माझा फ्लॅट आहे. चार-पाच फोर व्हीलर आहेत. तू मला पैसे कमवायची लाईन मिळवून दिली पोलोमी. इतकी वर्ष झाली मी पकडले गेले नाही. आणि पकडले गेले होते तेव्हा खून केलाही नव्हता. न केलेल्या गुन्ह्याबद्दल मला तुरुंगात जावं लागलं."
रीना खिडकीतून बाहेर बघत म्हणाली. पॉलोमी मागचे आठवू लागली. पॉल त्यावेळी तिच्यापासून लांब राहू लागला होता. कामावरून घरी आला तरी त्याच्या विषयाबद्दल गणिताबद्दल. त्यातील प्रमेयांबद्दल. समीकरणाबाबत सतत विचार करत राहायचा. घरी आल्यावर तो त्याच्या अभ्यासिकेचे दार लावून घेई ते अगदी जेवण तयार होईपर्यंत. जेवतानाही तो त्याच्या डोक्यात गणित समीकरण सोडवत असायचा. गणितावर कसलासा ग्रंथ लिहायला घेतला होता त्याने. रात्री बेरात्री उशिरापर्यंत जागा राहून काहीतरी कागदावर सोडवत बसायचा. अशी माणसं. मग भले बुद्धिमान शास्त्रज्ञ म्हणा. डॉक्टर म्हणा किंवा मग पॉल सारखे प्राध्यापक. अत्यंत तऱ्हेवाईक असतात. पॉलच्या अशा वागण्याने पोलोमीच वैवाहिक आयुष्याचे गणित मात्र पार बिघडून गेलं. तिची सगळी समीकरणे चुकत चालली होती.
गणितात रंगून गेलेल्या पॉलला रात्री अपरात्री मात्र पोलोमी न चुकता हवी असायची. गणित. समीकरणे अचूक सोडल्यावर येणारी झिंग तो पॉलोमीचे शरीर हक्काने कुस्करून, ओरबाडून साजरी करायचा. त्यात त्या वयाने लहान असल्या पोरीवर. आपल्या आश्रित असलेल्या आपल्याच विद्यार्थिनीवर पॉलचा असलेला डोळा पाहून पोलोमी वैतागून गेली. विचार करून डोक्याचा पार भुगा झाला. पॉलची अत्यंत किळस वाटू लागली. आणि मग त्या रात्री.... त्या रात्री....
त्या रात्री आपल्या मुलाला नेहमीप्रमाणे रीन्सच्या ताब्यात देऊन पॉलशी आपण शेवटची शय्यासोबत केली. आपल्याकडून शेवटचं सुख घेऊन पॉल जसा निश्चित झोपला. आपण डाव साधला. त्याला कायमचा संपवला आणि मग स्वतःला. स्वतःच्या प्रतिष्ठेला वाचण्यासाठी बिचाऱ्या रीन्सला पुढे केलं. रीन्सने काहीच केलं नव्हतं.
"तुझी क्षमा कशी मागू...?? काहीच कळत नाहीये रीन्स..." गद्गद्लेल्या स्वरात दाटून आलेल्या कंठाने पोलोमी म्हणाली.
रीना म्हणाली..."मी कशी ही असले. अगदी मनोरुग्ण जरी असले तरी मी कृतघ्न नाही. तू माझ्या चांगल्याचा माझ्या कल्याणाचा विचार केला होतास. या चांगुलपणाचा अंश असलेल्या बाईचं मी कसं वाईट होऊ देणार होते? ती एक परतफेड म्हणून मी पोलिसांच्या अधीन झाले गुन्हा कबूल केला."
"पोलोमी तुझं, तुझ्या मुलाचंचं नवऱ्याच्या पश्चात चांगलंच व्हावं अशी माझी इच्छा होती. म्हणून तर इतकी वर्ष तुझ्या घरापासून लांब राहिले. माझ्या पद्धतीने जसं जगता येईल तसं जीवन जगले. आता या जीवनाचा.. माणसं मारण्याचा उबग आलाय.. शांतपणे जीवन जगायचे आणि मग ठरवलं की तुला भेटावं आणि मग पोलिसांना शरण जाऊ. सगळे गुन्हे कबूल करावे." रीना शांत होत समोरच्या ताटातलं आवडीने खाऊ लागली. बाहेर पाऊस कोसळण्याचा आवाज वाढू लागला होता.
इकडे पोलोमिला मात्र समोर वाढलेले काही दिसत नव्हतं. खरी मनोरुग्ण कोण... आपण.. रीना...
आणि कोण. त्याचा विचार सारखा मनात येत होता.
# योगेश साळवी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा