भरदुपारी रणरणत्या उन्हात तो बाहेर घुटमळत फिरत राहिला. कुठं जायचं नसताना असं निरर्थक फिरत राहायचं म्हणजे.
तशी त्याला त्याची सवय होती. कधी विचार टाळायला, कधी स्वत:चे प्रश्न टाळायला तो असा फिरत राहायचा. पण आज घराबाहेर राहणं त्याची मजबुरी होती.
चोविसाव्वा वाढदिवस नुकताच पार पडलेला. आणि ‘आता पुढं काय?’ ह्या त्याच्या मनातल्या प्रश्नांचा संसर्ग जवळच्या लोकांना व्हायला लागला होता.
बाबा बोलून दाखवत नव्हते, धाकटी धीर देत होती आणि आई?
आई म्हणजे सावत्र आई बरं का…! म्हणायला सावत्र. कोडकौतुक करायचा तिचा स्वभाव नसला, तरी तसा जाचही तिनं केला नाही कधी. उलट अबोल राहून अंतर राखून मायाच केली. याची त्यालाही जाणीव होती. आई सावत्र म्हणून मामाही सावत्र. पण त्यानं सुद्धा सख्ख्या मामासारखंच नातं जपलं.
पण तरी आई गेल्याचा आघात त्याला फार लहानपणी सोसावा लागला. बाबांशी तसा संवाद नव्हताच. त्यात त्यांना दुसरं लग्न करावसं वाटलं, त्यामुळं ते अधिकच चोरट्यासारखं करायला लागले. दोन्ही आत्यांनी सावत्र आईच्या येण्याची अशी अनामिक भिती घालून ठेवली.
धाकटी आत्या तर त्याला आपल्या घरीच न्यायचं म्हणत होती. अर्थात, ती न्यायचं म्हणाली तरी हा जायला तयार व्हायला हवा ना…! अडून राहण्यासारखं इथं काहीच नव्हतं असं आत्याला वाटत होतं, पण त्याचा जीव जडला होता…
प्रेम म्हणजे काय? कुणी आवडणं म्हणजे काय? ओढ वाटणं म्हणजे काय? हे काही कळत नसताना तो ते अनुभवत होता.
ती त्याच्यापेक्षा तीन वर्षानी लहान. एकुलती एक. लाडावलेली. पण ती सुद्धा याला बघून पाघळल्यासारखी व्हायची. याची आई गेली तेव्हा धीर करून ही त्याला भेटायला पहिल्यांदा आली; ती पहिली समोरासमोर झालेली भेट. तो लहान होता. तर ती किती लहान असेल… पण त्याला तिचाच आधार वाटला. तिला समोर बघून तो मुसमुसत रडला… रडत राहिला. ती शहाण्या मुलीसारखी त्याला थोपटत राहिली.
आत्या म्हणाली, “काल-परवापासून काही खाल्लेलं नाहीये यानं. जरा दूध प्यायला लाव!” तिच्या शब्दाखातर त्यानं दुधाचा ग्लास ओठाना लावला होता.
बाबा दुसरं लग्न करतायत, हे जेव्हा कानावर आलं, तेव्हा सगळ्यात आधी त्यानं तिलाच सांगितलं. तिनंही सगळं शांतपणे ऐकून घेतलं होतं. आता तो तिच्या घरी अधनंमधनं जायला लागला होता. आईविना पोर म्हणून तिच्या घरी याला कधीही प्रवेश होता.
तिची आई सुद्धा मायेनं वागायची. या दोघांच्या मनात असा गोफ विणला जात असेल, याची कुणालाच म्हणजे त्या दोघांनाही कल्पना नव्हती. तिच्या आईच्या दृष्टीनं तो जवळ राहणारा गुणी, आईविना पोरका मुलगा होता.
“बाबा दुसरं लग्न करतायत तर करू दे.” असं ती समजुतदारपणे म्हणाली होती. ती कशीही वागली तरी आपण चांगलच वागायचं, असं त्या दोघांनी तेव्हा ठरवून टाकलं. जणू लग्न करून आपण पुढं त्याच घरी जाणार आहोत, हे तिला आधीपासून माहीत होतं.
