गुरुवार, ३० एप्रिल, २०२६

2771. आईस्क्रीम

 "अरे लोकं हसतील तुमच्या या निर्णयाला कळलं ना, बघा अजुनही कळवून टाका आमचा निर्णय बदलला आहे आम्ही येऊ शकत नाही. सुमन मावशीचं वाक्य ऐकुन दरवाज्यात चौकटीवर मोठा फुगा बांधण्यासाठी चढलेला तो एकदम उतरला आणि मावशी समोर जाऊन म्हणाला,"मावशी प्लिज हं आमचा निर्णय पक्का आहे आणि आम्ही तुला आमच्या आनंदात सहभागी व्हायला बोलावलंय त्यामुळे प्लिज तू आता काही सल्ले देऊ नकोस ना." त्यावर मावशी म्हणाली,"बरं बाबा नाही बोलत मला काय आम्ही रक्ताचे म्हातारा म्हातारी कधी कधी जड होतो आमच्या लेकरांना आणि तुम्ही उपरे आणायचा विचार करता म्हणून म्हटलं एकदा सुचवून पाहावं,.."
      त्यावर क्षिप्रा मावशींजवळ येऊन म्हणाली,"तुम्ही नका काळजी करू मावशी आम्ही सगळा नीट विचार करून माहिती काढून हे सगळे निर्णय घेतले आहेत,..अहो 'सावली' हे वृद्धाश्रम अविच्या मित्राच्या बाबांचं आहे..,बऱ्याच वर्षांपासुन चालवतात ते. त्यामुळे सगळी माहिती व्यवस्थित  मिळवली आहे."
     मावशी म्हणाल्या,"करा तुमचं ठरलंय तसं निघा आता वेळ झाली तुमची मी औक्षणच ताट करून ठेवते,...."
   अवि आणि क्षिप्रा सावली वृद्धाश्रमात आले,..ऑफिसमध्ये ते दोघे आपलं सामना घेऊन बसलेले होते,..ह्यांना बघून एकदम चेहर्यावरील ताण कमी झाला त्यांच्या तेव्हां व्यवस्थापक म्हणाले."बघा आले कि नाही तुम्हाला वाटत होतं निर्णय बदलला कि काय?"
     काही कागदोपत्री सह्या झाल्या तसंही ती दोघे स्वयं खुशीने तिथे राहायला आलेली होती,...मुलं बाळ नाहीत असं आधीच प्रवेशाच्या फॉर्ममध्ये लिहून दिलेलं होतं आणि तसेही अवि माहितीतील असल्याने संस्थाचालकांनी ह्यांना संस्था सोडायला सहमती दर्शवली होती,..ते चौघे ऑफिसातून बाहेर पडले तेंव्हा बाकड्यावरचे थकलेले अनेक डोळे त्यांना नव्या आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा देत होते,..बायका पदराने अश्रू टिपत होत्या आजुबाजुच्या अनेक खिडक्यांमधून उत्साही,काही थकलेले तर काही उठताही येत नसल्याने पेंगुळलेले हात त्यांना टाटा करून निरोप देत होते,..आयुष्याची एक नवी सुरुवात होऊ घालत होती,..गेटच्या बाहेर येताच गाडीचा दरवाजा उघडुन अवि आणि क्षिप्राने कमरेत वाकुन सन्मानाने त्यांना आत बसण्याचा ईशारा केला,..ते दोघे जरा बुजले त्याक्षणी कारण त्यांनाही हा निर्णय घ्यायला फार विचार करावा लागला होता,..पण अवि आणि क्षिप्राच्य विचारां वरून त्यांनी हा निर्णय घेतला होता खरंतर आजींनी यात जास्त पुढाकार घेतला होता हे दोघांना लक्षात आलं होतं,..