दुसरी आई आली. तिला बाळ झालं आणि तिच्यामुळं त्याला धाकटी बहीण मिळाली. ही दुसरी आई शिस्तीची होती. अबोल होती पण वाईट नक्कीच नव्हती. तिला चांगलं म्हटलं, की दोन्ही आत्यांना राग यायचा. “मग कळेल तिचा चांगुलपणा.” असं त्या खवचटपणे म्हणायच्या.
पण आत्ता आत्तापर्यंत आई चांगलीच वागत आली होती. धाकटीसाठी तर ‘दादा’ म्हणजे जीव का प्राण होता. मधे तो शाळेच्या टूरला गेला तर धाकटीनं दोनच्या वर ताप घेतला होता !
आईमुळं तिचं घरी येणं राजरोसपणे सुरू झालं; कारण आई संस्कृतचे क्लासेस घ्यायची आणि नशिबानं तिचं संस्कृत कच्चं होतं. ती यायला लागली, मग थांबायला लागली, मग रमायला लागली. आईच्या काही लक्षात येत नव्हतं असं नाही, पण बोलायचा तिचा स्वभाव नव्हता.
आणि हेही दोघे कधी इतकंसंही वावगं वागायचे नाहीत. मामा तर तिला सुनबाईच म्हणायचा. आईला ते मात्र आवडायचं नाही. “पुढं काय होणार आहे कोण जाणे? अशानं आपणच मुलाना फूस लावतो…” असं ती म्हणायची पण आईलाही ती आवडायची.
आई शिस्तीची म्हणून याचं शिक्षण नीट पार पडलं. तो पदवीधर झाला. तीही शिकत होती. तिला सुद्धा शिकून-सवरून संस्कृतची प्रोफेसर व्हायचं होतं. आईची ती लाडकी विद्यार्थिनी होती. “तुझ्याकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत,” असं आई तिला म्हणायची.
‘माझ्या पण अपेक्षा आहेत…’ असं हा मागनं डोळ्यांनी बोलायचा. ती मुक्यानं मान हलवायची.
सगळं मनासारखं पार पडत होतं; पण त्यात तो रमत नव्हता. त्याला वेगळंच काहीतरी करायचं होतं. आईच्या धाकानं त्यानं कधी आपले खरे विचार, खरे बेत सांगितले नाहीत; नाहीतर त्याला इंडस्ट्री जॉईन करायची होती. उत्तम दिग्दर्शक म्हणून नाव कमवायचं होतं.
“पदवीधर हो आणि काय हवं ते कर…” असं मामा तेव्हा म्हणाला होता; पण आता त्यानं आपला विचार बोलून दाखवल्यावर मात्र आईनं तर स्पष्ट सांगितलं, “सोन्यासारखं आयुष्य भिरकवायला निघालायस…!”
पण ‘तिचं’ मात्र काहीच म्हणणं नव्हतं. “तुला हवं ते तू कर…” असं ती म्हणाली. आणि याचा स्ट्रगल सुरू झाला. माळ्यावरची जुनी ट्रंक भर उन्हात नेऊन झटकावी आणि अचानक उघड्यावर पडलेल्या झुरळांची कशी तारांबळ उडते तसं त्याचं झालं.
तो हवालदिल होऊन गेला. आईला शिस्त प्रिय आणि याच्या वागण्याला काही शिस्तच राहिली नाही. नक्की याचं काय चाललंय, हे कळायला मार्ग नव्हता. बाहेर कुणाला विचारायची सोय नव्हती. स्ट्रगल किती आणि किती वेळ करावा लागेल, याची शाश्वती नव्हती.
‘हा वाया गेला…’ अशी ओरड आधी त्याच्या आत्यांनीच केली. मग असं गृहीतच धरलं गेलं. धाकटीला शुटींगचे किस्से सांगितलेले आईला आवडायचं नाही आणि नेमकी ती तेच विचारायची. त्यात त्याच्या एका मित्रानं ‘धाकटी काम करेल का?’ विचारल्यावर तर आईचा पाराच चढला.
वाद झाला. विकोपाला गेला आणि हा दुसरीकडे पेईंग गेस्ट म्हणून राहायला लागला. त्यात त्याच्याबद्दल रोज नवी कहाणी सांगणारेही कमी नव्हते. त्यात त्याचं नाव योशिता कुंवर सोबत जोडलं गेलं. कधी नाही ते हिचाही विश्वास डळमळीत झाला.