   क्षिप्रा आता खिडकीतुन बाहेर बघत होती,..तिला महिनाभरापूर्वीचा प्रसंग आठवत होता,.. अविच्या वाढदिवसानिमित्त त्याने आश्रमात सकाळी जेवण आणि चार वाजता आईस्क्रीम पार्टी ठेवली होती,..हॉलमध्ये सगळे वृद्ध जमले होते ..अविला सगळ्यांनी टाळ्या वाजवत शुभेच्छा दिल्या आणि सगळे लहान होऊन त्या आईस्क्रीम वर ताव मारत होते,..वृद्धाश्रमात बऱ्याच गोष्टी बाहेरचे लोकं देतात,... कधी फळ,कधी बिस्कीट,गोड पदार्थ,औषधी,कपडे असं बरंच काही आणि एक मात्र खरं वृद्धावस्थेत थोडंसंच पण वेग वेगळं बऱ्याचदा खावं वाटतं पण ते काही हक्काचं घरं थोडीच बऱ्याच इच्छा माराव्या लागतात,..ज्याच्या जवळ पैसे ते जवळपास मिळत असेल तर आणुन खातात पण बाकीचे गप्प बसतात,..तसं उन्हाळ्यात आईस्क्रीमचं होतं असेल कारण आजच्या ह्या खाऊला कोणीच नाही म्हंटल नाही,..गारेगार,गोड आईस्क्रीम थकलेल्या सुरकुतलेल्या गळ्यातून खाली जात होतं एक छान आत्मीय आनंद सगळेच घेत होते,..अगदी चाटून पुसून सगळ्यांनी कप रिकामे केले होते,..त्यांनंतर अशी पार्टी देणाऱ्याचे संस्थेकडून आभार मानण्याची प्रथा होती,..ती जबाबदारी नेमकी साने आजींची होती,..आयुष्यभर शाळेत शिक्षक राहिलेल्या आजी ती आनंदाने पार पाडत,..संस्थाचालक आजींना म्हणाले,"आजी आईस्क्रीम वर थोडं बोला आणि छान गोड आभार माना आपल्या अविचे,.."
      आजींनी माईक ताब्यात घेतला,.."आजी मिश्किल पणे आपल्या सगळ्या मित्र मैत्रिणींना म्हणाल्या,"आता कसं वाटतंय?"हॉलमध्ये जोरजोरात आवाज आला"गार गार वाटतंय,.."आजी हसत म्हणाल्या,"बस असंच गार गार रहायचं आयुष्यात,.. स्वीकार करायचा जगण्याचा प्रवास,..
आईस्क्रीम सारखा...दुधाला उकळी,परत गार परत घुसळून इतर सामग्री ते स्वतःत सामावून घेत आणि  फ्रिजचा स्विकार करून बसतं बर्फात थंड होऊन,..त्याचा शेवट स्थितप्रज्ञ होण्याचा आणि इतरांना गार आनंद देण्याचा,..मला आवडतो म्हणुन उरलेल्या आयुष्याच्या तक्रारी नको करत बसायला,..आपण इथे का,लेकरं असे का निघाले?,..संस्कार कुठे चुकले ?आमच्या सोबतच का घडलं?हे प्रश्न सोडुन हे वृद्धाश्रम फ्रिज म्हणून स्वीकारावं आणि बसावं मस्त आईस्क्रीम होऊन,..
आपल्यासाठी इथेही किती छान उपक्रम आहेत,....इथल्या झाडांना लेकरं समजून दत्तक घ्या,..इथले कर्मचारी जीव लावतात आपल्याला त्यांना प्रेम द्या ज्यांना काळजी नाही त्यांच्यासाठी कशाला जीव जाळायचा?एक वाक्य फार छान आहे 
"Life is ice cream enjoy it before melt.."आपल्या उतारवयाला अगदी योग्य वाक्य आहे हे,..बरं माझं आपलं सुरू झालं लेक्चर आपल्या पाहुण्यांचे आणि अशी गारेगार पार्टी देणाऱ्याचे खरंच आभार,..हॉलमध्ये टाळ्या वाजत राहिल्या,..
        घरी आल्यावर आपलं आणि अविच एक मत झालं,..अविच्या मोठ्या भावाने घरात गळफास लावून घेतल्या पासुन छोटी चिऊ काही केल्या खुलत नव्हती,बुजरी,घुमी होत चालली होती,..मानसोपचार तज्ञांच्या मते घरात आणखी कोणी माणसे असतील तर कदाचित बोलेल,..आजी आजोबा अशी मायेची माणसं असतील तर बोलावून घ्या,..तेंव्हा दोघांच्या डोळ्यात खळकण पाणी आलं कारण चिऊला दोन्हीकडचे आजी आजोबा नव्हते,..त्यादिवशी पासुन विचारचक्र सुरू होतं ते थांबलं साने आजींना बघुन,.. दोघांनी मित्राच्या वडिलांकडे चौकशी केली,..तेंव्हा कळलं...आजी आजोबा दोघे आहेत आणि पोटच्या सुंदर मुली एका मवाल्याने काही वर्षांपूर्वी मारल्या आहेत,..मोठीने प्रेमाला नकार दिला म्हणून तिच्यावर चाकू हल्ला झाला आणि तिला वाचवणाऱ्या दुसरीला त्याने सम्पवून टाकलं,..साने जोडप्याच आयुष्य क्षणात नेस्तनाबूत झालं होतं,..त्यामुळे साने आजोबा शॉक मध्ये होते पण त्यांना माणसात आणण्याच काम बाईने जिद्दीने केलं होतं,..स्वखुशीने इथे प्रवेश घेतला,...एकलकोंड आयुष्य नको म्हणाल्या,..माणसात जगु कोणाला हसवता आलं,समजवता आलं,कोणाला काही शिकवता आलं तर तसं राहू इथे त्यांच्या वयाची सगळी टिम भेटली हळूहळू जख्मेवर खपली चढली आपल्या पेक्षा कठिण दुःख घेऊन जगणारी माणसं दिसली,..दहा एक वर्ष झाले इथे आहेत त्या,..अविने जीभ रेटून विचारलं त्यांना ते तयार असतील तर मला त्यांना माझ्या घरी आणायचं आहे कायमचं,.. काका हसुन म्हणाले,"अरे मुल दत्तक घेतात तू तर आई वडिल दत्तक घेतो का..?"त्यावर अवि म्हणाला ,"तस समजा हवं तर त्यांना उद्या भेटायला येतो तुम्ही विषय काढून बघा आणि कळवा मला,.."त्यांनंतर काही तासात फोन आला होता,..या उद्या भेटायला,..आपण खोलीत गेलो तर किती छान, स्वच्छ खोली दोघेही अगदी प्रसन्न,..अविने सगळी परिस्थिती सांगितली आणि शेवटी तर त्याने पायच धरले दोघांचे माझ्या लेकीसाठी हो म्हणा,..आपण सगळे एकमेकांचा आधार होऊन राहू,..आजी म्हणाल्या,"खरंतर काहिही स्वीकारायला मन आता तयार असतं कारण हे सगळं लिखित घडत असतं विधात्याच्या मनात असावं कदाचित... येतो आम्ही पण एक लक्षात ठेवा ज्याक्षणी तुम्हाला वाटेल आम्ही नको तुमच्या संसारात तेंव्हा मोकळेपणी सांगा,..तुम्हाला दडपण नको आणि आम्हाला उपकार नको,.."असं म्हणत सगळं ठरलं आणि आज हा दिवस उगवला,....चिऊला तर मोठं सरप्राईज आहे,..तेवढ्यात घर आलं,..क्षिप्रा चटकन उतरून घरात पळली,..पाय धुवून मावशीने तयार केलेलं औक्षणच ताट घेतलं,..चिऊला हाक मारली चल ये हा फुगा तू फोडणार आहेस ना आजी आजोबा आलेत,..चल म्हणत तिला खुर्चीत उभं केलं,..अवि दोघांचं सामान घेऊन त्यांना घेऊन आला,..क्षिप्राने औक्षण केलं,..चिऊने फुगा फोडला दोघांनी सुरकुतल्या डोळ्यांनी हसत वर बघितलं टाळ्या वाजवत हसणारी चिऊ,..आजीने पटकन जवळ घेतलं तिला,.. लेकीला मिळणारी मायेची ऊब दुरूनच अवि आणि क्षिप्राने अनुभवली,..हसुन स्वागत झालं,..आजी आजोबाला बोट पकडून खोली आणि घर दाखवून झालं,..चिऊ म्हणाली,"आता आजी तुझ्या आवडीचा खाऊ,..आई दे ना ग सगळ्यांना,.."क्षिप्रा मस्त आईस्क्रीमचे बाऊल  घेऊन आली,..अवि म्हणाला,"आपलं नवं आयुष्य भरभरून जगु या एकमेकांना आधार देऊ,..जगण्याचा आनंद घेऊ या,.."आजी आजोबा म्हणाले ,"हो नक्की पण ते विरघळण्याच्या आधी,..life is ice cream enjoy it before melt,.."
   वाचकहो कथा कशी वाटली नक्की कळवा. धन्यवाद.

©स्वप्ना मुळे (मायी) छ.संभाजीनगर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...