थोडासा वाद झाला. बेफिकिर वागायची सवय झालेली. त्यानं त्या नादात तिलाही उडवून लावलं. दोघांचं भेटणं बंद झालं, बोलणं बंद झालं. मग काही दिवसानी धाकटी आजारी पडली. तिनं ‘दादा’चा ध्यास घेतला. धाकटीपुढं कसला आलाय मान-अपमान?
चंबूगबाळं आटोपून तो परत घरी आला. धाकटीला दिलासा मिळाला. आई-बाबांनाही बरं वाटलं; पण ‘ती’ दिसेना. ना गल्लीशी, ना नाक्यावर… मग धाकटीनं सांगितलं, “तिच्या बाबानी मॉडेल टाऊन मधे बंगला घेतलाय…”
मॉडेल टाऊन मधे बंगला… हे दोघांनी पाहिलेलं स्वप्न होतं. असो…
तो घुम्या झाला. त्यात थोडे दिवस गेले आणि तिचं लग्न ठरत असल्याची खबर मिळाली ! काल तिचा फोन आला… इतक्या दिवसानी. कशासाठी? तर, “मला बाईंनी घरी बोलावलंय, तर प्लीज तू घरी राहू नकोस.”
“मी कुठं जाऊ?” त्यानं हळवं होत विचारलं होतं.
“कुठंही जा…” ती कोरडेपणानं म्हणाली, “इतके दिवस भटकलास, ते काय मला विचारून? मी फार वेळ बसणार नाही, फार तर अर्धा तास… मग तू ये. हवं तर मी निघाल्यावर धाकटीला तुला फोन करायला सांगते.”
म्हणून धाकटीच्या फोनची वाट बघत तो भर उन्हाचा भटकत होता, घुटमळत होता. उगाचच तिच्या वरचा राग मनात खदखदत होता.
‘आयला ही समजते काय? मॉडेल टाऊन मधे राहायला गेली, तर काय राणी झाली? ही घरी येणार म्हणून मी बाहेर फिरायचं? मी काय पाप केलंय की गुन्हा केलाय? लग्न तू जमवलंस…!’ असं म्हणता म्हणता त्याचं मन फितूर झालं. ‘दोष तुझाच आहे’ असं त्याला निक्षून म्हणालं, ‘ती बिचारी किती समजून घेत होती; आपणच अशी बेभरवशाची लाईन निवडली त्यात तिचा काय दोष?’
अचानक तो अगतिक झाला. ‘धाकटीचा फोन वाजायच्या आत आपण घर गाठूया; म्हणजे निदान ती जाताना तरी दिसेल…’ असं म्हणत तो पायात त्राण नसताना थकल्या जीवानं घरी धावला.
तो घरी आला, तर ती येऊन गेली होती. कपबशा, डिशेश तशाच पडल्या होत्या. तो हिरमुसला. चिडायचं म्हणून धाकटीवर चिडत म्हणाला, “तिनं तुला सांगितलं होतं ना? ती गेल्यावर मला फोन करायचा म्हणून…”
त्याला अडवत धाकटी म्हणाली, “उगीच वेड्यासारखा चिडू नकोस. मी काय सांगते ते ऐक. आईनं तिला मुद्दामच बोलावून घेतलं होतं. तिचं लग्न ठरतंय, हे खरंय; पण आईनं तिला बजावून सांगितलंय, ‘निमूट माझ्या मुलाशी लग्न कर. तोच तुला योग्य आहे. मी माझ्या मुलाला चांगलं ओळखते. आज ना उद्या त्याचा जम बसेल आणि मुलींच्या बाबतीत तो किती येडपट आहे हे मी तुला सांगायला नको.”
तो चाचरत म्हणाला, “आई कुठंय…?”
धाकटी म्हणाली, “मामा-मामीला सोबत घेऊन तिला मागणी घालायला गेलीय. तिचे आई-बाबा काही आपल्या आईच्या शब्दाबाहेर नाहीत… माहितीये? निघताना आईनं तिची ओटी सुद्धा भरली!”
अचानक आभाळ भरून आलं की कसं होतं…? आपल्या नायकाचं तसं झालं !
चित्रपटात शोभेल असा एक प्रसंग त्याच्या आयुष्यात अवचित घडला होता. प्रसंग दिग्दर्शित करणं एकवेळ सोपं; पण तो फेस करणं किती कठीण, हे तो आत्ता अनुभवत होता.
- चंद्रशेखर गोखले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा